Leading International Marathi News Daily

रविवार , १ मार्च २००९

विदेशी चलन घरबसल्या खिशात खुळखुळू लागल्याने हुरळून गेलेला द्राक्ष उत्पादक सध्याच्या जागतिक घडामोडींमुळे आता कुठे भान सावरू लागला असतानाच, आरोग्यदायी अर्थात हेल्थ ड्रिंकच्या निर्मितीत योगदान देण्यास्तव सरसावलेले त्यांचेच वाइन उपयोगी द्राक्ष उत्पादक भाऊबंद व्यापारीवृत्तीच्या वाइनरींमुळे कोंडीत सापडले आहेत. सद्यस्थितीत नाशिकसह राज्यात भिन्न भिन्न जातींची अंदाजे नऊ हजार एकरावरील वाइन उपयोगी द्राक्षे कडाक्याच्या उन्हाचा मार सहन करीत ठिकठिकाणच्या बागांमध्ये तोडणीच्या प्रतिक्षेत लटकलेली आहेत. मुदतीत तोडणी होऊ न शकल्याने या द्राक्षांच्या आरोग्यावर अन् बागांमध्ये पडून असलेल्या नगदी मालाचा सांभाळ करताना उत्पादक शेतकऱ्यांच्याही घशाला कोरड पडू लागली आहे.

समाजातील एक मोठा वर्ग आर्थिक मंदी, महागाई आणि त्याचवेळी नोकरकपातीच्या विळख्यात सापडला आहे.. मंदीचे चटके आता मध्यमवर्गालाही आता जाणवू लागले आहेत. उत्पादनात घट होते आहे. असे असले तरी दुसरीकडे एक विरोधाभास समाजातील उच्चभ्रू आणि अतिउच्चभ्रू वर्गात ठळकपणे पाहावयास मिळतो आहे. त्यांच्यासाठी स्टेटस सिम्बॉल ठरणाऱ्या अलिशान (लक्झरी) गाडय़ांच्या मागमीत सातत्याने वाढ होते आहे. एवढी की त्यासाठी मर्सिडीझसारख्या अनेकांनी भारतात कारखाने सुरू तरी केले आहेत किंवा असलेले परिपूर्ण करण्यासाठी जय्यत तयारी तरी केली आहे. भारत ही एक युरोपातील व्यापारी देशांच्या दृष्टीने चांगली बाजारपेठ आहे.

..तर सर्वच ‘पिंकीं’च्या चेहऱ्यावर ‘स्माइल’ पसरेल!
नमिता देशपांडे

जन्मत:च ओठ दुभंगलेले असलेल्या लहान मुलांच्या समस्या जगापुढे मांडणाऱ्या ‘स्माइल पिंकी’ने ऑस्कर मिळविले. या लघुपटाच्या निमित्ताने ‘क्लेफ्ट लिप’ किंवा दुभंगलेले ओठ ही समस्या काय आहे व त्यावर उपचार होऊ शकतात हे लोकांना कळले. स्माइल ट्रेन ही न्यूयॉर्कस्थित संस्था गेली सात वर्षे भारतात काम करते आहे. या समस्येवर मोफत उपाययोजना व्हावी यासाठी ही संस्था प्रयत्नशील आहे. भारतातील रुग्णालयांच्या बरोबरही ही संस्था काम करत आहे. दादर येथील शुश्रूषा रुग्णालयातील डॉ. नितीन मोकल हे १८ वर्षे प्लॅस्टिक सर्जरीच्या क्षेत्रात काम करत असून त्यांनी आतापर्यंत अडीच हजार यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. स्माइल पिंकीच्या ऑस्करवारीच्या निमित्ताने डॉक्टरांशी ‘वृत्तान्त’ने साधलेला हा संवाद.

