Leading International Marathi News Daily

सोमवार, २ मार्च २००९

उन्हाळा आल्याची चाहूल देणारा पळस फुलांनी बहरलाय.

कोल्हापुरात शुद्ध पाण्यासाठी उद्या नागरिक रस्त्यावर
दहा वर्षे केवळ आश्वासने; अशुद्ध पाण्याचे पूजन करणार

कोल्हापूर, १ मार्च/विशेष प्रतिनिधी

प्रदूषणमुक्त पाणी मिळण्यासाठी गेली दहा वर्षे सतत आंदोलने करूनही केवळ आश्वासनाखेरीज काहीच हाती लागत नसल्याने कोल्हापुरातील नागरिक मंगळवार, ३ मार्च रोजी पंचगंगा बचाव अभियानाद्वारे रस्त्यावर उतरणार आहेत.

महाबळेश्वरला टॅक्सीचालकांचे आज आंदोलन
महाबळेश्वर, १ मार्च/वार्ताहर
महाबळेश्वरच्या विविध प्रेक्षणीय स्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांच्या दुरावस्थेकडे नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे लक्ष नसल्याच्या निषेधार्थ महाबळेश्वर टॅक्सी व्यावसायिकांनी सोमवार, २ मार्चपासून बेमुदत रास्ता रोकोचा इशारा दिला आहे. महाबळेश्वरकडे येणारे तीनही रस्ते बेमुदत रोखून धरणार असल्याचे या संघटनेचे अध्यक्ष इमाम नालबंद यांनी सांगितले.महाबळेश्वरच्या सर्व प्रेक्षणीय स्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांची मोठय़ा प्रमाणात दुरावस्था झाली आहे. त्यामुळे टॅक्सीवाल्यांच्या गाडीचे अतोनात नुकसान होत आहे. तसेच यामुळे पर्यटकांनाही त्रास होत आहे. येत्या २० ते २२ मार्चपर्यंत येथे मराठी साहित्य संमेलन होत असून, यानिमित्त या पर्यटनस्थळी देशातील विविध भागातून पर्यटक, साहित्यिक येणार आहेत.

काँग्रेस नगरसेवकाने कोटय़वधीचा आरक्षित भूखंड हडपल्याचा सहकाऱ्याचाच आरोप
सांगली, १ मार्च / गणेश जोशी
सांगली शहरातील विश्रामबाग परिसरात क्रीडांगणासाठी आरक्षित केलेली कोटय़वधी रूपये किमतीची सुमारे एक लाख स्क्वेअर फुटाची जागा काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक हणमंत पवार यांनी हडप केल्याचा आरोप त्यांचेच एकेकाळचे घनिष्ठ सहकारी माजी नगरसेवक आनंद परांजपे यांनी केला आहे. एकूणच शहरातील सत्ताधाऱ्यांनी भूखंडाचे श्रीखंड केले आहे.

उदयनराजेंच्या उमेदवारीसाठी काँग्रेस निरीक्षकांसमोर गदारोळ
सातारा, १ मार्च/प्रतिनिधी

जिल्हा काँग्रेस कमिटीने सातारा लोकसभेसाठी केंद्रीय मंत्री पृथ्वीराज चव्हाण व उदयनराजे भोसले या दोघांच्या नावाची शिफारस करणारा ठराव केला. त्यास आक्षेप घेऊन उदयनराजेंच्या एकमेव नावाचा आग्रह धरून त्यांच्या कार्यकर्त्यांनी पक्ष निरीक्षकांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत भूमिका घेतल्याने गदारोळ झाला.

रॉकेलचे वितरण नळाद्वारे न करण्याचे आदेश
सोलापूर , १ मार्च/प्रतिनिधी

हॉकर्सद्वारे केरोसिनची विक्री अंधारात करण्यात येऊ नये , तसेच केरोसिनचे माप नळाद्वारे न भरता ते केरोसिनच्या पिंपात बुडवून ग्राहकांना पुरवठा करावा , असा महत्त्वपूर्ण निर्णय सहदिवाणी न्यायाधीश वरिष्ठस्तर ल. मु. गजभिये यांनी दिला. सोलापुरात किरकोळ रॉकेल वितरण करणारे हॉकर्स अंधारात वाटप करताना ग्राहकांना कमी रॉकेल देतात , याबाबत तक्रार करूनही अन्नधान्य पुरवठा अधिकारी दखल घेत नसल्याने हिरासिंग ठाकूरसिंग बाडीवाले (रा. उत्तर सदर बझार) यांनी राज्य शासन व अन्नधान्य वितरण अधिकारी यांच्याविरुद्ध न्यायालयात दावा दाखल केला. त्यानुसार अंधारात रॉकेलची विक्री करू नये आणि नळाद्वारे माप भरण्यात येऊ नये , पिंपात बुडवूनच रॉकेल वाटप करावे , या अनुषंगाने हॉकर्सवर नियंत्रण ठेवावे , असा निकाल न्यायाधीश गजभिये यांनी दिला . यात बाडीवाले यांच्या वतीने डब्ल्यू. बी. खान , तर शासनातर्फे अ‍ॅड. आर. ए. शेख यांनी काम पाहिले.

