Leading International Marathi News Daily
रविवार , १ मार्च २००९

फकीरभाई प्रतिष्ठानच्या वतीने ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना शरद पवार यांच्या हस्ते संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पुरस्काराने गौरविण्यात आले. यावेळी डावीकडून महापौर अपर्णा डोके, पवार, धर्माधिकारी, आझम पानसरे आणि अनिता धर्माधिकारी, तर दुसऱ्या छायाचित्रात या सोहळ्य़ासाठी राज्यभरातून आलेला लाखोंचा जनसमुदाय.

राष्ट्रीय राजकारणात काँग्रेसबरोबरच
राज्यात मात्र परिस्थितीनुसार निर्णय घेऊ

पुणे, २८ फेब्रुवारी/ विशेष प्रतिनिधी

राष्ट्रीय राजकारणात आम्ही काँग्रेसबरोबरच राहणार आहोत, अशी निसंदिग्ध भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना जाहीर केली. पण राज्याच्या बाबतीत बोलताना मात्र राज्या- राज्यातील परिस्थितीनुसार आम्ही निर्णय घेऊ असे सांगून काँग्रेसवरील दबाव कायम ठेवण्याचा आपला इरादा त्यांनी पुन्हा स्पष्ट केला.
वेस्टर्न अ‍ॅग्री फूड पार्क (प्रा.)लिमिटेडच्या पहिल्या मेगा फूड पार्कचे उद्घाटन आज पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.

दक्षिण-मध्य मुंबईवरून कामत , गायकवाड यांच्यात जुंपली
मुंबई, २८ फेब्रुवारी/प्रतिनिधी

मतदारसंघ पुनर्रचनेनंतर काँग्रेससाठी सर्वाधिक सोपा मतदारसंघ समजल्या जाणाऱ्या दक्षिण-मध्य मुंबईची उमेदवारी मिळावी म्हणून विद्यमान खासदार एकनाथ गायकवाड व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष व ईशान्य मुंबईचे खासदार गुरुदास कामत यांच्यात जबरदस्त रस्सीखेच सुरू झाली आहे. आज ‘वर्षां’ या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दिल्लीहून आलेले निरीक्षक आसीफअली टाक यांच्यासमोर कामत व गायकवाड यांच्या समर्थकांनी हा मतदारसंघ आपल्या नेत्यालाच का सुटायला हवा याची बाजू जोरदारपणे मांडली. यात गायकवाड यांच्या बाजूने त्यांची मुलगी व धारावीच्या आमदार वर्षां गायकवाड आणि नगरसेवक महेंद्र शिंदे हे दोघेच समर्थक होते.

‘.. अन्यथा ‘आरपीआय’ची वेगळी वाट ’
बंधुराज लोणे, नवी दिल्ली, २८ फेब्रुवारी

आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेससह सर्व धर्मनिरपेक्ष पक्षांनी एकत्र येऊन लढवाव्यात, अन्यथा रिपब्लिकन पक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरेल, असा ठराव आज रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय अधिवेशनात करण्यात आला. राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची युती मान्य नसल्याचेच संकेत आज पक्षाचे नेते खासदार रामदास आठवले यांनी दिले. रामलीला मैदानावर झालेल्या या अधिवेशनाला देशातील अनेक प्रदेशांतून रिपब्लिकन कार्यकर्ते आले होते.

अजमल कसाबप्रकरणी नौदलप्रमुखांची निर्थक सारवासारव
पाकिस्तानचे घुमजाव

कराची, २८ फेब्रुवारी/पीटीआय

मुंबईवर हल्ला करणारे अजमल आमीर कसाब व अन्य पाकिस्तानी दहशतवादी पाकिस्तानातून सागरी मार्गाने भारतात आल्याचे कोणतेही पुरावे पाकिस्तानी नौदलाला मिळालेले नाहीत असे वादग्रस्त विधान करणारे पाकिस्तानी नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल नोमन बशीर यांच्यावर चौफेर टीका झाल्यानंतर त्यांनी आज आपल्या भूमिकेपासून घुमजाव केले. या हल्ल्याच्या तपासाची जबाबदारी पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाकेड आहे. या हल्ल्यांचा तपास पाकिस्तानी नौदलाकडे नाही. कसाब व अन्य दहशतवादी पाकिस्तानातून सागरी मार्गाने मुंबईत गेल्याचे पुरावे गृहमंत्रालयाला मिळाले असण्याची शक्यता आहे मात्र तपासकामात सहभागी नसल्यामुळे पाकिस्तानी नौदलाकडे ते पुरावे नाहीत अशी तद्दन निर्थक सारवासारव अ‍ॅडमिरल नोमन बशीर यांनी आज केली.

