Leading International Marathi News Daily

रविवार , १ मार्च २००९

शिर्डी रेल्वेस्थानक आंतरराष्ट्रीय दर्जाचे करू - लालूप्रसाद
राहाता, २८ फेब्रुवारी/वार्ताहर

शिर्डी रेल्वेस्थानकाचा विस्तार करून ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे केले जाईल, असे रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी आज जाहीर केले. रस्त्यावरील वाहतुकीचा बोजा कमी करण्यासाठी रेल्वेने मालवाहतुकीची व्यवस्था उभारण्याची घोषणाही त्यांनी केली.

निळू फुलेंना समताभूषण पुरस्कार प्रदान
अकोले, २८ फेब्रुवारी/वार्ताहर

कलाकार म्हणून गेल्या चार दशकांपेक्षा अधिक काळ मराठी मनावर अधिराज्य गाजवितानाच सामाजिक समतेच्या लढय़ातही आपला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग नोंदविणारे, सामाजिक बांधिलकी जोपासणारे चित्रपट अभिनेते निळू फुले यांना आज ‘समताभूषण’, तर आपली कला व प्रतिभा सामाजिक समतेच्या संगरात लढण्यासाठी वापरणारे लोकशाहीर विठ्ठल उमप यांना भंडारदरा येथे धम्मयात्रेत ‘समाजभूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. भंडारदऱ्याच्या निसर्गरम्य परिसरात, भंडारदरा जलाशयाकाठच्या ‘जेतवना’च्या पवित्र भूमीत मावळतीच्या सूर्याच्या साक्षीने झालेल्या या कार्यक्रमासाठी भन्ते जुन्सी, कामगार नेते किशोर पवार, श्रीमती सुशीलाबाई रूपवते, अशोक भांगरे यांच्यासह विविध ठिकाणांहून आलेले समताप्रेमी नागरिक उपस्थित होते.

आकार
काही दिवसांपूर्वीची
वकील सतीश भोपेंच्या
ऑफिसमधली
एक महत्त्वपूर्ण बैठक
अन् त्या बैठकीतील चर्चेत
असूनही नसलेला ‘मी’
कारण माझं सगळं लक्ष
सतीशच्या मागच्या भिंतीवर.

लूलीन धुमकेतू
आपण मागच्या महिन्यात नगरवरील आकाशात दिसणाऱ्या ताऱ्यांचे, ग्रहांचे, नक्षत्रांचे अवलोकन या लेखात दिलेल्या नकाशातील दिलेल्या माहितीनुसार केलेले असेलच. आज या लेखाबरोबर मार्च महिन्याचे ५ नकाशे दिले आहेत. त्यांच्या साहाय्याने आपण निरीक्षणकरणार आहोतच. मात्र, या लेखातून मार्च २००९मध्ये खगोलशास्त्रात घडणाऱ्या विस्मयकारक घटनांची आपण माहिती घेणार आहोत व पुढील रविवारी या सदरातील आजच्या नकाशांच्या साहाय्याने नभांगणाची सफर करणार आहोत.

सहा. निरीक्षक शेख यांच्यासह ३६ पोलीस अधिकाऱ्यांना बढती
नगर, २८ फेब्रुवारी/प्रतिनिधी

पोलीस महासंचालकांनी राज्यातील ३६ सहायक निरीक्षकांना बढतीचे आदेश काढले असून, नगर तालुका ठाण्यातील सहायक निरीक्षक एस. डी. शेख यांचा त्यात समावेश आहे. शेख यांची पोलीस निरीक्षक म्हणून बढती झाली आहे. राज्यातील ३६ अधिकाऱ्यांना पोलीस निरीक्षक पदावर बढती देण्यात आली. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांची तयारी सुरू असताना या बढतीचेही आदेश काढण्यात आले. नगरचे पोलीस अधीक्षक अशोक डोंगरे यांचीही बदली होण्याचे निश्चित झाले आहे. मात्र, अजूनही त्यांना बदलीचा आदेश मिळालेला नाही.

