Leading International Marathi News Daily
सोमवार, २ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

कुलूप तोडून काँग्रेस कार्यालयाचा ताबा
जिल्हाध्यक्षाची नियुक्ती तातडीने करण्याची मागणी
नगर, १ मार्च/प्रतिनिधी

काँग्रेसचे बंडखोर आमदार गोविंदराव आदिक यांचे समर्थक असलेले विनायक देशमुख यांच्या राष्ट्रवादीमधील अपेक्षित प्रवेशाने जिल्हाध्यक्षांविना पोरके झालेल्या जिल्हा काँग्रेस कार्यालयाचा ताबा

 

आज सकाळी काँग्रेसचे नगरसेवक धनंजय जाधव व त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतला.
पक्ष कार्यालयाचे कुलूप तोडून आतील दप्तर त्यांनी ताब्यात घेतले. काँग्रेस सेवादलाचे प्रमुख केशवराव मुर्तडक त्यांच्या समवेत होते. भिंगार शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष श्यामराव वाघस्कर, सेवादलाचे अध्यक्ष संजय छत्तीसे, संघटनमंत्री डॉ. नामदेव गुंजाळ, प्रशांत क्षत्रीय आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.नगरसेवक जाधव यांच्यासह हे सर्वजण कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांचे समर्थक आहेत. काँग्रेसमधीलच थोरातविरोधी खासदार बाळासाहेब विखे गटाच्या कोणी जिल्हा कार्यालय ताब्यात घेऊ नये यासाठी नगरसेवक जाधव व त्यांच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळीच पक्ष कार्यालय ताब्यात घेण्याची घाई केली. त्यांनी लगेचच दुपारी तिथे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रमही घेतला. पक्षाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य डॉ. सुधीर तांबे, संगमनेरच्या नगराध्यक्ष दुर्गा तांबे, जि. प. समाजकल्याण समितीचे सभापती पांडुरंग खेडकर, ज्ञानदेव वाफारे, माजी महापौर संदीप कोतकर, कर्जतचे युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रवीण घुले, अनंत देसाई आदी यावेळी उपस्थित होते.
लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच जिल्हाध्यक्षपदाची नियुक्ती करावी, असा ठराव या कार्यक्रमात मंजूर करण्यात आला व त्याची प्रत प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. खासदार, आमदाराबरोबर नाही तर पक्षाबरोबर निष्ठावंत असणाऱ्या व संघटनात्मक कौशल्य सिद्ध करून दाखवलेल्याच या पदावर नियुक्त करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
थोरात गटाच्या या घाईघाईत पक्ष कार्यालय ताब्यात घेण्यामुळे जिल्ह्य़ात आता थोरात तसेच विखे यांच्यात जिल्हाध्यक्षपदावरून संघर्ष उडण्याची चिन्हे आहेत. आमदार राधाकृष्ण विखे यांना शालेय शिक्षणमंत्री म्हणून मंत्रिमंडळात घेतल्यामुळे सत्तेविना गेली काही वर्षे हलके असणारे खासदार बाळासाहेब विखे यांचे पारडे आता जड झाले आहे. त्यांचे काही समर्थकही जिल्हाध्यक्षपदासाठी इच्छुक असून, त्यांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.