Leading International Marathi News Daily
सोमवार, २ मार्च २००९

राष्ट्रवादी अटीतटीला
संतोष प्रधान, नाशिक, १ मार्च
फिफ्टी-फिफ्टीवर ठाम
जागांची मागणी अवास्तव नसल्याचा दावा
शरद पवारांनी केले काँग्रेसला लक्ष्य!
राष्ट्रीय पातळीवर यू.पी.ए.तील घटक पक्षांबरोबर आघाडी न करण्याच्या निर्णयाचा काँग्रेसने फेरविचार करावा अन्यथा अन्य राज्यांमध्ये काँग्रेसविरोधी पक्षांबरोबर आमची आघाडी होऊ शकते. इतर राज्यांमध्ये आम्ही काँग्रेसविरोधी भूमिका घेतल्यास महाराष्ट्रातील मतदारांमध्ये गोंधळ होऊन त्याचा फायदा विरोधी पक्षालाच होईल, असा इशाराच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज काँग्रेसला दिला. तसेच जागावाटपात काँग्रेसकडे अवास्तव जागांची मागणी केलेली नसून आमची मागणी न्याय असल्याचे सांगत जागावाटपात माघार घेणार नाही, असेच सूचित केले आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात पवारांनी आज नाशिकमध्ये झालेल्या जाहीर सभेच्या माध्यमातून केली.

निवडणूक आयुक्त चावला यांना हटविण्याची शिफारस राष्ट्रपतींनी फेटाळली
नवी दिल्ली, १ मार्च/खास प्रतिनिधी

मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी यांनी ‘वादग्रस्त’ निवडणूक आयुक्त नवीन चावला यांना हटविण्याची शिफारस केंद्र सरकारच्या सल्ल्यावरून राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी फेटाळली आहे. चावला यांच्याविरुद्ध गोपालस्वामी यांनी दिलेला अहवाल फेटाळण्यात यावा, असा केंद्र सरकारने दिलेला सल्ला राष्ट्रपतींनी स्वीकारला आहे. त्यामुळे गोपालस्वामी यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्या जागी ज्येष्ठतेच्या आधारावर चावला यांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती होण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे. नवीन चावला यांच्या नियुक्तीला आव्हान देताना संसद, राष्ट्रपती भवन आणि सर्वोच्च न्यायालयात दाद मागणाऱ्या भाजपने सरकारच्या या निर्णयाचे ‘दुर्दैवी’ असे वर्णन केले आहे, तर हा निर्णय स्वाभाविकच असून गोपालस्वामींची सूचना ‘लहरी’पणाची होती, असे काँग्रेसने म्हटले आहे.

शिक्षण, बचत गटाविषयी राष्ट्रवादीच्या अनास्थेमुळे सुप्रिया सुळे नाराज
अनिकेत साठे, नाशिक, १ मार्च

काँग्रेसकडून मिळणारी दुय्यम वागणूक, विरोधकांच्या टिकेला प्रत्युत्तर देताना होणारा कालापव्यय याविषयी संतप्त भावना व्यक्त करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी आपापल्या कामाचे प्रगतीपुस्तक मांडत मित्र पक्षापेक्षा आपले काम कसे सरस ठरले, याचे दाखले आज येथे आयोजित राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. राज्य व पक्षाच्या प्रगतीचा सर्वंकष आढावा घेतला जात असताना खा. सुप्रिया सुळे यांनी महिला बचत गट व शिक्षणाच्या प्रश्नावरून उपस्थितांचे कान टोचत या विषयांकडे गांभीर्याने पाहण्याचा सल्ला दिला. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी हिंदुत्ववादी संघटना ज्या समाजाला संशयाच्या भोवऱ्यात उभे करण्यासाठी प्रयत्न करतात, त्या मुस्लिम समाजाला संरक्षण देण्याची राष्ट्रवादीची भूमिका असल्याचे स्पष्ट केले.

