Leading International Marathi News Daily
सोमवार, २ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

राष्ट्रवादी अटीतटीला
पवारांनी केले काँग्रेसला लक्ष्य !
संतोष प्रधान, नाशिक, १ मार्च

राष्ट्रीय पातळीवर यू.पी.ए.तील घटक पक्षांबरोबर आघाडी न करण्याच्या निर्णयाचा काँग्रेसने फेरविचार

 

करावा अन्यथा अन्य राज्यांमध्ये काँग्रेसविरोधी पक्षांबरोबर आमची आघाडी होऊ शकते. इतर राज्यांमध्ये आम्ही काँग्रेसविरोधी भूमिका घेतल्यास महाराष्ट्रातील मतदारांमध्ये गोंधळ होऊन त्याचा फायदा विरोधी पक्षालाच होईल, असा इशाराच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज काँग्रेसला दिला. तसेच जागावाटपात काँग्रेसकडे अवास्तव जागांची मागणी केलेली नसून आमची मागणी न्याय असल्याचे सांगत जागावाटपात माघार घेणार नाही, असेच सूचित केले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात पवारांनी आज नाशिकमध्ये झालेल्या जाहीर सभेच्या माध्यमातून केली. एकीकडे राज्यात काँग्रेसबरोबर आघाडी कायम असल्याचा निर्वाळा देतानाच दुसरीकडे राष्ट्रवादी व शिवसेनेत सुरू असलेल्या गुफ्तगूंबाबत बोलण्याचे टाळले. काँग्रेसवर दबावाचे राजकारण कायम ठेवताना देशभर आघाडी न केल्यास महाराष्ट्रातही त्याचे परिणाम होऊ शकतात, असा इशाराच पवारांनी काँग्रेसला दिला. काँगेसबरोबर जागावाटपात संख्याबळाची मागणी नाही. मात्र निवडून येतील अशा जागा मिळाल्या पाहिजेत अशी सूचना त्यांनी केली. तसेच जम्मू व काश्मिरमध्ये काँग्रेसने लागू केलेल्या सूत्रानुसार महाराष्ट्रातही प्रत्येकी अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याची सूचनाही त्यांनी केली.
एकूणच दिवसभराच्या अधिवेशनात पवार व राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांनी काँग्रेसला लक्ष्य केले होते. काँग्रेस जागावाटप व राष्ट्रीय पातळीवर आघाडी करण्याबाबत पवारांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत असल्यानेच त्याचे पडसाद या अधिवेशनात उमटले. प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील यांनी तर उन्हात बसून काम करणे सोपे पण काँग्रेसबरोबर जागावाटपाची चर्चा नकोशी वाटते, असे विधान केले. यापुढे लोकसभा, विधानसभा तसेच मुख्यमंत्रीपद सर्वत्र निम्मा वाटा अशीच राष्ट्रवादीची भूमिका असेल, असे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.
शिवसेना व राष्ट्रवादीच्या वाढलेल्या गुफ्तंगूबाबत पवारांचे लक्ष पत्रकार परिषदेत वेधण्यात आले असता त्यांनी त्यावर मतप्रदर्शन करण्याचे टाळले. वृत्तवाहिन्या वेळ मारून नेण्याकरिता तर वृत्तपत्रे जागा भरण्यासाठी अशी चर्चा खमंगपणे रंगवीत आहेत. शिवसेनेशी जवळीक साधणार का, या प्रश्नावर त्यांनी ठामपणे उत्तर देण्याचे टाळले. मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी येत्या एक-दोन दिवसांत आपण त्यांची भेट घेणार असल्याचे सांगून त्यातून राजकीय वर्तुळात पुन्हा चर्चेला ऊत येईल, असेच सुतोवाच केले.
काँग्रेसने राष्ट्रीय पातळीवर आघाडी करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करण्याचे आवाहन करताना पवार म्हणाले की, गेल्या पाच वर्षांमध्ये डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारने चांगले काम केले आहे. यू.पी.ए.तील घटक पक्ष एकत्रितपणे निवडणुकांना सामोरे गेल्यास त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. राष्ट्रीय पातळीवर आघाडी न करण्याचा काँग्रेसच्या निर्णयामुळे यू.पी.ए.ची शक्ती कमजोर होण्याची शक्यता आहे. म्हणूनच राष्ट्रीय पातळीवर आघाडी न करण्याच्या निर्णयाचा काँग्रेसने फेरविचार करण्याची आवश्यकता आहे. उमेदवारी अर्ज भरण्याच्या मुदतीपूर्वी आठवडाभर आधी तसा निर्णय व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. गेल्या पाच वर्षांमध्ये पंतप्रधानांसह लालूप्रसाद यादव, प्रफुल्ल पटेल या मंत्र्यांच्या खात्याची कामगिरी उत्तम होती. आपल्याकडे असलेल्या कृषी खात्याच्या कामगिरीबद्दल स्वत पंतप्रधानांनी प्रशंसा केली आहे, असे सांगून काँग्रेसपेक्षा मित्र पक्षाच्या मंत्र्यांच्या खात्याची कामगिरी सरस झाल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न पवारांनी केला.
महाराष्ट्राबाहेर राष्ट्रवादीला २० ते २१ जागा मिळाव्यात तर मित्र पक्षांसाठी ५०च्या आसपास जागा काँग्रेसने सोडल्यास त्यातून चांगला संदेश मतदारांपर्यंत जाईल, असे मतही पवारांनी व्यक्त केले. दुर्दैवाने काँग्रेसने देशपातळीवर आघाडी करण्याचा निर्णय टाळल्यास त्याचा भाजपलाच फायदा होईल, असा इशाराच त्यांनी काँग्रेसला दिला.
आंध्र प्रदेशमध्ये राष्ट्रवादीची तेलगू देशमबरोबर आघाडी झाल्यास साहजिकच तेथे काँग्रेस विरोधात बोलावे लागेल. त्याची महाराष्ट्रात प्रतिक्रिया उमटल्याशिवाय राहणार नाही. हे सर्वच मित्र पक्षांच्या बाबतीत होईल. त्यातून गोंधळ आणखी वाढेल, असा इशारा त्यांनी दिला. जयललिता, चंद्रबाबू नायडू, डाव्या पक्षांच्या नेत्यांबरोबर भेटीगाठी झाल्याचे सांगून काँग्रेसवर दबाव वाढविण्याचा प्रयत्न पवारांनी केला.