Leading International Marathi News Daily
सोमवार, २ मार्च २००९
(सविस्तर वृत्त)

कुशल मार्गदशक- बाणे गुरुजी
मल्लखांबाचे शिलेदार

बाणे गुरुजी-(इ.स. १९२६ १९९८)-एखाद्या गोष्टीसाठी संपूर्ण आयुष्यच समर्पण करणारे क्वचितच लोक असतात. अशापैकी एक म्हणजेच पी.व्ही. बाणे. यांना सर्वजण ‘बाणे गुरुजी’ म्हणत असत. मल्लखांब बाणे गुरुजी असे समीकरणच होते. त्यांनी संपूर्ण आयुष्यभर फक्त मल्लखांबासाठीच समर्पण केले होते.

 

बाणे गुरुजींचा जन्म. इ. स. १९२६ मध्ये झाला.पुण्यातील फडगेट पोलीस चौकी (शुक्रवार पेठ) जवळील ४ बा १० च्या खोलीत ते रहात होते. ते मारुतीचे उपासक होते. त्यांच्या खोलीतील एका भिंतीवर मारुतीचे २५ छायाचित्रे होती तर दुसऱ्या भिंतीवर बहाटलीवरील मल्लखांबाला लागणारे तीन पाट असायचे. या पाटावरच बाणे गुरुजी झोपत होते. अत्यंत साधे राहणीमान असणारे गुरुजींकडे एक घोंगडी होती. वाडय़ातील विहिरीवर स्नान करून ते देवपूजा करायचे. घरी येणाऱ्या प्रत्येकाला खडीसाखर व मारुतीच्या प्रसादाचे खोबरे देत असत. आंघोळ झाल्यावर सोवळ्याने पूजा करून ते मल्लखांबाला शिवायचे.
ते हाय अ‍ॅटिटय़ूड बॅलन्स (उंचीवरील बॅलन्स) सर्कसमधील चाकूबाजी )चाकूची नेमबाजी) व घोडेस्वारमध्ये तरबेज होते. तर मल्लखांबातील ‘निराधार मल्लखांबात’ निष्णात होते. निराधार मल्लखांबावरील मुठय़ाचा. फरारा (हाफ बॅलन्स) व तेढी या प्रकारात त्यांचा हातखंडा होता. मल्लखांब शिकविताना ते प्रत्येक प्रकार व्यवस्थीतपणे झाला पाहिजे याबाबत जागरुर होते. गुरुजींनी अनेक मुलींनाही रोप मल्लखांब शिकविला होता. पुण्यातील श्री. धाक्रस, श्री. आफळे यांच्या मुलींनाही त्यांनी रोप मल्लखांबामध्ये तरबेज केले होते. पुण्यात झाल्यावर बाणे गुरुजी कुमठेकर रस्त्यावरील श्री. खासगीवाले यांच्याकडे काही महिने वास्तव्यास होते. श्री. खासगीवाले यांना योगासने शिकवित होते. मल्लखांबाच्या बोंडाला (सर्वात वरचा भाग) विरुद्ध दिशेने तलवारील लावून, बोंडावर उभे राहून खडी झाप हा अत्यंत अवघड प्रकार ते सहजतेने करीत होते.
मुलांना बाटलीवरील व निराधार मल्लखांब तर मुलींना दोरीचा मल्लखांब शिकवित होते. पुण्यातील व्यावसायिक श्री. राजमाचीकर यांनी गुरुजींना मल्लखांब भेट दिला होता. इस्त्री केलेला सलवार झब्बा व नीटनेटकेपणा त्यांना आवडत होता. १९८० ते ८२ साली बाणे गुरुजींनी मंडळात शिबिरार्थीना मल्लखांब शिकविला होता. इ. स. १९४० मध्ये त्यांना परदेशात जाण्याची संधी उपलब्ध होती, पण बहिणीने अनुमती न दिल्याने त्यांनी देशातच अनेक मल्लखांबपटूंना मार्गदर्शन केले होते.
गोरे हॉस्पिटलच्या उद्घाटनप्रसंगी गुरुजींनी तिसऱ्या मजल्याच्या कठडय़ावर दोन्ही हातांवर बॅलन्स केला होता. तर पुणे महानगरपालिकेच्या इमारतीवरील गच्चीवरही बॅलन्स केला होता. तसेच महाराष्ट्रीय मंडळाच्या साधारण ३० ते ३५ फूट उंच भिंतीवरील बॅलन्स करून सर्वानी आश्चर्यचकित केले होते. इ.स. १९७८ मध्ये त्यांनी फिल्डमार्शल माणिक शॉसमोर मल्लखांबाचे प्रात्यक्षिक केले होते. माजी उपराष्ट्रपती बी.डी. जत्ती, शंतनुराव किलरेस्कर, यशवंतराव चव्हाण, कॅ. विजयालक्ष्मी पंडित, इ. मान्यवरांसमोरही मल्लखांबाची प्रात्यक्षिके केली होती. तसेच श्रीमंत दगडूशेठ, हलवाई गणपतीजवळील कार्यक्रमात क्रिकेटपटू सुनील गावसकर प्रमुख पाहुणे असतानाही त्यांनी मल्लखांब प्रात्यक्षिके केली होती.बाणे गुरुजी पर्वती चढताना व उतरताना दोन्ही हातांवर संपूर्ण शरीराचा तोल सांभाळून ‘बॅलन्स’ करायचे. गुरुजींनी रॉयल सर्कसमध्ये हातांनी बाटल्या फिरविणे, चाकूबाजी इ. प्रात्यक्षिके केली होती. गुरुजींनीसमर्थ व्यायाम मंदिर, दादर तसेच अंबाबाई तालिम (मिरज) येथील म. द. करमरकर यांच्याकडेही मल्लखांब प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करून मल्लखांबपटूंना प्रशिक्षित केले होते.
म्हातारपणी बाणे गुरुजींचे जेवणाचे बिल समर्थ व्यायाम मंदिराचे उदय देशपांडे देत होते. तर इ. स. १९९८ मध्ये गुरुजींचे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया पुण्यातील नेत्रतज्ञ डॉ. केळकर यांनी मोफत केली होती. गुरुजी शस्त्रक्रियेला सहमती देत नव्हते. पण त्यांच्या शिष्यांनीच त्यांची समजूत घातली व शस्त्रक्रिया केली. संभाजी बिडीचे मालक श्री. ठाकूर सावदेकर यांनाही गुरुजींनी मल्लखांब शिकविला होता. बाणे गुरुजींच्या शिष्य परंपरा मोठी आहे. त्यापैकी अरविंद साठे, अमरेंद्र भट, विनायक राजमाचीकर, अनिरुद्ध कुमठेकर, उदय देशपांडे, इ. नी आपापल्या क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे. गुरुजी दोरीवरील व बाटलीवरील मल्लखांब शिकविण्यात प्रवीण होते.
कोकणातून आलेले बाणे गुरुजी पुण्यात स्थायिक झाले तरी मल्लखांबाच्या प्रसारासाठी ते महाराष्ट्रात बरेच ठिकाणी गेले होते. मल्लखांब व्यतिरिक्त त्यांच्या जीवनात दुसरे काहीच नव्हते. अशा या एका महान मल्लखांबाकाचे निधन वयाच्या ७२ व्या वर्षी पुण्यात इ.स. १९९८ मध्ये झाले गुरुजींना शत:प्रणाम!
श्री निवास हवालदार