Leading International Marathi News Daily
सोमवार, २ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

स्टिव्ह बकनर!
‘‘स्टिव्ह यांनी गेल्या दोन दशकांहून अधिक काळ पंच म्हणून आपल्या महान खेळाला (क्रिकेट) दिलेले योगदान खरोखरच फार मोठे आहे.’’ -हॅरून लॉर्गट (आयसीसीचे मुख्य प्रशासक)
वेस्ट इंडियन पंच स्टिव्ह बकनर यांनी येत्या मार्चमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंचपदावरून आपण म्हणून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील निवडक सन्माननीय पंचांच्या गटातील एक पंच काही दिवसांनंतर मैदानात पाहायला मिळणार नाही. म्हणूनच बकनर यांच्या या घोषणेनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने आपल्या एका उत्कृष्ट पंचाला भावपूर्ण निरोप देण्याची तयारी सुरू केली

 

आहे.
दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात येत्या १९ मार्चपासून केपटाऊन येथे सुरू होणारा कसोटी सामना बकनर यांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच म्हणून शेवटचा कसोटी सामना असणार आहे. त्यानंतर २९ मार्च रोजी बारबाडोस येथील ब्रीजटाऊन येथे वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात होणाऱ्या सामन्यात बकनर पंच असणार आहेत. हा त्यांचा पंच म्हणून शेवटचा एकदिवसीय सामना असणार आहे आणि खऱ्या अर्थाने बकनर यांच्या आंतरराष्ट्रीय पंचाच्या कारकीर्दीतील हाच शेवटचा सामना ठरणार आहे. त्या दोन्ही सामन्यांच्या अखेरीस बकनर यांना मैदानातही भावपूर्ण निरोप देण्यात येईल.
६२ वर्षीय बकनर यांनी त्यांच्या कार्यकाळात १२६ कसोटी तसेच १७९ एकदिवसीय सामन्यांमध्ये पंच म्हणून काम पाहिले आहे. बकनर यांचा हा विक्रमच मानण्यात येतो. तसेच १९९२ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेपासून प्रत्येक विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पंच म्हणून मैदानात उतरण्याचा मान बकनर यांना लाभला आहे.
या सर्व सामन्यांमध्ये निर्णय देताना तिसऱ्या पंचाची कमीत कमी वेळा मदत घेणारे ते पंच ठरले. कदाचित तोही विक्रम त्यांच्या नावावर नोंदविता येऊ शकेल. त्यांनी पंच म्हणून निर्णय देताना त्यांचे जे थोडेफार निर्णय वादग्रस्त ठरले, त्यामध्ये प्रामुख्याने पायचितसंबंधीच्या निर्णयांचा समावेश होतो. त्यावरूनच लॉर्गट यांनी बकनर यांच्याविषयी मत व्यक्त करताना म्हटले आहे, की इतक्या प्रदीर्घ काळासाठी क्रिकेटच्या सर्वोच्च पंचांपैकी एक असलेले बकनर यांच्याकडे आत्मविश्वास आहे. ते एक सन्माननीय व्यक्ती आहेत. असे असले तरी ते अतिशय नम्र आहेत. समोरचा खेळाडू बाद झाल्यावर निर्णय देताना त्यांची शांतपणे हात उंचावण्याची पद्धत पाहूनच त्यांना ‘स्लो डेथ बकनर’ असे म्हटले जाते. तसेच खेळाडू बाद झाल्याचा निर्णय देताना काही क्षण थांबण्याची पद्धत त्यांचे एक वैशिष्टय़ बनली.
सामना सुरू असताना अतिशय शांत आणि मैदानात होणाऱ्या घडामोडींपासून अलिप्त असल्यासारखे भासणारे बकनर कॅरिबियन द्विपसमूहामधील बारबाडोस या देशाचे मूळ नागरिक असून, ते पेशाने गणिताचे शालेय शिक्षक आहेत. तरुण वयात माँटेगो बे येथे बकनर स्वत: क्रिकेट खेळाडू होते. त्या वेळी पंचांकडून सतत चुकीचे निर्णय दिले जात असत आणि त्याचा फटका बकनर यांना बसत असे. त्या घटनांमुळे व्यथित होऊन बकनर यांनी स्वत: निष्पक्ष पंच होण्याचा निश्चय केला आणि आता त्यांच्या निवृत्तीच्या वेळी असे निश्चितच म्हणता येईल, की बकनर यांनी आपला निश्चय पूर्णत्वास नेला आहे. त्यांनी क्रीडा क्षेत्रात पंच म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात १९८५ पासून केली. ते १९९२ पर्यंत आंतरराष्ट्रीय फुटबॉल संघटनेच्या पंचांच्या मंडळाचे सदस्य होते. त्यांनी त्या काळात विश्वचषक स्पर्धाच्या निवड फेरीच्या सामन्यांमध्ये पंच म्हणून काम केले होते. त्यानंतर क्रिकेटचे पंच झालेले बकनर डिसेंबर १९९३ पासून जगातील सर्वोच्च क्रिकेट पंचाच्या मंडळाचे एक महत्त्वाचे सदस्य राहिले आहेत.बकनर यांनी त्यांची एकदिवसीय क्रिकेट सामन्यांचे पंच म्हणून कारकीर्द १९८९ मध्ये अँटिग्वा येथील सेंट जॉन्स येथे भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात झालेल्या सामन्यापासून सुरू केली. भारताच्या त्याच दौऱ्यात भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात जमैकातील किंगस्टन येथे झालेल्या कसोटी सामन्यात ते पंच म्हणून मैदानात उतरले आणि त्याबरोबरच त्यांची कसोटी पंच म्हणूनही कारकीर्द सुरू झाली.
भारतीय क्रिकेट संघ २००८च्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेलेला असताना सिडनी येथे झालेल्या कसोटी सामन्याच्या वेळी पंच म्हणून बकनर यांनी दिलेले निर्णय वादग्रस्त ठरले होते. त्यामुळे त्यांना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थ येथे झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या वेळी पंचपदावरून हटविण्यात आले होते. त्यानंतर महिन्याभरातच बांगलादेश आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या सामन्यांच्या वेळी बकनर यांनी कसोटी पंच म्हणून पुनरागमन केले होते.आपल्या निवृत्तीविषयी ‘जमैका टाइम्स’शी बोलताना बकनर म्हणाले, की मी शारीरिकदृष्टय़ा अजूनही तंदुरुस्त आहे. त्यामुळे आणखी दोन-तीन वर्षे तरी मी पंच म्हणून नक्की काम करू शकेन. पण मला माझा आतील आवाज आता सांगत आहे, की निवृत्तीची वेळ आली आहे. निवृत्तीनंतर कॅरिबियन देशांमधील पंचांच्या कामगिरीचा दर्जा उंचावण्यासाठी काम करण्याचा माझा मानस आहे. वेस्ट इंडिज क्रिकेट मंडळाने मला तरुण पंचांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलाविले आहे. त्यामुळे निवृत्तीनंतर मी त्यांच्याबरोबर असेन.
स्टिव्ह बकनर यांच्याकडे पंच म्हणून आयसीसीकडून या आधी सोपविण्यात आलेल्या सामन्यांची जबाबदारी पूर्ण झाल्यावर ते निवृत्त होणार आहेत. निवृत्त होताना बकनर यांच्या सन्मानार्थ आयसीसीकडून विशेष निरोप समारंभ आयोजित करण्यात येणार आहे.
पराग पुरोहित