Leading International Marathi News Daily
सोमवार, २ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

शिक्षक - काही असे, काही तसे..
राज्य आणि केंद्र सरकार लोकहिताच्या योजना राबवते. अशीच एक योजना म्हणजे ‘माध्यान्ह भोजन’. यासंबंधीची एक बातमी अलीकडेच वाचनात आली. ज्यांच्यामार्फत ही योजना राबवायची, त्या शिक्षकांचेच हात काळे झाल्याची धक्कादायक गोष्ट पुढे आली. शाळेतील मुलांची गळती थांबविणे हा खिचडी योजनेचा मूळ उद्देश. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ही योजना सुरू झाली असली, तरी भ्रष्टाचारामुळे गळती

 

थांबविण्याऐवजी ती चालूच राहिली. इतर घटकांबरोबरच शिक्षकही त्याला जबाबदार आहेत.
खरे तर शाळांमधील मुलांची गळती हा जुनाच रोग आहे. त्याला इतरही वेगवेगळी कारणे असली, तरी शिक्षक हेही गळतीचे माध्यम आहेच. अर्थात एकजात सर्वच शिक्षक असे असतात, असेही नाही. इतर व्यवसाय, पेशात जशा काही अपप्रवृत्तींबरोबरच चांगली माणसेही असतात, तसेच शिक्षकी पेशातही आहे. मात्र, विद्यार्थ्यांची गळती रोखण्याचे काम शिक्षक अधिक चांगल्या प्रकारे करू शकतात. शिक्षकांमुळे विद्यार्थ्यांची गळती होण्याच्या काही घटना मी लहानपणी प्रत्यक्ष बघितल्या आणि अनुभवल्याही आहेत. माझ्या वडिलांनी धांदरफळ खुर्द येथे शाळा सुरू केली होती. माझ्यासह आठ-दहा विद्यार्थी त्या शाळेत जात असत. आमच्या गुरुजींना शेजारच्या धांदरफळ बुद्रुक गावामधून यावे लागत असे. त्यांच्या दृष्टीने आमच्या गावातील नवीन शाळा म्हणजे त्रासाचा मामला होता. त्यांनी एक दिवस आम्हा मुलांना नदीवरून लव्हाळा आणायला सांगितला. गुरुजींचा आदेश शिरसावंद्य मानून आम्ही सर्व मुले नदीवर गेलो. आमच्याबरोबर लक्ष्मण कोकणे नावाचा वर्गमित्र होता. अतिउत्साहाच्या भरात लक्ष्मण सर्वाच्या पुढे धावत नदीवर गेला आणि लव्हाळा काढायला लागला. अचानक त्याच्यावर विषारी गांधीलमाशांनी हल्ला केला. त्याच्या सर्वागावर गांधीलमाशांनी डंख मारले. आम्ही हे सर्व दुरूनच बघितले आणि तेथूनच घरी धूम ठोकली. लक्ष्मणने मात्र तशाही स्थितीत गुरुजींसाठी लव्हाळा आणला.
दुसऱ्या दिवशी आम्ही भीतभीतच शाळेत गेलो. लक्ष्मणचे सर्वाग सुजले होते. गुरुजींनी त्याला अंग कशामुळे सुजले याचे कारण विचारले. त्याने झालेली घटना सांगितली. क्षणार्धात गुरुजींचा पारा चढला. ‘मूर्खा, तुला कोणती आज्ञा पाळायची आणि कोणती नाही याचं भान नाही. तू शिक्षण घ्यायच्या पात्रतेचा नाहीस’, असं म्हणत गुरुजींनी त्याला चांगलाच चोप दिला. परिणामी लक्ष्मणने शाळा सोडली. गुरुजींच्या माराच्या भीतीने इतरही मुले शाळेत येईनाशी झाली. अखेर महिना-दीड महिन्यात शाळा बंद पडली.