दिलीप देशमुख यांना मंत्रीपदाची शपथ
मुंबई, १ मार्च/ खास प्रतिनिधी

मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज झालेले काँग्रेसचे नेते गोिवदराव आदिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा रस्ता धरल्यानंतर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची नाराजी दूर करण्यासाठी आज सायंकाळी घाईघाईने त्यांचे बंधू दिलीप देशमुख यांना कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. राजभवनात झालेल्या छोटेखानी समारंभात राज्यपाल जमीर यांनी दिलीप देशमुख यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह काही मंत्री उपस्थित होते. दोन आठवडय़ापूर्वी काँग्रेसने आपल्या वाटय़ाच्या चार मंत्रीपदांपैकी नारायण राणे, राधाकृष्ण विखे-पाटील आणि नसीम खान या तिघांना मंत्रीपदाची शपथ दिली होती.

इस्रो तयार करणार अंतराळवीरांना घेऊन जाणारा अग्निबाण
नवी दिल्ली, १ मार्च/पीटीआय
चांद्रमोहिमेच्या यशस्वी प्रारंभानंतर गुंतली असून त्यासाठी आवश्यक असलेला अद्ययावत अग्निबाण बनविण्यात येणार आहे. जिओस्टेशनरी सॅटेलाईट लॉंच व्हेईकल मार्क ३ (जीएसएलव्ही एमके ३) असे या अग्निबाणाचे नाव असून त्याच्या सहाय्याने पूर्वीपेक्षा जास्त संख्येने म्हणजे तीन अंतराळवीरांसह अवकाशयान प्रक्षेपित करणे शक्य होईल. या अग्निबाणाच्या सहाय्याने भारताला सर्व प्रकारचे उपग्रह स्वबळावर प्रक्षेपित करता येणार आहेत. जिओस्टेशनरी सॅटेलाईट लॉंच व्हेईकल मार्क ३ (जीएसएलव्ही एमके ३) असे इस्रो बनवित असलेल्या अद्ययावत अग्निबाणाचे नाव आहे. हा अग्निबाण येत्या तीन वर्षांच्या कालावधीत बनविला जाईल. त्यामुळे सर्व प्रकारचे उपग्रह अवकाशात स्वबळावर प्रक्षेपित करणे भारताला शक्य होणार आहे.

‘रॉकस्टार’ सौरभी इंडियन आयडॉल
मुंबई, १ मार्च / प्रतिनिधी
गेले सहा महिने सोनी टीव्हीवर सुरू असलेल्या चौथ्या ‘इंडियन आयडॉल’चा किताब अखेर त्रिपुराची ‘रॉकस्टार’ सौरभी देबबर्मा हिने पटकावला. तिच्या स्वागतासाठी त्रिपुराचे राजे प्रद्युम्न स्वत: चेंबूरच्या आर. के. स्टुडिओत उपस्थित होते. एक कोटी रुपयांचा धनादेश आणि टाटा विंगर ही कार अनु मलिक यांच्या हस्ते सौरभीला प्रदान करण्यात आली. कॅटरिना कैफ, जॉन अब्राहम, नील नितीन मुकेश, उदित नारायण, आलिशा चिनॉय तसेच अभिजित सावंत, संदीप आचार्य, प्रशांत उमंग या आतापर्यंतच्या तिघा इंडियन आयडॉलच्या उपस्थितीत अनु मलिक यांनी चौथ्या इंडियन आयडॉलचा किताब सौरभीच्या डोक्यावर चढविला. आम्हा परीक्षकांना यंदाची इंडियन आयडॉल मुलगीच व्हावी असे मनापासून वाटत होते आणि ती इच्छा आज पूर्ण झाली, असे अनु मलिक यांनी सांगितले. पहिल्यांदाच परीक्षक बनलेल्या सोनाली बेंद्रे हिनेदेखील हीच भावना बोलून दाखविली. आपण इंडियन आयडॉल झालो यावर विश्वासच बसत नाही. देशवासीयांचे मनापासून आभार. यापुढेही आपण मनोरंजन करीतच राहू, अशा भावना सौरभीने यावेळी व्यक्त केल्या. सौरभीसह तोरशी सरकार (कोलकता) आणि कपिल थापा (डेहराडून) या तिघांमध्ये इंडियन आयडॉलच्या मुकुटासाठी रस्सीखेच सुरू झाली तेव्हा एसएमएसचे पाठबळ न मिळाल्याने सुरुवातील तोरशी बाहेर गेली. त्यानंतर सौरभी आणि कपिल यांच्यातील जुगलबंदी चांगलीच रंगली. अखेर सौरभीने त्यावर मात केली. दोघांनी गायलेल्या ‘जय हो’ या ‘स्लमडॉग मिलिनिअर’मधील गाण्याने या रंगतदार स्पर्धेचा समारोप झाला.

