Leading International Marathi News Daily

सोमवार, २ मार्च २००९

प्रादेशिक

पं. भीमसेन जोशींनी गायलेला ‘बागेश्री’ प्रकाशित
मुंबई, १ मार्च / प्रतिनिधी

दिग्गज गायकांनी खासगी बैठकीत आळवलेल्या रागांची मजा काही औरच असते. अशा मैफलीच्या आठवणी केवळ त्या बैठकीस उपस्थित असलेल्या श्रोत्यांच्या तोंडून ऐकायला मिळतात. इतरांना त्या शब्दांमधूनच मैफलीचा अनुभव घ्यावा लागतो. अशीच एक मैफल १० मार्च २००० रोजी कोलकात्यातील जयंत चटर्जीच्या घरी जमली होती. त्या मैफलीत भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांनी ‘बागेश्री’चा रंग भरला होता. काही निवडक श्रोत्यांसमोर रंगलेली ही मैफल आता मात्र सीडीच्या स्वरुपात तयार झाली आहे. ज्येष्ठ संगीतकार श्रीनिवास खळे आणि महाराष्ट्राचे महसूल मंत्री पतंगराव कदम यांच्या हस्ते आज या सीडीचे प्रकाशन करण्यात आले. व्हॅल्युएबल ग्रुपचे प्रमुख संजय गायकवाड यांनी या सीडीचे हक्क विकत घेतले आहेत. हा अल्बम व्यावसायिक रूपात बाजारात येणार नसून कॉर्पोरेट गिफ्टच्या माध्यमातून तो कानसेनांपर्यंत पोहोचणार आहे.

आरक्षण आर्थिक निकषांवरच हवे - जयंत साळगावकर
मुंबई , १ मार्च / प्रतिनिधी
आरक्षणाच्या वाढत चाललेल्या मागण्या हिंदू धर्माच्या दृष्टीने धोकादायक आहेत. जातीवर आरक्षणाची आता गरज नाही तर आर्थिक निकषांवर आरक्षण द्यावे , अशी सूचना ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी त्यांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त आयोजित समारंभात केली. ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांना ८० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात साळगावकरांचा भव्य सत्कार आयोजित करण्यात आला. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते जयंत साळगावकर यांचा हृद्य सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमासाठी कविवर्य मंगेश पाडगावकर , विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर , डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. सुरुवातीला सत्कार समितीचे अध्यक्ष डॉ. अरुण टिकेकर यांनी प्रास्ताविक केले.

पाकमधील मदरशात शिकवला जातोय भारताबाबतचा चुकीचा इतिहास!
मुंबई, १ मार्च / प्रतिनिधी

‘१९४७ पूर्वी भारत हा पाकिस्तानचा भाग होता.. १९६५ मध्ये झालेल्या युद्धात भारताचा बराचसा भाग पाकिस्तानने काबिज केला होता. परंतु भारताने संयुक्त राष्ट्रसंघाला विनंती केली आणि त्यामुळेच युद्धविराम झाला.. १९७१ च्या युद्धात तर पाक सैन्याने विजयी पताका फडकावीत भारताच्या पूर्व व पश्चिम प्रदेशावर कब्जा मिळविला होता.’ हा इतिहास शिकवला जातो आहे पाकिस्तानातील मदरशातून. या मदरशात दाखल झालेल्या १० वर्षांच्या विद्यार्थ्यांना भारताविरुद्ध बाळकडू पाजताना अनेक खोटय़ा गोष्टी रंगवून सांगितल्या जात आहेत. भारतीय गुप्तचर विभागातील सूत्रांनीच ही माहिती दिली आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीबाबत प्रश्नचिन्ह
संदीप आचार्य, मुंबई, १ मार्च

निवडून येण्याची क्षमता हाच केवळ निकष असावा असा मुद्दा उपस्थित करत आगामी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात निम्म्या म्हणजे २४ जागांची मागणी करणारा ठराव राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाअधिवेशनात करून आपला दबाव अधिकाधिक वाढविण्याचा प्रयत्न केला असला तरी या दबावापुढे कोणत्याही परिस्थितीत न झुकण्याचा निर्णय काँग्रेसने घतला आहे. याबाबत राष्ट्रवादीला निम्म्या जागा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे प्रचार प्रमुख विलासराव देशमुख यांनी स्पष्ट केला असून मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही अशीच भूमिका घेतली आहे. यामुळे आघाडीबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

