Leading International Marathi News Daily

शनिवार, २८ फेब्रुवारी २००९

ग्रंथविश्व

भारतातील वेश्यासायाची मुळे देवदासी प्रथेत आढळतात. भारतीय राजेरजवाडय़ांच्या जमान्यात दरबारात नर्तिका व गायिकांचा भरणा असे. त्या आपली कला सादर करून चरितार्थ चालवीत असत. काही राजदरबारांत तर अशा स्त्रियांना मोठा मानमरातब मिळत असे. परंतु जसे राजेरजवाडय़ांचे वैभव लोपू लागले तसा या कलाकार स्त्रियांना राजाश्रय मिळेनासा झाला, तेव्हा त्या चरितार्थासाठी शरीरविक्री करू लागल्या. पुढे पुढे अनेक कारणांनी या व्यवसायाचा विस्तार झाला. आता तर वेश्या व्यवसायाला अत्यंत विकृत स्वरूप आले आहे. आज सुशिक्षित आणि प्रतिष्ठित कुटुंबातील काही स्त्रियासुध्दा सर्रास

 

शरीरविक्रय करतात, अशी माहिती रोहिणी सहानी, व्ही. कल्याणशंकर आणि हेमंत आपटे या त्रयींेनी संपादित केलेल्या 'Prostitution and Beyond' या संशोधनपर पुस्तकात दिली आहे. या संपादित पुस्तकातील बहुतांश लेख स्त्रियांनीच लिहिले आहेत. ते सखोल संशोधनावर आधारित आहेत.
पुणे विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित केल्या गेलेल्या ‘भारतातील स्त्रियांच्या चळवळी’ या विषयावरील चर्चेत पुष्पा भावे, विद्युत भागवत, स्वाती शाह, मीना शेशू, किरण मोघे यांनी मांडलेले परखड विचारही या पुस्तकात संकलित करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे १९९७ सालच्या ‘सेक्स वर्कर्स मॅनिफॅस्टो’चाही उल्लेख पुस्तकात आहे.
कोलकात्यातील सोनागाची ही भारतातील सर्वात मोठय़ा वेश्यावस्तींपैकी एक. तेथील कुंटणखान्यांत व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांनी संघटित होऊन शब्दबद्ध केलेला हा जाहीरनामा, १९९७ मध्ये प्रसिद्ध करण्यात आला. त्यांच्या समस्यांचा त्यात परामर्श घेण्यात आला. वेश्या म्हणजे कुटुंबसंस्थेला निर्माण झालेला धोका आहे, अशी भावना समाजात आहे. ती चुकीची असल्याचे हा जाहीरनामा म्हणतो. चरितार्थासाठी शरीरविक्रय करावा लागणे हे सर्वसामान्यत: उपजिविकेसाठी केल्या जाणाऱ्या कष्टांपेक्षाही अधिक यातनामय असते, असेही हा जाहीरनामा नमूद करतो!
‘भारतातील वेश्याव्यवसायातील महिलांचे संघटन’ या लेखात अनघा तांबे यांनी देवदासींना एके काळी कसे मानमरातबाने वागविले जाई, त्याचे वर्णन केले आहे. राजाच्या पत्नीबरोबर त्या पानविडासुद्धा खात असत. त्यांचे देवाशी लग्न होत असल्यामुळे त्या अखंड सौभाग्यवती मानल्या जात. मात्र आज ज्याला वेश्याव्यवसाय असे नामाभिधान आहे, ‘तो’ व्यवसाय या स्त्रिया करीत नसत, असे अनघा तांबे म्हणतात. देवदासींचे जसे दक्षिण भारतात प्राबल्य आहे, तसे ते उत्तर भारतात नाही. याची कारणे सांगताना त्या म्हणतात की, उत्तर भारतात, दक्षिण भारतातल्याप्रमाणे मोठी मंदिरसंकुले नाहीत. त्यामुळे त्यांना मंदिरांचा आश्रय नाही. तुर्कानी उत्तर भारतावर चढाई केली, तेव्हा त्यांनी देवळांचा विध्वंस केला. त्या वेळी उत्तरेत ज्या थोडय़ाथोडक्या देवदासी होत्या, त्या दक्षिण भारतात स्थलांतरित झाल्या. अनघा तांबे पुढे म्हणतात की, आज देवदासी पद्धत जरी कायद्याने बंद झालेली असली तरी या ना त्या स्वरूपात ती टिकून आहेच.