न्यू जर्सीचं नाटय़संमेलन आगळं ठरणार?
यंदा पहिलं विश्व मराठी साहित्य संमेलन अमेरिकेतील बे-एरिया येथे संपन्न झाले. त्यापाठोपाठ पुढील वर्षीचं नाटय़संमेलनही अमेरिकेतील न्यू जर्सी येथे होणार असल्याची घोषणा बीडच्या नाटय़संमेलनात केली गेली. ती उचलून धरताना मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही, दर दोन-तीन वर्षांनी परदेशांत नाटय़संमेलनं घेण्याचं आवाहन केलं. ‘मराठी पाऊल पडते पुढे’चा प्रत्यय देणाऱ्याच या घटना आहेत. परंतु अशा संमेलनांची व्यवहार्यता आणि त्यातून होणारी उपलब्धी तपासणंही तितकंच गरजेचं आहे. आज मराठी माणूस जगाच्या पाठीवर टिकलीएवढं अस्तित्व असणाऱ्या देशांतूनही स्थायिक झालेला आहे. तिथंही आपल्या संस्कृतीची आणि मायबोलीची नाळ तुटू नये म्हणून तो प्रयत्नशील असतो.

‘सिद्धार्थ द प्रिझनर’ : चित्रपटाकडून कसलीही इच्छा-अपेक्षा नसलेल्यांसाठी
प्रतिनिधी-

सीएसटी स्थानकावर एक माणूस तिकीट काढतोय. तिकीट काऊंटरच्या काचेवर वरच्या बाजूला जिथे ‘क्यू फॉर फर्स्ट क्लास’ किंवा ‘सेकंड क्लास’ अशी पाटी असते तिथे ‘जेन्ट्स’ अशी पाटी दिसते. कदाचित ‘स्वच्छतागृह आणि तिकीट खिडकी’ या दोन्हीमध्ये दिग्दर्शकाचा गोंधळ उडाला असावा किंवा दिग्दर्शकाने स्वत: कधीच रांगेत उभे राहून तिकीट काढले नसावे. ‘सिद्धार्थ द प्रिझनर’ हा चित्रपट पाहाताना एवढाच क्षण चेहऱ्यावर थोडेसे स्मित हास्य उमटते, बाकीची एकोणनव्वद मिनिटे आणि पंचेचाळीस सेकंद केवळ प्रश्नचिन्ह असते. काही चित्रपट पाहताना मनोरंजन होते, काही पाहताना काहीतरी गवसल्याचा आनंद मिळतो, काही चित्रपटांमधून थरार अनुभवता येतो पण काही चित्रपट पाहताना केवळ कंटाळा येतो. ‘सिद्धार्थ द प्रिझनर’ हा शेवटच्या प्रकारातील चित्रपट आहे.

‘गुलमोहर’
चला, भावनिक गुंता करू या

सुनील डिंगणकर

एक स्त्री व्यक्तिरेखा घ्यायची, तिच्या आयुष्यात दोन पुरुष आणायचे, त्यापैकी एक तिचा नवरा असलाच पाहिजे. पूर्वार्धात त्या स्त्रीच्या आयुष्यात भावनिक गुंतागुंत करत जायचे आणि उत्तरार्धात हा गुंता सोडवत ती स्त्री व्यक्तिरेखा उदात्त करायची.. यापूर्वीही काही हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये यशस्वी झालेल्या फॉम्र्युलाची री ओढलेला ‘गुलमोहर’ हा चित्रपट दाखल झाला आहे. विद्या चौधरी (सोनाली कुलकर्णी) महाविद्यालयात प्राध्यापिका आहे. तिचा पती देवेन (रजत कपूर) हा नाटकाचा दिग्दर्शक आहे पण सध्या त्याच्याकडे एकही नाटक नाही.

