Leading International Marathi News Daily

रविवार , १ मार्च २००९

राज्य

वंचित वर्गाची प्रगती झाली नाही तर देशाचा विकास अर्धवट-सोनिया गांधी
सोलापूर, २८ फेब्रुवारी/प्रतिनिधी

कमकुवत, वंचित वर्गापर्यंत आपण पोहोचत नाही तोपर्यंत देशाचा विकास अर्धवट आहे. दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, महिलांच्या विकासाची जबाबदारी निश्चित करायला हवी. त्या अनुषंगाने सद्भावना आणि सामाजिक न्यायाच्या वातावरणात केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारची पावले पडत असल्याचा दावा काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील फताटेवाडी येथे राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळातर्फे (एनटीपीसी) ६६०० कोटी खर्चाच्या १३२० मेगावॉट औष्णिक ऊर्जा प्रकल्पाचा कोनशिला समारंभ श्रीमती गांधी यांच्या हस्ते शनिवारी दुपारी पार पडला. त्यावेळी उपस्थित हजारो जनसमुदायाशी त्यांनी संवाद साधला.

आताच पंतप्रधान पदाची चर्चा कशाला? - लालू प्रसाद यादव यांचा सवाल
औरंगाबाद, २८ फेब्रुवारी/खास प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्यात पंतप्रधान पदाचे भावी उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव घेतले जात आहे. शिवसेनेनेही या नावाला आपला पाठिंबा देऊ केला आहे. या संदर्भात बोलताना ‘हे हिंदुत्ववादी लोक कुणालाही पंतप्रधान बनवतात,’ अशा शब्दांत राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि रेल्वेमंत्री लालूप्रसाद यादव यांनी पंतप्रधान पदाच्या संभाव्य उमेदवाराचा प्रश्न निकाली काढला.

चोरीचा मोबाईल, संगणक बाळगणेही यापुढे गंभीर गुन्हा
औरंगाबाद, २८ फेब्रुवारी/प्रतिनिधी

आठ वर्षांपूर्वी २००० मध्ये तयार करण्यात आलेल्या माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या दुरुस्तीला गेल्या महिन्यात लोकसभेने मान्यता दिली. या दुरुस्तीमध्ये सायबर गुन्हे करणाऱ्यांना जास्तीत जास्त शिक्षा सुचविण्यात आली आहे. सायबर दहशतवादापासून ते थेट नैतिकतेपर्यंत सर्व गोष्टींचा यात समावेश करण्यात आला आहे. चोरीचा मोबाईल, संगणक बाळगणे, मोबाईलवरून अश्लील संदेश पाठविणे, संमतीशिवाय दुसऱ्याचा पासवर्ड वापरून माहिती पळविणे, ईमेलमधून जाहिरातींद्वारे खोटे आमिष दाखविणे, महिलांची नग्न, अर्धनग्न छायाचित्रे काढून मोबाईल, इंटरनेटद्वारे त्याचा प्रसार करणे, बालकांच्या लैंगिक शोषणाबद्दल जाहिराती करणे हे प्रकार यापुढे गंभीर गुन्हे ठरणार आहेत.

‘काँग्रेस व राष्ट्रवादीत वाद नाहीत’
देवरुख, २८ फेब्रुवारी/वार्ताहर

राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणतेही वाद नाहीत, आहे ती केवळ चर्चा. निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी एकदिलानेच राहतील. निवडणुकीपर्यंत जागा वाटपाचे मतभेदही संपुष्टात येतील, असा विश्वास कोकण नेते नारायण राणे यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
आपण उद्योग व बंदर विकास खात्याचे मंत्री होऊन दोन-तीन दिवसच झाले आहेत. कोकणात जे काही करता येईल ते या खात्यातून आपण साध्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कोळी समाजाचा आज राज्यव्यापी संघर्ष मेळावा
ठाणे, २८ फेब्रुवारी/प्रतिनिधी

महाराष्ट्र कोळी समाज संघाच्या वतीने उद्या येथील शिवाजी मैदानावर सायंकाळी राज्यव्यापी संघर्ष मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महादेव कोळी व तत्सम जमातींना संरक्षण देणाऱ्या १५ जून १९९५ च्या अध्यादेशाची व्याप्ती युतीची सत्ता गेल्यानंतर कमी करण्यात आली. त्यामुळे असंख्य कोळी बांधव बेरोजगार झाले आहेत, याशिवाय तुटपुंजे कोकण पॅकेज, त्याच्या वाटपातील भ्रष्टाचार, लोकप्रतिनिधींची निवडणूक अवैध ठरविणारे कायदे, कोळीवाडे-गावठाण यांच्या पुनर्विकासात अडथळा आणणारे कायदे आदींचा उहापोह या मेळाव्यात होणार असून, आगामी निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर कोळी समाजाची भूमिका संघटनेचे अध्यक्ष अनंत तरे मांडणार आहेत. या मेळाव्याच्या निमित्ताने जोरदार शक्तीप्रदर्शन करण्याची तयारीही सुरू करण्यात आली आहे.