Leading International Marathi News Daily

सोमवार, २ मार्च २००९

संगमनेरला वाहतुकीची कोंडी
संगमनेर, १ मार्च/वार्ताहर

नाशिकला असलेला राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा, त्यातच आज मोठी लग्नतिथी असल्याने शहरातून जाणाऱ्या पुणे-नाशिक मार्गावर दिवसभर प्रचंड वाहतुकीची कोंडी झाली. वाहनचालकांसह स्थानिक रहिवाशांनाही त्यामुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.

कुलूप तोडून काँग्रेस कार्यालयाचा ताबा
जिल्हाध्यक्षाची नियुक्ती तातडीने करण्याची मागणी

नगर, १ मार्च/प्रतिनिधी

काँग्रेसचे बंडखोर आमदार गोविंदराव आदिक यांचे समर्थक असलेले विनायक देशमुख यांच्या राष्ट्रवादीमधील अपेक्षित प्रवेशाने जिल्हाध्यक्षांविना पोरके झालेल्या जिल्हा काँग्रेस कार्यालयाचा ताबा आज सकाळी काँग्रेसचे नगरसेवक धनंजय जाधव व त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतला.पक्ष कार्यालयाचे कुलूप तोडून आतील दप्तर त्यांनी ताब्यात घेतले. काँग्रेस सेवादलाचे प्रमुख केशवराव मुर्तडक त्यांच्या समवेत होते. भिंगार शहर काँग्रेसचे कार्याध्यक्ष श्यामराव वाघस्कर, सेवादलाचे अध्यक्ष संजय छत्तीसे, संघटनमंत्री डॉ. नामदेव गुंजाळ, प्रशांत क्षत्रीय आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.नगरसेवक जाधव यांच्यासह हे सर्वजण कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांचे समर्थक आहेत.

‘ओबीसींनी आता राज्यकर्ते व्हावे’
नगर, १ मार्च/प्रतिनिधी

सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी ओबीसी समाजाची दिशाभूलच केली. त्यामुळे चाकरी करण्याऐवजी राज्यकर्ते होण्याची मानसिकता ओबीसींनी आत्मसात करावी. सामाजिक अधिकार असलेले आरक्षण स्वतच लढून टिकवून ठेवावे, असे प्रतिपादन भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज येथे केले. महाराष्ट्र ओबीसी समन्वय समितीच्या वतीने राज्यभर काढण्यात आलेल्या ओबीसी आरक्षण बचाव जनजागरण रथयात्रेचा समारोप आज येथे झाला. यानिमित्ताने सगम मैदानावर (स्वस्तिक चौक) झालेल्या ओबीसी आरक्षण बचाव अधिवेशनात प्रमुख पाहुणे म्हणून आंबेडकर बोलत होते. समितीचे अध्यक्ष हनुमंत उपरे अध्यक्षस्थानी होते.

शिक्षक - काही असे, काही तसे..
राज्य आणि केंद्र सरकार लोकहिताच्या योजना राबवते. अशीच एक योजना म्हणजे ‘माध्यान्ह भोजन’. यासंबंधीची एक बातमी अलीकडेच वाचनात आली. ज्यांच्यामार्फत ही योजना राबवायची, त्या शिक्षकांचेच हात काळे झाल्याची धक्कादायक गोष्ट पुढे आली. शाळेतील मुलांची गळती थांबविणे हा खिचडी योजनेचा मूळ उद्देश. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने ही योजना सुरू झाली असली, तरी भ्रष्टाचारामुळे गळती थांबविण्याऐवजी ती चालूच राहिली. इतर घटकांबरोबरच शिक्षकही त्याला जबाबदार आहेत.

वेदपाठी विद्यार्थ्यांनी घेतला आकाशदर्शनाचा आनंद!
नगर, १ मार्च/प्रतिनिधी

सकाळ, संध्याकाळ वेदपठणात मग्न असलेल्या वेदांतनगर येथील दत्त देवस्थानमधील विद्यार्थ्यांनी काल आकाशातील ग्रह-ताऱ्यांच्या निरीक्षणाचा आनंद घेतला. दुर्बिणीतून दिसणारी शुक्राची चंद्रासारखी कोर पाहून ते हरखून गेले. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त भास्कराचार्य अ‍ॅस्ट्रॉनॉमी रिसर्च सेंटरतर्फे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष प्रा. दिनेश निसंग यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
दुर्बिणीतून चंद्र, शनी, शुक्र दाखवून आकाशवाचन कसे करावे, याबाबत या वेळी सांगण्यात आले.कार्यक्रमाला देवस्थानचे व्यवस्थापक प्रकाश प्रधान, अमोल कुलकर्णी, ‘भास्कराचार्य’चे मंदार साबळे, पराग गोरे, विक्रम एडके, नीरजा फळे, नीलेश घोडके आदी उपस्थित होते.

