Leading International Marathi News Daily
सोमवार, २ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

दिलीप देशमुख यांना मंत्रीपदाची शपथ
मुंबई, १ मार्च/ खास प्रतिनिधी

मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज झालेले काँग्रेसचे नेते गोिवदराव आदिक यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा रस्ता

 

धरल्यानंतर माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची नाराजी दूर करण्यासाठी आज सायंकाळी घाईघाईने त्यांचे बंधू दिलीप देशमुख यांना कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. राजभवनात झालेल्या छोटेखानी समारंभात राज्यपाल जमीर यांनी दिलीप देशमुख यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह काही मंत्री उपस्थित होते.
दोन आठवडय़ापूर्वी काँग्रेसने आपल्या वाटय़ाच्या चार मंत्रीपदांपैकी नारायण राणे, राधाकृष्ण विखे-पाटील आणि नसीम खान या तिघांना मंत्रीपदाची शपथ दिली होती. त्यानंतर काँग्रेसच्या वाटय़ाच्या एका मंत्रीपदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू झाली. उद्योगमंत्री नारायण राणे यांचे निकटवर्तीय कालीदास कोळमकर यांना मंत्रीपद न मिळाल्यामुळे राणे काहीसे नाराज होते तर आपले बंधू दिलीप देशमुख यांचा पत्ता शेवटच्या क्षणी कापण्यात आल्याचे समजल्यामुळे मराठवाडय़ावर अन्याय झाल्याची आरोळी ठोकून विलासराव देशमुख यांनी आपली नाराजी जाहीरपणे व्यक्त केली. त्याचवेळी ज्येष्ठ नेते गोविंदराव आदिक यांनीही आपली नाराजी व्यक्त करून बंडाचा इशारा दिला. अखेर आपली वर्णी लागणार नाही हे स्पष्ट झाल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली. दिलीप देशमुख यांनी यापूर्वी अर्थखात्याचे राज्यमंत्री म्हणून काम पाहिले होते.
काँग्रेसच्या वाटय़ाचे हे एकमेव मंत्रीपद लोकसभा निवडणुकीनंतर द्यावे, अशी भूमिका काँग्रेच्या वरिष्ठांनी सुरूवातीला घेतली होती. मात्र वाढती नाराजी लक्षात घेऊन उद्या सोमवारी आचासंहिता लागू होण्यापूर्वी आज सायंकाळी घाईघाईने देशमुख यांची मंत्रीपदी वर्णी लावण्यात आली. सायंकाळी चारवाजता त्यांना शपथविधीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले तेव्हा दिलीप देशमुख हे लातूर येथे होते. त्यावेळी लातूर येथे हेलिकॉप्टरने आलेल्या विलासराव देशमुख यांच्याच हेलिकॉप्टरने ते तात्काळ मुंबईला आल्याचे सूत्रांनी सांगितले.