रस्त्यावरील राजकीय उद्रेकाची किंमत तीन कोटी
अजित गोगटे, मुंबई, २८ फेब्रुवारी

अठरापगड विचारसरणीच्या राजकीय पक्ष-संघटनांकडून उठसुठ पुकारले जाणारे ‘बंद’ आणि ‘हरताळ’ आणि याचा राग रस्त्यावर येऊन व्यक्त करण्याची अंगवळणी पडलेली ‘सवय’ याची मुंबई, ठाणे व नाशिक या शहरांमधील परिवहन सेवांना तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास (एसटी) गेल्या सुमारे तीन वर्षांत तीन कोटी रुपयांहून अधिक नुकसानीची झळ निष्कारण सोसावी लागल्याची माहिती माहितीच्या अधिकाराखाली प्राप्त झाली आहे.

‘लिटिल चॅम्प्स’ लागले परीक्षेच्या तयारीला!
मुंबई, २८ फेब्रुवारी / प्रतिनिधी

झी-मराठी वाहिनीवरील ‘सारेगमप’या कार्यक्रमाने लोकप्रियतेचा नवा उच्चांक गाठून सहभागी ‘लिटील चॅम्प्स’ना महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवले. कार्यक्रम संपला असल्यामुळे आता हे सर्व लिटिल चॅम्प्स वार्षिक परीक्षेच्या तयारीला लागले आहेत. मात्र या अभ्यासाबरोबरच ‘पंचरत्न’-भाग दोन या नव्या आल्बमची तयारी आणि राज्यात ठिकठिकाणी होणाऱ्या विविध कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीही ते सर्व जण व्यस्त आहेत. ‘सारेगमप’च्या महाअंतिम फेरीच्या वेळेस युनिव्हर्सल कंपनी आणि झी-मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व लिटिल चॅम्प्सचा आल्बम ‘पंचरत्न’ या नावाने प्रकाशित करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते.

सत्तेवर आल्यास वयोवृद्ध शेतक ऱ्यांना पेन्शन देऊ -अडवाणी
मदनपल्ली ,आंध्र प्रदेश २८ फेब्रुवारी/पीटीआय

निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी आता वातावरण तापू लागले असून एनडीए सत्तेवर आल्यास छोटय़ा शेतकऱ्यांसाठी कृषी उत्पन्न हमी योजना व वयोवृद्ध शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना राबवण्यात येईल ,असे आश्वासन भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार लालकृष्ण अडवाणी यांनी काल सायंकाळी येथे विजय संकल्प यात्रेच्यावेळी जाहीर सभेत दिले. जर सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळते तर मग वयोवृद्ध शेतकऱ्यानाही ती का मिळू नये, असा सवाल करून ते म्हणाले की, उत्तम राज्यकारभार, सामान्य लोकांना सुरक्षा, सर्व आघाडय़ांवर विकास या मुद्दय़ांच्या आधारे आमचा पक्ष लोकसभा निवडणुका लढवित आहे, असे त्यांनी सांगितले. यूपीए आघाडी सरकारने राष्ट्रीय महामार्गाचा प्रकल्प सोडून दिला. ग्रामीण विकासाकडे दुर्लक्ष केले त्याचबरोबर नद्याजोड प्रकल्पाला रामराम ठोकला असा घणाघाती आरोप करून ते म्हणाले की, एनडीए सत्तेवर आल्यास हे चांगले प्रकल्प पुन्हा सुरू केले जातील. त्यामुळे मंदीत होरपळत असलेल्या लोकांना रोजगारही उपलब्ध होईल.