योगायोगाने मला मात्र वडिलांनी घरीच शिकविल्याने पुढे धांदरफळ बुद्रुकच्या शाळेत प्रवेश मिळाला. दुर्दैवाने दुसऱ्या आणि चौथ्या वर्गाला मला पुन्हा तेच शिक्षक लाभले! दोन्ही वर्ग एकाच शिक्षकाकडे होते. एकदा त्यांनी आम्हाला मराठी महिन्यांची नावे घरून शिकून येण्यास सांगितले. मला गुरुजींचा स्वभाव माहीत असल्याने मी तो सवंगडय़ांना सांगितला. ते समजायचं ते समजले. मात्र, पिंपळगाव कोंझिरा येथील भीमा कर्पे समजून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. तो त्याच्या आजीकडून मराठी महिन्यांची नावे शिकून व पाठ करून आला. महिन्यांची नावे कोणी-कोणी पाठ केली असे गुरुजींनी विचारल्याबरोबर भीमाने अभिमानाने बोट वर केले. संपूर्ण वर्गात त्याचे एकटय़ाचेच बोट वर होते. गुरुजींनी त्यास महिन्यांची नावे सांगण्यास सांगितले. भीमा सांगू लागला, ‘चैत, वैशाक, जेठ, आखाड, सरवान, भादवा, कारतिक, मार्गीसर, पुस, माघ, शिमगा..!’ वर्गात बॉम्बस्फोट झाला. गुरुजींनी भीमाला महिन्याच्या प्रत्येक नावागणिक एकेक तोंडात मारली. त्याला त्याचे कारण समजले नाही. मात्र,माराच्या भीतीने त्याने कायमची शाळा सोडली. भीतीपोटी त्याच्याबरोबर इतरही काही मुलांनी शाळा सोडली.
वरील दोन्ही उदाहरणांत शिक्षकांचा एक नकारात्मक पैलू दिसतो. याचा अर्थ सर्वच शिक्षक वाईट आहेत, असा नाही. आजही अनेक चांगले, कर्तव्यदक्ष शिक्षक आहेत. मला भेटलेल्या गुरूजनांमध्ये अनेक चांगलेही होते. अशाच दोन चांगल्या शिक्षकांच्या हाताखाली शिकण्याची संधी मला मिळाली. त्यापैकी एक निमगाव जाळीचे डेंगळे गुरुजी, तर दुसरे पिंपरण्याचे देशमुख गुरुजी. डेंगळे गुरुजी रोज सकाळी भल्या पहाटे बाहेर पडत. जमेल तेवढय़ा विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांना उठवत. सर्व मुलांना एकत्र करून त्यांना व्यायामाचे महत्त्व पटवून देत. सर्वासह तेही व्यायाम करत. आम्हा सर्व मुलांना अतिशय माया-ममतेने वागवत. वेळप्रसंगी शाळेव्यतिरिक्त विनामोबादला शिकवत. आम्हाला त्यांनी देशप्रेमाचे धडे दिले, शिस्त लावली. माझ्याअंगी जी थोडीबहुत शिस्त आली आणि आज याही वयात जे प्रकृतीस्वास्थ्य लाभले, त्याचे सर्व श्रेय डेंगळे गुरुजींनाच जाते.
पिंपरण्याचे देशमुख गुरुजीही असेच प्रेमळ. मी मंत्री झालो तेव्हा आणि त्याअगोदरही देशमुख गुरुजींच्या वृद्धावस्थेत नित्यनेमाने त्यांना भेटायला जात असे. त्या वेळी ते रानात म्हणजे त्यांच्या शेतात छोटासा झाप बांधून गावाच्या आडबाजूला राहत असत. मी त्यांना भेटायला जायचो, याचे अनेक लोकांना आश्चर्य वाटायचे. कारण विविध ठिकाणचे गावकरी अनेकदा माझे कार्यक्रम मागत. परंतु वेळेअभावी मी कार्यक्रम काही वेळा देत नसे. मात्र, गुरुजी हयात असेपर्यंत त्यांच्याकडे जात असे. देशमुख गुरुजी आम्हाला सामान्यज्ञान शिकवत, देशप्रेमाची ज्योत आमच्या मनात पेटवत. असे शिक्षक देशाला लाभले, तर नवा भारत उभा राहील.