बारावीचा विद्यार्थी बेपत्ता
देवळाली प्रवरा, २८ फेब्रुवारी/वार्ताहर

बारावीचे पेपर अवघड जातात, म्हणून आज सकाळी पेपर देण्यासाठी बाहेर पडलेला मुलगा उशिरापर्यंत घरी न आल्याने राहुरी पोलिसांनी हरविल्याची नोंद केली आहे. राहुरीतील कासारगल्लीत राहणारा योगेश श्रीमंत दळवी (वय १८) हा बारावी विज्ञान शाखेत शिकतो. बारावीचा आज हिंदी विषयाचा पेपर होता. त्याला परीक्षेचे पेपर अवघड जात होते. त्यामुळे वडिलांनी त्याची समजूत काढली होती. आज सकाळी पेपर देण्यासाठी घरातून बाहेर पडला होता. त्याने राहुरी महाविद्यालयात जाऊन हिंदी विषयाचा पेपर दिला. मात्र, पेपर देऊन तो लवकरच परीक्षा कक्षाबाहेर पडल्याचे त्याच्या मित्रांनी सांगितले. याबाबत श्रीमंत भिकाजी दळवी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हरविल्याची नोंद केली. तपास सहायक फौजदार दिलीप अकोलकर करीत आहेत.

आंतरराष्ट्रीय फायटिंग स्पर्धेसाठी माळी यांची निवड
कोपरगाव, २८ फेब्रुवारी/वार्ताहर

दक्षिण कोरिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय फायटिंग स्पर्धा व प्रशिक्षणासाठी येथील नॅशनल तायक्वांदो अ‍ॅकॅडमीचे प्रमुख नारायण माळी यांची निवड झाली. नगर जिल्ह्य़ामधून एकमेव माळी यांची निवड झाली. दि. १ मे रोजी या स्पर्धा होणार आहेत. माळी यांना या स्पर्धेसाठी दीड लाख रुपयांहून अधिक खर्च येणार असल्याने दानशूरांनी मोबाईल ९९२१७६१३१८ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

राहुरी फ्रेन्डस क्लबचे कार्य कौतुकास्पद - तनपुरे
राहुरी, २८ फेब्रुवारी/वार्ताहर

शैक्षणिक स्पर्धाच्या काळात खेळाला दुय्यम स्थान दिले जात असताना शहरी व ग्रामीण भागातील खिलाडूवृत्तीच्या विविध खेळांच्या स्पर्धा यशस्वी करून राहुरी फ्रेन्डस् क्लबने कौतुकास्पद कार्य केल्याचे प्रतिपादन बाजार समितीचे सभापती अरुण तनपुरे यांनी केले.फ्रेन्डस् क्लबने जिल्हास्तरीय बॅडिमटन स्पर्धेचे आयोजन केले होते. स्पर्धेचे उद्घाटन तनपुरे यांच्या हस्ते आले. प्रभाकर पानसंबळ, संदीप राऊत, राजेंद्र उंडे, क्लबचे अध्यक्ष भाऊसाहेब मेहेत्रे, राधेश्याम मेहेर, नितीन कपाडिया उपस्थित होते. तनपुरे म्हणाले की, ग्रामीण भागातील खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी विविध स्पर्धाचे आयोजन करणे गरजेचे आहे.

विठ्ठलनाथमहाराज यांचे निधन
शेवगाव, २८ फे ब्रुवारी/वार्ताहर

तालुक्यातील भाविनिमगाव येथील विठ्ठलनाथमहाराज यांचे निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. विठ्ठल मंदिर, आनंद आश्रम आणि दत्तात्रेय मंदिराच्या उभारणीत त्यांचा मोठा सहभाग होता. गावकऱ्यांनी आपले व्यवहार बंद ठेवून त्यांना श्रद्धांजली वाहिली. आमदार नरेंद्र घुले, कृष्णदेवमहाराज काळे, उत्तमराव मोटेमहाराज, अशोकनंदमहाराज, सुखदेवमहाराज मुंगसे, डॉ. कैलास कानडे, डॉ. अरुण पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.

कंपनीतील भंगार चोरणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्याला अटक
नगर, २८ फेब्रुवारी/प्रतिनिधी

केडगाव येथील रुबी रोलर्स वर्कशॉप कंपनीतून भंगार चोरणाऱ्या कंपनीच्या सुरक्षा कर्मचाऱ्याला कंपनी मालकाने रंगेहाथ पकडून पोलिसांच्या हवाली केले. पोलिसांनी त्याला अटक केली. कोतवाली पोलिसांनी त्याच्याकडून सुमारे बाराशे रुपयांचा माल जप्त केला. सादिक शफी शेख (भरत तलाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. शेख अब्दुल मतीन अब्दुल मजीद (वय ३८) यांनी फिर्याद दिली. शेख अब्दुल यांची केडगावला रुबी रोलर्स कंपनी आहे. तो कंपनीतून काही दिवसांपासून लोखंडी साहित्याची चोरी होता.

