Leading International Marathi News Daily

रविवार , १ मार्च २००९

एन.एम.एम.टी.च्या चौक्या बनल्या गर्दुल्ल्यांची आश्रयस्थाने
विजय भोर

२१ व्या शतकातील आधुनिक शहर म्हणून टेंभा मिरविणाऱ्या नवी मुंबईत महापालिका व पोलीस प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे येथील एन.एम.एम.टी.च्या चौक्या, बस आगारे अक्षरश: गर्दुल्ल्यांची आश्रयस्थाने बनत चालली आहेत. या समस्येकडे लक्ष द्यायला सुस्त लोकप्रतिनिधींनाही वेळ नसल्याने नवी मुंबईकरांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टला वाहतूक कोंडी
रेल्वे क्रॉसिंगजवळ हवा फ्लायओव्हर ब्रिजरेल्वे क्रॉसिंगजवळ हवा फ्लायओव्हर ब्रिज

मधुकर ठाकूर

उरण परिसरात वाढत्या औद्योगिक पसाऱ्यामुळे वाहनांची वर्दळ प्रचंड प्रमाणात वाढली आहे. वाढत्या रहदारीमुळे करळ फाटा म्हणजे वाहतूक कोंडीचे ठिकाण बनत चालले आहे. यामुळे आता उरण-करळ मार्गावरील रेल्वे क्रॉसिंगवर फ्लायओव्हर ब्रिज उभारण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.
केंद्र व राज्य सरकारचे विविध प्रकल्प उभारल्याने येथील वर्दळ वाढली आहे. त्यात जेएनपीटीसारख्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बंदराची भर पडली आहे. समुद्रमार्गे मालवाहतूक जलद व कमी खर्चात होऊ लागल्याने सर्वच बंदरांना अधिक महत्त्व प्राप्त होऊ लागले आहे.

