Leading International Marathi News Daily

रविवार , १ मार्च २००९

प्रादेशिक

आज ‘गुलजार गुलछडी’ महालावणी महोत्सव
मुंबई, २८ फेब्रुवारी / प्रतिनिधी

‘गुलजार गुलछडी नटून मी खडी खडी’ म्हणत आपल्या दिलखेचक लावणी नृत्यांची रसिक प्रेक्षकांवर मोहिनी घालायला महाराष्ट्रातील एकापेक्षा एक लावण्यसुंदरी रविवार, १ मार्चला एका मंचावर येणार आहेत. राजमुद्रा कला अकादमीने या महालावणी महोत्सवाचा योग जुळवून आणलाय.
लावणीचा वारसा जपण्यासाठी धडपडणारी राजमुद्रा कला अकादमी आपल्या लावणी नृत्याविष्कार ‘गुलजार गुलछडी’च्या माध्यमातून महाराष्ट्रातील १२ लावण्यवती नृत्यांगनांना समोर आणणार आहे. रविवारी दुपारी ४ वाजता प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़मंदिरात पारंपरिक लावणीसह ठसकेबाज, शृंगारिक, खडी आणि बैठकीच्या लावणीचे रंग उधळले जाणार आहेत; पण याचबरोबर लोकशाहीवर विठ्ठल उमप यांना ‘जीवनगौरव’ पुरस्कारानेही गौरविण्यात येणार असल्याची माहिती राजमुद्राचे शंकर पिसाळ यांनी दिली. ‘या रावजी’, ‘कारभारी दमानं’, ‘झाल्या तिन्ही सांजा’ अशा एकापेक्षा एक सरस लावण्या संजीवनी मुळे-नगरकर, कविता घडशी, वर्षां दरपे, आसावरी तारे, आकांक्षा कदम, चैत्राली राजे, सुनीता कळमकर, शुभांगी सातारकर, मयुरी राजेशिर्के, करुणा साळवी, मनीषा शिर्के, कार्तिकी दीक्षित या लावण्यसुंदरी सादर करणार आहेत.

आजारी शिक्षकांची शिक्षण मंडळाला डोकेदुखी
तुषार खरात , मुंबई, २८ फेब्रुवारी

परीक्षांच्या काळात शिक्षकांमध्ये बळावतोय आजार
शिक्षण मंडळातील अधिकाऱ्यांपुढे उत्तरपत्रिका तपासण्याचे आव्हान
बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका वेळेत तपासून पूर्ण करण्यासाठी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने कंबर कसली आहे. परंतु, अनेक शिक्षकांनी आजारी असल्याचे कारण देत उत्तरपत्रिका तपासण्याच्या कामातून सूट देण्याची विनंती करणारे अर्ज शिक्षण मंडळाकडे धाडले आहेत. शिक्षण मंडळाच्या वाशी कार्यालयात दररोज पंधरा ते वीस शिक्षकांची अशी प्रकरणे येऊ लागल्यामुळे मंडळाचे अधिकारीही चक्रावून गेले आहेत. उत्तरपत्रिका तपासण्यासाठी शिक्षक कुठून उपलब्ध करायचे, असा यक्ष प्रश्न आता मंडळाच्या अधिकाऱ्यांसमोर उभा राहिला आहे. उत्तरपत्रिका तपासण्याचे काम टाळण्यासाठी शिक्षकांकडून आजाराची खोटी कारणे दिली जात असल्याचा संशय अधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे.

दिघी बंदरामुळे पाच हजारांना रोजगार मिळेल
मुंबई, २८ फेब्रुवारी / प्रतिनिधी

महाराष्ट्राला लाभलेल्या समुद्रकिनाऱ्यावर नवीन बंदरे विकसित करण्याच्या राज्य सरकारच्या धोरणानुसार सरकारी आणि खासगी सहभागातून सात लहान बंदरे विकसित करण्यात येणार असून त्यामध्ये मुंबईला जवळच असलेल्या रायगड जिल्ह्यातील दिघी बंदराचा समावेश आहे. हे बंदर २०१० मध्ये नियोजित वेळापत्रकानुसार कार्यान्वित होणार असल्याचा निर्वाळा राज्याचे उद्योग आणि बंदरे मंत्री नारायण राणे यांनी दिला आहे. सरकार आणि खासगी विकासक यांच्या भागीदारीतून उभारण्यात येणारा हा पहिलाच प्रकल्प असून दिघी बंदर हे अलीकडच्या काळातील एकच ‘ग्रीनफिल्ड’ प्रकल्प आहे. असे असतानाही या बंदरातून कोळशाची वाहतूकही करण्यात येणार आहे.

