Leading International Marathi News Daily

शनिवार, २८ फेब्रुवारी २००९

क्रीडा

अखेरच्या चेंडूवर न्यूझीलंडची सरशी * ब्रँडन मॅक्युलमचा आणखी एक दणका
वेलिंग्टन, २७ फेब्रुवारी/वृत्तसंस्था
अखेरच्या चेंडूपर्यंत रोमहर्षक ठरलेला ‘ट्वेन्टी-२०’ क्रिकेट सामना अखेर न्यूझीलंडने जिंकली. भारताचे १५० धावांचे आव्हान मॅक्युलमच्या धावांच्या अभेद्य खेळीमुळे न्यूझीलंडने अखेरच्या चेंडूत पार केले. इरफान पठाणने आपल्या तिसऱ्या षटकांत घेत दोन सलग चेंडूवर बळी घेऊन केलेली चुरस भारताने अखेरच्या चेंडूपर्यंत कायम ठेवली. अखेरच्या षटकात १२ धावांची न्यूझीलंडला गरज होती. पहिल्या ३ चेंडूत अवघ्या ३ धावाच भारताने दिल्यानंतर विजय भारताच्या बाजूने झुकला होता. पण अखेरच्या षटकातील इरफान पठाणचा चौथा चेंडू फुलटॉस पडला. मॅक्युलमने तो मिडऑन सीमारेषेपलिकडे पाठविला. त्यानंतरचा सरळ पठाणच्या डोक्यावरून सीमेपलिकडे मारला. या दोन चौकारांनंतरही भारताचे आव्हान कायम होते.

युवी व युसूफ बाद झाल्यामुळे मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश -धोनी
वेलिंग्टन, २७ फेब्रुवारी/ वृत्तसंस्था

युवराज सिंग व युसुफ पठाण हे दोघे पाठोपाठ बाद झाल्याने भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. तेथेच आम्ही सामना गमावला, अशी प्रतिक्रिया भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने व्यक्त केली.
सामना संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना धोनी म्हणाला, की युवराज-युसुफ हे दोघे डावाच्या मध्यभागी बाद होणे भारताला फारच महागात पडले. असे असले तरी गोलंदाजांना सामना भारताच्या बाजूने फिरविणे शक्य होते. मात्र वेगवान गोलंदाजांना ती कामगिरी जमली नाही.

..अखेर त्या वादग्रस्त सामन्यातून सचिनची माघार!
वेलिंग्टन, २७ फेब्रुवारी/ वृत्तसंस्था

इंडियन क्रिकेट लीगमध्ये गतवर्षी खेळलेल्या एका खेळाडूच्या समावेशामुळे वादग्रस्त ठरलेल्या प्रदर्शनीय सामन्यातून सचिन तेंडुलकर याने आज अखेरच्या क्षणी माघार घेतली.
न्यूझीलंड क्रिकेट असोसिएशन व ऑस्ट्रेलिया क्रिकेट असोसिएशन यांच्यात आज हा प्रदर्शनीय सामना आयोजित करण्यात आला होता. या सामन्यात न्यूझीलंड क्रिकेट असोसिएशन संघाकडून हॅमिश मार्शल हा खेळाडू खेळणार होता. मार्शल हा गेल्या वर्षी भारतात झालेल्या इंडियन क्रिकेट लीगच्या (आयसीएल) स्पर्धेत रॉयल बेंगाल टायगर संघाकडून खेळला होता.

मावळत्या कर्णधार जयवर्धनेला विजयाची भेट देण्यास श्रीलंका उत्सुक
जय.. हो!
लाहोर, २७ फेब्रुवारी / एएफपी
मावळता कर्णधार महेला जयवर्धनेला विजयाची भेट देण्याच्या निर्धाराने श्रीलंकेचा संघ रविवारपासून सुरू होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या आणि अखेरच्या कसोटी सामन्यात उतरणार आहेत.
३१ वर्षीय जयवर्धनेने श्रीलंकेचे नेतृत्व करताना २७ कसोटी सामन्यांपैकी १५ जिंकण्याची किमया साधली आहे. तर सात पराभव आणि पाच सामने अनिर्णित राखले आहे. परंतु फलंदाजीकडे लक्ष केंद्रित करता यावे याकरिता चालू मालिका संपल्यानंतर कर्णधारपदही सोडणार असल्याचे जयवर्धनेने आधीच जाहीर केले होते.