सच्चा समाजवादी!
साधारण ६० वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. केशव (बंडू) गोरेंशी लग्न होऊन मी गोरेगावात आले होते. तेव्हा पहिल्यांदा माझी आणि प. बा. उर्फ बाबूराव सामंत यांची भेट झाली. बंडू, आबा करमरकर आणि बाबूराव यांची मैत्री होती. ते चळवळीतले सहकारी होते. अर्थातच मी त्यांच्या गटात सहभागी झाले. बाबूराव तेव्हा गोरेगाव ग्रामपंचायतीचे सरपंच होते. सरपंच म्हणून गोरेगावात त्यांनी खूप काम केले. झाडू कामगारांसाठी घरांची योजना त्यांनी आखली आणि त्यासाठी स्वत:ची जमीनही दिली. नंतर बंडू आणि बाबूरावांच्या आग्रहामुळे मी ग्रामपंचायतीला उभी राहीले आणि निवडून आले. त्यांच्यासोबत काम केल्याने आयुष्यात अनेक गोष्टी शिकता आल्या.ग्रामपंचायत जाऊन पालिका आणि नंतर महानगरपालिकेत गोरेगावचा समावेश झाला. तेव्हा खरे पालिका निवडणुकीत उभे राहण्याचा बाबूरावांचा नैसर्गिक अधिकार होता.

शोषितांचे कैवारी
न त्वहं कामये राज्यं, न स्वर्ग न पुर्नभवम्
कामये दु:ख-तत्पानां प्राणिनाम् आर्तिनाशनं
मला राज्य म्हणजे सत्ता नको, स्वर्ग ही नको तसेच पुनर्जन्म नको, फक्त दु:खाने होरपळलेल्या जनांची यातना दूर करण्याची इच्छा मी बाळगतो. याच भावनेनेच प. बा. ऊर्फ बाबूराव सामंतांनी आपले सर्व आयुष्य व्यतित केले. त्यावेळी गोरेगावच्या एक तृतीयांश जमिनीचे ते मालक होते. मनात आणले असते तर ते आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर व दीघरेद्योगी वृत्तीने देशाच्या सर्वात श्रीमान व्यक्तीमध्ये स्थान मिळवू शकले असते. समाजवादी विचारवंत डॉ. राममनोहर लोहिया यांच्या विचाराने प्रभावित होऊन शोषित जनसामान्यांना आधार देऊन त्यांचे अश्रु पुसण्याचेच असिधाराव्रत स्वीकारले. आपल्या वडिलोपार्जित जमिनींपैकी बरीच जमीन अभिनव शिक्षण मंडळ, रेल्वे यार्ड, सफाई कामगार वसाहत, महापालिकेची शाळा, सहकारी गृहनिर्माण संस्था यांना दिली. परंतु आपल्या दानशूरपणाचे नगारे मात्र वाजविले नाहीत.

गरज पोलीस दलाला लोकाभिमुख करण्याची
२६ नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मुंबई पोलिसांनी अक्षरश: जीवाची बाजी लावून एका पाकिस्तानी दहशतवाद्याला जिवंत पकडले व जगासमोर पाकिस्तानचे खरे स्वरूप उघडे पाडले आहे. NSG ची टीम मुंबई शहरात येईपर्यंत मुंबई पोलिसांच्याQuick Response team च्या जवानांनी दहशतवाद्यांना चोख उत्तर दिले होते. या दहशतवादी घटनेनंतर महाराष्ट्र सरकारला पोलीस दलाचे आधुनिकीकरण करणे आवश्यक भासू लागले. मात्र त्यासाठी शेकडो निरपराध नागरिक आणि सुमारे १५ पोलीस कर्मचाऱ्यांचे बलिदान द्यावे लागेल. शहराच्या लोकसंख्येच्या प्रमाणात पोलिसांच्या संख्येत वाढ करणे शक्य नसले. तरीही काही प्रमाणात वाढ करण्याचे सरकारने ठरविले आहे व त्या दिशेने पावले उचलण्यात आली आहेत. तसेच काही शेकडो कोटी रुपयांची आर्थिक तरतूददेखील करण्यात आली आहे.

वीज वितरण व्यवस्थेतील विशेष कामगिरीसाठी ‘बेस्ट’ला भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयाने २००७-०८ या वर्षांसाठी रौप्य पदक देऊन गौरविले. राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते पदक स्वीकारताना बेस्ट समितीचे अध्यक्ष प्रवीण छेडा आणि व्यवस्थापक उत्तम खोब्रागडे. हा समारंभ नवी दिल्ली येथील विज्ञान भवनात नुकताच पार पडला.