रंगले फलाट, रंगल्या भिंती.. झाडे-गटारेही रंगली!
कैलास कोरडे, मुंबई, १ मार्च

मध्य रेल्वेच्या मेन मार्गावरील उपनगरी स्थानकांचे फ्लॅटफॉर्म, रेल्वेमार्गाना समांतर असलेल्या संरक्षक भिंती आणि गटारे, रेल्वेमार्गालगतची झाडे या साऱ्याच गोष्टींचे भाग्य उजळले आहे. हाव्यवस्थापकांकडून करण्यात येणाऱ्या पर्यवेक्षणाच्या निमित्ताने प्रथमच याप्रकारे रेल्वे हद्दीतील साऱ्या गोष्टींची रंगरंगोटी मध्य रेल्वेकडून सुरू आहे. बेभरवाशी प्रवासी सेवेचे ‘रंगढंग’ बदलण्याकडे लक्ष न देता पर्यवेक्षणाच्या नावाखाली सुरू असलेली वरवरची रंगरंगोटी म्हणजे जनतेच्या पैशांची उधळण असल्याची टीका होत आहे. सीएसटी-कल्याणदरम्यान रेल्वेमार्गाला समांतर असलेल्या संरक्षक भिंतीला पांढरा आणि घेरुचा रंग फासण्यात आला आहे.

कल्याण डोंबिवली पालिकेचा अर्थसंकल्प, विकासकामांचे प्रस्ताव सात तासात मंजूर
कल्याण १ मार्च/प्रतिनिधी

कल्याण डोंबिवली पालिकेचा ९५१ कोटी १२ लाखाचा अर्थसंकल्प आज स्थायी समितीच्या विशेष सभेत मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर परिवहन समिती आणि शिक्षण मंडळाचे अर्थसंकल्प स्थायी समितीत सादर करण्यात आले. गेले तीन महिने पालिकेत स्थायी समिती सदस्य व सभापतीपदावरून वादंग सुरू होता. त्यामुळे स्थायी समिती अस्तित्वात नसल्याने अर्थसंकल्प सादरीकरण व विकासाकामांचे मंजुरीचे काम रखडले होते. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने आज रविवार असूनही विकास कामांसदर्भातचे १५५ कोटीचे प्रस्ताव व अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. सकाळी ११ वाजता सुरू झालेली बैठक संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरू होती. आयुक्त राठोड यांनी सांगितले, जकातीपासून ९४ कोटी, मालमत्ता कर ९९ कोटी, पाणीपट्टी ४० कोटी, विशेष वसुलीतून शहरातील सार्वजनिक विकासकामे करण्यात येतील. अर्थसंकल्पात शहरी गरीबांसाठी २४ कोटी, महिला व बालकांच्या विकासाठी दोन कोटी, क्रीडांगण विकास १ कोटी, सायन्स नेचर पार्क विकास १ कोटी, निवृत्त सफाई कामगारांना मोफत घरे देण्यासाठी ५० लाख तरतुदी करण्यात आल्या आहेत. तिसगाव येथील पर्यायी रस्त्यासाठी १ कोटी, वालधुनी येथील उड्डाणपूल बांधणेसाठी १० कोटी, निर्मल योजनेंतर्गत शौचालये उभारणीसाठी २५ कोटी, कल्याण डोंबिवलीतील स्कायवॉकसाठी ४८ कोटीची तरतुद करण्यात आली आहे.

म्हाडा अभियंत्यांच्या अर्धांगिनी बिल्डर
बनल्याप्रकरणी चौकशीचे आदेश
मुंबई, १ मार्च / प्रतिनिधी