दोन पोलीस नाईक, एका शिपायास पुन्हा कामावर घेण्याचा आदेश
मुंबई, २८ फेब्रुवारी/प्रतिनिधी
सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांनी विनाचौकशी नोकरीतून बडतर्फ केलेले शिवाजी महादेव मांडले व होशीराम सत्तू शेळके हे दोन पोलीस नाईक आणि ‘पेरोबेशन’वर असताना नोकरीतून कमी केलेले पुणे शहर पोलीस दलातील एक पोलीस शिपाई संतोष नामदेव बेंढारी या तिघांना पुन्हा नोकरीत रुजू करून घेण्याचे आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) अलीकडेच दोन वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये दिले.

शिक्षकाच्या चुकीमुळे डीएडचे १३७ विद्यार्थी नापास
मुंबई, २८ फेब्रुवारी / प्रतिनिधी

डीएड अभ्यासक्रमाच्या संगीत विषयाची अंतर्गत परीक्षा २५ गुणांसाठी घेणे बंधनकारक असतानाही वडाळा येथील मुंबई डीएड महाविद्यालयातील या विषयाच्या शिक्षकाने गैरसमजुतीमधून १५ गुणांची परीक्षा घेतल्याने तब्बल १३७ विद्यार्थी नापास झाले आहेत. लेखी परीक्षेत घसघशीत गुण मिळाले असतानाही या चुकीमुळे या विद्यार्थ्यांना नापास व्हावे लागले आहे. शैलेश भट या संगीत शिक्षकाकडून ही चूक झाली आहे. परंतु, ही चूक तपासण्याची तसदी इतर वरिष्ठ शिक्षक तसेच प्राचार्याकडूनही झाली नाही. त्यामुळे या सदोष गुणांची माहिती ‘राज्य परीक्षा परिषदे’कडे पाठविण्यात आली. परिषदेनेही या माहितीची पडताळणी न करता चुकीचा निकाल जाहीर केला. गुणांतील हा दोष दूर करून सुधारित गुणपत्रिका बनविण्याची विनंती विद्यार्थ्यांनी शिक्षणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, शिक्षण सचिव संजय कुमार, परीक्षा परिषदेचे आयुक्त राम इथापे यांच्याकडे केली आहे. परंतु, या विनंतीची दखल घेण्यात येत नसल्याचे विद्यार्थ्यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. याबाबत, महाविद्यालयाच्या प्राचार्या सविता देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, या चुकीची गंभीर दखल घेऊन आम्ही संबंधित शिक्षकाला निलंबित केले आहे. विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेत सुधारित गुण नमूद करण्याची विनंतीही आम्ही परीक्षा परिषदेला केली आहे. परंतु, परिषदेने अशी सुधारणा करण्यास नकार दिल्याचे त्यांनी सांगितले.

‘महाराष्ट्र माझा’ पाक्षिकाचे प्रकाशन
मुंबई, २८ फेब्रुवारी/प्रतिनिधी

मनसेचे निष्ठावान कार्यकर्ते आणि राज ठाकरे यांचे निकटवर्तीय शिरीष पारकर यांनी महाराष्ट्र माझा नावाने जो दिवाळी अंक सुरू केला होता, तो आता पाक्षिक स्वरुपात प्रकाशित होणार आहे. शुक्रवारी संध्याकाळी वांद्रे येथील रंगशारदा येथे या पाक्षिकाचा पहिला अंक प्रकाशित करण्यात आला.
पारकर यांनी सांगितले की, पहिल्या वहिल्या दिवाळी अंकाला वृत्तपत्र लेखक संघाचा पुरस्कारही मिळाला. मात्र त्यानंतर अनेक मराठीप्रेमी व मनसेच्या कार्यकर्त्यांनी मराठीची भूमिका मांडण्यासाठी योग्यते व्यासपीठ मिळावे म्हणून महाराष्ट्र माझा सातत्याने प्रकाशित करावे, असा धोशा माझ्या मागे लावला होता आणि ते योग्यही होते म्हणूच आपण आता पाक्षिकाच्या रुपात महाराष्ट्र माझा प्रकाशित होणार आहे. हा पहिला अंक २६ पानांचा असून त्यात एकही जाहिरात नाही. मंदीमुळे जाहिरातींचा बाजारही थंड असल्याने या अंकात जाहिराती नाहीत, असे पारकर म्हणाले. मात्र जाहिरातीशिवायही अंक प्रकाशित झाल्याने हे पाक्षिक स्थिरावल्याचीच मराठीप्रेमींची भावना आहे.

