Leading International Marathi News Daily
रविवार, १ मार्च २००९

आव्हानांची देवघेव नको
दशमातील गुरू-राहूच्या आधारे व्यवहारचक्रे कमी-जास्त वेगाने फिरतील. बुध-मंगळाच्या राश्यांतरातून संमिश्र प्रतिक्रिया उमटतील. त्यातील अनुकूलता सत्कारणी लावली तर काही प्रसंगांतील गांभीर्य कमी करता येईल. नोकरी, व्यापार, राजकारण, कला, साहित्य क्षेत्रात गोड बोलूनच कार्यभाग साधावा. आव्हानांची देवघेव आपत्तींना निमंत्रण देणारी ठरेल. शुभ चंद्रभ्रमणाचा लाभ प्रतिष्ठा सांभाळण्यासाठी होईल.
दिनांक : २ ते ६ शुभकाळ.
महिलांना : सफलतेसाठी परिश्रम घ्यावे लागतील.

अडचणी टाळता येतील
भाग्यात गुरू, राहू, लाभात शुक्र यांतून वृषभ व्यक्तींना यश मिळवणे सोपे असले तरी बुध-मंगळाच्या राश्यांतराच्या परिणामी त्यात अडचणी येऊ नयेत, यासाठी सत्य व संयम यांचा प्रारंभापासूनच उपयोग केला तर नजीकच्या भविष्यात अस्थिरता नियंत्रणात ठेवता येईल. बढती-बदलीचे योग आहेत. व्यापारी गाडी रुळावर आणता येईल. प्रापंचिक जबाबदाऱ्या पूर्ण करता येतील. अवास्तव साहस कटाक्षाने टाळा.
दिनांक : ३ ते ६ शुभकाळ
महिलांना : आप्तांची मदत मिळेल.

घोळ, गोंधळ नको
शनी पराक्रमी आहे. बुध-मंगळाचा प्रवास भाग्यस्थानाकडे सुरू झालेला आहे. विचार व कृती यांमध्ये परिवर्तन शक्य आहे. तरी सहज यश मिळेल या भरवशावर राहू नका. अधिकारी, सहकारी, चर्चा याबाबत रागरंग बघून निर्णय घ्या. व्यापारी सौदे, राजकीय देवघेव, मंगलकार्ये, मिळकतीचे करार यांत रोखठोक कृतीच उपयुक्त. घोळातून गोंधळ व त्यातून स्फोट असे व्यवहार बुध-मंगळ युतीकाळात टाळावेत.
दिनांक : १, २, ५, ६ शुभकाळ.
महिलांना : सरळ मार्ग व स्वच्छ कृतीतून सहज पुढे सरकता येईल.

परीक्षेचा पर्वकाळ
साडेसाती जाता जाता काय काय करून जाईल, याचा भरवसा नाही. यावेळी तर बुध-मंगळ यांचा त्यात समावेश होत असल्याने कर्क व्यक्तींना प्रत्येक पाऊल विचाराने पुढे टाकावे लागेल. दुसऱ्यांवर विश्वासून उपक्रम ठरवू नका. वाहनांचा वेग सांभाळा. खर्चावर नियंत्रण ठेवा. भागीदार, सहकारी यांना सध्या तरी नाराज करू नका. प्रकृतीची पथ्ये मोडू नका.
दिनांक : १ ते ४ शुभकाळ.
महिलांना : कसोशीने प्रयत्न सुरू ठेवा, यश निश्चित मिळेल.

अवघड प्रश्नांचा काळ
साडेसातीच्या समोर सूर्य आहे. त्यात बुध, मंगळ प्रवेश करतील आणि सिंह व्यक्तींपुढे नवे अवघड प्रश्न उभे राहतील. त्यामध्ये भागीदार असतील, प्रपंचातील परिवार असेल आणि आर्थिक देवघेवीचा भागही असेल. त्यांच्या सोडवणुकीसाठी सामोपचाराचा मार्गच उपयुक्त ठरेल. बुध-नेपच्यून प्रतियोगात कृतीत आणता येतील, अशीच आश्वासने द्यावी. बढती-बदलीचे प्रयत्न सुरू ठेवा. प्रकृती सांभाळा.
दिनांक : २ ते ६ सामोपचारातून यश.
महिलांना : वाद टाळा, प्रकृती सांभाळा.

आधाराचा लाभ उठवा
साडेसातीच्या परिणामांची प्रखरता वाढत राहणार असली तरी शनिवारच्या मंगळ राश्यांतरापर्यंत मिळतील त्या आधारांचा लाभ उठवून कार्यभाग साधायला हरकत नाही. चंद्रभ्रमण, गुरू-राहू सहयोग व मीन शुक्र प्रतिष्ठा सांभाळणारी सफलता मिळवून देतील. कायदा हातात घेऊन, निष्कारण वाद करून, प्रलोभनांत गुरफटून आपत्ती मात्र ओढवून घेऊ नका. वाहन जपून चालवा. भक्तिमार्ग आनंद मिळवून देणारा ठरेल.
दिनांक : ३ ते ६ शुभकाळ.
महिलांना : निर्धाराने पुढे चला, यश मिळेल.

यशासाठी थांबा
चतुर्थातून बुध-मंगळ पुढे सरकत आहेत. त्यामुळे काही दडपणे कमी होतील. नवे मार्ग दृष्टिपथात येतील. यशासाठी थांबावे लागेल, पण प्रवासात उत्साह प्रकटत राहील. शनीचं सहकार्य मिळेल. नवीन परिचय, नवे उपक्रम, शासकीय नियम यासंबंधात सतर्क राहून केलेल्या कृतींना प्रतिसाद मिळवणे सोपे जाईल. व्यापारात रागरंग बघून कृती करा. चौकशी करूनच मंगलकार्ये निश्चित करा. शिक्षणात लक्ष द्या. आरोग्याची काळजी घ्या.
दिनांक : १, २, ५, ६ शुभकाळ.
महिलांना : सामोपचाराने समस्या सोडवता येतील.

