Leading International Marathi News Daily

सोमवार, २ मार्च २००९

स्टेट बँक ऑफ हैदराबादतर्फे आयोजित आंतरबँक क्रिकेट स्पर्धेच्या रौप्य महोत्सवी वर्षांत भारतीय स्टेट बँकेने विजेतेपद पटकाविले. भारताचा माजी यष्टीरक्षक व पद्मश्री सय्यद किरमाणी यांच्या हस्ते भारतीय स्टेट बँकेचा कर्णधार संजीव शर्मा ढाल स्वीकारताना. सोबत के. लक्ष्मीक्षा, जे. यू. मिटकर, विजय राघवन, कर्नाटकाचे माजी रणजीपटू विजयकुमार आणि स्पर्धा सचिव जगदीश भावठाणकर.

पहिल्या क्रमांकावर जाण्याची भारतीय क्रिकेट संघात क्षमता
औरंगाबाद, १ मार्च/खास प्रतिनिधी

जागतिक क्रमवारीत भारतीय क्रिकेट संघात क्रमांक एकवर जाण्यासाठी क्षमता आहे. येत्या २०११ मध्ये होणाऱ्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतरच जगात कुठला संघ पहिल्या स्थानावर आहे यावर शिक्कामोर्तब होईल, असे मत भारतीय क्रिकेट संघाचे माजी यष्टीरक्षक सय्यद किरमाणी यांनी व्यक्त केले.

काँग्रेसचे माजी मंत्री पंडितराव दौंड राष्ट्रवादीत!
बीड, १ मार्च/वार्ताहर

विधानसभेच्या रेणापूर मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे माजी मंत्री पंडितराव दौंड यांनी नाशिक येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अधिकृतपणे प्रवेश केला. लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर दौंड यांचा प्रवेश झाल्यामुळे राष्ट्रवादीकडून त्यांच्या उमेदवारीची शक्यता व्यक्त केली जात आहे.बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार गोपीनाथ मुंडे निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने या मतदारसंघात जमवाजमव सुरू केली आहे.

एक मी ना ऐकतो
आवाज कानावर पडत राहतात. अगदी सकाळी उठल्या पासून ते रात्री निजेच्या पदरांमध्ये गुरफरटून निवांत होईपर्यंत. किती प्रकारचे आवाज. आपल्याशी संबंधित नसणारे, असणारे. तिकडे पूर्व दिशा हळूहळू लालसर होत असते. संपलेलं नसतं तरीही रातकिडय़ांचं गाणं. अविरत सुरू. कंटाळा नाही. आवाज थांबत नाही. स्थळाचा अंदाज घेऊन टाळी वाजवा. क्षणभर थांबतो आवाज. लगेच पुन्हा सुरू. म्हणजे अडथळा लक्षात येतो. कुणीतरी आहे. निर्भयतेचा विश्वास वाढला की पुन्हा आपल्या नादात गुंग. सकाळ होणार, या चाहुलीने कुठेतरी येणारा पक्ष्यांचा किलकिलाट. चालताना आपल्या पावलांचा येणारा आवाज. लक्षपूर्वक ऐकाल सतत काही ना काही आवाज येतच राहतात.

कापूस खरेदीस १५ मार्चपर्यंत मुदतवाढ
परभणी, १ मार्च/वार्ताहर

महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाद्वारे चालू असलेल्या कापूस खरेदीस १५ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या पूर्वी २८ फेब्रुवारीला कापूस खरेदी कायमस्वरूपी बंद करण्याचे जाहीर केले होते. चालू वर्षांत कापसाचे विक्रमी उत्पादन झाले.

राज्यातील जागा वाटपाबाबत काँग्रेस ठाम- विलासराव देशमुख
लातूर, १ मार्च/वार्ताहर

राज्यातील लोकसभा निवडणुकांसाठी जागावाटपांकरिता २००४ चे सूत्र कायम असून, याबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही कोणताही दूराग्रह धरलेला नाही, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना केले.राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर शिवसेनेची युती होणार काय, यावर श्री. देशमुख म्हणाले की, अशी युती व्हायची असेल तर राष्ट्रवादीला हिंदुत्व स्वीकारावे लागेल किंवा शिवसेनेला सर्वधर्म समभावाचे धोरण स्वीकारावे लागेल. श्री. देशमुख तीन दिवस लातूरच्या दौऱ्यावर आहेत.युती संदर्भातील निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घ्यायचा आहे. गोविंदराव आदिक यांनी काँग्रेस पक्ष सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यावेळी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. त्यासंदर्भात विचारले असता देशमुख म्हणाले की, गोविंदरावांनीच दलबदल केला आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसमधील नाराजांचा गट त्यांनी सांभाळावा एवढेच.

