Leading International Marathi News Daily

रविवार , १ मार्च २००९

क्रीडा

तय्यार!!
भारतीय संघाच्या कामगिरीबाबत कर्णधार झुलन आशावादी

विश्वचषक क्रिकेट, मुंबई, २८ फेब्रुवारी / क्री. प्र.

ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय संघ उत्कृष्ट कामगिरी करील, असा दृढ विश्वास भारतीय संघाची कर्णधार झुलन गोस्वामी हिने व्यक्त केला आहे. भारतीय संघ येत्या ७ ते २२ मार्च या कालावधीत ऑस्ट्रेलियात विश्वचषकासाठी रवाना होत असून यावेळेस विजेतेपद पटकाविण्यासाठी हा संघ अतिशय उत्सुक आहे. गेल्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाला अंतिम फेरीपर्यंत मजल मारला आली होती, मात्र ऑस्ट्रेलियाकडून ५-० असा पराभव स्वीकारावा लागल्यामुळे विजेतेपदाने हुलकावणी दिली होती.
झुलनने सांगितले की, भारतीय संघ सर्वबाबतीत संतुलित असून ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतर तेथील हवामानाशी व खेळपट्टय़ांशी जुळवून घेण्याला अधिक महत्त्व आहे. आमच्या संघात अनुभवी आणि होतकरू अशा दोन्ही प्रकारच्या खेळाडूंचे उत्तम मिश्रण आहे.

सरवानच्या शतकामुळे विंडीज ३ बाद २४०
ब्रिजटाऊन, २८ फेब्रुवारी / वृत्तसंस्था

रामनरेश सरवानने केलेल्या नाबाद १०८ आणि शिवनारायण चंद्रपॉलच्या नाबाद ५० धावांमुळे वेस्ट इंडिजने तिसऱ्या दिवशी उपाहारानंतर इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत ३ बाद २४० असे उत्तर दिले होते. त्याआधी, इंग्लंडने ६ बाद ६०० धावांवर आपला पहिला डाव घोषित केला होता. वेस्ट इंडिजचा सलामीवीर डेव्हॉन स्मिथने ५५ धावांची खेळी करीत इंग्लिश गोलंदाजांना थोपविण्याचे काम केले. पण ख्रिस गेल (६) आणि हाइन्ड्स (१५) झटपट परतल्यामुळे विंडीजची अवस्था वाईट झाली होती. मात्र सरवान आणि चंद्रपॉलने ही पडझड रोखून धरली.इंग्लंडच्या फलंदाजांनी केन्सिंग्टन ओव्हलवर सुरू असलेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. मधल्या फळीतील फलंदाज रवी बोपाराने १४३ चेंडूवर तडाखेबंद १०४ धावांची खेळी केली.

दुसरी कसोटी जिंकून निरोप घेण्याचा जयवर्धनेचा निर्धार
लाहोर, २८ फेब्रुवारी, वृत्तसंस्था

पाकिस्तानविरुद्ध उद्यापासून सुरू होणारी दुसरी कसोटी जिंकून कर्णधारपदाच्या कारकिर्दीचा समारोप करण्याची आपली इच्छा आहे, असे मनोगत श्रीलंकेचा कर्णधार माहेला जयवर्धने याने व्यक्त केले आहे.
भारताविरुद्ध नुकत्याच झालेल्या एकदिवसीय मालिकेत पराभूत झाल्यामुळे माहेला जयवर्धने याने पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. कर्णधारपदामुळे फलंदाजीवर विपरीत परिणाम होत असल्याचे कारण त्याने दिले होते.

डीव्हिलियर्सचे झुंजार शतक; दक्षिण आफ्रिका २२० धावांत गारद
जोहान्सबर्ग, २८ फेब्रुवारी / वृत्तसंस्था

पाहुण्या ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला पहिल्या डावात २२० धावांवर रोखले आणि फॉलोऑन न देता एकूण आघाडी २९७ धावांनी वाढवली असताना आज तिसऱ्या दिवशी चहापानानंतरच्या खेळात पावसाने व्यत्यय निर्माण केला. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ४६६ धावांच्या प्रत्युत्तरात खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेचा डाव अब्राहम डीव्हिलियर्सच्या झुंजार शतकानंतरही २२० धावांवर रोखण्यात पाहुण्या संघाने यश मिळवून विजयाची मजबूत पायाभरणी करण्यास सुरुवात केली असतानाच खेळात पावसाचा व्यत्यय निर्माण झाला होता.

