Leading International Marathi News Daily
रविवार , १ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

रस्त्यावरील राजकीय उद्रेकाची किंमत तीन कोटी !
अजित गोगटे, मुंबई, २८ फेब्रुवारी

अठरापगड विचारसरणीच्या राजकीय पक्ष-संघटनांकडून उठसुठ पुकारले जाणारे ‘बंद’ आणि ‘हरताळ’

 

आणि याचा राग रस्त्यावर येऊन व्यक्त करण्याची अंगवळणी पडलेली ‘सवय’ याची मुंबई, ठाणे व नाशिक या शहरांमधील परिवहन सेवांना तसेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळास (एसटी) गेल्या सुमारे तीन वर्षांत तीन कोटी रुपयांहून अधिक नुकसानीची झळ निष्कारण सोसावी लागल्याची माहिती माहितीच्या अधिकाराखाली प्राप्त झाली आहे.
दादर येथे राहणारे मििलद शरद मुळे यांनी एस.टी. महामंडळ, ‘बेस्ट’, ठाणे परिवहन सेवा, कल्याण-डोंबिवली परिवहन सेवा आणि नाशिक परिवहन सेवकडून माहितीच्या अधिकाराखाली मिळविलेल्या माहितीनुसार या परिवहन सेवांच्या ७,१८१ बसगाडय़ांची अपघातांमुळे तर २,८९७ बसगाडय़ांची राजकीय संतापाच्या रस्त्यावर झालेल्या उद्रेकामुळे मोडतोड झाली. ही आकडेवारी १ एप्रिल २००६ ते ३० नोव्हेंबर २००८ या ३२ महिन्यांची आहे. या काळात या परिवहन सेवांना अपघातांमुळे ९.१४ कोटी रुपयांची तर रस्त्यावरील राजकीय संतापामुळे ३.०७ कोटी रुपयांच्ऋी झळ सोसावी लागली.
मुळे यांनी प्राप्त केलेली माहिती असेही दर्शविते की, अपघातांमुळे होणाऱ्या नुकसानीच्या तुलनेत दंगलींमुळे होणाऱ्या नुकसानीची अगदीच नगण्य भरपाई वसूल होऊ शकते. याचाच अर्थ असा की, ज्या राजकीय कारणामुळे ‘बंद’ अथवा ‘हरताळ’ पुकारला जातो त्याच्याशी सूतरामही संबंध नसलेल्या सार्वजनिक परिवहन सेवांना निष्कारण मोठे नुकसान सोसावे लागते. या ३२ महिन्यांच्या काळात रस्त्यावरील राजकीय संतापाने सोसाव्या लागलेल्या नुकसानीपैकी वसूल होऊ शकलेली भरपाई शून्य किंवा अगदीच नगण्य आहे. गेल्या सुमारे तीन वर्षांत एस.टी, महामंडळाच्या एकूण १,६३८ बसगाडय़ांचे २.९० कोटी रुपयांचे ‘राजकीय’ नुकसान झाले पण त्यापैकी अगदी नगण्य म्हणजे फक्त ०.०७ टक्के एवढीच रक्कम वसूल होऊ शकली. ‘बेस्ट’ प्रशासनच्या १,२४६ बसगाडय़ांचे १४.८२ लाख रुपयांचे, कल्याण-डोंबिवली परिहवहन सेवेच्या १३ बसगाडय़ांचे ९६,७०० रुपयांचे तर ठाणे परिवहन सेवेचे ५१,२९१ रुपयांचे नुसकान झाले. मात्र यापैकी एक पैसाही भरपाईच्या स्वरूपात वसूल होऊ शकला नाही.
याउलट अपघातांमुळे झालेल्या ८.४७ कोटी रुपयांच्या नुसकानीपैकी १० टक्के रक्म एस.टी. महामंडळ वसूल करू शकले. ‘बेस्ट’ प्रशासन अपघतांमुळे झालेल्या ५५.८४ लाख रुपयांच्या हानीपैकी ५४ टक्के रक्कम भरपाई म्हणून वसूल करू शकले. कल्याण-डोंबिवली परिवहन सेवेला झालेले सर्व म्हणजे ५.५२ लाख रुपयांचे नुकसान वसूल करण्यात यश आले. नाशिक परिवहन सेवेच्या २.८९ लाख रुपयांच्या नुकसानीपैकी ९३ टक्के आणि ठाणे परिवहन सेवेच्या २.७९लाख रुपयांच्या नुकसानीपैकी ४६ टक्के रक्कम वसूल होऊ शकली. घाटकोपर येथे ‘बेस्ट’ बसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटानंतर ‘बंद’ पुकारून जनतेला वेठीस धरल्याबद्दल उच्च न्यायालयाने शिवसेना-भाजपला प्रत्येकी २५ लाख रुपयांचा दंड केला. इतरही काही ठिकाणी पुकारल्या गेलेल्या ‘बंद’वरून न्यायालयाने धारेवर धरल्यानंतर राज्य सरकारने अलीकडेच मुंबई पोलीस कायद्यात दुरुस्ती करून अशा ‘बंद’ व ‘हरताळ’च्या दरम्यान सार्वजनिक मालमत्तेचे होणारे नुकसान संबंधित पक्ष-संघटनांकडून वसूल करण्याची तरतूद केली. तरीही परिस्थिती फारशी बदलेल व रस्त्यावर उफाळून येणारा राग सार्वजनिक परिवहन सेवांच्या बसगाडय़ांवर काढण्याच्या कुप्रवृत्तीस त्यामुळे परिणामकारक आळा बसेल, असे चित्र नाही. कारण प्रत्यक्षात जाळपोळ व दगडफेक करताना जे पकडले जातील ते आमचे कार्यकर्तेच नाहीत, असा विश्वामित्री पवित्रा घेण्याचा राजकीय पक्ष-संघटनांचा मार्ग यानंतरही मोकळा असणार आहे.