म्हाडा अभियंत्यांच्या अर्धागिनी बिल्डर बनल्याप्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दक्षता विभागाला देण्यात आले आहेत. म्हाडा अभियंत्यांनी अर्धांगिनींच्या बांधकाम कंपनीसाठी आपल्या पदाचा गैरवापर केला का वा त्यांचा या कंपन्यांशी संबध आहे का, याची चौकशी करून अहवाल आठवडय़ाभरात सादर करण्यास सांगण्यात आले आहे. म्हाडा अभियंत्यांच्या अर्धांगिनी बिल्डर बनल्याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता’ने प्रसिद्ध केल्यानंतर म्हाडाचे उपाध्यक्ष व मुख्य अधिकारी गौतम चॅटर्जी यांनी दखल घेऊन दक्षता विभागाला अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. म्हाडातील तिघा अभियंत्यांच्या अर्धांगिनींनी उभारलेल्या ‘मेसर्स सिद्धाई होम इंजिनीअर्स अँड कॉन्ट्रॅक्टर’ या कंपनीच्या वतीने खुलासा करताना यापैकी दोघा अभियंत्यांनी सदर कंपनी आपल्या पत्नींच्या नावे असून त्याच्याशी आपला काहीएक संबंध नाही, असा दावा केला. अन्य अभियंता आंगणेवाडीच्या जत्रेला गेल्यामुळे येऊ शकला नाही, असेही या अभियंत्यांनी सांगितले. दरम्यान, दहिसर पूर्व येथीलच ‘साफल्य’ या १५ ते १८ क्रमांकाच्या सोसायटीतील रहिवाशांसमवेत करारनामा झालेला नसतानाही पुनर्विकासासाठी ‘ना हरकत प्रमाणपत्र’ मिळावे यासाठी तिघा म्हाडा अभियंत्यांच्या अर्धांगिनींच्या कंपनीने मुंबई मंडळाच्या मुख्य अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव सादर केल्याची माहितीही हाती आली आहे. या कंपनीच्या वतीने एस. बी. असोसिएटस्चे सुहास बोराळे यांनी ३१ डिसेंबर २००८ रोजी मुंबई गृहनिर्माण मंडळाच्या मुख्य अधिकाऱ्यांना प्रस्ताव सादर केला आहे. हा प्रस्ताव सादर करण्यासाठी या कंपनीच्या वतीने सिद्धेश कानडे यांनी बोराळे यांची वास्तुतज्ज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे शंभर रुपयांच्या मुद्रांक पेपरवर नमूद करण्यात आले आहे. परंतु या कंपनीच्या वतीने खुलासा करण्यासाठी आलेल्या दोघा अभियंत्यांनी ‘साफल्य’ या सोसायटीबरोबर अद्याप करारनामा झालेला नाही, असे सदर प्रतिनिधीला सांगितले. दहिसर पूर्व येथीलच ३२ ते ३४ क्रमांकाच्या स्नेहसागर या सोसायटीतील रहिवाशांबरोबर झालेल्या करारनाम्यात जो २१.३६ चौरस मीटरचा क्षेत्रफळाचा उल्लेख करण्यात आला आहे, त्यापैकी अधिक क्षेत्रफळ देण्यात येणार असल्याचेही या अभियंत्यांनी सदर प्रतिनिधीशी बोलताना स्पष्ट केले. आपण नागपूरहून मुंबईत फक्त नोकरी करण्यासाठी नव्हे तर पैसे कमावण्यासाठी आलो आहोत. अशावेळी प्रामाणिकपणे पत्नीच्या नावे कंपनी स्थापन केली तर बिघडले कुठे, असा सवालही यापैकी एका अभियंत्याने केला. पत्नीच्या नावे कंपनी स्थापन करून बांधकाम व्यवसायात स्थिर व्हायचे होते तर त्यांनी राजीनामा द्यायला हवा होता, असे म्हाडातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

‘एनएमएमटी’च्या धडकेने मोटारसायकलस्वार ठार
उरण, १ मार्च/वार्ताहर

येथील नवीन शेवा-चारफाटा दरम्यान एनएमएमटी व मोटारसायकल यांच्यात झालेल्या मोटारसायकलस्वार ठार झाला. यामुळे संतप्त झालेल्या जमावाने एसटीसह चार बसेसची तोडफोड करून संताप व्यक्त केला. रविवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास एनएमएमटी बसने हिरो होण्डा मोटारसायकलस्वाराला ओएनजीसी कामगार वसाहतीसमोर धडक दिली. या अपघातात मोटारसायकलस्वार विक्रम घरत (२०, रा. नवीन शेवा) हा तरुण गंभीर जखमी झाला . त्याला उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या जमावाने आपला मोर्चा अपघातस्थळी वळविला. नवीन शेवा व चारफाटा दरम्यान या जमावाने एनएमएमटीच्या चार तर एक एसटी गाडय़ांची लाठय़ा-काठय़ांनी जबरदस्त तोडफोड केली. यामुळे या मार्गावरील एसटी व प्रवासी वाहतूक इतर मार्गावरून फिरविण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.