Leading International Marathi News Daily
सोमवार, २ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

दुसऱ्या फळीतील राष्ट्रवाद्यांचे ‘फिप्टी-फिप्टी’
अभिजीत कुलकर्णी, नाशिक, १ मार्च

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्याच्या उद्देशाने राष्ट्रवादीने येथे आयोजित केलेल्या

 

महाअधिवेशनाच्या व्यासपीठावरून शरद पवारांनी भलेही काँग्रेसकडे एकत्रित निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला असो, या पक्षाच्या दुसऱ्या फळीतील सर्वच नेत्यांनी मात्र यापुढे राज्यात ‘फिप्टी-फिप्टी’ वाटा मिळालाच पाहिजे असा सूर आळवत आपली खरी स्पर्धा काँग्रेसशीच असल्याचा प्रत्यय आणून दिला. विशेषत: राज्याची धुरा सांभाळणारे उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आर. आर. पाटील या दोघांनीही आपल्या भाषणाचा रोख मुख्यत: याच दिशेने ठेऊन कार्यकर्त्यांच्या मनातील वेदना बोलून दाखविली. त्याचवेळी सगळ्याच वक्तयांनी शिवसेनेचा मात्र नामोल्लेखही केला नाही, हे विशेष.
भुजबळ यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत काँग्रेसी मंडळींना चिमटे काढले. गेल्या दहा वर्षांत राष्ट्रवादीची ताकद कितीतरी पटीने वाढली असतानाही काँग्रेसचे नेते मात्र नेहमी आम्हाला दुय्यम भूमिका घ्यायला भाग पाडतात. अन्य राज्यांमध्ये जेथे काँग्रेसची आघाडी आहे तेथे अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री होतो तसाच फॉम्र्युला महाराष्ट्रातही हवा असे ठासून सांगताना वाटाघाटींमध्ये कायम वाटा काँग्रेसला व घाटा राष्ट्रवादीला का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मराठा आरक्षणप्रश्नी आपण कधीही विरोधात भूमिका घेतली नसल्याचे निक्षून सांगताना तरीही काही मंडळी मात्र ‘मेटा’कुटीला येऊन आपल्याला खलनायक ठरविण्याच प्रयत्न करीत असल्याची भुजबळांची कोटी हशा वसूल करून गेली. राष्ट्रवादी सध्या वेगळा विचार करीत असल्याच्या चर्चा-बातम्या सगळीकडे जोरदार असल्या तरी त्याला राष्ट्रवादी जबाबदार नसल्याचे सांगत त्यांनी पक्षाच्या भूमिकेची पाठराखण केली. हाच धागा पकडून आर. आर. पाटील यांनीदेखील काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. विशेष म्हणजे, आर. आर. बोलायला उभे राहताच उपस्थितांकडून झालेला टाळ्यांचा कडकडाट त्यांची कार्यकर्त्यांच्या मनावरील पकड अजूनही टिकून असल्याची साक्ष देणारा ठरला. ‘इस बार, शरद पवार’ अशी घोषणा देत आबांनी पवार पंतप्रधानसाठी कसे सर्वार्थाने योग्य आहेत, ते पटवून दिले. नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला असल्याचे लक्षात घेऊन राज ठाकरे यांनाही खडे बोल सुनावण्यास त्यांनी कमी केले नाही. राज यांनी नाशकातच अलीकडे पवारांची धोकायंत्र या शब्दात केलेल्या संभावनेचा समाचार घेताना केवळ मोडतोड करून कधी नवनिर्माण होत नाही, असा टोला लगावण्यासही आबा विसरले नाहीत. मेळाव्याचे औचित्य साधून पक्षात प्रवेश केलेल्या गोविंदराव आदिक यांनी काँग्रेसवर टीका करण्याची संधी साधून घेतली. केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल, सूर्यकांता पाटील, खासदार निवेदिता माने आदि वक्त्यांनी देखील पवारांना पंतप्रधान बनविण्यासाठी कामाला लागण्याचा संदेश कार्यकर्त्यांना दिला. विविध समाजांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेतेमंडळीना व्यासपीठावरून बोलण्याची संधी देऊन जातीय समतोल साधला जाईल, याचीही पुरेपूर काळजी घेण्यात आली. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी नाशिक मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या वतीने भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ यांच्या नावाची चर्चा असल्याच्या पाश्र्वभूमीवर त्यांना या मेळाव्याचे प्रास्तविक करण्याची दिलेली संधीही बरेच काही सांगून गेली.