Leading International Marathi News Daily
रविवार , १ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

अजमल कसाबप्रकरणी नौदलप्रमुखांची निर्थक सारवासारव
पाकिस्तानचे घुमजाव
कराची, २८ फेब्रुवारी/पीटीआय
मुंबईवर हल्ला करणारे अजमल आमीर कसाब व अन्य पाकिस्तानी दहशतवादी पाकिस्तानातून सागरी

 

मार्गाने भारतात आल्याचे कोणतेही पुरावे पाकिस्तानी नौदलाला मिळालेले नाहीत असे वादग्रस्त विधान करणारे पाकिस्तानी नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल नोमन बशीर यांच्यावर चौफेर टीका झाल्यानंतर त्यांनी आज आपल्या भूमिकेपासून घुमजाव केले. या हल्ल्याच्या तपासाची जबाबदारी पाकिस्तानच्या गृहमंत्रालयाकेड आहे. या हल्ल्यांचा तपास पाकिस्तानी नौदलाकडे नाही. कसाब व अन्य दहशतवादी पाकिस्तानातून सागरी मार्गाने मुंबईत गेल्याचे पुरावे गृहमंत्रालयाला मिळाले असण्याची शक्यता आहे मात्र तपासकामात सहभागी नसल्यामुळे पाकिस्तानी नौदलाकडे ते पुरावे नाहीत अशी तद्दन निर्थक सारवासारव अ‍ॅडमिरल नोमन बशीर यांनी आज केली. दरम्यान मुंबईवर हल्ला करणाऱ्या पाकिस्तानी दहशतवाद्यांनी सागरी मार्गानेच भारतात आले याचे ठोस पुरावे भारताकडे असून ते पाकिस्तानला देण्यात आले आहेत असे सांगून केंद्रीय गृहमंत्री पी. चिदम्बरम यांनी पाकिस्तानचे नौदलप्रमुख नोमन बशीर यांचा दावा खोटा ठरविला.
दरम्यान संरक्षणमंत्री ए. के. अ‍ॅन्टोनी यांनी देखील आज अ‍ॅडमिरल नोमन बशीर यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, मुंबईवर हल्ला करणारे दहशतवादी सागरी मार्गानेच भारतात आले हे भारतीय तपासयंत्रणांनी केलेल्या तपासातून सिद्ध झाले आहे. भारताचे नौदलप्रमुख अ‍ॅडमिरल सुरीश मेहता यांनीही पाकिस्तानच्या नौदलप्रमुखांच्या विधानांवर टीका केली आहे.
मुंबई हल्ल्यामध्ये अजमल आमीर कसाबच्या असलेल्या सहभागासंदर्भात करण्यात आलेली चौकशी व तिचे निष्कर्ष याबाबत पाकिस्तान गृहमंत्रालय व नौदल यांच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत असेही बशीर म्हणाले. नोमन बशीर हे पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव सलमान बशीर यांचे बंधु आहेत. मुंबई हल्ल्यासंदर्भातील चौकशी व तिचे निष्कर्ष यासंदर्भात पाकिस्तानने अनेकदा विसंगत विधाने केली होती. अ‍ॅडमिरल नोमन बशीर यांचे विधानही याच पठडीतले होते. अजमल कसाब पाकिस्तानातून सागरी मार्गे भारतात आला याबद्दलचे ठोस पुरावे पाकिस्तानी नौदलाकडे नाही असे वक्तव्य मी केले असले तरी त्याचा अर्थ मी मुंबई हल्लाप्रकरणी पाकिस्तानी गृहखात्याने केलेली चौकशीचे निष्कर्ष खोडून काढतोय असा होत नाही. कराची गोदीमधील एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना पाकिस्तानचे नौदलप्रमुख नोमन बशीर म्हणाले की, मुंबई हल्लाप्रकरणी पाकिस्तानी गृहखात्याने केलेल्या चौकशीत पाकिस्तानी नौदलाचा प्रत्यक्ष सहभाग नव्हता. अजमल आमीर कसाब याने पाकिस्तानातून सागरी मार्गे भारतात प्रवेश केल्याचे पुरावे पाकिस्तानी गृहखात्याला मिळाले असावेत. हे पुरावे पाकिस्तानी नौदलापर्यंत अद्यापी आलेले नाहीत. त्यामुळे अजमल आमीर कसाबच्या भारत प्रवेशाबाबत पाकिस्तानी गृहमंत्रालयाकडे आमच्यापेक्षआ अधिक माहिती असणे शक्य आहे असेही अ‍ॅडमिरल नोमन बशीर यांनी सांगितले.