लाच घेणाऱ्या गृहपालाला निलंबित करण्याची मागणी
मुंबई, २८ फेब्रुवारी / प्रतिनिधी

राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने चालविण्यात येत असलेल्या वरळी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहाचे गृहपाल दीपक सावंत यांना विद्यार्थ्यांकडून लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी रंगेहाथ पकडले होते. परंतु, सावंत यांच्यावर सामाजिक न्याय विभागाने कोणतीच कारवाई केली नसल्याबद्दल समतावादी छात्रभारतीने नाराजी व्यक्त केली आहे. सावंत यांना तात्काळ निलंबीत करण्यात यावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे उपाध्यक्ष मनोज टेकाडे यांनी दिला आहे. नीलेश खरात या विद्यार्थ्यांला वरळी वसतिगृहामध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश मिळाला होता. गुणवत्ता यादीत त्याचे नावही प्रसिद्ध झाले होते. परंतु, प्रत्यक्षात प्रवेश देताना गृहपाल सावंत यांनी त्याच्याकडे पैशाची मागणी केली. दोन महिन्यांपासून सावंत यांनी त्याला प्रवेश दिला नव्हता. त्यामुळे खरात याने आपला मित्र बाबासाहेब कांबळे याच्या मदतीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीनुसार लाचलुचपत विभागातील अधिकाऱ्यांनी सापळा रचून सावंत यांना लाच घेत असताना अटक केली होती. याबाबत, सामाजिक न्यायमंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या विषयावर काहीही बोलण्यास नकार दिला.

बेहिशेबी मालमत्ता बाळगण्याप्रकरणी दोन प्राप्तीकर अधिकाऱ्यांना अटक
मुंबई, २८ फेब्रुवारी / प्रतिनिधी

बेहिशेबी मालमत्ता बाळगण्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) शुक्रवारी दोन प्राप्तीकर अधिकाऱ्यांना अटक केली असून त्यात एका अतिरिक्त आयुक्ताचा समावेश आहे. वरिष्ठाच्या नावाखाली लाच मागितल्याप्रकरणी टी. व्ही. मोहन या अधिकाऱ्याला अटक करण्यात आल्यानंतर अतिरिक्त आयुक्त के. एम. केशकामत यांच्या बेहिशेबी मालमत्तेचे प्रकरण उजेडात आले होते. केशकामत यांच्या नावाखाली बोरिवली येथील रियल इस्टेट एजंटकडून साडेचार लाख रुपयांची लाच स्वीकारताना मोहन यांना सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ अटक केली होती. याप्रकरणी एका चार्टर्ड अकाऊंटंटचाही सहभाग असून त्यालाही अटक करण्यात आली आहे. मोहन यांच्या चौकशीत केशकामत यांच्याकडील बेहिशेबी मालमत्तेचे उघड झाल्यानंतर सीबीआयतर्फे केशकामत यांच्या नावावर असलेल्या तीन घरांवरही छापा टाकला. केशकामत यांची तिन्ही घरे हिरानंदानी संकुलात असून त्यांची अनुक्रमे किंमत दीड कोटी, ८५ लाख आणि ८२ लाख अशी आहे. केशकामत यांचे एक दुकानही असून त्याचीही किंमत सव्वा कोटी रुपयांच्या घरात आहे. याशिवाय त्यांच्या अ‍ॅक्सिस बँकेतील लॉकरमधून अडीच किलो सोनेही सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी या धाडीदरम्याम जप्त केले. अ‍ॅक्सिस बँकेतील लॉकरप्रमाणे केशकामत यांचे गोवा येथील एका बँकेतही खाते आहे. तर मोहन यांचे बोरिवली येथे दोन फ्लॅट असून एक त्यांच्या नावावर आहे व दुसरा त्यांच्या वडिलांच्या नावावर आहे. मोहन यांची १८ बँक खाती असून सीबीआयतर्फे त्याबाबत चौकशी केली जात आहे.

