Leading International Marathi News Daily

शनिवार, २८ फेब्रुवारी २००९

टी शर्टस्वर अवतरल्या मराठी काव्यपंक्ती..
ठाण्यातील भारतीय वस्त्र शिल्प या संस्थेने गेल्या वर्षी मराठी दिनी मराठी काव्यपंक्तींचा कल्पक वापर असणारे आकर्षक टी शर्टस् बाजारात आणले. उन्मेश जोशी, पिनाकिन रिसबुड आणि यजुवेंद्र गोरे या तीन ठाणेकर मराठी तरुणांनी फॅशन विश्वाला ज्ञानेश्वरांपासून कुसुमाग्रजांपर्यंत अनेक दिग्गज कवींच्या पंक्ती असणाऱ्या या टी शर्टस्ची दखल घ्यायला लावली. वर्षभरात ठाण्याबरोबरच मुंबई, पुणे, तसेच नाशिक येथील दुकानांमधूनही मराठीची ही टी पताका पोचली आहे. वर्धापनदिनानिमित्त या तरुणांनी काही नव्या काव्यपंक्ती नव्या डिझाइन्ससह बाजारात आणल्या आहेत. शुक्रवारी मराठी दिनी या नव्या टी शर्टस्सह उन्मेश आणि पिनाकिनने वृत्तान्तला अशी खास पोझ दिली.

मराठी दिनानिमित्त कल्याणमध्ये ग्रंथ प्रदर्शन आणि कुसुमाग्रज स्मरणयात्रा
ठाणे प्रतिनिधी

कल्याण येथील ओक हायस्कूलमध्ये मराठी दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन, तसेच ज्ञानपीठ पारितोषिक प्राप्त कवी कुसुमाग्रज स्मरणयात्रा आयोजित करण्यात आली होती. या प्रदर्शनात अनेक दुर्मिळ ग्रंथ मांडण्यात आले होते. विश्वस्त डॉ. फडके यांनी प्रदर्शनाचे उद्घाटन केले.

योगस्पर्धांमध्ये सुहासिनी ब्युटी हेल्थचे यश
ठाणे/प्रतिनिधी : गेल्या वर्षभरात विविध ठिकाणी आयोजित योगस्पर्धांमध्ये सर्वाधिक पदके पटकावून डोंबिवलीतील सुहासिनी ब्युटी हेल्थने ठाणे जिल्ह्यातील सर्वात बलाढय़ योगसंघ असा लौकिक मिळविला आहे.दहा वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या या संस्थेने यंदा वर्षांच्या सुरुवातीसच डोंबिवली ऑलिम्पिकमध्ये चार सुवर्ण, दोन रजत, एक कांस्य पदक पटकाविले. त्यानंतर मुंबई महापौर चषकात दुसऱ्या क्रमांकाचे सांघिक विजेतेपद मिळविले. नुकत्याच पार पडलेल्या ग्रेटर मुंबई योगासन चॅम्पियनशिपमध्ये दोन सुवर्ण, चार रजत आणि तीन कास्य पदके पटकावली.

उन्हाळ्याच्या सुट्टीत जंगल सफारी..
ठाणे/प्रतिनिधी : उन्हाळ्याच्या सुट्टीत निरनिराळ्या प्रदेशात भटकंती करण्याचा ट्रेंड हल्ली वाढू लागला आहे. विशेषत: निरनिराळ्या अभयारण्यांना भेट देऊन तेथील वन्यजीवन न्याहाळणे अनेकांना आवडू लागले आहे. या जंगल सफारीला जाताना मात्र काही नियम पाळावे लागतात. जंगलात विशिष्ट ड्रेस कोड लागतो. एरवी गडबड-गोंधळ करण्याच्या सवयीला थोडी मुरड घालून शांतपणे तेथील जीवन न्याहाळावे लागते. डोंबिवलीतील चैतन्य ट्रॅव्हल्स गेली काही वर्षे उन्हाळ्याच्या सुट्टीत नियमितपणे विविध अभयारण्यात जंगल सफारी आयोजित करीत आहेत. यंदा २५ मे रोजी बांधवगड आणि ३० मे रोजी कान्हा येथे जंगल सफारींचे आयोजन करण्यात आले आहे. कोणत्याही पॅकेज टुर्समध्ये असते, तशी राहण्या-जेवण्याची उत्तम सोय या सफारीत असतेच, पण त्यापेक्षा महत्त्वाचे जंगलाची उत्तम जाण असणारा गाईड पर्यटकांना या सफारीत आरण्यवाचन शिकवितो. सहकुटुंब अथवा ग्रुपने या सफारीत पर्यटक सहभागी होऊ शकतात. संपर्क- ९३२२०७०९९०.

