Leading International Marathi News Daily
सोमवार, २ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

निवडणूक आयुक्त चावला यांना हटविण्याची शिफारस राष्ट्रपतींनी फेटाळली
नवी दिल्ली, १ मार्च/खास प्रतिनिधी

मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी यांनी ‘वादग्रस्त’ निवडणूक आयुक्त नवीन चावला यांना

 

हटविण्याची शिफारस केंद्र सरकारच्या सल्ल्यावरून राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी फेटाळली आहे. चावला यांच्याविरुद्ध गोपालस्वामी यांनी दिलेला अहवाल फेटाळण्यात यावा, असा केंद्र सरकारने दिलेला सल्ला राष्ट्रपतींनी स्वीकारला आहे. त्यामुळे गोपालस्वामी यांच्या निवृत्तीनंतर त्यांच्या जागी ज्येष्ठतेच्या आधारावर चावला यांची मुख्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती होण्याचा मार्ग प्रशस्त झाला आहे.
नवीन चावला यांच्या नियुक्तीला आव्हान देताना संसद, राष्ट्रपती भवन आणि सर्वोच्च न्यायालयात दाद मागणाऱ्या भाजपने सरकारच्या या निर्णयाचे ‘दुर्दैवी’ असे वर्णन केले आहे, तर हा निर्णय स्वाभाविकच असून गोपालस्वामींची सूचना ‘लहरी’पणाची होती, असे काँग्रेसने म्हटले आहे. गोपालस्वामींच्या शिफारशीवरून चावलांना हटविले जाणार नाही, असे विधी व न्याय मंत्री हंसराज भारद्वाज यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले होते. राष्ट्रपतींनी विविध पैलू विचारात घेऊन चावला यांना न हटविण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांच्या विशेष कार्याधिकारी अर्चना दत्ता यांनी सांगितले. चावला पक्षपाती असून काँग्रेसला मदत करतात, असा आरोप करून त्यांना निवडणूक आयुक्तपदावरून हटविण्यात यावे, असे शिफारसपत्र १६ जानेवारी २००९ रोजी घटनेच्या कलम ३२४ (५) अन्वये असलेले अधिकार वापरून गोपालस्वामी यांनी राष्ट्रपतींना लिहिले होते.
लोकसभा व काही राज्यांतील विधानसभा निवडणुका होऊ घातल्या असताना केंद्र सरकारने चावला यांच्यासारख्या पक्षपाती व्यक्तीला निवडणूक आयुक्तपदी कायम राखण्याचा निर्णय दुर्दैवी व निराशाजनक आहे, अशी टीका भाजपचे उपाध्यक्ष मुख्तार अब्बास नकवी यांनी केली. गोपालस्वामी यांची शिफारस लहरीपणाची होती. त्यामुळे ती फेटाळली जाणे स्वाभाविकच होते, असे काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते वीरप्पा मोईली यांनी म्हटले आहे. चावला यांच्यावर पक्षपातीपणावर आरोप करीत मार्च २००६ मध्ये भाजपने संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या २०४ खासदारांच्या स्वाक्षऱ्या घेऊन तत्कालिन राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्याकडे चावला यांना हटविण्यासाठी निवेदन दिले होते. पण केंद्र सरकारने त्याची दखल न घेतल्याने भाजपने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सहकारी निवडणूक आयुक्ताला हटविण्याची शिफारस करण्याचे आपल्याला अधिकार असल्याचे गोपालस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केल्यानंतर भाजपने ही याचिका मागे घेतली होती.
निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी
गोपालस्वामी येत्या २० एप्रिल रोजी निवृत्त होणार असून सेवाज्येष्ठतेच्या आधारावर चावला मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची जागा घेतील. पंधराव्या लोकसभा निवडणुकांबरोबर आंध्र प्रदेश, सिक्कीम आणि ओरिसा विधानसभा निवडणुकांच्या वेळापत्रकाची घोषणा आज होणे अपेक्षित होते. पण नवीन चावला गुडघेदुखीच्या सबबीवरून रजेवर गेले. निवडणुकांची घोषणा आयोगाच्या तिन्ही आयुक्तांच्या उपस्थितीत करण्याचा शिरस्ता असल्यामुळे आजचा मुहूर्त बारगळला. उद्या सोमवारी किंवा मंगळवारी लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा निवडणुका एप्रिल दुसऱ्या आठवडय़ापासून मे महिन्याच्या दुसऱ्या आठवडय़ापर्यंत पाच टप्प्यांमध्ये पार पडतील. असे सांगण्यात येत आहे.
गोपालस्वामींच्या जागेसाठी राव, विश्वनाथन यांची नावे
ऐन लोकसभा निवडणुकांदरम्यान निवृत्त होत असलेल्या गोपालस्वामींमुळे रिक्त होणारी जागा भरण्यासाठी केंद्र सरकारने तीन नावे निश्चित केल्याचे समजते. कर्नाटकचे मुख्य सचिव सुधाकर राव आणि केंद्रीय विधी व न्याय मंत्रालयाचे सचिव टी. के. विश्वनाथन यांची नावे आघाडीवर आहेत. त्यापाठोपाठ माजी ऊर्जा सचिव अनिल राजदान यांचेही नाव चर्चेत आहे.