Leading International Marathi News Daily

रविवार , १ मार्च २००९

औरंगाबाद विमानतळावर केंद्रीय रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांचे शनिवारी सकाळी आगमन झाले. त्यानंतर शिर्डीला रवाना होण्यापूर्वी त्यांचे स्वागत शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले. सोबत राज्य हज समितीचे अध्यक्ष जी. एस. ए. अन्सारी.

आता कशाला उद्याची बात -लालूप्रसाद
औरंगाबाद, २८ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्यात पंतप्रधान पदाचे भावी उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव घेतले जात आहे. शिवसेनेनेही या नावाला आपला पाठिंबा देऊ केला आहे.

शेतीयोग्य जमिनी सिडको घेणार नाही- नकुल पाटील
औरंगाबाद, २८ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

सिडको शेतकऱ्यांच्या शेतीयोग्य जमिनी ताब्यात घेणार नाही. प्रत्यक्ष जागेची पाहणी करूनच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन सिडकोचे अध्यक्ष नकुल पाटील यांनी वाळूज महानगर जमीन अधिग्रहण हटाव संघर्ष समितीला दिले आहे.या समितीच्या वतीने २०० शेतकऱ्यांनी मुंबईतील सिडकोच्या नरिमन पॉइंट येथील निर्मल भवनात आंदोलन केले. या आंदोलनाला यश मिळाल्याचे संघर्ष समितीचे सदस्य पंजाबराव वडजे यांनी सांगितले. सिडकोने १९८६ मध्ये वाळूज महानगर आरक्षित केले.

वादग्रस्त शेरेबाजीमुळे शिक्षणाधिकारी पवार अडचणीत येण्याची शक्यता
गंगाखेड, २८ फेब्रुवारी/वार्ताहर

जिल्हाधिकारी मोहन ठोंबरे यांच्या पुढाकाराने सध्या परभणी जिल्ह्य़ात बारावी परीक्षेसाठी कॉपीनिर्मूलन मोहीम सुरू आहे. मात्र ज्या शिक्षिण विभागाकडून याबाबत युद्धपातळीवर उपाययोजना होणे गरजेचे आहे त्या विभागाचे शिक्षणाधिकारी एम. बी. पवार हेच परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी अनुत्सुक असल्याचे स्पष्ट होत असून कॉप्यांचा सुळसुळाट असलेल्या परीक्षा केंद्रांना भेटी देत ‘परीक्षा सुरळीत सुरू आहेत’ असा शेरा मारण्याचा जणू सपाटाच त्यांनी लावला आहे.

म..मराठीचा
‘व्हता’ हा शब्द शुद्ध की अशुद्ध?
मराठीचा प्राध्यापक असलेल्या मित्राने प्रश्न विचारला. क्षणाचाही उशीर न करता उत्तर दिले, ‘अर्थातच अशुद्ध!’ त्याने लगेच दुसरा प्रश्न विचारला, ‘मग, ‘नव्हता’ शुद्ध की अशुद्ध?’ उत्तर नव्हते. तेव्हाही आणि आजही. शुक्रवारी ‘मराठी दिन’ ‘साजरा’ झाला. त्यानिमित्त विविध ठिकाणी विविध लेख प्रसिद्ध झाले. त्या लेखांवरून हा संवाद आठवला. ‘मराठी भाषेचे काय होणार?’, हा अलीकडच्या काळात, काळजीच्या सुरात विचारावयाचा प्रश्न आहे. तसा तो तुम्ही विचारता आहात, म्हणजे तुम्हाला मायभाषेची काळजी वाटते, हे सिद्ध होण्यास मदत होते.