उभ्या टेम्पोवर जीप आदळल्याने शिक्षक ठार, ६ विद्यार्थी जखमी
सोनई, १ मार्च/वार्ताहर

टायर पंक्चर झाल्यामुळे रस्त्यात उभ्या असलेल्या टेम्पोवर मागील बाजूने शालेय विद्यार्थ्यांची ट्रॅक्स जीप आदळून एक शिक्षक ठार, तर अन्य शिक्षक व चालकासह ६ विद्यार्थी जखमी झाले. नगर-औरंगाबाद रस्त्यावर घोडेगाव शिवारात आज सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात घडला. नगर येथे स्केटिंग स्पर्धेसाठी ९ ते १० वर्षांचे १४ विद्यार्थी अकोला येथून या जीपमधून निघाले होते. मात्र, वाटेतच त्यांच्यावर हा प्रसंग ओढवला. शिवाजी किसनराव चव्हाण (कौलखेड, जिल्हा अकोला) या शिक्षकाने सोनई पोलिसांत फिर्याद दिली. नगर-औरंगाबाद मार्गावर घोडेगाव शिवारात टेम्पो टायर पंक्चर झाल्याने रस्त्यात उभा होता.

तुळजापूरमध्ये व्हॉलिबॉल स्पर्धा
तुळजापूर, १ मार्च/वार्ताहर

तुळजाभवानी व्हॉलीबॉल संघ यांच्या वतीने भव्य खुल्या दिवस-रात्र व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन नुकतेच म. वि. रा. शिंदे हायस्कूलच्या प्रांगणात करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये उस्मानाबाद, सोलापूर व लातूर जिल्ह्य़ातील ५२ संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेचे उद्घाटन काँग्रेसचे उस्मानाबादचे अध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून कुलस्वामिनी सहकारी सूत गिरणीचे उपाध्यक्ष अशोक मगर होते.

मुकुंद कोकणे यांना गुणवंत कामगार पुरस्कार
औरंगाबाद, १ मार्च/खास प्रतिनिधी

चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील सीके डायकीनमधील कामगार मुकुंद आसाराम कोकणे यांना २००८ चा गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार मुंबई येथे प्रदान करण्यात आला. गेल्या १३ वर्षांपासून मुकुंद कोकणे हे सीके डायकीनमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन, हुंडाबळी, एड्स जनजागरण, व्यसनमुक्ती अभियान, कामगारांच्या कुटुंबीयांसाठी आरोग्य शिबिर आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे. जागतिक पर्यावरणदिनानिमित्त वृक्ष दिंडी आणि वृक्षारोपणही करण्यात ते आघाडीवर आहेत. कामगारांसाठी औद्योगिक सुरक्षा कार्यशाळा आणि संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाअंतर्गत रेल्वे स्थानक परिसरात स्वच्छता अभियान राबविले. मुकुंद कोकणे यांनी २९ वेळा स्वेच्छा रक्तदान केले. त्यांना जीवनदाता गौरव पुरस्कारानेही सन्मानीत करण्यात आले आहे.

अखंड हरिनाम सप्ताहात १७ जोडपी विवाहबद्ध
परभणी, १ मार्च/वार्ताहर

जांब येथील अखंड हरिनामा सप्ताह व पारायण सोहळ्यात आज रविवारी सायंकाळी १७ जोडपी विवाहबद्ध झाली. हा सामूहिक विवाहसोहळा खासदार तुकाराम रेंगे पाटील मित्रमंडळाने आयोजित केला होता. २५ फेब्रुवारीपासून जांब येथे अखंड हरिनाम सप्ताह व पारायण सोहळ्यास सुरुवात झाली. या सोहळ्याचे संयोजक खासदार तुकाराम रेंगे पाटील हे आहेत. गतवर्षी या हरिनाम सप्ताहात त्यांनी स्वत:च्या मुलाचा विवाह केला होता. या वर्षी अखंड हरिनाम सप्ताहात सामूहिक विवाहसोहळा आयोजित करण्याची संकल्पना मांडली व आज या सप्ताहात परिसरातील १७ जोडपी विवाहबद्ध झाली. वधू व वरांना मित्रमंडळाच्या वतीने कपडे, मंगळसूत्र व संसारोपयोगी साहित्य देण्यात आले. या लग्नसोहळ्यात जांबच्या पंचक्रोशीतील हजारो नागरिक सहभागी झाले होते. सुरुवातीला संतमहात्म्यांनी नवदाम्पत्यांना शुभाशीर्वाद दिले. या सर्वाचे खासदार तुकाराम रेंगे यांनी जातीने स्वागत केले.

