Leading International Marathi News Daily
सोमवार, २ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

संगमनेरला वाहतुकीची कोंडी
संगमनेर, १ मार्च/वार्ताहर

नाशिकला असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा, त्यातच आज मोठी लग्नतिथी असल्याने शहरातून जाणाऱ्या पुणे-नाशिक मार्गावर दिवसभर प्रचंड वाहतुकीची कोंडी झाली. वाहनचालकांसह स्थानिक

 

रहिवाशांनाही त्यामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
आज नाशिक येथे राष्ट्रवादीचे निवडणूकपूर्व अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्य़ांतून अदिवेशनासाठी जाणारे कार्यकर्ते आपापल्या वाहनांतून पुणे-नाशिक रस्त्यावरून जात होते. त्यात आज मोठी लग्नतिथी असल्याने वऱ्हाडी वाहनांचीही भर पडली. त्यांच्यात स्थानिक बेशिस्त रिक्षाचालकांनी हातभार लावल्याने मोठी कोंडी होत होती.
या सर्व कारणांमुळे पुणे-नाशिक मार्गाने आज वाहतुकीच्या गर्दीचा उच्चांक गाठला. अतिक्रमणांमुळे आधीच अरुंद झालेला हा रस्ता कोंडीमुळे पुरता गुदमरून गेला होता. संगमनेर खुर्दजवळील प्रवरा नदीवरील पूल ते संगमनेर कारखाना या भागात सर्वाधिक गर्दी झाली होती. अक्षरश मुंगीच्या पावलांनी येथील वाहतूक कशीबशी सुरू होती. अवघ्या तीन-चार किलोमीटरचे अंतर कापण्यास वाहनांना अर्धा ते एक तास लागत होता.
त्यातही सर्वाधिक कोंडी बसस्थानकासमोर आणि प्रवरेच्या पुलावर झाली होती. पुलावरील वाहनचालक तर जीव मुठीत धरून पुढे सरकत होते. वाहतुकीचे नियंत्रण करणाऱ्या पोलिसांचीही आज पुरती दमछाक झाली.