वरळीच्या नेहरु सेंटर गॅलरीमध्ये सोमनाथ सी. बॅनर्जी यांच्या ‘ए लॅण्डस्केप ऑफ मेडिटेशन’ या विषयावरील चित्रांचे एक प्रदर्शन भरविण्यात आले असून सोमवारी २ मार्च रोजी प्रदर्शनाचा अंतिम दिवस आहे. मंगळवारी २४ फेब्रुवारी रोजी या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळी ऑरा आर्टचे दलजीतसिंग सेठी, एंजेलो कॉम्प्युटर्सचे अग्नेलो राजेश एन. अथायडे, यांच्या हस्ते हे उद्घाटन झाले. या प्रदर्शनाला अनिल धारकर, पंडित सतीश व्यास, विप्ता कपाडिया आणि गॅरी रिचर्डसन आदी मान्यवर कलारसिकांनी हजेरी लावली. सोमवार, २ मार्चपर्यंत हे प्रदर्शन चालू राहणार आहे. चित्रकार सोमनाथ सी बॅनर्जी म्हणाले, लहानपणापासून या पायरीपर्यंतचा माझा प्रवास हा या चित्रांमधून अधोरेखित होतो. बहारदार रंग आणि दृश्य प्रकार ते बहर ते अंतर्गत शांतता या सर्वच गोष्टी यातून अधोरेखित होतात.

राफ्टिंगचा धाडसी अनुभव
तिबेटमध्ये उगम पावणाऱ्या नद्यांपैकी ब्रह्मपुत्रा नदी ही अरुणाचलमधून वाहते. हा इथला मोठा धबधबा. पुरातन कालापासून ब्रह्मपुत्रा ही नदी नाही तर नद म्हणून ओळखली जाते. शंतनुऋषी व त्यांची पत्नी अमोघा यांना ब्रह्मदेवाच्या कृपेमुळे पुत्रप्राप्ती झाली. तोच हा ब्रह्मपुत्र. उगम तिबेटमध्ये मानससरोवर येथे, प्रवास हिमालयातून खाली त्यामुळे सदैव भरपूर पाणी. तिबेटमध्ये यारलुंग सांगपो म्हणून ओळखली जाते. तेथे पठारावरून खाली पासीघाट, नामचे बरुआ येथे अरुणाचलला येते. तेथे सियांग म्हणून वाहते. पुढे दिबांग, लुईत या नद्यांच्या संगमात मिळून आसाम येथे ब्रह्मपुत्रा म्हणून ओळखली जाते. आसामपासून पुढे बांगलादेश येथे पद्मा तर बंगालमध्ये जमुना या नावाने ओळखली जाते. थेट उगमापासून बंगालच्या उपसागराला मिळेपर्यंत साधारणपणे ९६६ मी. उंचीपासून खाली ९८ मी. उंचीपर्यंत उतरत २९०० कि.मी. प्रवास करते. ही आशिया खंडातली सर्वात मोठी (हाय व्हॉल्यूम) नदी.

द काऊंटडाऊन बिगिन्स..
इंडियन आयडॉलचे स्पर्धक ज्या क्षणासाठी गेले काही महिने अतोनात मेहेनत घेत आहेत, तो क्षण अखेर आला आहे. इंडियन आयडॉलचा ग्रॅण्ड फिनाले.. सगळ्या स्पर्धकांना आणि त्यांना वेळोवेळी योग्य मार्गदर्शन करणाऱ्या इंडियन आयडॉलच्या परीक्षकांच्या मनात सध्या अनिश्चितता, उत्साह, ताण अशा सगळ्या भावनांचा कल्लोळ उठला आहे. इंडियन आयडॉलच्या चौथ्या पर्वाचा मुकुट कोणाच्या डोक्यावर विराजमान होणार हे ठरणार आहे उद्या रात्री ८.०० वाजता, सोनी एंटरटेन्मेंट टेलीव्हीजनवर.

