Leading International Marathi News Daily
सोमवार, २ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

उभ्या टेम्पोवर जीप आदळल्याने शिक्षक ठार
सोनई, १ मार्च/वार्ताहर

टायर पंक्चर झाल्यामुळे रस्त्यात उभ्या असलेल्या टेम्पोवर मागील बाजूने शालेय विद्यार्थ्यांची ट्रॅक्स जीप आदळून एक शिक्षक ठार, तर अन्य शिक्षक व चालकासह ६ विद्यार्थी जखमी झाले. नगर-औरंगाबाद

 

रस्त्यावर घोडेगाव शिवारात आज सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात घडला.
नगर येथे स्केटिंग स्पर्धेसाठी ९ ते १० वर्षांचे १४ विद्यार्थी अकोला येथून या जीपमधून निघाले होते. मात्र, वाटेतच त्यांच्यावर हा प्रसंग ओढवला.
शिवाजी किसनराव चव्हाण (कौलखेड, जिल्हा अकोला) या शिक्षकाने सोनई पोलिसांत फिर्याद दिली. नगर-औरंगाबाद मार्गावर घोडेगाव शिवारात एम. एच. ०४ ए. जी. ४५७३ या क्रमांकाचा टेम्पो टायर पंक्चर झाल्याने रस्त्यात उभा होता. टेम्पो चालकाने इंडिकेटर अथवा काहीही निशाणी लावली नव्हती. अकोल्यातील शालेय विद्यार्थी नगरकडे घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्स जीपच्या (एम. एच. ३८-३१३) चालकाला अंदाज न आल्याने टेम्पोवर जीप आदळली. या अपघातात कृणाल किशोर शेडे (वय २०) हे शिक्षक मयत झाले. फिर्यादी चव्हाण, ट्रॅक्सचालक राजेंद्र विष्णू मोरे (मंगळूरपीर, जिल्हा वाशिम), तसेच आशिश ऊर्फ अल्पेश जुनगारे, राज अनिल टिकार, सिद्धार्थ रायबोले, पार्थ जयेश शहा, संकेत मनोजकुमार शहा हे अकोला येथील प्रभात कीटस् विद्यालयातील ९ ते १० वर्षे वयोगटाचे विद्यार्थी गंभीर जखमी झाले. त्यांना शनैश्वर देवस्थानच्या रग्णवाहिकेतून नगर व वडाळा मिशन रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.
सोनईचे सहायक निरीक्षक संजय हिबारे, वाहतूक पोलीस सुनील जरे, सहायक फौजदार डी. पी. परदेशी, हवालदार बी. टी. जगताप, पी. डी. कटारे, रामभाऊ पालवे या पोलीस पथकाने घटनास्थळी पंचनामा करून जखमींचे जबाब नोंदविले. ट्रॅक्सचालक राजेंद्र मोरे व टेम्पोचा चालक (नाव, गाव माहीत नाही) या दोन्ही चालकांवर गुन्हा दाखल केला.