महामार्गाच्या सुशोभीकरणाचा बोजा मनपावर नको - गांधी
नगर, १ मार्च/प्रतिनिधी

महापालिका हद्दीतून जाणाऱ्या नगर-मनमाड, नगर-औरंगाबाद, नगर-पुणे, तसेच सोलापूर, जामखेड, दौंड, कल्याणकडे जाणाऱ्या महामर्गांच्या सुशोभीकरणाची सर्व जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभगाची असल्याने महापालिकेने हा नसता आर्थिक बोजा अंगावर घेऊ नये, असे माजी केंद्रीय राज्यमंत्री दिलीप गांधी यांनी मनपा आयुक्तांना कळवले आहे. मनपा हद्दीतून या रस्त्यांचा काही भाग जात असला, तरी संपूर्ण रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाने बोओटी तत्त्वावर खासगीकरणात दिले आहेत. ते काम घेणाऱ्या ठेकेदारांकडेच मनपा हद्दीतून जाणाऱ्या रस्त्यांच्याही देखभाल-दुरुस्तीची व सुशोभीकरणाचीही जबाबदारी आहे. याबाबत आपण बांधकाम विभागालाही सविस्तर पत्र दिले असल्याचे गांधी यांनी पत्रात म्हटले आहे. मनपाने सर्वसाधारण सभेत याप्रमाणे ठराव करावा व त्या ठरावाची प्रत बांधकाम विभागाकडे पाठवावी. बांधकाम विभाग संबंधित ठेकेदारांकडून हे काम करून घेईपर्यंत त्याचा पाठपुरावा करावा, असे गांधी यांचे म्हणणे आहे.

मेहेरबाबांच्या जीवनावर कवडे प्रशालेत कार्यक्रम
नगर, १ मार्च/प्रतिनिधी

नगर तालुक्यातील नागरदेवळे येथील स्वातंत्र्यसैनिक जानकीबाई कवडे प्रशालेत अवतार मेहेरबाबा यांच्या जयंतीनिमित्त नुकताच कार्यक्रम घेण्यात आला. अध्यक्षस्थानी देहरादून येथील ब्रिजभूषण शर्मा होते. यावेळी माजी नगरसेवक सुनील त्रिपाठी, प्रशालेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रवींद्र कवडे, संचालिका राज कवडे, मुख्याध्यापक नंदकुमार लोणकर उपस्थित होते. शिक्षिका स्वयंप्रभा खंडागळे यांनी स्वागतगीत म्हटले. शर्मा यांनी अवतार मेहेरबाबांच्या जीवनाविषयी माहिती दिली. तसेच विविध भाषेत गीते सादर केली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिराज खान, दीपक पंडित, दत्तात्रेय जाधव, सुनंदा जावळे, मुबिना शेख, कीर्ति कुसकर, छात्र शिक्षिका सुषमा श्रीमंदीलकर, टाकसाळ, गणेश बडे यांची परिश्रम घेतले.

एमआयआरसीतर्फे उद्या पॅराग्लायडिंग प्रात्यक्षिक
नगर, १ मार्च/प्रतिनिधी

मॅकनाईज्ड इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरच्या (एमआयआरसी) वतीने मंगळवारी (दि. ३) सायंकाळी ५ ते ६ या वेळेत येथील ग्रीन प्रोजेक्ट मैदानावर (नारायणडोहो रस्ता) पॅराग्लायडिंगचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे. सर्व नागरिकांसाठी ते खुले आहे, अशी माहिती कर्नल एस. आर. निकम यांनी दिली.
एमआयआरसीच्या आर्मी अ‍ॅडव्हेंचर्स विंगच्या वतीने नुकतीच गोवा ते नगर ही ट्रान्स सह्य़ाद्री पॅराग्लायडिंग मोहीम घेण्यात आली. या मोहिमेत कर्नल निकम यांच्या नेतृत्वाखाली १६ जवानांचा समावेश होता. मोहीम यशस्वी करणारे हे जवान या प्रदर्शनात पॅराग्लायडिंगची प्रात्यक्षिके सादर करणार आहेत. दरेवाडीहून नारायणडोहो रस्त्यावर ६ कि. मी. अंतरावर एमआयआरसीचे ग्रीन प्रोजेक्ट मैदान आहे. तेथे होणाऱ्या या प्रदर्शनात नागरिकांना फोटोग्राफी, व्हीडिओ चित्रीकरण करता येणार आहे. नागरिकांनी येताना पाण्याच्या बाटल्या घेऊन याव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.