ऑस्ट्रेलियाच्या ४६६ धावांपुढे द. आफ्रिकेची डळमळीत सुरुवात
मार्कस नॉर्थचे पदार्पणात शतक
जोहान्सबर्ग, २७ फेब्रुवारी/वृत्तसंस्था
न्यू वॉन्डर्स स्टेडियमवरील पहिल्या क्रिकेट कसोटीत ४६६ धावांची मजल मारणाऱ्या ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसाअखेर यजमान दक्षिण आफ्रिकेची ३ बाद ८५ धावा अशी अवस्था केली आहे.
कसोटी शतक हुकलेल्या मिशेल जॉन्सनने डावातील पहिल्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर कर्णधार स्मिथचा बळी मिळवत दक्षिण आफ्रिकेला पहिला धक्का दिला. दुसऱ्या षटकात हिल्फेनहॉसने अमलाला बाद करून आणखी एक हादरा दिला तर कसोटी क्रिकेटमधील १० हजार धावांचा पल्ला गाठणारा जॅक कॅलिस (२७) सिडलच्या गोलंदाजीवर बाद झाला.

राज्याच्या क्रीडा संचालनालयास वालीच नाही?
पुणे, २७ फेब्रुवारी/क्रीडा प्रतिनिधी

राज्याचे क्रीडासंचालक लक्ष्मीकांत देशमुख हे कोल्हापूर येथे जिल्हाधिकारी या पदावर रुजू होऊन १५ दिवस झाले तरी अद्याप क्रीडासंचालकपदावर कोणाचीही नियुक्ती झालेली नाही.
देशमुख यांच्या जागी सांगलीचे जिल्हाधिकारी राजेंद्र चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली होती, मात्र जिल्हाधिकारी पदापेक्षा क्रीडासंचालकपद कमी दर्जाचे असल्यामुळे चव्हाण यांनी हे पद स्वीकारण्यास नकार दिला होता व अन्य चांगले खाते द्यावे, अशी विनंती केली होती. त्यांची विनंती मान्य होऊन त्यांची सहकार आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे क्रीडासंचालकपदावर अद्याप कोणाचीही नियुक्ती करण्यात आलेली नाही.

इंग्लंडची दमदार मजल
कॉलिंगवूडचे शतक हुकले बोपाराचे अर्धशतक
ब्रिजटाऊन, २७ फेब्रुवारी / एएफपी

कर्णधार अ‍ॅन्ड्रय़ू स्ट्रॉसचे मालिकेतील दुसरे शतक, पॉल कॉलिंगवूडचे हुकलेले शतक आणि रवि बोपाराच्या अर्धशतकाच्या बळावर इंग्लंडने वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी उपाहारानंतरच्या तासाभराच्या खेळात ५ बाद ५१६ अशी दमदार मजल मारली.
१४२ धावांच्या खेळीसह कारकिर्दीतले १६वे कसोटी शतक झळकावणाऱ्या स्ट्रॉसचा पहिल्या दिवशीच पॉवेलने त्रिफळा उडविला.

लिनारेस बुद्धिबळ : आनंदला ग्रिसच्युकने बरोबरीत रोखले
लिनारेस (स्पेन), २७ फेब्रुवारी / पीटीआय

विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदने येथे सुरू असलेल्या मॅजिस्ट्रल क्युदाद डी लिनारेस बुद्धिबळ स्पध्रेच्या सातव्या फेरीत रशियाच्या अ‍ॅलेक्झांडर ग्रिसच्युकला बरोबरीत रोखून संयुक्तपणे चौथे स्थान कायम राखले आहे. आठ अव्वल बुद्धिबळपटूंच्या सहभागानिशी दुहेरी राऊंड रॉबिन पद्धतीने चालणारी ही स्पर्धा अध्र्यावर येऊन ठेपली असताना भारताच्या आनंदच्या खात्यावर ३.५ गुण जमा आहेत.
सातपैकी पाच गुणांच्या कमाईनिशी ग्रिसच्युक सध्या आघाडीवर आहे. आनंद अर्मिनेच्या लेव्हॉन अरोनियनसोबत संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहे. युक्रेनच्या व्हॅसली इव्हानच्यूकने त्याला पराभूत केले. स्पध्रेतील हा त्याचा सलग दुसरा पराभव आहे. इव्हाच्युकसोबत नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन चार गुणांसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानावर आहे. कार्लसनने अझरबेजानच्या तैमूर राजडाबोव्हला बरोबरीत रोखले. क्युबाचा लेनियर डॉमिनग्युएझ सहाव्या तर चीनचा वांग यू आणि तैमूरचा राजडाबोव्ह २.५ गुणासंह संयुक्तपणे सातव्या स्थानावर आहेत. आनंदविरुद्धच्या लढतीत ग्रिसच्युकने राजाच्या प्याद्याने प्रारंभ केला. या प्रायोगिक पावलानंतर ग्रिसच्युकने तिसऱ्या चालीला ग्रुनफेल्ड बचावपद्धतीचा वापर केला. तथापि, आनंदने किंग्ज इंडियन बचावाऐवजी सॅमिच आक्रमणाचे हत्यार उगारले. या स्पध्रेत किंग्ज इंडियनला चांगले यश लाभल्याचे पाहावयास मिळत आहे. अखेर ३२ व्या चालीला दोघांनीही बरोबरी मान्य केली.