दुसऱ्या फळीतील राष्ट्रवाद्यांचे ‘फिप्टी-फिप्टी’
अभिजीत कुलकर्णी, नाशिक, १ मार्च

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादीने येथे आयोजित केलेल्या महाअधिवेशनाच्या व्यासपीठावरून शरद पवारांनी भलेही काँग्रेसकडे एकत्रित निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला असो, या पक्षाच्या दुसऱ्या फळीतील सर्वच नेत्यांनी मात्र यापुढे राज्यात ‘फिप्टी-फिप्टी’ वाटा मिळालाच पाहिजे असा सूर आळवत आपली खरी स्पर्धा काँग्रेसशीच असल्याचा प्रत्यय आणून दिला. विशेषत: राज्याची धुरा सांभाळणारे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील या दोघांनीही आपल्या भाषणाचा रोख मुख्यत: याच दिशेने ठेऊन कार्यकर्त्यांच्या मनातील वेदना बोलून दाखविली. त्याचवेळी सगळ्याच वक्तयांनी शिवसेनेचा मात्र नामोल्लेखही केला नाही, हे विशेष.

नांदेडमध्ये भरारीपथक आणि पोलिसांकडूनच कॉपीला आशीर्वाद
नांदेड, १ मार्च/वार्ताहर

मराठवाडय़ाच्या वेगवेगळ्या भागांत कॉपीविरोधी मोहीम चालविली जात असताना नांदेड जिल्ह्य़ात मात्र त्याउलट परिस्थिती आहे. भरारी पथके कार्यालयातच तर पोलीस कर्मचारी शांतपणे बघ्याची भूमिका घेण्यातच धन्यता मानीत असल्याने अनेक केंद्रांवर मुक्तपणे नकला सुरू आहेत. नांदेड जिल्ह्य़ाच्या वेगवेगळ्या भागांत मुक्तपणे सुरू आहेत. उपद्रवी परीक्षा केंद्रे यंदा आपला उपद्रव कमी करतील, अशी अपेक्षा होती; परंतु शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणाची जाणीव झालेल्या या केंद्रांनी यंदा कहरच केल्याचे सांगण्यात आले.

डीएसके आणि अण्णा जोशी यांना ‘बसपा’कडून ऑफर
पुणे, १ मार्च/विशेष प्रतिनिधी

बहुजन समाज पक्षाच्या वतीने पुण्यातून प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी निवडणूक लढवावी, अशी गळ या पक्षाकडून त्यांना घालण्यात येत असल्याची माहिती या पक्षातील सूत्रांकडून आज समजली. कुलकर्णी यांनी त्यास नकार दिला तर भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार अण्णा जोशी यांनाही पक्षाकडून विचारणा करण्यात येणार असल्याचे समजते. पुण्यामधील राजकीय वातावरण आता तापू लागले असून कोण कोणाविरुद्ध उभे राहिले तर काय चित्र होईल, याचे आडाखे विविध राजकीय पक्ष बांधू लागले आहेत. काँग्रेसकडून विद्यमान खासदार सुरेश कलमाडी यांनाच उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता त्या पक्षाकडून व्यक्त होत असून त्यांच्याविरोधातील भाजपचा उमेदवार मात्र अद्याप ठरायचा आहे.