लोडशेडिंग एक ते दीड तासाने कमी होणार
खाजगी उत्पादकांकडून ५०० मेगॅवॅट वीज घेणार

मुंबई, २८ फेब्रुवारी/प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आता आचारसंहिता लागण्याच्या आधीच जनेताला सुखावणारे निर्णय घेण्याच्या आघाडी सरकारच्या धडाक्यात आणखी एका निर्णयाची भर पडली आहे. नवे ऊर्जामंत्री सुनील तटकरे यांनी ऊर्जा खात्याचा कारभार सांभळल्यापासून या खात्यात बऱ्याच वर्षांनी सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून आता पुढील तीन महिने ५०० मेगॅवॅट वीज खाजगी उत्पादकांकडून घेण्याचे नक्की केले आहे.

आदिक यांचा आज ‘राष्ट्रवादी’त प्रवेश
श्रीरामपूर, २८ फेब्रुवारी/प्रतिनिधी

ऐन वेळी मंत्रिपद नाकारल्याने संतप्त झालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार गोविंदराव आदिक यांनी आज काँग्रेसला रामराम ठोकला. उद्या (रविवारी) नाशिक येथे कार्यकर्ता अधिवेशनात केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. आदिक यांच्या विधानपरिषद सदस्यत्वाची मुदत साडेतीन वर्षे होती. परंतु ते विधानपरिषद सदस्यत्वाचाही राजीनामा देणार आहेत. राज्यातील आदिक समर्थकही त्यांच्यासोबत राष्ट्रवादीत जाणार आहेत. आदिक हे मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार होते. परंतु त्यांना मंत्रिपद नाकारण्यात आले. मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केलेल्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या वेळी त्यांचे नाव ‘हायकमांड’ने सूचविले. परंतु ऐन वेळी त्यांच्याऐवजी कट्टर विरोधक आमदार राधाकृष्ण विखे यांना संधी देण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या आदिकांनी कृषक समाजाचा मेळावा घेऊन काँग्रेस नेत्यांवर टीकास्त्र सोडले होते. आदिक व पवार यांच्यामध्ये चर्चा झाल्यानंतर त्यांनी आज काँग्रेसला रामराम ठोकण्याचा इशारा दिला.

महाअधिवेशनात राष्ट्रवादी फोडणार प्रचाराचा नारळ
नाशिक, २८ फेब्रुवारी / खास प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाअधिवेशनातच लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडायचा आणि तेथूनच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात तयारीनिशी उडी घ्यायची, अशा पद्धतीने या संपूर्ण अधिवेशनाची व्यूहरचना करण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून तयार केलेला एक लघुपट शरद पवार यांच्या हस्ते रविवारच्या अधिवेशनातच प्रदर्शित केला जाणार आहे. त्याचप्रमाणे अधिवेशनानिमित्त सकाळी निवडक प्रतिनिधींची बंद दाराआड एक बैठकही होणार आहे.

‘अडवाणींना पंतप्रधान बनण्यासाठी बरीच मजल मारायची आहे’
चंदिगढ, २८ फेब्रुवारी/पीटीआय

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना पंतप्रधान बनण्यासाठी अजून बरीच मजल मारायची आहे असे भाजपचे माजी सरचिटणीस के. एन. गोविंदाचार्य यांनी म्हटले आहे. असे वक्तव्य करून गोविंदाचार्यानी पंतप्रधानपदासाठीचे उमेदवार म्हणून लालकृष्ण अडवाणी यांच्यापेक्षा गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावालाच अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिला. पंतप्रधान बनण्यासाठी लालकृष्ण अडवाणी यांना अजून बरीच मजल मारावी लागणार आहे असे सांगून गोविंदाचार्य म्हणाले की, पंतप्रधानपदासाठीचे उमेदवार म्हणून एनडीएतर्फे लालकृष्ण अडवाणी यांचे नाव पुढे करण्यात आले. गुजरातमधील विधानसभा निवडणुकांचे निकाल लागण्याच्या एक दिवस आधी पंतप्रधानपदासाठीचे उमेदवार म्हणून अडवाणींचे नाव जाहीर करण्यात आले ही क्रूर खेळी होती. मात्र निवडणुका जिंकून देण्यात नरेंद्र मोदी हे जास्ती वरचढ आहेत असा टोला गोविंदाचार्यानी लगाविला. लालकृष्ण अडवाणी यांनी आपली वेबसाईट सुरू केली व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी जाहिरात मोहिम राबविण्याचे ठरविले आहे. त्यावर टीका करताना गोविंदाचार्य म्हणाले की, निवडणुकांमध्ये व्यवस्थापन तंत्राचा काहीही उपयोग होत नाही.