मादाम तुसाँच्या कलादालनात मेणाचा सचिन
मुंबई, २७ फेब्रुवारी/क्री.प्र.

लंडनच्या मेणाच्या पुतळ्यांचे संग्रहालय असलेल्या मादाम तुसाँ यांच्या कलादालनात भारताचा लिटल मास्टर क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा पुतळा लवकरच पाहायला मिळणार आहे. मादाम तुसाँच्या प्रसिद्धीप्रमुख लिझ एडवर्डस् यांनी सचिन तेंडुलकर याच्या मेण्याच्या पुतळ्याची लवकरच कलादालनात भर पडणार असल्याचे सांगितले. चित्रपट कलावंत अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, शाहरूख खान व सलमान खान यांचे मेणाचे पुतळे या भारतीयांचे कलादालनात आहेत. क्रिकेटपटू ब्रायन लारा आणि शेन वॉर्न या क्रिकेटपटूंचेही मेणाचे पुतळे या कलादालनात आहेत. मादाम तुसाँ यांच्या स्टुडियोचे कलाकारांनी नुकतीच सचिन तेंडुलकर यांची मुंबईत भेट घेऊन मेणाचा पुतळा बनविण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींची पूर्तता केली होती.

गौतम गंभीर कोकाकोलाचा ब्रॅन्ड अ‍ॅम्बॅसेडर
मुंबई : कोकोकोला ओपन हॅपिनेस या मोहिमेच्या प्रसारासाठी कोकाकोला कंपनीने ब्रॅन्ड अ‍ॅम्बॅसेडरपदी भारताचा यशस्वी सलामीवीर गौतम गंभीर याची निवड केली आहे. अमेरिकेमध्ये यशस्वी पद्धतीने ही मोहीम राबविल्यानंतर भारतातही याची झोकात सुरुवात व्हावी म्हणून गंभीरची नियुक्ती करण्यात आल्याचे कोकोकोला कंपनीने सांगितले. यावेळी गंभीर म्हणाला की, कोकोकोलाशी जोडला गेल्याचा आनंद काही वेगळाच आहे. कोकोकोला हे नेहमीच समाधान व आनंदाचे क्षण देत आले असून येत्या काळात चांगल्या इनिंग्जचा अनुभव येईल.

जागतिक शांततेसाठी क्रिकेट सामने
मुंबई, २७ फेब्रुवारी/प्रतिनिधी

सद्गुरु मंगेशदा क्रियायोग फाऊंडेशनतर्फे ‘क्रिकेट फॉर वर्ल्ड पीस’ या संकल्पनेअंतर्गत येत्या रविवारी क्रिकेट सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ला, सध्याचा जागतिक मंदीचा काळ या निराशाजनक व नकारात्मक वातावरणात समाजाला सकारात्मक भावनेने प्रेरीत करण्याच्या उद्देशाने या सामन्यांचे आयोजन करण्यात आले आहे. कॉर्पोरेट जगतातील अनेक कंपन्या या उपक्रमात सहभागी होणार असून फाऊंडेशनचे संस्थापक श्री श्री मंगेशदा हेसुद्धा या वेळी उपस्थित राहणार आहेत. अंधेरी (पूर्व) येथील होली फॅमिली शाळेच्या मैदानावर सकाळी ७.३० पासून हे सामने सुरू होणार आहेत.