Leading International Marathi News Daily

सोमवार, २ मार्च २००९

लोकमानस

शाळांना किमान निकालांचे बंधन नको
‘चला घडवूया कॉपीमुक्त महाराष्ट्र’ हा लेख समाजामध्ये जागृती येण्याच्या दृष्टीने उपयुक्त वाटला. कॉपी

 

प्रतिबंधात्मक उपाय व अंमलबजावणी म्हटले की, आठवते ती ‘सुगरण व माकडाचे घर’ ही गोष्ट. ती अशी- सुगरण नियोजनबद्धपणे पुढे येणाऱ्या पावसाळ्यापासून संरक्षणाकरिता अपार मेहनत व निश्चयपूर्वक घरटे बांधते, परंतु माकड तिची चेष्टा करीत राहते. ऐन पावसाळ्यात मात्र सुगरण सुरक्षित आपल्या घरात राहते व माकड पावसाने हैराण होते.
तद्वतच परीक्षेचा मोसम आला की, कॉपीविरोधात काही तरी केले पाहिजे, अशा नुसत्याच वल्गना केल्या जातात, परंतु या घोषणांची अंमलबजावणी नंतर वर्षभर केली जात नाही. यंदा शैक्षणिक संस्था, शाळा कॉपीविरोधात कडक पावले उचलत आहेत.
परीक्षार्थीना कॉपी पुरवण्यासाठी केंद्राबाहेर पालक व विद्यार्थ्यांची लगीनघाई व त्यामुळे परीक्षा केंद्राला आलेले जत्रेचे स्वरूप सर्वत्र दिसते. पर्यवेक्षकाचा परीक्षा कक्षातील हालचालीपेक्षा प्रवेशद्वारात उभे राहून बाह्य़ हालचालीवर लक्ष ठेवण्याकडे दिसणारा कल, भरारी पथकाच्या आगमनाविषयी केंद्राला पूर्वसूचना मिळण्याकरिता केलेले प्रयोजनही नेहमीचे.
या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यावर वरवरची मलमपट्टी उपयोगाची नाही. या समस्येच्या मुळावर घाव घातला तरच त्याचा परिणाम दिसून येईल. मुळातच पर्यवेक्षकाच्या सहकार्याशिवाय कॉपी करणे दुरापास्तच. पण तेच या कॉपीच्या गंगोत्रीकडे दुर्लक्ष करतात किंवा कधी कधी स्वत:च सहकार्य देतात व याचे समर्थन करताना शिक्षक सांगतात की, आम्हाला आमची शाळा चालवायची असेल, सरकारच्या विविध योजनांचे अनुदान मिळवायचे असेल, शाळेतील विद्यार्थी संख्या टिकवून ठेवायची असेल तर इतर शाळांच्या स्पर्धेत टिकण्यासाठी आम्हाला निकाल चांगलाच लावावा लागेल. त्यामुळे कॉपीविरोधी धोरणांची अंमलबजावणी करताना हातचे राखणे गरजेचे पडते. इथेच खरी ‘ग्यानबाची मेख’ आहे. जोपर्यंत शासन शाळांचे मूल्यमापन परीक्षांच्या निकालावरच करीत राहील तोपर्यंत कॉपीमुक्त परीक्षा हे दिवास्वप्नच ठरेल.
त्यामुळे खऱ्या अर्थाने भविष्यात कॉपीमुक्त परीक्षा घ्यायच्या असतील तर शासनाने सर्वप्रथम किमान निकालाचे बंधन काढून घ्यावे व पर्यायाने पर्यवेक्षकाला कॉपीमुक्त अभियानात मुक्त हस्त द्यावा. परीक्षा पद्धतीमध्ये पर्यवेक्षक व केंद्रप्रमुख यांना अनन्यसाधारण महत्त्व असून त्यांनी ठरविले तर आणि तरच कॉपीमुक्त परीक्षा होऊ शकतात, अन्यथा नाही.
त्याचबरोबर विद्यार्थ्यांवर कडक वचक राहण्यासाठी यापुढे विद्यार्थी कॉपी करताना आढळल्यास त्यासंबंधीची नोंद त्याच्या गुणपत्रिकेवर ‘कॉपी’ असा ठळक शेरा मारून करावी. जेणेकरून भावी आयुष्यात त्याला समाजात वावरताना नोकरीसाठी अर्ज करताना जाणीव होईल व खऱ्या गुणवान विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही.
कॉपीविरोधात कितीही कडक कायदे केले तरी जोपर्यंत त्याची अंमलबजावणी करणाऱ्याच्या मानसिकतेत जागरूकता येत नाही तोपर्यंत काहीच फरक पडणार नाही.
सुधीर दाणी
Sudhirdani@yahoo.co.in