भूमी अभिलेख कार्यालयात लेखणी बंद आंदोलन
ठाणे/प्रतिनिधी: सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी स्वीकारण्याचा निर्णय घेतल्यानंतर मंत्रिमंडळाने महसूल अधिकारी संघटनेच्या दबावाला बळी पडून तहसीलदार संवर्गाचे वेतन आयोगाची शिफारस नसताना, वेतन त्रुटी समितीचा आधार नसताना वेतनश्रेणी वाढविण्याच्या घातलेल्या घाटाच्या विरोधात दोन दिवस लेखणी बंद आंदोलन पुकारण्यात आल्याची माहिती ठाणे भूमी अभिलेख अधीक्षक पाटील यांनी दिली.

शालेय जीवनातच आयुष्याचे ध्येय नक्की करा - विजय कदम
ठाणे/प्रतिनिधी : विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी जडणघडण शालेय जीवनातच होते. स्नेहसंमेलनामुळे कलागुणांना वाव मिळतो. पुढील आयुष्यात काय बनायचे आहे, याचा विचार या काळातच करून आयुष्याचे ध्येय नक्की करा, असे आवाहन सिने-नाटय़ कलावंत विजय कदम यांनी डॉ. बेडेकर विद्यामंदिरातील कार्यक्रमात केले.

दर्दभऱ्या कवितांनी रंगले काव्यरसिक मंडळाचे संमेलन
डोंबिवली/प्रतिनिधी - जसा कवी तशी त्याची कविता असते. जसे कवीमन तसे त्याचे प्रतिबिंब त्या कवीच्या कवितेत पडत असते. या कवीमनातून तो कवी आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचा कानोसा घेत रचना करत असतो, असे प्रतिपादन कविवर्य संजय चौधरी यांनी येथे केले. काव्यरसिक मंडळाचे संमेलन काव्य आणि कवीच्या भेटीने रंगले. काव्यरसिक मंडळाच्या संमेलनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित नव्या जाणिवा-नवी स्पंदने कार्यक्रमात कविता वाचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. दर्दी रसिक, ज्येष्ठ कवीमनाची मंडळी यावेळी उपस्थित होती.

रामन इफेक्टची चिरंतन स्मृती!
मुकुंद मराठे

हा दिवस संपूर्ण भारतभर १९८७ पासून राष्ट्रीय विज्ञानदिन म्हणून पाळण्यात येतो. २८ फेब्रुवारी हाच दिवस निवडायचे कारण म्हणजे, या दिवशीच सर चंद्रशेखर वेंकटरामन अर्थात सी.व्ही. रामन यांनी ‘रामन इफेक्ट’ हा वैशिष्टय़पूर्ण शोधनिबंध सादर करून २८ फेब्रुवारी याच दिवशी १९२८ मध्ये याची जाहीर घोषणा केली. रामन परिणाम म्हणजे एकप्रकारे प्रकाशाचे विकिरणच! प्रकाशाचे विकिरण हा एक दृश्य परिणाम आहे. जेव्हा प्रकाशाचे किरण सरळ डोळ्यात शिरतात, तेव्हाच आपल्याला प्रकाशाच्या अस्तित्वाची जाणीव होते. रामन हे सुरुवातीला स्फटिकांच्या अणुरचनेमध्ये आढळणाऱ्या रचना साधम्र्याशी अपवादात्मक असा अभ्यास करत होते.

बिग बझारमध्ये भंगार द्या, नवीन वस्तू घ्या
ठाणे/प्रतिनिधी : सध्याच्या आव्हानात्मक अशा मंदीच्या दिवसांमध्ये प्रत्येकजण बचतीच्या मागे लागला आहे. त्यांच्यासाठी खास खुशखबर असून घरातील भंगार देऊन त्याच्या मोबदल्यात नवीन सामान खरेदी करण्याची सुवर्णसंधी बिग बझारने उपलब्ध करून दिली आहे. ८ मार्चपर्यंत बिग बझारच्या सर्व दुकानांमध्ये चालणाऱ्या या ग्रेट एक्स्चेंज ऑफरमध्ये ग्राहकांना वर्तमानपत्राची रद्दी, कपडे, चपला, प्लास्टिक आदी जुन्या व भंगार सामानाच्या बदल्यात नवीन वस्तूंची खरेदी करता येईल. रद्दी २५ रुपये किलो, जुने कपडे २०० रुपये किलो, प्लॅस्टिक ७५ रुपये किलो, चपला १०० रुपये किलो, टायर ५० रुपये किलो दराने विकत घेतले जाणार असून त्या बदल्यात ग्राहकांना तेवढय़ा रकमेची खरेदी करता येईल.