दरवाढीबद्दल पालिकेत मटण विक्रेत्यांचा निषेध
कागल , १ मार्च / वार्ताहर
नगरपालिकेच्या चालू आर्थिक वर्षांच्या अंदाजपत्रकास मंजुरी देण्यासाठी आयोजित केलेल्या विशेष सभेत शहरातील मटणविक्रेत्यांनी मटणाचे दर प्रतिकिलो २०० रूपये केल्यामुळे संतप्त झालेल्या नगरसेवकांनी मटणविक्रेत्यांचा निषेध तर केलाच शिवाय मटणविक्रेत्यांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी बाहेरगावच्या मटणविक्रेत्यांना बोलावून त्यांना परवाना द्यावा अशा आशयाचा ठराव मंजूर करण्यात आला. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अजित कांबळे हे होते. १४ कोटी ९४ लाख ३० हजार ४५२ रूपये जमेचे आणि १४ कोटी ११ लाख ७६ हजार १०० रूपये इतक्या खर्चाचे व ८२ लाख ५४ हजार ३५२ रूपये शिल्लक दाखविणारे २००९-१० या सालचे अंदाजपत्रक या सभेत सादर करण्यात आल्यानंतर त्यावर चर्चा होऊन ते मंजूर करण्यात आले. विशेष म्हणजे शहर सुधारणेस भरपूर वाव देणारे हे अंदाजपत्रक असून सर्वसामान्य नागरिकांवर नव्या कराचा कोणताही बोजा टाकण्यात आलेला नाही.

िवाहितेला जाळून मारण्याचा प्रयत्न
मिरज , १ मार्च / वार्ताहर

सोडचिठ्ठी देत नाही , या कारणावरून पती व सासूने विवाहितेच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून जीवे मारण्याचा प्रयत्न सांगली वेस येथे घडला. यातील विवाहित तरुणी अत्यवस्थ असून तिच्यावर सांगली येथील वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. श्रीमती स्मिता विनायक सातपुते (वय २२) हिने पती विनायक अर्जुन सातपुते व सासू कमल अर्जुन सातपुते यांच्याविरोधात तक्रार दिली आहे. काल दुपारी राहत्या घरी पती व सासू या दोघांनी स्मिता हिला रॉकेल ओतून पेटवून जाळून मारण्याचा प्रयत्न केला. यात स्मिता ही ८० टक्के भाजली असून तिची प्रकृती गंभीर आहे. याप्रकरणी मिरज शहर पोलिसांनी पती व सासू या दोघांना अटक केली आहे.

साहित्य संमेलन मंडपाचे भूमिपूजन
महाबळेश्वर, १ मार्च/ वार्ताहर

८२ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित मंडपाचे भूमिपूजन गृहमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते पोलीस परेड ग्राऊंड येथे पार पडले. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या महाबळेश्वर शाखेचे अध्यक्ष बबनराव ढेबे, चौफेरचे अध्यक्ष मोहन कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, विलास काळे, शिवरतन पलोड, रमेश पलोड, रतिकांत तोष्णीवाल, संदीप साळुंखे, संजय दस्तुरे आदी उपस्थित होते. साहित्य संमेलनाचा नियोजित मंडप १०० बाय २३० फुटाचा असणार आहे. मुख्य सभामंडप, स्टेज व ग्रंथ प्रदर्शनाचे स्टॉल यांची उभारणी १८ तारखेस पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर स्टॉलचे वाटप लॉटरी पद्धतीने केले जाऊन त्याचे हस्तांतर करण्यात येणार आहे.

किसन वीर कारखान्यात संगणकीय यंत्रणेस आग
वाई, १ मार्च/वार्ताहर

किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या संगणकीय व वातानुकूलित यंत्रणेला अचानक आग लागली. आग तातडीने आटोक्यात आणण्यात आली. भुईंज (ता. वाई) येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्याच्या वातानुकूलित यंत्रणेतील सिलिंडरचा स्फोट झाल्याने वातानुकूलित यंत्रणा व लगतच्या संगणकीय विभागासही आगीची झळ पोहोचली. कारखान्याच्या आगप्रतिबंधक यंत्रणा व वाई पालिकेच्या आग प्रतिबंधक यंत्रणा व वाई पालिकेच्या विभागाने आग तात्काळ आटोक्यात आणली.

जमिनीच्या वादातून मारामारी
वाई, १ मार्च/वार्ताहर

नवीन घेतलेली शेतजमीन नांगरणी केल्याच्या कारणावरून गुळुंब (ता. वाई) येथे मारामारी झाली. यात पाचजण जखमी झाले. याबाबत भुईंज पोलिसात परस्पर विरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
सुमन तुकाराम चव्हाण (५५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार हणमंत सपकाळ व इतरांनी कोयता-कुऱ्हाडीने मारहाण केल्याची, तर संजय चव्हाण व इतरांनी कुऱ्हाडीने मारल्याची नितीन सपकाळ यांची तक्रार आहे.

विजेच्या धक्कय़ाने तरुणाचा मृत्यू
फलटण, १ मार्च/वार्ताहर

शहरालगत कोळकी येथील वीज वितरण कंपनीच्या सबस्टेशनमध्ये पाईपलाईनचे काम करीत असताना विजेचा धक्का बसल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. तुषार बाळासाहेब नाळे (वय १८, रा.वनदेवशेरी, केळकी) हा पाईपलाईनचे काम करीत असताना त्याला विजेचा धक्का बसल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचे निधन झाले.

श्री विठ्ठल इन्स्टिटय़ूटचे महाविद्यालय आदर्श - सहस्रबुद्धे
पंढरपूर, १ मार्च /वार्ताहर

‘संशोधनाबरोबरच तंत्रशिक्षण विकसित करण्यासाठी राज्यातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांनी या कॉलेजचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवून वाटचाल केल्यास भारत देश संशोधन प्रक्रियेत अग्रेसर राहील, असे मत पुण्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे संचालक ए. डी. सहस्त्रबुद्धे यांनी मांडले.
येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अ‍ॅण्ड रीसर्च इन्स्टिटय़ूटच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘ऑलंपस २००९’ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधन सादरीकरणाचे उद्घाटनप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली. संस्थेचे सचिव प्रा. बी. पी. रोगे हे अध्यक्षस्थानी होते.