गुजरात दंगलीतील २२८ बेपत्ता व्यक्तींना मृत घोषित करणार
अहमदाबाद, २८ फेब्रुवारी/पीटीआय

गोध्रा जळितकांडानंतर २००२ साली गुजरातमध्ये उसळलेल्या जातीय दंगलींमध्ये बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा त्यानंतर सात वर्षे उलटली तरी अद्याप शोध लागलेला नाही. बेपत्ता व्यक्तींचा सात वर्षांच्या काळात शोध न लागल्यास त्यांना मृत घोषित करण्याची तरतूद कायद्यात आहे. त्यामुळे गुजरात दंगलीतील बेपत्ता झालेल्या २२८ व्यक्तींना लवकरच मृत घोषित करण्यात येईल. त्यामुळे गुजरात दंगलीतील मृतांचा आकडा ९५२ वरून ११८० पर्यंत पोहोचणार आहे. यासंदर्भात गुजरातच्या गृहखात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव बलवंतसिंग यांनी सांगितले की, गुजरात दंगलीत बेपत्ता झालेल्या व सात वर्षांनंतरही शोध न लागलेल्या २२८ व्यक्तींची यादी आम्ही तयार केली असून ती महसूल विभागाकडे पाठविण्यात आली आहे. या बेपत्ता व्यक्तींना लवकरच मृत घोषित करण्यात येईल.

पुणे-नाशिक मार्गावर अपघात ठाण्याचे सात यात्रेकरू ठार
मंचर, २८ फेब्रुवारी/वार्ताहर

राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस आणि प्रवासी यात्रा करणारी जीप यांची धडक होऊन सात यात्रेकरू जागीच ठार तर जीपसह एसटीतील तेरा प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात पुणे-नाशिक रस्त्यावरील कळंब (ता. आंबेगाव) नजीक सहाणेवस्ती येथे शनिवारी सायंकाळी सहा वाजता झाला. अपघातात मृत पावलेले सर्वजण शहापूर, जि.ठाणे येथील असून पिंपरी- चिंचवड येथे सद्गुरू दत्तात्रय नारायण धर्माधिकारी यांच्या पुरस्कार कार्यक्रमाहून माघारी परतताना हा अपघात झाला आहे.
महिंद्रा जीपमधील गोटीराम उंबरगोडे (वय ५५), त्यांची मुलगी सारिका उंबरगोडे (वय २५, रा. बिरवाडी, ता. शहापूर), भाऊ धलपे (वय ५५), त्यांची पत्नी धलपे काकू (वय ४०, रा. भातसानगर), गोपाळ धसाडे (वय ५०, रा. भातसानगर), चालक मुख्तार शेख (वय २६, रा. धसई, ता. शहापूर) व उंबरगोडे (पूर्ण नाव माहीत नाही, वय ४५, रा. आवरा) गाव असे अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. मिहद्रा जीप (क्रमांक एमएच ०४ ई १५५९) ही शहापूर तालुक्यातील भाविकांना घेऊन पिंपरी चिंचवड येथील कार्यक्रमास हजर राहिले होते. या कार्यक्रमास हजर राहून हे सर्व भाविक मिहद्रा जीपने माघारी शहापूर येथे जाण्यासाठी माळशेज घाट मार्गे निघाले. पुणे नाशिक महामार्गावर कळंब (ता. आंबेगाव) गावच्या हद्दीत नारायणगाव बाजूकडून धुळे ते पुणेही एसटी बस (क्रमांक एमएच २० डी ८४४१) ही पुण्याकडे चालली होती. महिंद्रा जीप व एसटीची सहाणेवस्तीजवळ भीषण धडक होऊन अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की एसटीला धडक बसल्यानंतर महिंद्रा जीप ७० फूट मागे जाऊन तिचे तोंड पुन्हा विरुद्ध मंचरच्या दिशेने झाले तर एसटीची चालकाकडची बाजू आत गेली. अपघातात महिंद्रा जीपचा चक्काचूर झाला.

 


प्रत्येक शुक्रवारी