Leading International Marathi News Daily
रविवार , १ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

दक्षिण-मध्य मुंबईवरून कामत , गायकवाड यांच्यात जुंपली
मुंबई, २८ फेब्रुवारी/प्रतिनिधी
मतदारसंघ पुनर्रचनेनंतर काँग्रेससाठी सर्वाधिक सोपा मतदारसंघ समजल्या जाणाऱ्या दक्षिण-मध्य मुंबईची

 

उमेदवारी मिळावी म्हणून विद्यमान खासदार एकनाथ गायकवाड व मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष व ईशान्य मुंबईचे खासदार गुरुदास कामत यांच्यात जबरदस्त रस्सीखेच सुरू झाली आहे. आज ‘वर्षां’ या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दिल्लीहून आलेले निरीक्षक आसीफअली टाक यांच्यासमोर कामत व गायकवाड यांच्या समर्थकांनी हा मतदारसंघ आपल्या नेत्यालाच का सुटायला हवा याची बाजू जोरदारपणे मांडली. यात गायकवाड यांच्या बाजूने त्यांची मुलगी व धारावीच्या आमदार वर्षां गायकवाड आणि नगरसेवक महेंद्र शिंदे हे दोघेच समर्थक होते. उर्वरित जगन्नाथ शेट्टी, युसूफ अब्राहनी, चंद्रकांत हंडोरे, कालीदास कोळंबकर हे आमदार आणि गेल्या विधानसभेचे दोन उमेदवार अजित सांवत व राजन भोसले तसेच नव्या दक्षिण-मध्यचे जिल्हाध्यक्ष विरेंद्र उपाध्याय व ईशान्यचे जिल्हाध्यक्ष वेल्लूस्वामी नायडू या सगळ्यांनी कामत यांना दक्षिण-मध्यमधून उमेदवारी द्यावी अशी बाजू निरीक्षकांसमोर मांडली. कामत हे सध्याच्या दक्षिण-मध्य मुंबईचे स्थानिक आहेत. तसेच तेथील कार्यकर्त्यांचे मानसही कामत यांना दक्षिण-मध्य व गायकवाड हे ज्या ईशान्य मुंबईत राहतात त्यांना इशान्य मुंबईची उमेदवारी द्यावी, असे असल्याचे म्हणणे मांडले.
विद्यमान खासदारांचा मतदारसंघ बदलण्याची काँग्रेसची परंपरा नाही. त्यात गायकवाड यांचा मतदारसंघ कापल्यास त्याचे परिणाम राज्यातील दलित मतांवर होण्याची शक्यता गायकवाड समर्थकांनी व्यक्त केल्याचे समजते.