Leading International Marathi News Daily
सोमवार, २ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

शिक्षण, बचत गटाविषयी राष्ट्रवादीच्या अनास्थेमुळे सुप्रिया सुळे नाराज
अनिकेत साठे, नाशिक, १ मार्च

काँग्रेसकडून मिळणारी दुय्यम वागणूक, विरोधकांच्या टिकेला प्रत्युत्तर देताना होणारा कालापव्यय याविषयी संतप्त भावना व्यक्त करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांनी आपापल्या कामाचे प्रगतीपुस्तक

 

मांडत मित्र पक्षापेक्षा आपले काम कसे सरस ठरले, याचे दाखले आज येथे आयोजित राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. राज्य व पक्षाच्या प्रगतीचा सर्वंकष आढावा घेतला जात असताना खा. सुप्रिया सुळे यांनी महिला बचत गट व शिक्षणाच्या प्रश्नावरून उपस्थितांचे कान टोचत या विषयांकडे गांभीर्याने पाहण्याचा सल्ला दिला. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी हिंदुत्ववादी संघटना ज्या समाजाला संशयाच्या भोवऱ्यात उभे करण्यासाठी प्रयत्न करतात, त्या मुस्लिम समाजाला संरक्षण देण्याची राष्ट्रवादीची भूमिका असल्याचे स्पष्ट केले.
खुल्या अधिवेशनापूर्वी सकाळी महाकवी कालिदास कलामंदिरात झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये बंद दाराआड काँग्रेस बरोबरच्या आघाडीसह विविध विषयांवर चर्चा झाली. राष्ट्रवादीच्या प्रमुख मंत्र्यांनी आपल्या कामकाजाचा आढावा मांडताना काही मुद्यांवरून काँग्रेसच्या कार्यशैलीवर ताशेरे ओढले. राज्यात राष्ट्रवादी हा सर्वात मोठा पक्ष असूनही त्याला दुय्यम वागणूक दिली जात असल्याची खंत उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी अधिवेशनातून परतताना ऊर्जा व शक्ती सोबत घेऊन जावी आणि शरद पवार यांना पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी जोमाने प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले. राज्यात मित्रपक्षापेक्षा राष्ट्रवादीचे काम चांगले आहे, पण विरोधक जेव्हा आरोप करतात तेव्हा प्रत्युतर देण्यास आपण कमी पडत असल्याची बाब जलसंपदामंत्री अजित पवार यांनी नजरेस आणून दिली. एवढेच नव्हे तर ‘कुणी अरे म्हटले की त्याला का रे’ने उत्तर देणे आवश्यक असल्याचा सल्लाही त्यांनी दिला. काँग्रेस व आमदारकीचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीच्या गोटात दाखल झालेल्या गोविंदराव आदिकांनी या बैठकीत हजेरी लावली. पक्षाला शहरी तोंडावळा लाभण्यासाठी सुशिक्षितांना पक्षात सहभागी करून घेण्याची संकल्पना यावेळी मांडण्यात आली असली तरी सुप्रिया यांनी सुशिक्षित आपल्यासोबत का नाहीत, याचा उहापोह करताना पक्षातील एक दुखरी बाजूही उजेडात आणण्याचे धारिष्टय़ दाखविल्याने व्यासपीठावरील नेत्यांमध्ये चुळबूळ वाढली. पक्ष शिक्षणाविषयी काहीच बोलत नसल्याची जाणीव त्यांनी सर्वाना करून दिली. महिला व शिक्षणाच्या विषयावर चर्चा करून मते मिळणार नाहीत, असा बहुतेक नेते व पदाधिकाऱ्यांचा समज आहे, म्हणूनच बैठकीत तरूण व महिलांना बोलाविण्यात आले नाही की काय, असा सवालही त्यांनी केला.
शिक्षण जोपर्यंत दिले जात नाही, तोपर्यंत आरक्षण देवूनही खरा प्रश्न सुटणार नाही. शासनाने मध्यंतरी महिला बचत गटांना चार टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, त्याची अमलबजावणी अजूनही झाली नसल्याने ग्रामीण भागात फिरणे अवघड झाल्याचे दु:ख त्यांनी व्यक्त केल्याने काही पदाधिकारी मात्र सुखावले. शरद पवार यांनी हिंदुत्ववादी संघटना आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टिकास्त्र सोडले. मुंबईवरील अतिरेकी हल्ल्यानंतर पाकिस्तानवर हल्ला चढविण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली. परंतु ज्यांनी आयुष्यभर हाती लाठी घेवून व अर्धी चड्डी घालून संघदक्ष म्हणण्यातच आपला वेळ घालविला ते अशी आततायी मागणी करीत असून या पद्धतीने प्रश्न सुटत नाहीत, असे त्यांनी सांगितल्यावर टाळ्यांचा पाऊस पडला. हिंदुत्ववादी प्रवृत्तींना अटकाव केल्यानंतर देशातील वातावरण किती चांगले राहू शकते याचा अनुभव सध्या सर्वाना येत आहे. कर्जमाफीच्या पुढील टप्प्यात बारा बलुतेदारांनी विविध महामंडळांकडून घेतलेल्या कर्जास माफी देण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे ते म्हणाले.