एकंदरीत वेश्या व्यवसायातील स्त्रियांची सर्व बाजूंनी आर्थिक आणि शारीरिक पिळवणूक होत असते. काही वेळा पोलीसांकडूनही त्यांच्या पैशांची लूट आणि शारीरिक शोषण चालते.
अर्थात शरीरविक्रय करणारी प्रत्येक स्त्री हतबल आणि शोषित असते, असे नाही. काही वेश्या चोरी करतात, काही जणी ग्राहकांना लुबाडतात, ब्लॅकमेलही करतात. वेश्येकडून असा अन्याय झालेला पुरुष तरीही पोलिसांत तक्रार देत नाही. कारण हा व्यवहार अनैतिक स्वरूपाचा असतो. अशी काही उदाहरणेही या पुस्तकात देण्यात आली आहेत.
कोलकत्यामधील कॉलगर्ल्सबद्दलची माहिती एका लेखात आहे. त्यात म्हटले आहे की, अनेक कॉलगर्ल्स या प्रतिष्ठित कुटुंबातील असतात. कॉलगर्ल्स म्हणून काम करणाऱ्या ६० टक्के स्त्रिया निरनिराळ्या व्यवसायात गुंतलेल्या असतात, त्यामुळे त्यांचे वेश्याव्यवसायाशी असलेले संबंध छुपे राहतात. सुखवस्तू कुटुंबातील स्त्रियादेखील कॉलगर्ल्सचा व्यवसाय करतात. विशेष म्हणजे यापैकी बहुतेक स्त्रिया आपला हा व्यवसाय हलका मानत नाहीत, असे यात स्पष्ट केले आहे. यापैकी बहुतांश स्त्रिया आपल्या या व्यवसायाचे समर्थन करतात. मात्र आपल्या मुलींनी या व्यवसायात पडू नये असे त्यांना वाटते!
स्वाती शाह यांनी १८ महिने कामाठीपुऱ्याचा अभ्यास केला. त्यांनी आपल्या लेखांत कामाठीपुऱ्याचे वर्णन एक ‘नरकपुरी’ असे केले आहे. ब्रिटिशांनी आपल्या सैनिकांच्या कामेच्छापूर्तीसाठी कामाठीपुरा येथे वेश्यावसाहत केली, असे सांगून शाह म्हणतात की, ही नरकपुरी मुंबईलाच नव्हे, तर भारतालाच मोठा कलंक आहे!
रोहिणी सहानी आणि व्ही. कल्याणशंकर यांनी या व्यवसायातील अर्थकारणाची माहिती दिली आहे.. भारतीय स्त्रीपेक्षा नेपाळी स्त्रियांना अधिक भाव मिळतो. भारतीय स्त्रियांपैकी आंध्र प्रदेशमधील स्त्रियांना अधिक भाव मिळतो, कारण या स्त्रियांना धंद्याचे अर्थकारण बरोबर समजलेले आहे. त्या आरोग्याची चांगली निगा राखतात कराण अल्पावधीत जास्तीतजास्त कमाई करणे हे त्यांचे ध्येय असते. काही वर्षांनी व्यवसायाला रामराम करून त्या संसारात पडतात.
देशाच्या संस्कृतीबाबत भारावून बोलणाऱ्यांना तिची ही उघडीवाघडी बाजूही स्वीकारावी लागेल कारण ‘प्रॉस्टिटय़ुशन अ‍ॅंड बियॉंड’ संपूर्णपणे वस्तुस्थितीवरून लिहिले गेले आहे.
नंदकुमार रेगे
प्रॉस्टिटय़ुशन अ‍ॅण्ड बियाँड
संपादन : रोहिणी सहानी, व्ही. कल्याणशंकर, हेमंत आपटे;
प्रकाशक : सेन प्रकाशन;
पृष्ठे ३६९; किंमत रु. ३९५.