पुढे सरकता येईल
दशमात शनी, पराक्रमी गुरू, राहू, पंचमात शुक्र या अनुकूल ग्रहांमुळे प्रयत्न-प्रगतीच्या समन्वयातून वृश्चिक व्यक्तींना पुढे सरकता येईल. शनिवारच्या मंगळ राश्यांतरापूर्वी महत्त्वाची प्रकरणे मार्गी लावता येतील. प्रपंचातील समस्या सोडवता येतील. अनारोग्यावरील उपचार उपयुक्त ठरतील. पुढे सरकताना संयम सोडू नका, चुका करू नका. त्यामुळे मंगळ-शनीचा अशुभयोग, बुध-मंगळ युती यांचे दुष्परिणाम टाळता येतील. यश पक्के करू शकाल.
दिनांक : ३, ४, ७ शुभकाळ.
महिलांना : प्रपंचातील प्रश्न सुटतील.

अवास्तव अपेक्षा नको
गुरू-राहूचा सहयोग, मीन शुक्र यांचा लाभ प्रपंच, प्राप्ती, प्रतिष्ठा यांसाठी करून घेता येईल. बुधवारच्या बुध राश्यांतरातून बौद्धिक क्षेत्रात तसेच बाजारपेठेतही बस्तान बसवू शकाल. शनिवारच्या मंगळ राश्यांतरापूर्वी अवघड समस्या सोडवता येतील. शासकीय प्रकरणांतून बाहेर पडता येईल. परंतु अवास्तव अपेक्षा बुध-नेपच्यून प्रतियोगात अडचणीच्या ठरतात, याचं विस्मरण कदापि होऊ देऊ नये. कागदपत्रांच्या संबंधात सावध राहा. मंगलकार्य ठरेल. बढती-बदलीची चक्रे फिरू लागतील.
दिनांक : १, २, ५, ६ शुभकाळ.
महिलांना : संधी आणि सहकार्य यांचा कुशलतेने उपयोग करा. नेत्रदीपक यश मिळेल.

प्रतिमा निर्दोष राहील
राशीस्थानी गुरू-राहू सहयोग असेपर्यंत प्रतिमा दूषित करणारी शक्ती अनिष्ट रवी, शनी, मंगळ यांच्यातील वादळामध्ये नसेल. परंतु व्यवहार करताना नवे प्रश्न मात्र निर्माण करून नका. देवघेव चोख ठेवा. शब्द फिरवू नका. आश्वासनांत पक्के राहा. प्रकृतीची पथ्ये मोडू नका. शत्रूंना समजेल अशा कृती करू नका. मीन शुक्रातील प्रतिसाद प्राप्ती व प्रापंचिक समस्या सोडविण्यास उपयुक्त ठरतील. बुध-नेपच्यून युतीत बाजारपेठेचा रागरंग पाहून खरेदी-विक्री करावी लागते.
दिनांक : ३, ४, ७ शुभकाळ.
महिलांना : आप्तांचे सहकार्य मिळेल. समस्या सुटतील.

व्यस्त प्रमाण नको
राशीस्थानी सूर्य, बुधवारी बुधाचा कुंभ राशीत प्रवेश होईल. शनिवारी मंगळ राश्यांतर घडेल. या ग्रहस्थितीमध्ये पूर्णपणे विचार करून कृती करण्यासाठी आवश्यक तेवढा वेळ मिळेल. नवनवे संपर्क साधले जातील. व्यवस्थित आर्थिक नियोजन करता येईल. परंतु व्यवहाराची व्याप्ती आणि शक्तिमर्यादा यांचे प्रमाण नजीकच्या काळात व्यस्त होणार नाही, याची काळजी घ्यावी लागेल. व्ययस्थानी असलेल्या गुरू-राहूचा हस्तक्षेप त्याशिवाय कमी होणार नाही. धावपळीत घात-अपघात होऊ नये, याकरता सावध राहणेच योग्य ठरेल.
दिनांक : १, २, ५, ६ शुभकाळ.
महिलांना : कार्यभाग साधण्यासाठी शिकस्तीचे प्रयत्न करावे लागतील.

यश अनिष्ट चक्रात सापडेल
षष्ठात शनी, व्ययस्थानी सूर्य यांमध्ये बुधाचा प्रवेश होईल. शनिवारी मंगळ त्यात सहभागी होईल. त्यामुळे सहज मिळणारे यश अनिष्ट ग्रहांच्या चक्रात सापडण्याची शक्यता आहे. मात्र मारुतीची उपासना- आराधना अनिष्टतेवर मात करण्यास साहाय्यभूत होईल. शत्रूचे उपद्रव, शासकीय नियम, राजकीय वादळ, व्यापारी स्पर्धा यांचा त्यात समावेश होईल. त्यातून आर्थिक आडाखे चुकतील आणि त्यामुळे प्रपंचात असंतोष शिरकाव करील. तरीही गुरू, राहूचे सहकार्य मिळेल. मीन शुक्र निराश होऊ देणार नाही. त्यामुळे अनिष्टतेच्या चक्रात प्रतिष्ठा सापडणार नाही. पुढे चला. परमेश्वरी चिंतनातून पारमार्थिक आनंद मिळेल.
दिनांक : १ ते ४ शुभकाळ.
महिलांना : प्रयत्नाने प्रश्नांची संख्या कमी करता येईल. प्रभाव वाढेल.