बांगलादेशमध्ये एक हजार बंडखोर सैनिकांवर खुनाचा गुन्हा दाखल
ढाका, १ मार्च/पीटीआय

लष्करी अधिकाऱ्यांचे नृशंस हत्याकांड करण्याच्या कटाचे नेतृत्व बांगलादेश रायफल्समधील सहा जणांनी केले होते असा पोलिसांना संशय असून बांगलादेश रायफल्सच्या १ हजार बंडखोर सैनिकांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. हे बंड पूर्वनियोजीत होते व त्यामध्ये सैनिकांशिवाय काही बाह्यशक्तीही सामील होत्या असा दावा बांगलादेश सरकारने केला. यासंदर्भात पोलीस सूत्रांनी सांगितले की, बंडखोर सैनिकांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविण्याबरोबरच या बंडात सामील असलेल्या सर्वाचाच कसून शोध घेण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. दरम्यान बांगलादेश रायफल्सच्या सैनिकांनी केलेल्या बंडामध्ये बाह्यशक्तींचाही सहभाग होता असा आरोप त्या देशाचे सहकारमंत्री सईद अश्रफूल इस्लाम यांनी केल्याचे वृत्त तेथील प्रसारमाध्यमांनी दिले आहे. बांगलादेशच्या जहाजउद्योगक्षेत्रातील बडय़ा आसामीचे पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयशी संबंध असून त्याचा या बंडामागे हात असावा असाही कयास आहे. ठार मारलेल्या लष्करी अधिकाऱ्यांचे दफन चार विविध ठिकाणी बंडखोर सैनिकांनी केले होते असे आता उजेडात आले आहे.

पाकिस्तानात दोन क्षेपणास्त्र हल्ल्यात आठ ठार
इस्लामाबाद, १ मार्च/पीटीआय

अफगाणिस्तान सीमेजवळील पाकिस्तानच्या वायव्य सरहद्द प्रांतामध्ये तालिबानी दहशतवाद्यांच्या तळावर अमेरिकेने आज केलेल्या दोन क्षेपणास्त्र हल्ल्यात आठ जण ठार झाले. बराक ओबामा यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अमेरिकेने पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमाभागात केलेला हा अशा प्रकारचा पाचवा हल्ला आहे. दक्षिण वझिरीस्तानमधील सररोघा भागातील तालिबानी तळावर केलेल्या हल्ल्यामध्ये आठ संशयित दहशतवादी ठार झाले. बेनझीर भुत्तो यांची हत्या घडविणारा तालिबानचा नेता बैतुल्ला महसूद याला लक्ष्य करण्यासाठी हे क्षेपणास्त्र हल्ले करण्यात आले असेही सांगण्यात येते. गेल्या १६ फेब्रुवारी रोजी अमेरिकेच्या लढाऊ विमानांनी केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ३० जण ठार झाले होते. त्याआधी १४ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानमध्ये अमेरिकेन केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ३२ जण ठार झाले होते.

ललित मोदी पराभूत
जयपूर, १ मार्च, वृत्तसंस्था

‘इंडियन प्रीमियर लीग’ चे सर्वेसर्वा म्हणून ओळखले जाणारे ललित मोदी यांना आज राजस्थान क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत व्हावे लागले.भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी संजय दीक्षित यांनी मोदी यांचा १८ वि. १३ अशा मतांनी पराभव केला. मोदी यांनी आपल्या पराभवाला राजस्थान सरकारला जबाबदार धरले आहे.अशोक गेहलोत सरकारने माझा पराभव व्हावा यासाठी प्रयत्न केले, असा आरोप मोदी यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना केला. या पराभवाचा इंडियन प्रीमियर लीगच्या राजस्थानात होणाऱ्या स्पर्धावर कसलाच परिणाम होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील सामने जयपूर येथे होतील.या सामन्यासाठी प्रशासनाकडून आपणाला सर्व ते सहकार्य मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

‘२००४ चे सूत्र कायम’
लातूर, १ मार्च/वार्ताहर

राज्यातील लोकसभा निवडणुकांसाठी जागावाटपांकरिता २००४ चे सूत्र कायम असून, याबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही कोणताही दूराग्रह धरलेला नाही, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना केले. राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर शिवसेनेची युती होणार काय, यावर देशमुख म्हणाले की, अशी युती व्हायची असेल तर राष्ट्रवादीला हिंदुत्व स्वीकारावे लागेल किंवा शिवसेनेला सर्वधर्म समभावाचे धोरण स्वीकारावे लागेल. देशमुख तीन दिवस लातूरच्या दौऱ्यावर आहेत.

 


प्रत्येक शुक्रवारी