सरकारी कर्मचाऱ्यांना योग्यतेपेक्षा जास्त वेतन
जगात सर्वत्र मंदीचे सावट दाट होत असताना आपल्या सरकारने राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, सरकारी कर्मचारी यांच्यावर पैशांची उधळण केली आहे. याउलट परिस्थिती आहे ती खासगी क्षेत्रांत. तेथे अधिकाऱ्यांना-कर्मचाऱ्यांना विनाचौकशी नारळ दिला जातो. नोकरीची, फंड वगैरेची शाश्वती नाही. सरकारचे कायदे बासनात गुंडाळून ठेवले जातात. ज्यांना कायद्याचे बिलकुल संरक्षण नाही त्यांचे हाल कुत्रेही खात नाही. मात्र सरकारी कर्मचारी २५-३० वर्षे पगार व जवळपास तितकीच वर्षे पेन्शन खातात. (चिरीमिरी तर सरकारमान्यच जणू.)
अशात प्रत्येक वेतन आयोग सामान्य जनतेच्या डोक्यावर वरवंटा फिरवितो. जबरदस्त टॅक्स वाढवून जनतेचे फाटलेले खिसे उसवून टाकतो. आज निम्नस्तरीय सरकारी कर्मचारी ८ ते १० हजार रुपये वेतन घेतो, तर त्याच दर्जाचा खासगी कर्मचारी अडीच-तीन हजार रुपये वेतन घेतो. ही जीवघेणी तफावत ना सरकारला कळते ना सरकारी कर्मचाऱ्यांना.
शरद ओटवणेकर, मुलुंड, मुंबई

