Leading International Marathi News Daily
सोमवार, २ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

पाथर्डीच्या वसतिगृह अधीक्षकास नोटीस
पाथर्डी, १ मार्च/वार्ताहर

येथील डॉ. आंबेडकर वसतिगृहातील गैरकारभार व विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या निकृष्ट आहाराबाबत समाजकल्याण अधिकारी मुन्शी यांनी अधीक्षक डी. आर. पाटील यांना नोटीस बजावली आहे. तिचा

 

खुलासा न केल्यास दोन वेतनवाढी रोखण्याची तंबी दिली आहे.
या वसतिगृहातील दैन्यावस्थेबाबत जि. प. सदस्य अर्जुन शिरसाठ यांनी तक्रार केल्यानंतर समाजकल्याण अधिकारी मुन्शी यांनी निरीक्षक डी. व्ही. शिंदे व पी. पी. साठी यांना वसतिगृहाच्या पाहणीसाठी पाठविले, तेव्हा पाटील रजा न टाकताच परगावी केल्याचे आढळले. तसेच इतर अनेक गंभीर बाबी त्यांच्या निदर्शनास आल्या. त्यांनी अहवाल दिल्यानंतर मुन्शी यांनी पाटील यांना नोटीस बजावली. या नोटिशीत तब्बल १५ मुद्दे उपस्थित करण्यात आले आहेत. त्यात म्हटले आहे की, जनरेटर व इनव्हर्टरची सुविधा त्वरित द्यावी, आहारही चांगल्या दर्जाचा द्यावा, स्वयंपाकासाठी टाकीतून पाणी घेतले जाते ही बाब गंभीर आहे. विद्यार्थ्यांच्या वरून खोल्यांमधील विद्युत बोर्ड खराब झाले आहेत. दोन टय़ुबा लावण्यात याव्यात, फॅन दुरुस्त करावेत, दूरचित्रवाणी संचाची सोय नाही, संगणकाचा वापर विद्यार्थी न करता आपला मुलगा करतो ही बाब गंभीर आहे. मनोरंजन हॉल विद्यार्थ्यांसाठी मोकळा करावा, खेळाचे साहित्य विद्यार्थ्यांना दिले जात नाही, पाण्याचा हौद अस्वच्छ आहे, पत्नीचा व्यवस्थापनात हस्तक्षेप आढळतो. अधीक्षक गैरहजर असल्याने कार्यालयास कुलूप होते. त्यामुळे कोणतेही रेकॉर्ड तपासता आले नाही. आपण रजा न टाकताच परस्पर गैरहजर राहिलात. वरिष्ठांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडणे ही बाब गंभीर आहे. वसतिगृहाची मान्यता ७५ विद्यार्थ्यांची असताना ४५ विद्यार्थी गैरहजर आढळले. त्यांचे रजेचे अर्ज नव्हते. परीक्षाकाळात एवढे विद्यार्थी गैरहजर होते. तीस मुलांसाठी केलेला भात प्रमाणाप्रमाणे नव्हता. आपले वसतिगृहाच्या कारभारात लक्ष नसून सूचना देऊनही आदेशाचे पालन करत नसल्याचे दिसून येते. तत्काळ या सर्व बाबींचा खुलासा करावा; अन्यथा दोन वेतनवाढी का रोखण्यात येऊ नये, अशी तंबी नोटिसीत देण्यात आली आहे.
दरम्यान, आज वसतिगृहाच्या दैन्यावस्थेबाबत ‘लोकसत्ता’त वृत्त येताच कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. काही कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांची कानउघाडणीही केली.