Leading International Marathi News Daily
सोमवार, २ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

नांदेडमध्ये भरारीपथक आणि पोलिसांकडूनच कॉपीला आशीर्वाद
नांदेड, १ मार्च/वार्ताहर

मराठवाडय़ाच्या वेगवेगळ्या भागांत कॉपीविरोधी मोहीम चालविली जात असताना नांदेड जिल्ह्य़ात

 

मात्र त्याउलट परिस्थिती आहे. भरारी पथके कार्यालयातच तर पोलीस कर्मचारी शांतपणे बघ्याची भूमिका घेण्यातच धन्यता मानीत असल्याने अनेक केंद्रांवर मुक्तपणे नकला सुरू आहेत. नांदेड जिल्ह्य़ाच्या वेगवेगळ्या भागांत मुक्तपणे सुरू आहेत. उपद्रवी परीक्षा केंद्रे यंदा आपला उपद्रव कमी करतील, अशी अपेक्षा होती; परंतु शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणाची जाणीव झालेल्या या केंद्रांनी यंदा कहरच केल्याचे सांगण्यात आले. कंधार तालुक्यातल्या अनेक केंद्रांवर सामूहिक कॉपीचे प्रकार उघडपणे झाले. शिक्षणाधिकारी आनंद वाढे यांची सेवानिवृत्ती (२८ फेब्रुवारी), शिक्षण समितीची बैठक या पाश्र्वभूमीवर एकही भरारी पथक शुक्रवारी कोणत्याही कें द्रावर गेले नाही. भरारी पथक आज येणार नाही, तुम्ही तुमचे चालू द्या, असा संदेश शिक्षण विभागातल्या एका बहुचर्चित अधिकाऱ्याने काही परीक्षा केंद्रांवर पाठविला होता, असे सांगण्यात आले. इंग्रजीचा पेपर असल्याने शेवटच्या अध्र्या तासात एका शिक्षण विस्तार अधिकाऱ्याचे पथक बारूळ (ता. कंधार) येथे गेले होते; परंतु तेथे त्यांनी कोणती कारवाई कली, हे समजू शकले नाही. एकीकडे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची अनास्था तर दुसरीकडे पोलीस अधिकाऱ्यांची उदासीनता कॉपीविरोधी मोहिमेला बळ देऊ शकली नाही. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचे निमित्त करून पोलीस प्रशासनाने प्रारंभी परीक्षा केंद्रावर बंदोबस्त देण्यास टाळाटाळ केली तर काही केंद्रांवर फक्त गृहरक्षक दलाच्या जवानांवर बंदोबस्ताची जबाबदारी देण्यात आली. शिक्षण विभागातील अधिकारी, पोलीस प्रशासन तसेच जिल्हा महसूल यंत्रणेनेही कॉपी टाळण्यासाठी फारशी तसदी घेतली नाही, त्यामुळे अनेक केंद्रांवर कॉप्यांचे प्रकार बिनदिक्कतपणे सुरू आहेत. सुरुवातीच्या काळात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकर परदेशी यांनी प्रयत्न केले; परंतु अन्य कामाच्या व्यापामुळे त्यांचे दुर्लक्ष झाले आणि त्याचा फायदा या क्षेत्रातील तज्ज्ञांनी घेतला. कॉपी रोखण्यासाठी चार भरारी पथकांची स्थापना करण्यात आली खरी; परंतु त्यापैकी तीन पथके कार्यालयाबाहेर पडलीच नाहीत, असे सांगण्यात आले. मराठवाडय़ातल्या अन्य जिल्ह्य़ांत कॉपीविरोधात धडक कारवाई होत असताना नांदेड जिल्ह्य़ात मात्र एखाद्या धाडसी कारवाईचे धाडस अद्यापि कुणी दाखविले नाही!