पुनर्जन्म व जागतिक तज्ज्ञ
डॉ. विद्याधर गोपाळ ओक यांच्या ‘पुनर्जन्म एक कल्पनातील वास्तव’ (२३ फेब्रुवारी) या लेखात उल्लेखिल्याप्रमाणे, समजत नसेल तर ती अंधश्रद्धा असे असले तरी आधुनिक शास्त्रज्ञ व वैद्यक जगतात हा विषय संशोधनाचा आहे हे नक्की.
याच संदर्भात मार्च १८९५ मध्ये न्यूयॉर्कच्या ‘मेटॅफिजिकल मॅगझिन’ या अंकात स्वामी विवेकानंद यांचा एक लेख प्रसिद्ध झाला होता. त्यामधील उल्लेख पुढीलप्रमाणे- ‘हे अर्जुना, तुझे अनेक जन्म होऊन गेले आहेत पण तू मात्र ते जाणत नाहीस.’- भगवद्गीता ४-५.
हा हिंदूंचा पुनर्जन्म सिद्धांत जगभरातील अनेक मान्यवरांनी मान्य केला होता. प्राचीन इजिप्त शिक्षित लोकांचा त्यावर विश्वास होता. प्राचीन इराणी या सिद्धांताप्रत येऊन पोहोचले होते. ग्रीक तत्त्वज्ञांनी या सिद्धांताला आपली कोनशिला केली होती. हिब्रूंपैकी फॅरेसींनी याचा स्वीकार केला होता. मुस्लिमांपैकी सूफींनी याला सत्य मानले होते. हिरोडोटस म्हणतो की, शरीराचा नाश झाला की आत्मा जन्म घेणाऱ्या दुसऱ्या प्राण्यात प्रवेश करतो आणि पृथ्वी व समुद्रातील सर्व प्राण्यांत फिरत फिरत ३००० वर्षांनी पुन्हा मानवी शरीरात प्रवेश करतो. म्लेच्छ हे प्रेते पुरून ठेवीत, कारण त्यांचा विश्वास असे की या शरीराच्या भोगाला कंटाळून गेलेले जीवनरस (आत्मा) पुन्हा पुरलेल्या प्रेतात येतील. याउलट आर्याना माहीत होते की, शरीर सोडून गेलेला तोच खरा माणूस शरीर असताना भोगलेल्या आनंदापेक्षा तेथे उच्च आनंद अनुभवतो, म्हणून ते प्रेते जाळीत. कार्ल हेकेल म्हणतो- ‘देहांतर प्राप्तीचा हा सिद्धांत इजिप्तला अपरिचित होता. हिंदूंमघ्ये इजिप्शियन लोकांच्या गूढ शिकवणुकीमुळे या कल्पना आल्या होत्या त्या अलेक्झांड्रियामार्गे. अलेक्झांड्रिया व म्यानमार येथे बौद्ध धर्म प्रसार सुरू होता. ग्रीस देशातील लोकांना पुनर्जन्म शिकवणारा पायथागोरस हा भारतीयांकडून शिक्षण घेऊन आला होता. खाल्डियन लोक आत्म्याला शरीराची प्रतिकृती मानीत व त्याला थडग्याशी जखडून ठेवीत. युरोपियन तत्त्वज्ञ आय. एच. फिष्टे म्हणतात- ‘आत्म्याच्या अमरत्वाचा पुरावा म्हणजे ज्या वस्तूला आरंभ आहे ती अंत पावते म्हणून आत्मा पूर्वी होता हे तर्कसंगत आहे.’ शॉपेनहॉर पुनर्जन्माविषयी म्हणतात- ‘मृत्यू हा निद्रेसारखा आहे. स्मृती व व्यक्तित्व कायम ठेवून तीच कर्मे झुगारून इच्छाशक्ती या शरीराचा त्याग करते व मृत्यूरूपी निद्रेतून नवीन जीवन रूपाने प्रगट होते.’ १४ व्या शतकात ‘काळा मृत्यू’ नामक रोगाने अनेक जण मेले तेव्हा अचानक जन्मसंख्येत व जुळ्या जन्मात वृद्धी दिसून आली. इंग्रज शून्यवादी ह्यूम म्हणतात- ‘आत्म्याची देहांतप्राप्ती हे एकच मत असे आहे की जे तत्त्वज्ञान्याला ऐकावेसे वाटते’. सूफी हे तत्त्व मानतात. यहुदी लोकांमध्ये अखंड आत्म्याचा सिद्धांत दिसून येतो. येशूच्या वेळचे फॅटीसी लोक आत्मा हा निरनिराळ्या शरीरात भ्रमण करतो, असे मानीत. स्वत: येशू म्हणत- प्रेषित इलियस हे जॉन दि बाप्टिस्टच्या स्वरूपात पुन्हा आले होते. ‘तुम्हीजर विश्वास ठेवाल तर तो इलियन्स येणार होता तो हाच आहे.’- मॅथ्यूज ११-१४. बौद्धांच्या जातक कथा म्हणजे पुनर्जन्मच होत.
हिंदू तत्त्वज्ञान मानते की, ‘आत्मा भौतिकदृष्टय़ा विविध शरीरांतून भ्रमण करतो व आध्यात्मिकदृष्टय़ा तो विविध मानसिक अवस्थांतून भ्रमण करतो.’ स्वामी विवेकानंद.
(टीप : ही माहिती न्यूयॉर्क येथील ‘मेटॅफिजिकल मॅगेझिन’मधील मार्च १८९५ च्या अंकातील लेखावर आधारित आहे.)
डॉ. अभय कानेटकर, डोंबिवली