आप कैसे ‘साहब’ हैं?
मराठवाडय़ातील ‘अम्बा मनोहर नगरी’ (अंबाजोगाई) कुणाला ठाऊक नाही? ती मराठवाडय़ातल्याच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्रातील सर्वानाच माहीत आहे. या नगरीशी किती तरी संतांचं नातं जुळलं होतं. योगेश्वरी हे तेथील देवतेचं मूळ नाव व त्यापासून ‘जोगाई’ अस्सल मराठमोळा शब्द रूढ झाला आहे. या परिसरातील अनेक गावांच्या नावाच्या प्रारंभी किंवा नंतर ‘अंबा’ हा शब्द जोडूनही काही ग्रामनामं सिद्ध झाली आहेत. ‘चकलांबा’ हे त्यातलंच एक उदाहरण.

‘स्लमडॉग मिलिऑनर’मधील सलीमचा जालन्याशी नात्याचा रेशीमबंध!
जालना, २८ फेब्रुवारी/वार्ताहर

कलेच्या जागतिक क्षितिजावर भारताला ‘जय हो’ चा ऑस्कर पुरस्कार मिळवून देणाऱ्या ऑस्कर विजेत्या ‘स्लमडॉग मिलिऑनर’ चित्रपटातील बाल कलावंत सलीम अझरोद्दीन याचा जन्म जालन्यातील. सलीमच्या या नात्याच्या धाग्याने जालनेकरही हुरळून गेले आहेत.

तुळजापुरातील पुजाऱ्यांचे उपोषण
तुळजापूर, २८ फेब्रुवारी/वार्ताहर

तुळजाभवानी मंदिरात अनधिकृतरीत्या पुजारी व्यावसायिक व एजंट यांना पुजारी व्यवसाय करण्यास त्वरेने कडक बंदी घालावी तसेच भाविकांची होणारी दिशाभूल तसेच मंदिरात होणाऱ्या बेशिस्तीला लगाम घालावा, या मागणीसाठी तुळजाभवानी पुजारी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व पुजारी व्यावसायिक मंडळींनी नुकतेच उपोषण केले. गेल्या वर्षांत जानेवारी, मार्च, मे व जून महिन्यात वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली नाही म्हणून उपोषणाचा मार्ग अंगीकारणे भाग पडल्याची माहिती मंडळाचे सचिव दुर्गादास अमृतराव यांनी दिली. मंडळाचे अध्यक्ष मारुतीराव क्षीरसागर, उपाध्यक्ष- नगरसेवक दिलीपराव गंगणे, कोषाध्यक्ष- कुमार इंगळे या पदाधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
उपोषणकर्त्यां मंडळींची भेट घेऊन मंदिर समिती विश्वस्त तहसीलदार ए. सी. येवलीकर, श्री. भोसले यांनी भेट घेऊन अनधिकृत पुजाऱ्यांविरुद्ध त्वरेने कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

पूनम जिनिंगमधील आगीत ६५ लाखांचे नुकसान
अंबड, २८ फेब्रुवारी/वार्ताहर

तिर्थपुरी, ता. घनसावंगी येथील पूनम जिनिंग अ‍ॅण्ड प्रेसिंग फॅक्टरीत आज दुपारी ४ ते ४.३० च्या सुमारास आग लागून कापूस व रुई मिळून ६५ लाख रुपयांचे नुकसान झाले. पाच अग्निशमन बंबांच्या प्रयत्नांनंतरही रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आली नाही. एकाच महिन्यात या जिनिंगला दुसऱ्यांदा आग लागली आहे. दरम्यान, गोरी पोलीस ठाण्याचे फौजदार शिरीष राठोड, तहसीलदार बालाजी क्षीरसागर, तलाठी चंद्रकांत देशपांडे, जिल्हा परिषद सदस्य उत्तमराव पवार, सरपंच महेंद्र पवार यांनी घटनास्थळाला भेट दिली.

लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज
औरंगाबाद, २८ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी औरंगाबाद जिल्ह्य़ाचे प्रशासन सज्ज झाले आहे. निवडणूक कामकाज पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने १४ कक्ष स्थापन केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात लोकसभा निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत अप्पर जिल्हाधिकारी डी. एम. मुगळीकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी बी. एम. कांबळे यांनी या बैठकीत मार्गदर्शन केले. नामनिर्देशनपत्र व मतपत्रिका छपाई, मतदान अधिकारी, कर्मचारी, मायक्रो ऑब्झर्वहर कक्ष, वाहतूक व्यवस्था, आचारसंहिता कायदा व सुव्यवस्था, प्रसिद्धीमाध्यमांसाठी केंद्र, इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्र, उमेदवारांचा निवडणूक खर्च आदी विविध प्रकारच्या कक्षांची स्थापना करण्यात आली आहे.

अर्चना तेललवारचे निधन
लोहा, २८ फेब्रुवारी/वार्ताहर

अर्चना तेललवार हिचे(वय २२) कर्करोगाच्या व्याधीने निधन झाले. ती २२ वर्षांची होती. आडत व्यापारी अशोक तेललवार यांची ती मुलगी आहे. आज सायंकाळी तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी दिनेश तेललवार, केशवराव मुकदम, संजय मक्तेदार यांच्यासह तेललवार कुटुंबीय, मित्रपरिवार उपस्थित होता. काही दिवसांपूर्वी देगलूर तालुक्यातील हाणेगाव येथील जि.प. शाळेत शिक्षिका म्हणून रुजू झाली होती. त्यानंतर आठच दिवसांनी तिला रक्ताचा कर्करोग झाल्याचे निदान झाले होते.

लातूरमध्ये आज रक्तदान शिबिर
लातूर, २८ फेब्रुवारी/वार्ताहर

प्रसिद्ध एड्सतज्ज्ञ डॉ. प्रदीप उगिले यांच्या ४३व्या वाढदिवसाचे औचित्य साधून उद्या (रविवारी) रक्तदान शिबिर आयोजित केले आहे. कर्मयोगी मानवविकास प्रतिष्ठान व उगिले हॉस्पिटल संशोधन केंद्र यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराच्या माध्यमातून संकलित करण्यात येणारे रक्त एड्सबाधितांसाठी उपयोगात आणले जाणार आहे. शिबिरात इच्छुकांनी रक्तदान करून एड्स निर्मूलनाच्या कार्यात आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले आहे.

‘विद्यार्थ्यांनी संकटाशी सामना करायला शिकले पाहिजे'
लातूर, २८ फेब्रुवारी/वार्ताहर

विद्यार्थ्यांनी हुतात्म्यांचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करून, आपले दोष झटकून व अखंड जागरूक राहून आलेल्या संकटांशी सामना करायला शिकले पाहिजे, असे प्रतिपादन स्वामी विवेकानंद विचार मंचचे ज्येष्ठ कार्यकर्ते शशिकांत मांडके यांनी केले. केशवराज माध्यमिक विद्यालयात ‘१८५७ चे स्वातंत्र्यसमर’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. व्यासपीठावर मुख्याध्यापक प्र. मा. जोशी, जयश्री लाटकर, पर्यवेक्षक उमेश सेलूकर आदी उपस्थित होते. श्री.मांडके म्हणाले की, आपल्या स्वातंत्र्यावरील संकटे संपली आहेत, अशा भ्रमात राहू नये. यासाठी विद्यार्थ्यांनी संकटांशी सामना करायला शिकले पाहिजे.

धावत्या रेल्वेगाडीत चढताना तरुणाचा मृत्यू
औरंगाबाद, २८ फेब्रुवारी/प्रतिनिधी

धावती रेल्वेगाडी पकडण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा चिरडून मृत्यू झाला. तरुणाची ओळख पटलेली नाही. हा अपघात शुक्रवारी घडला. औरंगाबाद-हैदराबाद पॅसेंजर गाडी पकडण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा तोल गेला व तो गाडीखाली चिरडला गेला. लोहमार्ग पोलिसांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारआधीच त्याचा मृत्यू झाला. मृताची ओळख पटू शकली नाही.