भुलेश्वर येथे दरोडय़ानंतर गोळीबार
मुंबई, २८ फेब्रुवारी / प्रतिनिधी

भुलेश्वर येथील आत्माराम र्मचट मार्गावरील द्वारकेश र्मचट इमारतीतील दागिन्यांच्या कारखान्यात शुक्रवारी रात्री पाचजणांनी दरोडा टाकून पाऊण किलो सोने लुटून नेले. पसार होताना दरोडेखोरांनी कारखान्यात गोळीबार केला. त्यात कारखान्याचा मालक जखमी झाला असून त्याच्यावर जे. जे. रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शुक्रवारी रात्री साडेनऊच्या सुमारास पाच दरोडेखोर घुसले. मालक बाणेश्वर वाघ यांच्यासह १० कारागिर कारखान्यात होते. दरोडेखोरांनी बंदुक आणि चाकूचा धाक दाखवून कारखान्यातील सात लाख ६० हजार रुपयांचे पाऊण किलो सोने बॅगेत भरले. तसेच तेथून पसार होताना गोळीबार केला. या गोळीबारात वाघ यांच्या पायाला गोळी लागली. द्वारकेश र्मचट इमारत पूर्णत: व्यावसायिक असल्याने परिसरात फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे दरोडेखोर इमारतीत शिरताना आणि सोने लुटून पसार होताना कोणीच पाहिले नाही. परंतु याप्रकरणी वाघ यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला असून याप्रकरणी तपास सुरू असल्याचे लोकमान्य टिळक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयप्रकाश सरमोकादम यांनी सांगितले.

मुलाखती देत नसल्याने ‘स्लमडॉग’मधील अजहरला वडिलांकडून मारहाण
मुंबई, २८ फेब्रुवारी / प्रतिनिधी

‘स्लमडॉग मिलेऑनर’चित्रपटात लहानपणीच्या सलीमची भूमिका केलेला बालकलाकार अजहर याला त्याच्याच वडिलांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी धारावी झोपडपट्टीत घडला. घरी आलेल्या प्रसारमाध्यमाच्या मंडळींना भेटण्यास नकार दिल्याच्या कारणावरून अजहरला ही मारहाण झाली असल्याचे सांगण्यात आले. ‘ऑस्कर’चा पुरस्कार घेऊन सर्व मंडळी गुरुवारी परतली. त्या दिवशीही अजहरच्या घरी अनेक मंडळींनी तसेच प्रसारमाध्यमाच्या लोकांनी गर्दी केली होती. विमानप्रवास आणि सगळ्यांशी बोलून तो थकला होता. दुसऱ्या दिवशी तो शाळेतही गेला नाही. शुक्रवारी प्रसारमाध्यमातील काही प्रतिनिधी अजहरच्या घरी गेले. अजहरला विश्रांती हवी असल्याने त्याने लोकांना भेटण्यास नकार दिला. त्यामुळे त्याचे वडील मोहंमद इस्माईल यांना राग आला. रागाच्या भरात त्यांनी अजहरला सर्वासमोर मारहाण केली. मात्र काहीवेळाने झाल्या प्रकाराबद्दल त्यांनी माफी मागितली. मात्र असे असले तरी झाल्या प्रकाराबद्दल जोरदार चर्चा बॉलिवूड आणि धारावी परिसरात रंगली आहे.

‘मधुकर पाटील यांचा येऊर येथे बंगला नाही’
मुंबई, २८ फेब्रुवारी/प्रतिनिधी

ठाण्याचे माजी जिल्हाधिकारी मधुकर पाटील यांचा येऊरच्या डोंगरावर कोणताही बंगला नाही आणि येऊर येथे त्यांचा बगला असल्याविषयी उच्च न्यायालयापुढे केला गेलेला उल्लेख चुकीने केला गेला होता, असा खुलासा येऊरच्या बंगल्यांविषयी जनहित याचिका केलेले चंद्रकांत नाथु जाधव यांनी केला आहे. जाधव यांच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली तेव्हा त्यांचे वकील अ‍ॅड. सुहास ओक यांनी मधुकर पाटील यांचाही येऊर येथे बंगला असल्याचे सांगितले होते. त्यामुळे याविषयी गुरुवारी प्रसिद्ध झालेल्या ‘लोकसत्ता’मधील बातमीतही तसे लिहिले गेले होते. मात्र जाधव यांनी आता असा खुलासा केला आहे की, आपण आपल्या वकिलांना चुकीची माहिती दिली त्यामुळे मधुकर पाटील यांचा बंगला येऊर येथे असल्याचे न्यायालयास सांगितले गेले.