सारसनगरमध्ये महिला,बालकांची आरोग्य तपासणी
नगर, २८ फेब्रुवारी/प्रतिनिधी

सारसनगरच्या (कै.) दामोदर विधाते विद्यालयात महापालिका व एकात्मिक बाल आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी यांनी आयोजित केलेले महिला व बालकांसाठी विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिर झाले. मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. एन. जी. कुलकर्णी यांनी शिबिराचे उद्घाटन केले. मुख्याध्यापक म्हस्के अध्यक्षस्थानी होते. डॉ. सुजाता साळवे, डॉ. राजूरकर, डॉ. सुररकर, डॉ. आयेशा शेख, डॉ. शंकर शेंदाळे यांनी महिला व बालकांची आरोग्य तपासणी केली. सदाफळे यांनी सूत्रसंचालन केले.

आज शिर्डीत परिचय मेळावा
कोपरगाव, २८ फेब्रुवारी/वार्ताहर

माळी समाजातील वधू-वरांचा राज्यव्यापी परिचय मेळावा उद्या (रविवार) सकाळी १० वाजता शिर्डी येथील निसर्ग हॉटेलमध्ये होणार आहे. त्याची तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती संयोजक सुभाष एकतपुरे यांनी दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे असतील. उद्घाटन डॉ. सुनंदा नवले यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या वेळी ध्रुवशेठ कानपिळे, राधाकृष्ण सोनवणे, शिवाजी एकतपुरे, हेमंत रासकर, किशोर बोरावके, राहुल कुदळे, रेखा महाजन, मंजिरी धाडगे, विजया देडगे आदी उपस्थित राहणार आहेत.

सोनूबाई शेळके यांचे निधन
वाडेगव्हाण, २८ फेब्रुवारी/वार्ताहर

येथील सोनूबाई ज्ञानदेव शेळके यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. त्यांच्यामागे ६ मुले, १ मुलगी असा परिवार आहे. प्रभू विद्याधाम प्रशाला वाडेगव्हाण येथील ज्येष्ठ शिक्षक संभाजी शेळके यांच्या त्या मातुश्री होत.

प्रकल्पग्रस्त उमेदवारांचा उद्या नगरला मेळावा
नगर, २८ फेब्रुवारी/प्रतिनिधी

जिल्ह्य़ातील सर्व प्रकल्पग्रस्त उमेदवारांचा मेळावा दि. २ मार्चला सकाळी १० वाजता जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी दिली. मेळाव्यात जिल्ह्य़ातील दहावी, बारावी, पदवी व इतर शैक्षणिक पात्रता असणाऱ्या प्रकल्पग्रस्त उमेदवारांच्या प्रश्नांवर चर्चा होणार आहे. या मेळाव्यास प्रकल्पग्रस्त उमेदवारांनी उपस्थित रहावे, असे आवाहन दहातोंडे यांनी केले आहे.

स्पर्धात्मक जीवन जगण्याचे कौशल्य शिका - डोईफोडे
नगर, २८ फेब्रुवारी/प्रतिनिधी

यश हे एकमेव उद्दिष्ट न ठेवता खेळाडूंनी स्पर्धात्मक जीवन जगण्याचे कौशल्य शिकावे. क्रीडा क्षेत्र हे संघभावना वाढीस लागण्यासाठी महत्त्वाचे ठरते, असे प्रतिपादन पोलीस उपअधीक्षक संदीप डोईफोडे यांनी केले. नेहरू युवा केंद्र व वीरेंद्र युवक क्रीडा मंडळातर्फे आयोजित जिल्हास्तरीय क्रीडा महोत्सव उद्घाटनप्रसंगी डोईफोडे बोलत होते. या प्रसंगी जिल्हा क्रीडाधिकारी प्रमोदिनी गड्डमवार, जिल्हा युवक समन्वयक श्रीराम अहिरराव, रमेश नागवडे, अशोक पितळे उपस्थित होते.श्री. अहिरराव यांनी सांगितले की, युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागापर्यंत युवक-युवतींसाठी भरीव कार्यक्रम राबविले जातात.

बंकटलाल भळगट यांचे निधन
नगर, २८ फेब्रुवारी/प्रतिनिधी

नेवासे तालुक्यातील वडाळा बहिरोबा येथील बंकटलाल किसनदास भळगट यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. नेवासे तालुका जैन श्रावक संघाच्या स्थापनेत भळगट यांचे विशेष योगदान होते. जाणता राजा ग्रामीण पतसंस्थेचे उपाध्यक्ष शरद भळगट यांचे ते वडील होत. वडाळा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.