Leading International Marathi News Daily
सोमवार, २ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

संस्कृती, संस्काराचा विसर पडल्याने महिलांवरील अत्याचारात वाढ - जाधव
नगर, १ मार्च/प्रतिनिधी

संस्कृती, संस्कार यापासून समाज दूर चालल्यामुळे महिलांवरील अत्याचार, स्त्रीभ्रूणहत्या यासारखे प्रकार वाढत आहेत. या पाश्र्वभूमीवर स्नेहालयतर्फे सुरू असलेले परिवर्तनाचे कार्य मानव विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास विभागाचे आयुक्त बाजीराव जाधव यांनी केले.
‘स्नेहालय’च्या एमआयडीसीतील पुनर्वसन प्रकल्पात उभारण्यात आलेल्या एचआयव्हीबांधितांसाठीच्या रुग्णसेवा कक्षाचे उद्घाटन जाधव यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयहिंद चळवळीचे प्रणेते डॉ. सुधीर तांबे होते. संगमनेरच्या नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, उपायुक्त रवी पाटील, प्रकल्पाचे प्रणेते भाऊकाका जोशी, महिला बालविकास अधिकारी सुधीर मंचरकर, स्नेहालयचे अध्यक्ष सुवालाल शिंगवी आदी व्यासपीठावर उपस्थित होते.जाधव म्हणाले की, बागायती तालुक्यांमध्ये स्त्रियांचे प्रमाण एक हजार पुरुषांमागे ७२३ इतके कमी झाले आहे. त्यामुळे आणखी काही वर्षांनी गंभीर सामाजिक प्रश्न निर्माण होणार आहेत. अन्याय, अत्याचारात मोठी वाढ होईल. या दुष्परिणामांची जाणीव

 

समाजात आताच निर्माण व्हायला हवी.
महिला व बालकल्याण विभाग समाजातील ७०-७२ टक्के वर्गासाठी काम करतो. हे काम अधिक प्रभावी रितीने होण्यासाठी सुसूत्रीकरण आवश्यक आहे. अधिकाऱ्यांनी स्वतपासून सुधारणांना सुरुवात करायला हवी. मुलांची ‘होस्टेल’ बनवू नका, तर त्यांना कौटुंबिक वातावरणात वाढू द्या. त्यांना भरपूर पुस्तके वाचायला द्या, योग-प्राणायाम शिकवा असे ते म्हणाले. स्नेहालय संस्कारकेंद्र आहे. माणसं घडवणारी ही संस्था इतरांसाठी मार्गदर्शक ठरावी, अशी अपेक्षाही जाधव यांनी व्यक्त केली.डॉ. तांबे म्हणाले की, स्नेहालयसारख्या संस्था म्हणजे देवालय आहेत. मानवसेवा हाच खरा धर्म आणि हीच ईश्वरसेवा असल्याने देवस्थानांना श्रीमंत करण्यापेक्षा अशा संस्थांना समाजाने मदत करायला हवी.
रुग्णसेवा कक्षासाठी भरीव मदत देणारे भाऊकाका जोशी यांचेही भाषण झाले. डॉ. अनिरुद्ध व डॉ. ऊर्मिला गिते, तसेच पीएच. डी. संपादन करणारे स्नेहालयचे संस्थापक सदस्य अनिल कुडिया यांच्यासह पाहुण्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक मिलिंद कुलकर्णी यांनी, तर सूत्रसंचालन डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी केले.