Leading International Marathi News Daily
सोमवार, २ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

डीएसके आणि अण्णा जोशी यांना ‘बसपा’कडून ऑफर
पुणे, १ मार्च/विशेष प्रतिनिधी

बहुजन समाज पक्षाच्या वतीने पुण्यातून प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी

 

निवडणूक लढवावी, अशी गळ या पक्षाकडून त्यांना घालण्यात येत असल्याची माहिती या पक्षातील सूत्रांकडून आज समजली. कुलकर्णी यांनी त्यास नकार दिला तर भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार अण्णा जोशी यांनाही पक्षाकडून विचारणा करण्यात येणार असल्याचे समजते. पुण्यामधील राजकीय वातावरण आता तापू लागले असून कोण कोणाविरुद्ध उभे राहिले तर काय चित्र होईल, याचे आडाखे विविध राजकीय पक्ष बांधू लागले आहेत. काँग्रेसकडून विद्यमान खासदार सुरेश कलमाडी यांनाच उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता त्या पक्षाकडून व्यक्त होत असून त्यांच्याविरोधातील भाजपचा उमेदवार मात्र अद्याप ठरायचा आहे. भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळते, यावर निवडणुकीचे बरेचसे चित्र अवलंबून राहणार असले तरी अन्य पक्षांकडून राजकीय डावपेच आखण्यास सुरुवात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून बहुजन समाज पक्षाकडून चांगल्या उमेदवाराचा शोध सुरू झाला आहे. प्रथम या पक्षाकडून अण्णा जोशी यांना विचारणा झाली. मात्र अण्णा जोशी यांना भाजपच्या उमेदवारीची आशा असल्याने त्यांनी अद्याप त्यावर काहीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. यानंतर बसपाने ‘डीएसकें’ कडे आपला मोर्चा वळविल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले. घराला घरपण देणारा माणूस आपल्या घरात आला तर आपण निवडणुकीत चुरस निर्माण करू शकू, असा दावा या पक्षातील सूत्रांनी लोकसत्ताशी बोलताना केला. त्यांच्या म्हणण्यानुसार पुण्यातील दोन लाख दलित मतदार आपल्या पक्षाकडे वळविण्यात आपण यशस्वी होऊ. पुण्यात ब्राह्मण मतदारांची संख्या चार ते साडेचार लाखांच्या आसपास असून त्यापैकी एक लाख मतदार तरी कुलकर्णी यांच्याकडे वळू शकतील. अर्थात केवळ जातीच्या आधारावर कुलकर्णी यांना हे मतदान होणार नाही तर त्यांचा व्यक्तिगत जनसंपर्कही त्याला कारणीभूत असेल. कुलकर्णी यांची प्रतिमा सरळ, नेकीने व्यवहार करणारा बांधकाम व्यावसायिक अशी असल्याने त्यांना त्याची मदतच होईल, असे पक्षाचे म्हणणे आहे. परिणामी तीन ते सव्वातीन लाख मते त्यांना मिळतील, असा त्या पक्षाचा दावा आहे. बहुजन समाज पक्षाच्या पुण्यात नुकत्याच झालेल्या मेळाव्यात डीएसके जवळपास पूर्णवेळ उपस्थित होते. त्यांची ती उपस्थिती राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावणारी आणि चर्चेची ठरली. याबाबत डीएसकेंशी संपर्क साधला असता त्यांनी काहीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यास नकार दिला. असे असले तरी आपल्या उमेदवारीबाबत डीएसके येत्या दोन दिवसांत अंतिम निर्णय कळवतील, असे पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात आले.