गरम भाजी पडून मुलगा भाजला
औरंगाबाद, १ मार्च/प्रतिनिधी

सार्वजनिक कार्यक्रमात भाजी अंगावर पडल्याने सात वर्षांचा मुलगा भाजल्याची घटना गंगापूर तालुक्यातील सिल्लेगाव येथे घडली. दीपक शेषराव पंडित असे या मुलाचे नाव आहे.दीपकला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जागरणाच्या कार्यक्रमानिमित्त दीपक हा भाजीच्या पातेल्याजवळच पंगतीत बसल होता. पातेल्याला धक्का लागला आणि भाजी त्याच्या अंगावर पडली. यात तो गभीर भाजला.

जामखेडसह सहा ग्रामपंचायतींची २५ मार्चला पोटनिवडणूक
जामखेड, १ मार्च/वार्ताहर

जामखेडसह खर्डा, बोर्ले, मतेवाडी, झिक्री व तेलंगशी ग्रामपंचायतींच्या प्रत्येकी एक जागेसाठी २५ मार्च रोजी पोटनिवडणूक होत आहे. निवडणूक कार्यक्रम असा - उमेदवारी अर्ज ३ ते ९ मार्चदरम्यान भरायचे आहेत. अर्जाची छाननी दि. १२ला होणार आहे. अर्ज माघारीची मुदत दि. १४ असून, याच दिवशी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येईल.

रामभाऊ कोतवाल यांचे निधन
गेवराई, १ मार्च/वार्ताहर

येथील तहसील कार्यालयाचे माजी कोतवाल रामभाऊ पंढरीनाथ सुतार (वय ५०) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. रामभाऊ सुतार यांना पहाटे हृदयविकाराचा तीव्र झटका आला. रुग्णालयात नेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांनी येथील तहसील कार्यालयात काम केले होते. दुपारी मांगीरबाबा मंदिराशेजारी असणाऱ्या स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चान तीन मुले, एक मुलगी, पत्नी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

अतिप्रसंगाबद्दल एकाविरुद्ध गुन्हा
नांदेड, १ मार्च/वार्ताहर

लग्नाचे आमिष दाखवून एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करणाऱ्या माधव धर्मेकार याच्याविरुद्ध रामतीर्थ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितले की, बिलोली तालुक्यातल्या लोहगाव येथील माधव धर्मेकार याने गावातील एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. यातूनच तिने एका अपत्याला जन्म दिला. लग्नाचा आग्रह धरणाऱ्या मुलीला धर्मेकार याने नकार दिल्यानंतर काल तिने रामतीर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

युवकाच्या हत्येबद्दल दोघांविरुद्ध गुन्हा
नांदेड, १ मार्च/वार्ताहर

क्षुल्लक कारणावरून एका युवकाची दोरीने गळा आवळून हत्या करणाऱ्या दोघांविरुद्ध किनवट पोलिसांना गुन्हा दाखल केला. मध्यरात्री ही घटना घडली. पोलीस सूत्रांनुसार, गंगानगर परिसरातल्या दत्ता बोंतावार याचे भारत मधुकर राठोड याच्याशी काही दिवसांपूर्वी भांडण झाले होते. भांडणाचा राग मनात ठेवून भारत राठोड व त्याची आई गया राठोड या दोघांनी दत्ता बोंतावार याला घरी बोलावले व त्याची दोरीने गळा आवळून हत्या केली. यशोदा बोंतावार यांनी पोलिसात तक्रार दिली.

जिल्हा बॅँकेविरोधात उद्या नांदेडमध्ये मोर्चा
नांदेड, १ मार्च/वार्ताहर

मागील चार वर्षांपासून बंद असलेली जिल्हा बँक त्वरित सुरू करण्यात यावी व ठेवीदारांच्या ठेवी परत करण्यात याव्यात या व अन्य मागण्यासाठी जनसुराज्य शक्ती पक्षाच्या युवा नेत्या प्रीती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली परवा(३ मार्च) प्रचंड मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सर्वसामान्यांच्या ठेवी अडकल्या आहेत. तत्कालीन भ्रष्ट संचालकांच्या मनमानी कारभारामुळे जिल्हा बँक बंद पडली आहे. बँक सुरू करण्यासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करणाऱ्या
जनसुराज्य पक्षाने उद्या धडक मोर्चा आयोजित केला आहे.