Leading International Marathi News Daily
रविवार , १ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

राष्ट्रीय राजकारणात काँग्रेसबरोबरच
राज्यात मात्र परिस्थितीनुसार निर्णय घेऊ
पुणे, २८ फेब्रुवारी/ विशेष प्रतिनिधी

राष्ट्रीय राजकारणात आम्ही काँग्रेसबरोबरच राहणार आहोत, अशी निसंदिग्ध भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस

 

पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना जाहीर केली. पण राज्याच्या बाबतीत बोलताना मात्र राज्या- राज्यातील परिस्थितीनुसार आम्ही निर्णय घेऊ असे सांगून काँग्रेसवरील दबाव कायम ठेवण्याचा आपला इरादा त्यांनी पुन्हा स्पष्ट केला.
वेस्टर्न अ‍ॅग्री फूड पार्क (प्रा.)लिमिटेडच्या पहिल्या मेगा फूड पार्कचे उद्घाटन आज पवार यांच्या हस्ते झाले. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते. काँग्रेसचा जागा वाटपाचा फॉम्र्युला आम्हाला मान्य नसल्याचे सांगून ते म्हणाले की, निवडून येण्याच्या निकषावरच तिकीट वाटप झाले पाहिजे, अशी आमची आग्रही भूमिका आहे. तरीही येत्या २ मार्चला त्यासंदर्भात होणाऱ्या अंतिम चर्चेतील निर्णय आम्हाला मान्य असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील निवडणुकांसंदर्भात बोलताना पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रात कमी जागा लढवून जास्त जागा जिंकल्या. लढविलेल्या ११६ पैकी ७२ जागा पक्षाने जिंकल्या. तर काँग्रेसला १६८ पैकी फक्त ६८ जागाच जिंकता आल्या. या टक्केवारीच्या आधारावर बोलायचे झाले तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच राज्यातील सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळेच आता आम्हाला विधानसभेच्या जास्त जागा मिळायला हव्यात. राज्या- राज्यातील अशी परिस्थिती विचारात घेऊनच तेथे कोणाबरोबर तडजोडी करायच्या याचा निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांच्याशी आपली अद्यापपर्यंत भेट झाली नाही, असे सांगून पवार म्हणाले की, निवडणुकीबाबत आपली चर्चा काँग्रेसबरोबरच सुरू असल्याने शिवसेनेबरोबर चर्चा करायला आपल्याला वेळच नाही. मात्र, बाळासाहेबांची प्रकृती ठीक नसल्याचे समजल्याने त्यांना भेटायला मात्र आपण लवकरच जाणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिरुरच्या जागा नक्की कोणाकडे हे अजुन ठरलेले नाही. जागा वाटपात ती काँग्रेसकडे गेली तर तेथून काँग्रेसचा उमेदवारच निवडणूक लढवेल, असेही ते म्हणाले.