‘तिच्यातली स्त्री’ पुस्तकाचे प्रकाशन
ठाणे/प्रतिनिधी

येथील सुहासिनी प्रकाशन आणि मराठी ग्रंथ संग्रहालय यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १ मार्च रोजी दुपारी २ ते ५ या वेळेत मराठी ग्रंथ संग्रहालय, स्टेशन रोड, ठाणे (प) येथे शोभा सुभेदार लिखित ‘तिच्यातली स्त्री’ पुस्तकाचे प्रकाशन डॉ. अलका मांडके यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ‘स्त्री सक्षमीकरण म्हणजे नेमकं काय?’ या विषयावर मान्यवर वक्त्यांचा चर्चात्मक कार्यक्रम आयोजित केला आहे. यावेळी इंडियन मर्चंटस् चेंबर्सचे अध्यक्ष एम.एन. चैनी, तसेच शिक्षणतज्ज्ञ लीलाताई जोशी, मराठी ग्रंथसंग्रहालयाचे अध्यक्ष पां.के. दातार आणि कार्यवाह विद्याधर ठाणेकर उपस्थित राहणार आहेत.

म्हाळगी प्रबोधिनीतर्फे शिबीर
ठाणे : महाराष्ट्रात विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या स्वयंसेवी व सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांसाठी उत्तन (भाईंदर) येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे २८ व २९ मार्च रोजी निवासी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात कार्यालय व्यवस्थापन, कोष व माहिती तंत्रज्ञान, हिशोब लेखन-परीक्षण, निधी उभारणी आदी विषयांवर तज्ज्ञ व अनुभवी व्यक्तींकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शिबिरात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्थांच्या प्रतिनिधींनी रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, १७, चंचलस्मृती, गं.द. आंबेडकर मार्ग, वडाळा, उद्योग भवनसमोर, वडाळा, मुंबई- ४०००३१ या ठिकाणी २३ मार्चपर्यंत नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. (दूरध्वनी क्र. २४१३६९६६/ २४१८५५०२)

सुरेश तिवारी चकमकीत ठार
कल्याण/प्रतिनिधी

शस्त्रास्त्रांची तस्करी करणारा सुरेश तिवारी हा कुख्यात तस्कर काल रात्री कोळसेवाडी पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत ठार झाला. सुरेश आंतरराज्य पातळीवरचा एक कुख्यात तस्कर होता. तो कल्याणमध्ये येणार असल्याची खबर कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. डी. गवारे यांना मिळाली होती. त्याप्रमाणे गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी जोशी, सोनावणे, पाटील, भवारी, धोरमाळे , बनसोडे व गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कल्याण पूर्वेतील लोकग्रामजवळील तिकीट खिडकीजवळ सापळा रचला. रात्री सुरेश ठरलेल्या वेळेपेक्षा एक तास उशिरा लोकग्रामजवळ आला. पोलीस त्याला ओळखत नव्हते. एका पोलिसाने सुरेश अशी हाक मारताच सुरेशने पाठीमागे वळून पाहिले. पोलिसांनी त्याला शरण येण्यास सांगितले पण सुरेशने पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात तो जखमी झाला. त्याला तात्काळ रु ग्णालयात नेण्यात आले, पण तो मरण पावला. सुरेशवर मुंबईतील तीन पोलीस ठाण्यात शस्त्रास्त्र विक्री, खंडणीचे गुन्हे दाखल आहेत.

सहा शाळकरी मुलांना विषबाधा
भिवंडी/वार्ताहर : शांतीनगर परिसरातील संजयनगरमध्ये राहणाऱ्या सहा शाळकरी मुलांनी चंदन ज्योत वृक्षाच्या फळातील बिया खाल्ल्याने त्यांना विषबाधा झाल्याची घटना काल सायंकाळी घडली .
शांतीनगर परिसरातील महापालिकेच्या शाळेतील अरिफ मोहम्मद युसुफ शेख (१०) व जैनुल अबिदीन रईस शेख (८) हे दोघे विद्यार्थी जवळच असलेल्या पाइपलाइन परिसरात खेळण्यासाठी गेले होते. खेळताखेळता या दोघांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या चंदन ज्योत (जेट्रोफा) वृक्षाची फळे तोडून त्यातील बिया खाल्ल्या. त्यानंतर त्यांनी काही बिया खिशात भरून आणल्या व त्या आपल्या घरातील इतर भावंडांना दिल्या. बिया खाल्ल्याने या दोघांसह बसम्मा कौसर मोहम्मद अमीन अन्सारी, उसमा मो. अमिन अन्सारी, सायमा कौसर मो. अमिन अन्सारी, बिलाल अहमद रईस सिद्दिकी या सहा मुलांना उलटय़ा, जुलाब, पोटदुखीचा त्रास सुरू झाला. मुलांना त्वरित उपचारासाठी महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी जी. ए. खान यांनी दिली.

