Leading International Marathi News Daily

सोमवार, २ मार्च २००९

अग्रलेख

बांगलादेशी बंडाळी

बांगलादेशात गेल्या आठवडय़ात जे रणकंदन घडले ते पूर्णत: पूर्वनियोजित होते. पीलखानातल्या बांगलादेश रायफल्सच्या मुख्यालयात काहीजणांनी बंड करून अनेकांची कत्तल केली. बांगलादेश

 

रायफल्सचे महासंचालक मेजर जनरल शकील अहमद आणि त्यांच्या पत्नी यांना ठार केले तसेच संपूर्ण मुख्यालय ओलीस ठेवून सैनिकांशी थेट युद्धच पुकारले. अजूनही अनेकांचा पत्ता लागलेला नाही, तर बऱ्याचजणांचे पीलखान्यातच पुरलेले मृतदेह हाती येत आहेत. हा प्रकार लहानसहान नाही. दोन दिवसांपूर्वी या मुख्यालयाला बांगला देशात नव्याने निवडून आलेल्या पंतप्रधान शेख हसीना यांनी भेट दिली होती, तेव्हा जर हा प्रकार घडला असता तर काय भयानक अवस्था निर्माण झाली असती, याची आपण कल्पना करू शकतो. या बंडामागे पाकिस्तानातल्या काही शक्ती आहेत, याविषयी शंका बाळगायचे कारण नाही. बांगलादेशात अलीकडेच सार्वत्रिक निवडणुका पार पडल्या. त्यांचे निकाल आपल्या बाजूने वळवता येतील असे ज्यांना वाटले होते, त्यांचा फज्जा उडाला. त्याने ज्यांच्या जिवाची उलघाल झाली आहे, त्यात बांगलादेशातल्या धर्मवादी शक्ती निश्चितच आहेत. बांगला देशातल्या जमात ए इस्लामी आणि तत्सम धर्मवादी तसेच पुराणमतवादी संघटनांना सौदी अरेबिया आणि अल काईदा, तालिबान यासारख्या दहशतवादी संघटना यांच्याकडून अक्षरश: पोसण्यात येत असते. या धर्मवादी संघटनांकडून बांगलादेशात मदरसे, मशिदी यांना प्रचंड प्रमाणात पैसे देण्यात येत असतात. बांगलादेशात लोकशाहीचा नव्याने उदय होण्यापूर्वी जी हुकूमशाही सत्तेवर होती, तिने आणीबाणीच्या आयोगाची नियुक्ती करून बांगलादेश नॅशनॅलिस्ट पार्टीच्या नेत्या बेगम खलिदा झिया आणि अवामी लीगच्या नेत्या शेख हसीना या दोघींवर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांना काही काळ अटकेतही टाकले. ज्यांनी हे केले त्यांना शेख हसीनांना सत्तेपासून दूर ठेवायचे होते. आपण निष्पक्ष आहोत, असे दाखविण्यासाठी त्यांनी खलिदा झिया यांच्यावरही आरोप केले. शेख हसीना यांच्यावर केले गेलेले आरोप न्यायालयात सिद्ध होऊ शकले नाहीत. दरम्यान, निवडणुका जाहीर होऊन अवामी लीग प्रचंड बहुमताने निवडून आली. निवडणुकांचे निकाल आपल्या बाजूने वळवायचे खलिदा झियांचे सारे प्रयत्न हाणून पाडण्यात आले. खलिदा झिया यांना सत्तेत आणि सत्तेबाहेर जमात ए इस्लामीचे पूर्ण सहकार्य असते. मात्र त्यांच्या या राजकीय पुंडाईला जनतेनेच हद्दपार केल्याने या मंडळींना हातपाय आपटत राहण्याखेरीज दुसरा मार्ग उरला नाही. खलिदा झिया या भारताविरुद्ध कारवाया करण्यात पहिल्या