न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड मैदानावरील सुरक्षा व्यवस्था वाढविणार
वेलिंग्टन, २८ फेब्रुवारी / पीटीआय

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात भारतीय खेळाडूंवर प्रेक्षकांकडून बाटली फेकण्यात आल्यानंतर महेंद्रसिंग धोनीने कदाचित ही घटना फारशी गांभीर्याने घेतली नसली तरी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने मात्र या घटनेकडे कानाडोळा केलेला नाही. भारताच्या यापुढील दौऱ्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी मैदानातील सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्यात येणार आहेत. न्यूझीलंडची फलंदाजी सुरू असताना भारतीय क्षेत्ररक्षकांच्या दिशेने प्रेक्षकांना बाटल्या फेकून मारल्या होत्या. त्यामुळे खेळ काही काळ थांबवावा लागला होता. सामनाधिकारी रंजन मदुगले यांनी या घटनेबद्दल चिंता प्रकट केली होती. त्यावर न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जस्टिन वॉन यांनी सांगितले की, खेळाडूंना मैदानावर अधिक सुरक्षाव्यवस्था पुरविण्याचा निर्णय बोर्डाने घेतला असून आगामी एकदिवसीय मालिकेपासून ही सुरक्षाव्यवस्था दिली जाईल. भारताविरुद्धची एकदिवसीय सामन्यांची मालिका ३ मार्चपासून सुरू होत आहे. वॉन यांनी सांगितले की, अशाप्रकारच्या घटना या दुर्दैवी आहेत. विशेषत: अशा रंगलेल्या सामन्यादरम्यान अशा घटना घडतात. मात्र सुदैवाने त्याची पुनरावृत्ती झाली नाही. भविष्यात अशा घटना घडून नयेत म्हणून न्यूझीलंड क्रिकेट बोर्ड आवश्यक ती सुरक्षाव्यवस्था देण्यासाठी कटीबद्ध आहे.

भारत-न्यूझीलंड तिसरी कसोटी अनिर्णीत
ऑकलंड, २८ फेब्रुवारी / पीटीआय

उपकर्णधार डिन कोझिन्सने अखेरच्या क्षणी नोंदवलेल्या गोलच्या जोरावर यजमान न्यूझीलंडने भारताविरुद्धच्या हॉकी मालिकेतील आज झालेली तिसरी कसोटी अनिर्णीत राखण्यात यश मिळवले. या निकालामुळे न्यूझीलंडला मालिका बरोबरीत सोडवण्याची संधी आहे. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा व अखेरचा कसोटी सामना उद्या, रविवारी होणार आहे. दुसरी कसोटीजिंकत पाहुण्या भारताने मालिकेत १-०ची आघाडी मिळवली आहे. आक्रमक सुरुवात करणाऱ्या भारताने आजच्या लढतीत मध्यंतरापूर्वी वर्चस्व गाजवले. १३व्या मिनिटाला सेंटर फॉरवर्ड शिवेंद्र सिंगने न्यूझीलंडच्या बचावफळीला गुंगारा देत गोल नोंदवत भारताचे खाते उघडले. सुरुवातीलाच मिळालेल्या आघाडीमुळे मनोधैर्य उंचावलेल्या भारताने त्यानंतर अनेक चढाया केल्या पण, त्यांना आघाडी वाढवण्यात यश आले नाही. मध्यंतराला काही मिनिटांचा अवधी शिल्लक असताना न्यूझीलंडला बरोबरी साधण्याची संधी होती पण, जोएल बाकरने दिलेल्या पासवर निक विल्सनला गोल नोंदवण्यात अपयश आले. दरम्यान, १-०ने पिछाडीवर पडलेल्या न्यूझीलंड संघाने मध्यंतरानंतर वेगवान खेळ केला. दुसऱ्या सत्रात न्यूझीलंड संघाला तीन पेनल्टी कॉर्नर मिळाले पण, भारताचा गोलरक्षक बलजित सिंगने योग्य बचाव करत प्रतिस्पर्धी संघाचे गोल करण्याचे प्रयत्न हाणून पाडले. सामना संपायला काही सेकंदाचा अवधी शिल्लक असताना कोझिन्सने न्यूझीलंडतर्फे बरोबरी साधून देणारा गोल नोंदवला.