‘करवसुलीची दडपशाही न थांबविल्यास निवडणुकीवर बहिष्कार’
बदलापूर/वार्ताहर : अंबरनाथच्या सूर्योदय गृहनिर्माण सोसायटीमधील दुकानदारांवर कर वसुलीसाठी करण्यात येणारी दडपशाही त्वरित थांबवली गेली नाही तर शहरातील व्यापारी आगामी सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार टाकतील, असा इशारा तहसीलदारांना देण्यात आल्याची माहिती अंबरनाथ व्यापारी संघाचे अध्यक्ष नवीन शहा आणि सचिव युसूफ शेख यांनी दिली. सूर्योदय सोसायटीतील सदस्यांना पैसे भरण्यासाठी नोटिसा बजाविण्यात आल्या आहेत. यासंदर्भात विधान परिषदेचे उपसभापती वसंत डावखरे यांच्याशी चर्चा करून कर भरण्यासाठी अभय योजना अमलात आणण्याचे ठरले. असे असतानाही सोसायटीतील दुकानदारांना कर वसुलीसाठी मालमत्ता सील करणे अथवा सील करण्याच्या धमक्या देण्याचे सुरू आहे. जागतिक मंदीचा फटका व्यापाऱ्यांनाही बसला असून, शेतकऱ्यांपाठोपाठ व्यापाऱ्यांनीही आत्महत्या कराव्यात काय, असा सवाल शहा यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात केला आहे. एकाच इमारतीतील बिल्डरकडे ७५ टक्के भाग असतानाही बिल्डर्सना सवलत देताना व्यापाऱ्यांना धारेवर धरण्यात येते हे अयोग्य असून, जिल्हाधिकाऱ्यांसमवेत झालेल्या चर्चेनुसार व्यापारी पैसे भरण्यास तयार आहेत. यासाठी त्यांना थोडा अवधी द्यावा, दडपशाही मार्गाने वसुली केल्यास अंबरनाथ बंद ठेवण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

आघाडी सरकारच्या लोण्यावर शिवसेनेचा डोळा- संजीव नाईक
ठाणे/प्रतिनिधी

ठाणे महापालिका क्षेत्रात सध्या सुरू असलेल्या हजारो कोटी रुपयांच्या योजनांवर खर्च होणारा पैसा केंद्र व राज्य सरकारचा आहे, पण या कामांचे फुकटचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न शिवसेना नेते व लोकसभेत ‘मौनी खासदार’ असा शिक्का बसलेले ठाण्याचे खासदार करीत असल्याची खरमरीत टीका नवी मुंबईचे प्रथम महापौर व ठाणे लोकसभेचे राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीचे संभाव्य उमेदवार संजीव नाईक यांनी केली. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर संजीव नाईक यांनी गेल्या एक महिन्यापासून ठाणे शहरातील विविध भागांतील विचारवंत, डॉक्टर्स, इंजिनीअर्स, वकील व इतर मान्यवर नागरिकांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. घोडबंदर रोड परिसर त्यांनी पिंजून काढला असून, विभागवार सभा घेण्याचाही त्यांनी धुमधडाका लावला आहे. वागळे इस्टेटमधील भंडारी हॉलमध्ये काँग्रेस नगरसेवक रवींद्र फाटक यांनी आयोजित केलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात नाईक यांनी शिवसेना स्थानिक नेते व खासदार आनंद परांजपे यांच्या कामगिरीवर जोरदार टीका केली.
ठाण्यात सध्या बीएमयूपी योजना, स्कायवॉक, स्टेशन भागातील सॅटिस प्रकल्प, भुयारी गटार योजना, २०० नवीन बसेस खरेदी प्रस्ताव अशी विविध विकास कामे सुरू आहेत. या सर्व योजनांसाठी केंद्र व राज्य सरकारने जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजनेतून हजारो कोटी रुपयांचा निधी महापालिकेला दिला आहे. असे असताना ही कामे जणू आपल्याच पैशाने सुरू आहेत, असे दाखवून त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न स्थानिक शिवसेना नेते करीत असल्याबद्दल नाईक यांनी आश्चर्य व्यक्त केले.
नवी मुंबईच्या मोरबे धरणाचे पाणी ठाणेकरांना देण्यास आम्ही तयार आहोत, परंतु त्याचे श्रेय राष्ट्रवादी व नाईकांना मिळेल म्हणून शिवसेना नेते कोलदांडा घालीत असल्याचा आरोप त्यांनी केला. अनधिकृत बांधकामांना ज्यादा एफएसआय देऊन उल्हासनगरच्या धर्तीर ठाणेकरांनाही न्याय मिळवून देणे शक्य आहे. त्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.