मोटारसायकल चोरताना तिघांना अटक
औरंगाबाद, २८ फेब्रुवारी/प्रतिनिधी

घरासमोर ठेवलेली मोटारसायकल बनावट चावीच्या सहाय्याने पळविण्याची शक्कल तीन चोरटय़ांना महागात पडली. हा प्रकार शिवशंकर कॉलनीत घडला. राहुल गणपत गल्हारे (वय २५) याने आपली मोटारसायकल घरासमोर ठेवली होती. रात्री ११ च्या सुमारास देवानंद भानुदास मनगटे (रा. आरेफ मशिदीजवळ, न्यायनगर), संदीप यशवंत पाटील (पवननगर, हडको) व अन्य एकाने ती चोरून नेण्याचा प्रयत्न केला. त्या तिघा भामटय़ांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यापूर्वी त्यांनी बनावट चावीने मोटारसायकली पळविल्या असल्याचा संशय आहे. त्यांची कसून चौकशी सुरू आहे. शहरात वाहनचोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेता नागरिकांनीही दक्ष राहावे, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.

विद्यापीठात उद्या दीक्षान्त समारंभ
औरंगाबाद, २८ फेब्रुवारी/प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या सोमवारी (दि.२) दीक्षान्त समारंभ होणआर आहे. याची तयारी पूर्ण झाली आहे. नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉन्टेकसिंह अहलुवालिया यांच्या उपस्थितीत ५हजार २२५ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी शनिवारी तयारीचा आढावा घेतला. विद्यापीठाच्या इतिहास वस्तू संग्रहालयात सोमवारी (दि.२) सायं. ४.३० वा. हा समारंभ होत आहे. कुलगुरू डॉ. नागनाथ कोत्तापल्ले अध्यक्षस्थानी राहतील. या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली आहे. समारंभात ३९ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके दिली जाणार आहेत. विविध विद्याशाखांतील ५हजार २२५ विद्यार्थ्यांना पदव्या दिल्या जातील. यात कला, सामाजिक शास्त्र, विज्ञान, वाणिज्य, मेडिसीन, अभियांत्रिकी, विधी, शिक्षण, आयुर्वेद, व्यवस्थापन, होमिओपॅथी, ललितकला व शारीरिक शिक्षण या विद्याशाखांतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

रोटेगाव-पुणतांबा सर्वेक्षण करण्याचे रेल्वेमंत्र्यांचे आश्वासन
औरंगाबाद, २८ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

औरंगाबाद ते मुंबई या जनशताब्दी एक्स्प्रेसला रोटेगाव येथे थांबा आणि रोटेगाव-पुणतांबा रेल्वे सर्वेक्षण करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी दिले आहे. शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी या मागण्या केल्या होत्या. रोटेगाव येथे जनशताब्दी एक्स्प्रेस थांबण्यात येईल आणि याची अंमलबजावणी येत्या तीन-चार दिवसांत होईल, असे रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले. रोटेगाव ते पुणतांबा या रेल्वेमार्गासाठी सर्वेक्षण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. ही मागणीही त्यांनी मान्य केली