क्रमांकावर असल्याने त्यांच्या कारकीर्दीत बांगलादेशात भारतविरोधी दहशतवाद्यांचे अड्डे नेहमीच जमायचे. १९९१ पासून १९९६ पर्यंत आणि २००१ ते २००६ खलिदा सत्तेवर होत्या. पाकिस्तानी लष्कराच्या ‘इंटर सव्‍‌र्हिसेस इंटेलिजन्स’ या गुप्तचर संघटनेचाही तिथे वावर याच काळात वाढला. त्यांना बांगला देशात लष्करी हुकूमशाही असणे परवडणारे असते, पण भारताच्या बाजूने बोलणाऱ्या शेख हसीना यांची राजवट कदापिही मान्य नसते. बांगलादेशाला मधल्या काळात ‘इस्लामी लोकशाही प्रजासत्ताक’ बनविण्यात आले. त्यात बदल करून आपण त्याचे ‘धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक बनवणार आहोत,’ असे शेख हसीना यांनी निवडून येताच जाहीर केले. बांगलादेशात असणाऱ्या धर्माध शक्तींना धर्मनिरपेक्ष या शब्दाचेच वावडे असल्याने त्यांनी त्यास विरोध सुरू केला. शेख हसीनांनी जागतिक दहशतवादाविरुद्ध अमेरिकेची मदत घेऊन आपण लढणार असल्याचे जाहीर केले आणि भारताविरुद्ध बांगलादेशातून दहशतवादी कारवाया खपवून घेतल्या जाणार नाहीत, असे स्पष्ट केले. शेख हसीना यांचे वडील आणि बांगलादेशचे निर्माते शेख मुजिबूर रहमान यांच्या हत्येत ‘सीआयए’ या अमेरिकन गुप्तचर संघटनेचा सहभाग होता आणि नंतरच्या काळात सत्तेवर आलेले झियाउर रहमान आणि त्यांच्या मागून काही वर्षे सत्तेवर राहिलेल्या खलिदा झिया यांना अमेरिकेने पाठिंबा दिला होता. तथापि, ११ सप्टेंबर २००१ रोजी अमेरिकेवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेने आपल्या जागतिक धोरणांचा फेरविचार केला. त्यात बांगलादेशाविषयीच्या धोरणाचीही फेरमांडणी करण्यात आली. खलिदा अशा स्थितीत गप्प बसून राहणे शक्य नव्हते. त्यांनी आपल्या पक्षाच्या पराभवानंतर शेख हसीना यांच्या विरोधी कारवायांना तातडीने आरंभ केला. शेख हसीना यांना या हालचालींची कल्पना असल्यानेच त्यांनी बांगलादेश मुख्यालयाला बंडाआधी दोन दिवस भेट दिली होती. १९७१ मध्ये बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर लगेचच म्हणजे १९७२ च्या प्रारंभी बांगला देश रायफल्समध्ये बंड पुकारण्यात आले होते. शेख मुजिब यांनी ते बंड तातडीने शमवले आणि बंडखोरांबरोबर चर्चाही घडवून आणली. बांगलादेश रायफल्सच्या मुख्यालयात ज्या दिवशी बंड पेटले, बरोबर त्याच दिवशी इस्लामाबादच्या ‘हॉटेल मॅरियट’चे दोन मजले जळून खाक झाले. त्या आगीपूर्वी हॉटेलमध्ये अनेक स्फोट झाल्याचे सांगण्यात आले. या दोन्ही घटना योगायोगाच्या निश्चितच नव्हेत. पाकिस्तानमध्ये असणारी जमात ए इस्लामीची संघटना बांगला देशी जमात ए इस्लामीच्या बरोबरीने सर्व कारवायांमध्ये पुढाकार घेत असते. शेख मुजिब यांच्या हत्येच्या प्रकरणात सहभागी असणारे तेव्हाचे लष्करी अधिकारी बांगलादेशात खुलेआम फिरत असतात. त्यांना अजूनही शिक्षा करण्यात यश आलेले नाही. त्यांना पकडून न्यायालयासमोर उभे केले जाईल आणि त्यांना माफ करण्यात येणार नाही, असे शेख हसीना यांनी जाहीर केल्यानंतर जमात ए इस्लामीने आपण अशा तऱ्हेच्या कारवाईला विरोध करू, असे म्हटले होते. मुजिब यांच्या खुन्यांची पाठराखण करायचे हे खुलेआम प्रयत्न हाणून पाडायच्या आवश्यकतेवर चर्चा होऊ लागलेली असतानाच हे बंड पुकारले जाते हाही निव्वळ योगायोग नाही. बांगलादेश रायफल्समध्ये डाळ-भात चांगला मिळत नाही, अशी तक्रार करणाऱ्या आणि पुढे मेजर जनरल शकील अहमद यांच्या डोक्यावर बंदूक रोखून त्यांना ठार करणाऱ्या शिपायामागे आणखी कोण कोण आहेत, ते तपासून पाहायची आवश्यकता आहे. बांगलादेशाच्या बंगाली या राजभाषेला विरोध असणाऱ्यांचा बांगलादेश स्वतंत्र व्हायलाच तेव्हा विरोध होता आणि आजही तो आहे. त्यातही जमात ए इस्लामीचे नेते मौलाना मतिउर रहमान निझामी हे आघाडीवर आहेत. पाकिस्तानमधून बाहेर पडून आपल्या देशाची निर्मिती झाली, याची रुखरुख वाटणाऱ्यांचाही एक वर्ग आहे. त्यांचा बांगलादेशातल्या लोकशाहीलाच विरोध आहे. बांगलादेशाचे तेव्हाचे अध्यक्ष झियाउर रहमान यांना ठार करणाऱ्या काही लष्करी अधिकाऱ्यांना मृत्युदंड देण्यात आला, पण काहीजण आजही बाहेर मोकळे आहेत. ढाक्यात बांगलादेश रायफल्सच्या मुख्यालयात बंड झाले तेव्हा ३३०० सैनिक होते. त्यापैकी काहीजण मारले गेले, पण जेव्हा बंड करणाऱ्यांना ते शरण आल्यास माफी द्यायची घोषणा शेख हसीनांनी केली, तेव्हा अवघे शे-दोनशे शरण आले. बाकीचे अजूनही शस्त्रास्त्रांसह परागंदा आहेत, असे बांगलादेशातल्या वृत्तपत्रांमधून प्रसिद्ध झाले आहे. म्हणजे बांगलादेशात बंडानंतरचा धोकाही पूर्ण शमलेला नाही. शरण या, असे सांगण्यात आले, तेव्हा बांगलादेश रायफल्सच्या काही सैनिकांनी गणवेश उतरवून नेहमीचा पोशाख धारण करून अन्य मार्गाने पलायन केले आणि त्याच वेळी त्यांना पाठिंबा द्यायला ढाक्यात काही नागरिक त्या परिसरात उभे होते. त्यांच्यात मिसळून ते परागंदा झाले. हे म्हणूनच, लहानसहान कारस्थान नाही. ‘डाळ रोटी’त होणारा भ्रष्टाचार किंवा बांगलादेशी लष्कराचा पगार आणि बांगलादेश रायफल्सचा पगार यात असणारी तफावत एवढय़ापुरता हा प्रश्न मर्यादित होता, असे नाही. हे खोलवर शिजलेले कारस्थान आहे हे विसरून चालणार नाही. ते एका बटालियनपुरते होते, असेही नाही. जिथे महासंचालकांच्या डोक्यावर बंदुकीचा नेम धरून त्यांना ठार केले जाते, तिथे हे प्रकरण किरकोळ असंतोषाचे नाही. ते या पुढे कधीही उद्भवू शकते. त्याचा शेवट कशात होईल, हे सांगणे म्हणूनच अवघड आहे.