क्रिकेटचा संदर्भग्रंथ
इंग्लंडच्या कोणत्या फलंदाजाने कसोटी क्रिकेटमध्ये २९७ ही धावांची सरासरी राखली होती?.. कोणत्या क्रिकेटपटूने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला?.. एमएस धोनी आणि एमएस गोनी यांच्यात काय फरक आहे?.. सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांची संख्या खोऱ्याने वाढत आहे. या परिस्थितीत सर्व आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंची अद्य्यावत माहिती आपल्याला कशी काय मिळणार? ‘द क्रिकइन्फो गाइड टू इंटरनॅशनल क्रिकेट’ हे स्टीव्हन लिंच यांनी संपादित केलेले पुस्तक याचे उत्तर हमखास देऊ शकेल. २००९ या वर्षांसाठी आपली तिसरी आवृत्ती घेऊन क्रिकेटरसिकांच्या भेटीला आलेल्या या पुस्तकात क्रिकेटपटूंची कारकीर्द माहिती आणि सांख्यिकीच्या स्वरूपात रेखाटली आहे.आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सुमारे २०० क्रिकेटपटूंचा सचित्र आणि समग्र लेखाजोखा यात मांडला आहे.

झुणका-भाकर केंद्र चालकांचे चर्चासत्र
झुणका-भाकर केंद्र चालकांचा रोजगार वाचविल्याबद्दल झुणका-भाकर केंद्र चालक संघटनेने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे, शिवसेना नेते दिवाकर रावते, मुंबईच्या महापौर डॉ. शुभा राऊळ तसेच मुंबई महापालिकेतील सभागृह नेते, विविध समित्यांचे अध्यक्ष, गटनेते यांचे आभार मानले आहेत. या पाश्र्वभूमीवर झुणका-भाकर केंद्रांच्या प्रस्तावाबाबत व अन्य प्रश्नांबाबत उद्या सकाळी १० ते दुपारी ४ या दरम्यान ब्राह्मण सेवा मंडळ, भवानी शंकर मार्ग, दादर (प) येथे झुणका-भाकर केंद्र चालकांचे एक चर्चासत्र आयोजित करण्यात आल्याचे संघटनेने एका पत्रकाद्वारे कळविले आहे.

रामदास काम यांचा सत्कार
नाटय़संमेलनाध्यक्ष रामदास कामत यांचा आज रविवारी दुपारी ४ वाजता रवींद्र नाटय़ मंदिर प्रभादेवी येथील पु. ल. देशपांडे सभागृहात स्वरालय, स्वरभक्ती आणि शुभश्री या संस्थातर्फे सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी अशोक सहस्रबुद्धे यांनी लिहिलेल्या घरंदाज बंदिशींचे नोटेशन, गोखले-अभिषेकी युगातील नाटय़पदांचे नोटेशन व हार्मोनियम मार्गदर्शक या तीन संगीत विषयक पुस्तकांचे प्रकाशनही कामत यांच्याहस्ते करण्यात येणार आहे. तसेच ध्वनिमुद्रित नाटय़पदांच्या श्रवणाचाही आनंद यावेळी श्रोत्यांना घेता येणार आहे.

‘हॉलिडे मूड्स’चे उन्हाळी शिबिर
‘हॉलिडे मूडस्’ या संस्थेतर्फे २६ मे ते ६ जून या कालावधीसाठी ८ ते १८ या वयोगटांतील मुला-मुलींसाठी ‘मनाली’ येथे कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. बारा दिवसांचा कालावधी असलेल्या या कॅम्पमध्ये रॉक क्लायबिंग, रॅपलिंग, व्हॅली क्रॉसिंग, रायफल शूटिंग, आर्चरी, वॉटरफॉल ट्रेक्स या अ‍ॅक्टिव्हिटीज व काही पर्यटन स्थळांना भेटी दिल्या जाणार आहेत. अधिक माहितीसाठी संपर्क- ९८२२६७६०७७, ९४२१६२२०२१. ल्ल प्रतिनिधी