Leading International Marathi News Daily
रविवार , १ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

महाअधिवेशनात राष्ट्रवादी फोडणार प्रचाराचा नारळ
नाशिक, २८ फेब्रुवारी / खास प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाअधिवेशनातच लोकसभा निवडणूक प्रचाराचा नारळ फोडायचा आणि तेथूनच

 

पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष निवडणूक रिंगणात तयारीनिशी उडी घ्यायची, अशा पद्धतीने या संपूर्ण अधिवेशनाची व्यूहरचना करण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून तयार केलेला एक लघुपट शरद पवार यांच्या हस्ते रविवारच्या अधिवेशनातच प्रदर्शित केला जाणार आहे. त्याचप्रमाणे अधिवेशनानिमित्त सकाळी निवडक प्रतिनिधींची बंद दाराआड एक बैठकही होणार आहे.
राष्ट्रवादीच्या रविवारच्या महाअधिवेशनासाठी नाशिक सज्ज झाले आहे. संपूर्ण शहरभर तसेच नाशिक जिल्ह्य़ासह सरहद्दीवरील अन्य जिल्ह्य़ातील प्रमुख मार्गावर स्वागत फलक, होर्डीग लावण्यात आले आहेत. थोडक्यात नाशिक शहर राष्ट्रवादीमय करण्यावर भर देण्यात आला आहे. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी जाहीर होवू शकते. ही बाब लक्षात घेवून राष्ट्रवादीच्या ‘पॉवर प्ले’साठी भुजबळ काका पुतण्याने या अधिवेशनात संपूर्ण जान ओतली आहे. काका-पुतण्याने इव्हेंट मॅनेजमेंटचा अंगभूत गुण त्यासाठी पुरेपूर वापरला आहे. विशेषत: अधिवेशनाला येणाऱ्या प्रत्येक पदाधिकारी वा कार्यकर्त्यांला लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम दिसावी, निवडणूक तंत्र अवगत व्हावे तसेच पक्षाने देश व राज्य सरकारांमध्ये सत्तारुढ असताना लोककल्याणाच्या राबविलेल्या योजना, हाती घेतलेले महत्वाकांक्षी प्रकल्प, त्याचा सामान्य मतदारांना प्रत्यक्षात झालेला लाभ, शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी, सिंचन योजना या सर्व मुद्यांवर बेतलेला आणि समीर भुजबळ निर्मित एक मिनिटाचा लघुपट पक्षनेते शरद पवार यांच्या हस्ते प्रदर्शित केला जाणार आहे. सायंकाळच्या जाहीर सभेअगोदर महाकवी कालिदास कलामंदिरात मंत्री, खासदार, आमदार, जिल्हा प्रमुख, शहर प्रमुख, महामंडळाचे अध्यक्ष व उपाध्यक्ष तसेच केंद्र व राज्य कार्यकारीणी सदस्यांची एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक पूर्णपणे चार भितींआड व्हावी अशापद्धतीने त्याबाबत दक्षता घेण्यात आली आहे.