Leading International Marathi News Daily

रविवार , १ मार्च २००९

विविध

स्त्री सखी मंडळाचा ‘अखिल भारतीय मेळावा’ साजरा
शर्मिला फाटक
बेंगळुरू येथील महाराष्ट्र मंडळाच्या सभागृहात बेंगळुरू स्त्री सखी मंडळातर्फे ‘अखिल भारतीय स्त्री सखी मेळावा २००९’ आयोजित करण्यात आला होता. दोन दिवसांच्या या मेळाव्याचे उद्घाटन अक्षत फाऊंडेशन अध्यक्षा रोहिणी नीलेकणी यांच्या हस्ते झाले. त्यानंतर ‘जागतिक आर्थिक घडामोडींमध्ये स्त्रियांचे योगदान’ आणि ‘प्रसारमाध्यमांचा जनमानसावरील प्रभाव’ या दोन विषयांवर परिसंवाद घेण्यात आले. विविध जीवनस्पर्शी विषयांवर गटचर्चा घेण्यात आल्या. मेळाव्याच्या निमित्ताने स्त्री मनाची स्पंदने टिपणाऱ्या कवितांचे संमेलन आयोजित करण्यात आले होते. कथा अभिवाचनाचा एक आगळावेगळा कार्यक्रमही सादर करण्यात आला. ‘इच्छामरण-स्वेच्छामरण’ या विषयावर विद्या बाळ यांचे व्याख्यान झाले. बेंगळुरू स्त्री सखी मंडळातर्फे ‘पॅम्प्लेट’ ही एकांकिका सादर करण्यात आली. या निमित्ताने आयोजित केलेल्या ‘भेटकार्ड स्पर्धेतील’ यशस्वी स्पर्धकांना पारितोषिकेही या वेळी देण्यात आली. उद्घाटनानंतर अ‍ॅड्. शांताताई जोशी, केंद्रीय साहित्य अकादमीच्या पुरस्कार विजेत्या सरस्वती रिसबुड आणि वैज्ञानिक डॉ. रोहिणी गोडबोले यांचाही या वेळी सत्कार करण्यात आला.

वैद्याकडून खंडणी उकळणाऱ्या पाच बोगस पत्रकारांना अटक
ठाणे, २८ फेब्रुवारी/प्रतिनिधी

रुग्णांवर आयुर्वेदिक उपचार करणाऱ्या एका वैद्यास व औषध विक्रेत्यास धमकावून त्यांच्याकडून लाखो रुपयांची खंडणी उकळू पाहणाऱ्या पाच कथित पत्रकारांना आज नौपाडा पोलिसांनी रंगेहाथ गजाआड केले. त्यामध्ये ‘सबसे तेज’ वृत्तवाहिनीच्या तसेच एका महिला पत्रकाराचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील मोहनसिंग चितोडिया हे वैद्य असून, दुर्मिळ वनस्पतींच्या साह्याने ते वजन कमी करण्यासाठी तसेच गुडघेदुखीवर उपचार करतात.

‘वंचितांच्या प्रगतीशिवाय देशाचा विकास अर्धवट’
सोलापूर, २८ फेब्रुवारी/प्रतिनिधी

कमकुवत, वंचित वर्गापर्यंत आपण पोहोचत नाही तोपर्यंत देशाचा विकास अर्धवट आहे. दलित, आदिवासी, अल्पसंख्याक, महिलांच्या विकासाची जबाबदारी निश्चित करायला हवी. त्या अनुषंगाने सद्भावना आणि सामाजिक न्यायाच्या वातावरणात केंद्रातील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारची पावले पडत असल्याचा दावा काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला.

इराकमधून अमेरिकी सैन्य २०११ सालापर्यंत माघारी बोलाविणार- ओबामा
वॉशिंग्टन, २८ फेब्रुवारी/पीटीआय

इराकमधील लष्करी कारवाई ३१ ऑगस्ट २०१० पर्यंत आटोपती घेण्यात येईल तसेच या देशात तैनात असलेले अमेरिका व मित्रराष्ट्रांचे सर्व लष्कर येत्या २०११ सालापर्यंत माघारी बोलाविण्यात येईल अशी महत्वपूर्ण घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी केली. दरम्यान अफगाणिस्तानमध्ये अमेरिकेतर्फे सुरु असलेल्या लष्करी कारवाईचा र्सवकष आढावा घेण्याचे काम या मार्च महिन्याच्या मध्यापर्यंत पूर्ण होईल. अफगाणिस्तानमध्ये दहशतवाद्यांना थारा न मिळू देण्याचे अमेरिकेने बाळगलेले उद्दिष्ट साध्य होऊ शकते. आता अफगाणिस्तान व पाकिस्तानवर पुन्हा लक्ष केंद्रित करण्याची वेळ आली आहे असेही बराक ओबामा म्हणाले. उत्तर कॅरोलिना येथील कॅम्प लीज्यूएन येथे शुक्रवारी एका कार्यक्रमात बोलताना ओबामा यांनी ही घोषणा केली. अमेरिकी अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रचारादरम्यान बराक ओबामा यांनी जनतेला दिलेल्या महत्वाच्या वचनांपैकी इराकसंदर्भातील वचन अशा तऱ्हेने पूर्ण झाले आहे. इराकमधून येत्या १८ महिन्यांच्या कालावधीत लष्कराला माघारी बोलाविण्याचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे असे सांगून ओबामा पुढे म्हणाले की, तोपर्यंत इराकमधील अमेरिकेची मोहिम सुरुच राहणार आहे. इराकमधून लष्कर माघारी बोलाविल्यानंतर आमच्या भूमिकेत बदल होईल. इराकमधील सरकारला आम्ही पूर्ण पाठबळ देऊ तसेच इराकी लष्कराच्या हाती त्यांच्या देशाच्या सुरक्षेची सूत्रे दिली जातील. इराकी लष्कराला प्रशिक्षण देणे, अद्ययावत शस्त्रांनिशी सज्ज करणे व संरक्षणविषयक योग्य सल्ला अमेरिका देईल. दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी इराकी लष्कर सुसज्ज होईपर्यंत अमेरिकेचे ३५ ते ५० हजार सैनिक इराकमध्येच तैनात राहतील.

