Leading International Marathi News Daily
रविवार , १ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

लोडशेडिंग एक ते दीड तासाने कमी होणार
खाजगी उत्पादकांकडून ५०० मेगॅवॅट वीज घेणार
मुंबई, २८ फेब्रुवारी/प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर आता आचारसंहिता लागण्याच्या आधीच जनेताला सुखावणारे

 

निर्णय घेण्याच्या आघाडी सरकारच्या धडाक्यात आणखी एका निर्णयाची भर पडली आहे. नवे ऊर्जामंत्री सुनील तटकरे यांनी ऊर्जा खात्याचा कारभार सांभळल्यापासून या खात्यात बऱ्याच वर्षांनी सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून आता पुढील तीन महिने ५०० मेगॅवॅट वीज खाजगी उत्पादकांकडून घेण्याचे नक्की केले आहे.
शुक्रवारी रात्री उशीरा मंत्रिमंडळाची बैठक बोलाविण्यात आली होती. लोकसभा निवडणुकीची तारीख निवडणूक आयोग आता कधीही जाहीर करेल व पुढील तीन महिने आचारसंहितेमुळे कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेता येणार नाही त्यामुळे ही बैठक बोलाविण्यात आली. विजेमुळे ग्रामीणभागामध्ये सत्ताधाऱ्यांच्या विरोधात प्रचंड राग असल्याने लोडशेडिंग कमी करण्यासाठी तरतूद करण्याविषयी मंत्रिमंडळातील अनेक ज्येष्ठांचे गेले कित्येक दिवस म्हणणे होते. अखेर राज्याने यासाठी खास २०० कोटी रुपये प्रतीमहा तरतूद करण्याचे नक्की केले आहे.
यामुळे शहरांमध्ये दीड तास तर ग्रामीण भागामध्ये एक तास भारनियमन कमी होणार आहे. त्यामुळे परीक्षा व उन्हाळ्याच्या या हंगामामध्ये राज्यातील जनतेला काही अंशी का होईना दिलासा मिळणार आहे. ऊर्जामंत्री सुमील तटकरे यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता ते म्हणाले की, राज्यातील ऊर्जेचा प्रश्न चुटकीसरशी सुटणारा नसला तरीही ऊर्जा खाते राज्यातील जनतेला हा विश्वास देऊ इच्छिते की, ऊर्जेच्या प्रश्नाकडे आम्ही सकारात्मकदृष्टय़ा पाहात आहोत. येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील ऊर्जेच्या प्रश्नाची झळ बऱ्याच अंशी कमी करण्यात आम्ही यशस्वी ठरू, असा विश्वासही तटकरे यांनी यावेळी व्यक्त केला.