राजकीय अजेंडय़ाला ‘कौतुका’ची किनार!
जयेश सामंत

लोकसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर नवी मुंबईतील प्रमुख राजकीय पदांमध्ये सध्या जोरदार धूळवड रंगली असताना अशाच एका राजकीय शक्तीप्रदर्शनामुळे नवी मुंबईकरांची शुक्रवारची संध्याकाळी संस्मरणीय ठरली. जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून काही वर्षांत नावारूपास आलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांनी ‘झी सारेगमप’मधील पाच ‘लिटील चॅम्पस्’चा अभूतपूर्व असा कौतुक सोहळा शहरात घडवून आणला आणि या पाचही बालवीरांचे हे कौतुक न्याहाळण्यासाठी नवी मुंबईकरांनी हजारोंच्या संख्येने गर्दी केली. लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता कधी लागेल याचा नेम नसताना चौगुले आणि पर्यायाने शिवसेनेने घडवून आणलेला ‘लिटील चॅम्पस्’चा हा कौतुक सोहळा शहरातील राजकीय शक्तीप्रदर्शनाचा कळस तर ठरलाच, शिवाय नवी मुंबईकरांना अतिशय दर्जेदार आणि अभूतपूर्व अशा सोहळ्याचा आनंदही देऊन गेला. कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन, आर्या आंबेकर, प्रथमेश लघाटे आणि रोहित राऊत हे पाच ‘लिटील चॅम्पस’ सध्या मराठी मनावर अधिराज्य करीत आहेत. ‘सारेगमप’च्या माध्यमातून मराठी मनाला भुरळ घालणाऱ्या या चॅम्पस्चे नवी मुंबईकरांच्या वतीने कौतुक करावे, अशा पद्धतीने चौगुले तसेच शिवसेनेने या कार्यक्रमाची आखणी केली. मराठी मनाचा मानबिंदू ठरलेल्या कार्तिकी, मुग्धा, आर्या, प्रथमेश व रोहितचे कौतुक असा या सोहळ्याचा चेहरा असला, तरी या कार्यक्रमाचे चौगुले यांचा ‘छुपा अजेंडा’ लपला नव्हता. या सोहळ्यासाठी निवडलेल्या स्थळापासूनच ही शक्तीप्रदर्शनाची तयारी असल्याचे स्पष्टपणे दिसून येत होते. नवी मुंबईत नव्या रचनेत दिघा ते वाशी असा ‘ऐरोली’, तर वाशी ते पुढे बेलापूर असा ‘बेलापूर’ असे विधानसभेचे दोन मतदारसंघ बनले आहेत. चौगुले यांनी या सत्कार सोहळ्याकरिता या दोन्ही मतदारसंघांना जोडणारे वाशी सेक्टर-१२ चे काहीसे दुर्लक्षित असे मैदान निवडले. वाशी आणि कोपरखैरणे या दोन्ही नगरांच्या अगदी मधोमध अशा या मैदानावर हा सोहळा भरवून या कार्यक्रमाचे वारे संपूर्ण नवी मुंबईत जातील, अशी व्यवस्था चौगुले यांनी हे स्थळ निवडून केली. सिडकोकडून महापालिकेच्या ताब्यात आलेल्या या भूखंडाची रातोरात सफाई, सपाटीकरण करण्यात आले. हा महापालिकेचा भूखंड आहे, अशी भूमिका घेत या सोहळ्यात अडचणी उभ्या राहतील, असे प्रयत्न सुरू होते. मात्र शिवसेनेने कार्यक्रम करू, तर याच मैदानात अशी भूमिका घेत काहीशी आक्रमक भूमिका घेतल्याने महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी अडचणीत सापडले. लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर सध्या शहरात राजकीय कार्यक्रमांची अक्षरश: राळ उठली आहे. गणेश नाईक, त्यांचे पुत्र संजीव नाईक, विजय चौगुले यांनी कार्यक्रमांचा रतीब लावला आहे. क्रिकेट स्पर्धा, क्रीडा महोत्सव, युवा मेळावे, महिला मेळावा, जिल्हावासीयांचे मेळावे, सभांनी शहरातील राजकीय बाजार चांगलाच तेजीत आणला आहे. या पाश्र्वभूमीवर चौगुले यांनी सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर असणाऱ्या ‘लिटील चॅम्पस्’चा कौतुक सोहळा भरवून अतिशय दमदार आणि जोरकस असे शक्तीप्रदर्शन घडवून आणले. एरवी राजकीय धुळवडीपासून कोसो मैल दूर राहणे पसंद करणाऱ्या सर्वसामान्य नवी मुंबईकरांनीही या लिटील चॅम्पस्च्या कौतुकासाठी कशाचाही मुलाहिजा न ठेवता या अभूतपूर्व अशी गर्दी केल्याने हे पाचही ‘बालवीर’ आणि त्यांचे पालकही भारावून गेले! एखाद्या राजकीय पक्षाचा कार्यक्रम म्हटला की त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होणारच, मात्र या कौतुक सोहळ्याला सर्वसामान्य नवी मुंबईकरांनी जो मोठा प्रतिसाद दिला ते पाहून शिवसैनिकही अवाक् झाले. होम मिनिस्टर फेम आदेश बांदेकरांना ऐरोलीत एका महिला मेळाव्यात पाचारण करून चौगुले यांनी धमाल उडवून दिली होती. या पाठोपाठ ‘लिटील चॅम्पस’च्या कौतुक सोहळ्याचे आयोजन करून सेलिब्रेटीजचा ‘पॉलिटिकल फोरम’साठी कसा वापर करून घ्यायचा याचे नमुनेदार प्रदर्शन चौगुले यांनी पुन्हा घडविले. या पाचही बालकलाकारांनी सलग तीन तास आपल्या अदाकारीचे दर्जेदार असे प्रदर्शन घडवून नवी मुंबईकरांना बेहद खूष तर केलेच, शिवाय एका ऐतिहासिक अशा सोहळ्याचे साक्षीदारही बनवून टाकले. मुग्धा, कार्तिकीच्या ठसकेबाज लावण्या असोत वा रोहित, आर्या, प्रथमेशचे एनर्जेटिक परफॉर्मन्स असोत नवी मुंबईकरांनी या पाचही ‘चॅम्पस्’ना अक्षरश: डोक्यावर घेतले. हा सोहळा अखेरच्या टप्प्यात आला असतानाही नवी मुंबईकरांचे लोंढेच्या लोंढे सेक्टर-१३ च्या मैदानात धडकत होते, हे विशेष! या कौतुक सोहळ्यामागील चौगुले यांचा ‘छुपा पॉलिटिकल अजेंडा’ लपू शकला नाही हे खरे, मात्र या शक्तीप्रदर्शनाने नवी मुंबईकरांना ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार बनविले, हेही विसरता येणार नाही!