वसंतराव राजहंस निवर्तले
पुणे, २८ फेब्रुवारी / प्रतिनिधी

बालगंधर्व संगीत रसिक मंडळाचे मानद अध्यक्ष वसंतराव शंकरराव राजहंस (वय ९१) यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. येथील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राजहंस यांच्या मागे दोन मुलगे व एक कन्या असा परिवार आहे. वसंतराव गेल्या काही दिवसापासून आजारी होते. उपचारासाठी त्यांना येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथेच आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. वसंतराव राजहंस हे बालगंधर्वाचे मोठे बंधू शंकरराव यांचे चिरंजीव होते. आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ स्थापन केलेल्या विश्र्वस्त संस्थेचे ते मुख्य विश्वस्त होते. कला व संगीताच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना या ट्रस्टमार्फत ते अर्थसाहाय्य करीत असत. ते स्वत उत्तम ऑर्गन वादक होते. तसेच संगीत नाटकांचेही ते भोक्ते होते. १९८८ मध्ये बालगंधर्वाची जन्मशताब्दि लंडनमध्ये साजरी करण्यात आली होती. त्या कार्यक्रमात वसंतरावांचा सक्रिय सहभाग होता. बालगंधर्वाप्रमाणेच वसंतरावही प्रेमळ व उदार स्वभावाचे होते. बालगंधर्वाची संगीत नाटके पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ते सतत धडपडत असत. पुणे, मुंबई, नागठाणे व इतरही अनेक ठिकाणच्या संगीत व नाटय़संस्थांशी त्यांचा निकट संबंध होता.

कारका जंगलात नक्षलवाद्यांशी चकमक
गडचिरोली, २८ फेब्रुवारी / वार्ताहर

एटापल्ली तालुक्यातील कारका जंगल परिसरात शनिवारी सकाळी पोलीस व नक्षलवाद्यात चकमक झाली. दुपारी अहेरी तालुक्यातील रसपल्ली जंगल परिसरात नक्षलवाद्यांनी दोन खाजगी ट्रक जाळून १५ लाख रुपयाचे नुकसान केले. शनिवारी जायबंदी परिसरातील कारका जंगलात गडचिरोली जिल्हा पोलीस दल व केंद्रीय राखीव पोलीस बल संयुक्तरीत्या नक्षलवाद विरोधी मोहीम राबवत असताना परिसरात घात लावून बसलेल्या २५ ते ३० नक्षलवाद्यांनी सकाळी सातच्या दरम्यान पोलिसांवर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीही नक्षलवाद्यांच्या दिशेने गोळीबार केला असता पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी घनदाट जंगलाचा फायदा घेत पसार झाले. घटनास्थळावरून पोलिसांनी शस्त्रसाठा हस्तगत केला. घटनास्थळी दोन ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर रक्त सांडलेले आढळून आल्याने काही नक्षलवादी जखमी झाले असावेत असाही दावा पोलिसांनी केला आहे. जंगल परिसरात नक्षलवाद्यांचा कसून शोध घेण्याकरिता अतिरिक्त पोलिसांच्या तुकडय़ा रवाना करण्यात आल्या असून उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रकिशोर मीना यांच्या नेतृत्वाखाली अभियान तीव्र करण्यात आले आहे.

सिलेंडर स्फोटात एक ठार
ठाणे, २८ फेब्रुवारी/प्रतिनिधी

मोटर बाइकवरून घेऊन चाललेल्या सिलेंडरचा स्फोट होऊन झालेल्या दुर्घनेत एकजण जगीच ठार झाल्याची घटना आज दुपारी येथे घडली. दहिसर येथे राहणारे शहाबाज मोमिन खान आणि त्याचा भाऊ कॅश मोमिन खान हे दोघे दोन छोटे सिलेंडर घेऊन ठाण्यातून परत चालले असताना कापूरबावडी नाक्यावरील शिवशक्ती हॉटेलसमोर सिलेंडरचा स्फोट झाला. त्यात शहाबाज खान जागीच ठार झाला. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

गुजरात दंगलीतील २२८ बेपत्ता व्यक्तींना मृत घोषित करणार
अहमदाबाद, २८ फेब्रुवारी/पीटीआय

गोध्रा जळितकांडानंतर २००२ साली गुजरातमध्ये उसळलेल्या जातीय दंगलींमध्ये बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा सात वर्षे उलटली तरी अद्याप शोध लागलेला नाही. बेपत्ता व्यक्तींचा सात वर्षांच्या काळात शोध न लागल्यास त्यांना मृत घोषित करण्याची तरतूद कायद्यात आहे. त्यामुळे दंगलीतील २२८ झालेल्या व्यक्तींना मृत घोषित करण्यात येईल. त्यामुळे या दंगलीतील मृतांचा आकडा ९५२ वरून ११८० पर्यंत पोहोचणार आहे. यासंदर्भात गुजरातच्या गृहखात्याचे अतिरिक्त मुख्य सचिव बलवंतसिंग यांनी सांगितले की, या २२८ व्यक्तींची यादी आम्ही तयार केली असून ती महसूल विभागाकडे पाठविण्यात आली आहे.