‘रुग्णसहायक प्रशिक्षितांना संधी दिली जाईल ’
लातूर, २८ फेब्रुवारी/वार्ताहर

इन्स्टिटय़ूट ऑफ इंडो पब्लिक हेल्थ हायजिन अ‍ॅण्ड मल्टीपल एज्युकेशन संस्थेमार्फत प्रशिक्षण घेऊन उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षितांना नगरपालिकेच्या आणि निमशासकीय रुग्णालयात रुग्णसेवेची संधी दिली जाईल, अशी ग्वाही नगराध्यक्ष व्यंकट बेद्रे यांनी दिली. इन्स्टिटय़ूट ऑफ इंडो पब्लिक हेल्थ हायजिन अ‍ॅण्ड मल्टीपल एज्युकेशन संस्थेद्वारा आयोजित गुणगौरव कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख पाहुणे डॉ. विठ्ठल लहाने, गोविंद बोराडे, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ लातूर उपकेंद्राचे समन्वयक दीपक डोंगरे, डॉ. उज्ज्वला कुलकर्णी, बी. बी. कुलकर्णी, नवनाथ काळे, डॉ. एन. के. बोरगावकर उपस्थित होते. श्री. बेद्रे म्हणाले, डॉक्टरांनी रुग्णांची सेवा के ली पाहिजे. आर्थिक बाबीला महत्त्व देऊ नये.

‘पद्मावती भाग आदर्श बनवणार’
परळी वैजनाथ, २८ फेब्रुवारी/वार्ताहर

पद्मावती हा भाजपा-सेना युतीचा बालेकिल्ला असून प्रतिकूल परिस्थितीतही या भागातील नागरिकांनी युतीला साथ दिली होती. त्यामुळे या भागाचा प्राधान्याने नियोजनबद्ध विकास करून हा भाग शहरातील आदर्श भाग बनविणार असल्याची ग्वाही जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय मुंडे यांनी दिली. पद्मावती भागात नगरपालिकेच्या वतीने रस्ते अनुदानातून प्राप्त झालेल्या दहा लाख तेवीस हजार रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ वैद्यनाथ बँकेचे अध्यक्ष अशोकसेठ सामंत यांच्या हस्ते झाला. या वेळी बँकेचे उपाध्यक्ष सोमनाथअप्पा हालगे, जुगलकिशोर लोहिया, वैजनाथ बागवाले, पांडुसेठ सोनी आदी उपस्थित होते. संचालन व आभारप्रदर्शन पी. टी. मुंडे यांनी मानले.

मागासवर्गीय मुलींच्या वसतिगृहाचे आज भूमिपूजन
निलंगा, २८ फेब्रुवारी/वार्ताहर

समाजकल्याण खात्याच्या वतीने निलंगा येथे मागासवर्गीय जातीतील व आर्थिकदृष्टय़ा मागासलेल्या १०० मुलींच्या शासकीय वसतिगृहाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन उद्या (दि. १ मार्च) सकाळी १० वा. करण्यात येणार आहे. येथे ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाची सोय व्हावी यासाठी समाजकल्याण विभागांतर्गत तीन कोटी रुपये खर्चाचे सर्व सोयींनी युक्त शासकीय वसतिगृह बांधण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन खासदार रूपा पाटील-निलंगेकर यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभागीय समाजकल्याण अधिकारी एस. बी. भंडारी उपस्थित राहणार आहे. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार संभाजीराव पाटील-निलंगेकर, नगराध्यक्ष हमीद शेख, पंचायत समितीचे उपसभापती श्रीमती अफजलबी शेख (रक्साळे) उपस्थित राहणार आहेत.

बस स्थानक परिसरात आत्महत्या
परळी वैजनाथ, २८ फेब्रुवारी/वार्ताहर

बुधवारी सायंकाळी एका इसमाने येथील बस स्थानक परिसरातील झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली. २५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी त्या इसमाने बस स्थानकातील सार्वजनिक शौचालयाच्या मागील बाजूस असलेल्या लिंबाच्या झाडास गळफास लावून आत्महत्या केली. हा प्रकार लक्षात येताच घटनास्थळी बघ्यांनी एकच गर्दी केली. तथापि, आत्महत्या करणाऱ्या इसमाची ओळख पटू शकली नाही.

दिगंबर गायकवाड अध्यक्षपदी
लोहा, २८ फेब्रुवारी/वार्ताहर

कंधार तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी अ‍ॅड्. दिगंबर गायकवाड, तर सचिवपदी सचिन मोरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. माजी अध्यक्ष रमेशसिंह ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली.