Leading International Marathi News Daily
सोमवार, २ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

‘ओबीसींनी आता राज्यकर्ते व्हावे’
नगर, १ मार्च/प्रतिनिधी

सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी ओबीसी समाजाची दिशाभूलच केली. त्यामुळे चाकरी करण्याऐवजी राज्यकर्ते होण्याची मानसिकता ओबीसींनी आत्मसात करावी. सामाजिक अधिकार असलेले आरक्षण स्वतच लढून टिकवून ठेवावे, असे प्रतिपादन भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश

 

आंबेडकर यांनी आज येथे केले.
महाराष्ट्र ओबीसी समन्वय समितीच्या वतीने राज्यभर काढण्यात आलेल्या ओबीसी आरक्षण बचाव जनजागरण रथयात्रेचा समारोप आज येथे झाला. यानिमित्ताने सगम मैदानावर (स्वस्तिक चौक) झालेल्या ओबीसी आरक्षण बचाव अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून आंबेडकर बोलत होते. समितीचे अध्यक्ष हनुमंत उपरे अध्यक्षस्थानी होते. आमदार हरिभाऊ भदे, विठ्ठलराव राऊत, विक्रमशास्त्रीमहाराज, रामभाऊ पेरकर, राजन दीक्षित, गिरवलकर, चंद्रकांत बावकर, संयोजक अशोक सोनवणे आदींसह ओबीसीतील सुमारे ४० जातींचे संघटनाप्रमुख व्यासपीठावर उपस्थित होते.
आंबेडकर म्हणाले की, ओबीसी समाजबांधवांची चूल राजकीय व्यवस्थेने सुकविली. मंडल आयोगाच्या माध्यमातून व्ही. पी. सिंग यांनी या चुली पेटविल्या. आताच्या राज्यकर्त्यांनी ओबीसींच्या यादीत संशोधन करून मराठा आरक्षणाचा समावेश करण्याचा घाट घातला आहे. मात्र, समितीच्या या रथयात्रेमुळे सरकारला डाव तात्पुरता स्थगित करावा लागला. निवडणुकीनंतर मराठा आरक्षण जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या विरोधात लढा उभारून ओबीसी संघटनांनी आपला हक्क अबाधित ठेवावा.
उपरे म्हणाले की, ओबीसी आरक्षण बचाव रथयात्रा राज्यात फिरू नये, यासाठी मराठा नेत्यांकडून दमबाजी झाली. तरीसुद्धा सुमारे ३ हजार कि. मी.चा प्रवास करीत राज्यातील ३३ जिल्ह्य़ांत रथयात्रेने मार्गक्रमण केले. ७६ ठिकाणी सभा झाल्या. शिक्षणाच्या नावाखाली नोकरी व राजकीय आरक्षणावर कब्जा करण्याचा मराठा समाजातील नेत्यांचा डाव आहे. त्यामुळे आरक्षण बचावच्या क्रांतीत ओबीसींनी सहभागी व्हावे. ‘धक्का लागे बुक्का’ या न्यायाने आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी मराठा उमेदवाराला मत न देण्याचा बुक्का मारण्याचे आवाहनही त्यांनी केले.
ओबीसी कोटय़ातून मराठा आरक्षण देऊ नये; अन्यथा तीव्र आंदोलन करू. बापट आयोगाची अंमलबजावणी व सराफ आयोगाची फेरनेमणूक रद्द करावी, विधानसभा-लोकसभा निवडणुकीत ओबीसी उमेदवारांनाच मतदान करावे हे तीन ठराव संमत करण्यात आले. सर्वपक्षीय ओबीसी नेत्यांना सद्बुद्धी मिळावी, यासाठी अधिवेशनस्थळी यज्ञही करण्यात आला.
अधिवेशनाला जिल्ह्य़ासह मराठवाडा, विदर्भातील सुमारे एक हजार कार्यकर्ते उपस्थित होते. मनोहर खेडकर यांनी प्रास्ताविक, तर सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले.