Leading International Marathi News Daily

सोमवार, २ मार्च २००९

जनता की सवारी - नागपुरात पार पडलेल्या व्हिंटेज कार आणि बाईक रॅलीत १९६२ सालच्या लॅम्ब्रेटा स्कूटरसह सामील झालेले हे दोघे केशधारी शीख.

‘जुने ते सोने’ - अत्याधुनिक सोयी-सुविधांनी सज्ज अशा कार बाजारात उपलब्ध असताना आजही जुन्या चारचाकी आणि दुचाकींची ‘क्रेझ’कायम आहे. अशाच काही शौकिनांसाठी रविवारी ज्युनिअर चेंबर इंटरनॅशनल ऑरेंज सिटी या स्वयंसेवी संस्थेतर्फे ‘व्हिंटेज कार आणि बाईक रॅली’ आयोजित करण्यात आली होती. छायाचित्रात १) १९५५ सालच्या जीपवर मित्र मैत्रिणीसह स्वार झालेल्या कल्पना बनहट्टी. २) १९४० च्या शेवरलेट कंपनीच्या बसने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. 3) भारतीय स्त्री शक्तीच्या कार्यकर्त्यां आकर्षक जीपवर पारंपरिक वेशात सहभागी झाल्या. ४) १९७९ चे बॉबीचे मॉडेल. ५) अकोल्याचे निर्मल नरवडे यांची १९१६ सालची सायकल. ६) राजेश बोरकर यांची बुलेट आकर्षणाचे केंद्र होती. हिस्लॉप महाविद्यालयाच्या मैदानातून सुरू झालेल्या सुमारे ३७ किलोमीटरच्या या रॅलीचा समारोपही याच मैदानावर झाला. या रॅलीमध्ये ७५ स्पर्धक सहभागी झाले होते.

.. तरीही तळीराम जोरातच!
नागपूर, १ मार्च/ प्रतिनिधी

दारूबंदी व्हावी अशी विशेषत: राज्यातील महिला कितीही मागणी करीत असल्या, तरी उत्पादन शुल्काद्वारे राज्य सरकारला प्रचंड मोठा महसूल मिळवून देणाऱ्या मद्य उद्योगाला प्रोत्साहन देण्याचेच सरकारचे धोरण आहे. याचा परिणाम म्हणून गेल्या काही वर्षांत सर्वच प्रकारच्या मद्याच्या विक्रीचा आलेख वाढतच राहिलेला आहे. राज्यात दरवर्षी कोटय़वधी लिटर मद्य विकले जात आहे. राज्यात देशी दारू, देशी बनावटीची विदेशी दारू, बिअर आणि वाईन या चार प्रकारांच्या मद्याची जास्त विक्री होते.

रणजित देशमुखांचे ‘दिल जोडो’ भावले पक्षातील ज्येष्ठ-कनिष्ठांना
नागपूर, १ मार्च/प्रतिनिधी
केंद्रीय राज्यमंत्री विलास मुत्तेमवार यांच्यापासून तर माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, माजी खासदार दत्ता मेघे, गेव्ह आवारी यांच्यासह पक्षातील मित्र आणि विरोधकांच्या भेटी घेऊन माजी मंत्री व काँग्रेस नेते रणजित देशमुख यांनी आज त्यांच्या ‘दिल जोडो’ मोहिमेला सुरुवात केली. पूर्वी जे झाले ते विसरून नव्याने पक्ष अधिक बळकट करून विदर्भातील लोकसभेच्या सर्व जागा जिंकण्याचा संकल्प या मोहिमेदरम्यान सर्व नेत्यांनी केल्याचा दावा देशमुख यांनी केला.

कोचिंग कॉम्प्लेक्सला विलंब कोणामुळे?
राजेश्वर ठाकरे, नागपूर, १ मार्च

नागपूर शहरातील प्रवाशांचा प्रचंड ओघ बघता अजनी उपनगरीय रेल्वे स्थानकाच्या धर्तीवर विकसित होणारे आणि नागपूर रेल्वेच्या विकासात मैलाचा दगड ठरू शकणारे अजनी कोचिंग कॉम्प्लेक्स दफ्तरदिरंगाईत अडकले आहे. गेल्या दोन वर्षांपासून अद्याप हा प्रकल्प प्रशासकीय उदासिनतेमुळे प्राथमिक अवस्थेत पडलेला आहे. मिहान आणि कार्गो हब या प्रकल्पांमुळे नागपूर शहर जगाच्या नकाशावर ठळकपणे दिसू लागले असून येथील उद्योग-व्यापारामुळे गेल्या काही वर्षांत रेल्वेची वाहतूक प्रचंड प्रमाणात वाढली आहे. हे बघता प्रवाशांच्या सोयी-सुविधांच्या दृष्टीने येथून अधिक गाडय़ा थेट सोडता याव्या आणि उपनगरीय रेल्वे स्थानक म्हणून अजनी रेल्वे स्थानकाचा विकास व्हावा म्हणून अजनी कोचिंग कॉम्प्लेक्स विकसित करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला.

जीवनाला वात्सल्याचा गंध तेवढा हवा!
चंद्रकांत ढाकुलकर

अलीकडेच बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या परंतु, जे घडू नये असे समस्त पालकांना वाटते तेच घडले आणि पालकांची मने हादरून गेलेली आहेत. विदर्भात तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याने त्यांच्याप्रमाणेच जनमनही विचलित झाले आहे. या परीक्षा तशा जीवनाला कलाटणी देणाऱ्या तरी असतात किंवा जीवनाची दिशा निश्चित करणाऱ्या तरी असतात. बारावीनंतर काय, ही दिशा ज्यांची ठरलेली असते त्यांच्यासाठी ती दिशा दिग्दर्शन करणारी ठरते तर, ज्यांचे एव्हाना काहीही ठरलेले नसते त्यांच्यासाठी ती कलाटणी देणारी ठरते. यातही ज्यांचे करिअर टार्गेट ठरलेले आहे, अशांनाही निकालानंतरच्या पर्सेटेजनुसार ती टर्निग पॉईंट ठरू शकते परंतु, अपेक्षित पर्सेटेज न मिळाल्याने वैफल्याच्या भोज्याला शिवून आलेल्या अनेकांनी त्यांची आयुष्य उभारलेलीच नाहीत, असे नाही.

मेडिकलमधील ब्रेकीथेरपीचा शुभारंभ
नागपूर, १ मार्च / प्रतिनिधी

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (मेडिकल) कर्करोग विभागातील ब्रॅकीथेरेपीचा लोकार्पण समारंभ केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांच्या हस्ते पार पडला. यानिमित्त आयोजित समारंभाच्या अध्यक्षस्थानी आमदार दीनानाथ पडोळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. वासुदेव तायडे, नागपूर विभागाचे उपसंचालक डॉ. विजय गेडाम उपस्थित होते. मेडिकलच्या अधिष्ठाता डॉ. दीप्ती डोणगावकर, कर्करोग विभाग प्रमुख डॉ. के.एम. कांबळे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

मंदीची धास्ती बाळगण्याची गरज नाही -जिल्हाधिकारी
एनआयपीएमच्या परिसंवादाचा समारोप

नागपूर, १ मार्च / प्रतिनिधी

जागतिक मंदीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर अन्य देशांच्या तुलनेत फारसा परिणाम झालेला नाही. वित्तसंस्था, उत्पादन आणि आऊट सोर्सिग करणाऱ्या कंपन्यांना मंदीचा तडाखा बसला आहे. मात्र, मंदीची धास्ती बाळगण्याचे कारण नाही, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी प्रवीण दराडे यांनी येथे केले. नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ पर्सोनल मॅनेजमेंटच्या (एनआयपीएम) वतीने हॉटेल प्राईड येथे ‘मंदीच्या काळात मानव संसाधनाची भूमिका’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादाचे उद्घाटन करताना दराडे बोलत होते.

घरात शिरून महिलेस लुटले; ५ जणांचे टोळके गजाआड
नागपूर, १ मार्च / प्रतिनिधी

घरात शिरून महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगडय़ा हिसकून पळून गेलेल्या पाच आरोपींना गुन्हे शाखेच्या पथकाने एका दिवसात अटक केली. जलाराम नगरात शनिवारी दुपारी पावणे दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. कळमना यार्डातील अडते रोहित माखरिया यांची पत्नी प्रीती घरात दुपारी एकटीच होती. दुपारी तिचा दीर जेवण करून गेल्यानंतर काही वेळातच घरात शिरलेल्या टोळक्याने जबरदस्तीने तिच्या हातातील दोन सोन्याच्या बांगडय़ा (किंमत ४० हजार रुपये) हिसकून पळ काढला.

चित्रप्रदर्शन महाविद्यालयाचं; नागपूरकर रसिकांसाठी
नागपूर, १ मार्च / प्रतिनिधी

वेळ सकाळची.. प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमाची.. शासकीय चित्रकला महाविद्यालयातील लगीन घाईचा मूहूर्त.. फेब्रुवारीत प्रत्येक विद्यार्थी माउंटींग, फ्रेमींग, फोटो, सीडी, डिजीटल इमेजेस, ५ पेट्सच्या निर्मितीत दंग.. वर्षभर केलेल्या स्वाध्यायाचं, प्रेझेंटेशन उत्तम व्हावे, बक्षीस मिळावे आणि नागपूरकर रसिकांनी कौतुक करावे या आकांक्षेने रात्रीचा दिवस करून विद्यार्थी फेब्रुवारीच्या २५ तारखेपर्यंत कलाकृती पूर्ण करतात.. कलाकृतीचं स्वरूप शैक्षणिक असतं तरीही त्यांचा आस्वाद सर्व रसिकांपर्यंत पोचावा याच उद्देशानं दरवर्षी महाविद्यालय प्रदर्शनाचे आयोजन करीत असते.

‘जकातेंचे साहित्य अस्वस्थ करणारे' ‘दोन घडीचा डाव’, ‘याला जीवन ऐसे नाव’ प्रकाशित
नागपूर, १ मार्च / प्रतिनिधी

जकाते दाम्पत्याने कथा आणि कवितांतून दिलेले साहित्य अस्वस्थ करणारे आहे, अशी पावती यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान आणि रसिकराज सांस्कृतिक संस्थेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात वक्तयांनी दिली. मेजर हेमंत जकाते यांच्या ‘दोन घडीचा डाव’ या कवितासंग्रहाचे आणि सुलभा जकाते यांच्या ‘याला जीवन ऐसे नाव’ या कथासंग्रहाचे लेखिका शुभांगी भडभडे यांच्या हस्ते प्रकाशन झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्नल सुनील देशपांडे हे होते. मंचावर कवी नीलकांत ढोले, पत्रकार अविनाश पाठक आणि गणेश नायडू हे उपस्थित होते.

ऊर्जेचा अखंड स्रोत!
संदीप देशपांडे

गात्र आता थकलेली आहेत. चालणं-फिरणं पूर्वीसारखं होत नाही. दगदग बरेचदा धाप लावते. दैवी वक्तृत्वाची धार अजूनही कायम असली तरी पूर्वीसारखी लगबग आता होत नाही, हे अनेकांचे श्रद्धास्थान असलेले नानासाहेब शेवाळकर यांना जसं कळलेलं आहे, तसंच त्यांच्या चाहत्यांनाही कळतं पण, दोघांनाही वळत नाही. कारण कुठलंही असो, येणारे आजही मोठय़ा अपेक्षेनं येतात म्हणून सहसा नकार द्यायचा नाही, हे व्रत नानासाहेब आजही पाळत आहेत. उद्या ते वयाच्या ७९ व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. म्हणून उत्तर अंबाझरी मार्गावरील त्यांच्या ‘पर्णकुटी’त रविवार सकाळपासूनच त्यांचे हितचिंतक, स्नेही हळूच डोकावून बघत होते..

बंदी असूनही शाळा, महाविद्यालयांत मोबाईल सुरूच!
आदेशाची पायमल्ली

नागपूर, १ मार्च/ प्रतिनिधी

शाळा व महाविद्यालयात मोबाईल वापरण्यास राज्याच्या शिक्षण विभागाने बंदी घातली असली तरी शहरातील सर्व शाळा, महाविद्यालयांतून शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांचेही मोबाईल खणखणत असल्याचे चित्र असून यामुळे संबंधित आदेशाची सर्रास पायमल्ली होत असल्याचे दिसते. सध्या बारावीची परीक्षा सुरू असून शाळेच्या परिसरात पोलिसांचा बंदोबस्त असतानाही मोबाईल वापर सर्रास केला जात आहे. त्यावर त्वरित बंदी घालावी, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे.

रतनलाल तांबी यांची शहरातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी चर्चा
नागपूर, १मार्च / प्रतिनिधी

नागपूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक रतनलाल तांबी यांनी शहरातील राजकीय स्थितीवर अध्यक्ष जयप्रकाश गुप्ता व अन्य पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. पक्षाध्यक्ष सोनिया गांधी आणि काँग्रेस समिती देईल त्या उमेदवारास विजयी करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही जयप्रकाश गुप्ता यांनी दिली. कार्यकर्त्यांना सन्मान मिळाल्यास ते उत्साहाने काम करतात, यामुळे असा सन्मान मिळणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. यावेळी विजय जिचकार, सुभाष खोडे, मारोतराव कुंभलकर, डॉ. राजू देवघरे, डॉ. सूर्यकांत भगत, राजेश कडू, डॉ. मीनाक्षी ठाकरे, नरेश गावंडे, कमलेश समर्थ, डॉ. गजराज हटेवार, तफेल अशर, उमेश शाहू, जयप्रकाश पारेख, संजय दुबे, अतुल कोटेचा, जनक कांबळे, देवा उसरे आदी उपस्थित होते. संचालन बंडोपंत टेंभुर्णे यांनी केले. आभार उमाकांत अग्निहोत्री यांनी मानले.

प्रतिभा संशोधन अकादमीतर्फे विलासराव देशमुखांचा सत्कार
नागपूर, १ मार्च / प्रतिनिधी

माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा महात्मा फुले भारतीय प्रतिभा संशोधन अकादमीतर्फे नुकताच नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी महात्मा फुले प्रतिभा संशोधन अकादमीचे राष्ट्रीय सचिव डॉ. चंद्रभान भोयर यांनी शाल, श्रीफळ देऊन तसेच अ‍ॅड. मदन खंरा यांनी स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा गौरव केला. अकादमीचे उपाध्यक्ष डॉ. गणेश खंडेलवाल, कोषाध्यक्ष अ‍ॅड. अमोघ भोयर, सहसचिव प्रदीप पवार, गजानन लांबे आणि सदस्य ज्ञानेश काळे आदी उपस्थित होते. विद्यमान परिस्थितीत महात्मा फुले यांचे विचार समाजासाठी प्रेरक आहेत. तसेच अकादमीच्या वतीने फुले यांचे विचार पुढे नेण्याचा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे देशमुख म्हणाले. सत्काराच्यावेळी माजी आमदार देवराव रडके व कार्यकारिणी सदस्य उपस्थित होते.

पालिका कर्मचारी बँकेच्या निवडणुकीत ८७ टक्के मतदान
नागपूर, १ मार्च/ प्रतिनिधी

महानगर पालिका कर्मचारी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत आज ८७ टक्के मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला. उद्या नंदनवन येथील जवाहर वसतिगृहात मतमोजणी होणार आहे. गेल्या १५ दिवसांपासून महापालिकेत या निवडणुकीची जोरदार चर्चा आणि प्रचार सुरू आहे. दरवेळी अतिशय चुरशीच्या होणाऱ्या या निवडणुकीकडे सर्व पालिका कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले होते. एकूण २० संचालकांच्या पदासाठी आज सकाळपासून मतदानाला सुरुवात झाली. शहरात चार केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली होती. यात गणेशनगर कन्या विद्यालय, गायत्री कॉन्व्हेंट, बाळासाहेब पुंजे विद्यालय रेशीमबाग आणि शिवाजी हायस्कूल येथील केंद्राचा समावेश होता. किरकोळ वादावादीचा अपवाद सोडला तर मतदान शांततेत पार पडले. एकूण पाच पॅनलचे १०० उमेदवार रिंगणात होते. महापालिकेतील राजकीय नेत्यांचा निवडणुकीतील हस्तक्षेप टाळण्यासाठी कामगार नेत्यांनी एकत्रितरित्या ही निवडणूक लढविली हे या निवडणुकीचे वैशिष्टय़ मानावे लागेल. माजी महापौर अटलबहाद्दूर सिंग आणि शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शेखर सावरबांधे यांचे संयुक्त पॅनलही रिंगणात आहे.

चंद्रभान भोयर आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
नागपूर, १ मार्च / प्रतिनिधी

वाडीतील व्हीएसपीएम उच्च शिक्षण अकादमीतर्फे संचालित जवाहरलाल नेहरू कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील वाणिज्य विभाग प्रमुख चंद्रभान भोयर यांना राज्यस्तरीय शिक्षक मेळाव्यात आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र टिचर्स कौन्सिलच्या विद्यमाने चंद्रकांत गोहने पाटील यांच्या हस्ते त्यांना गौरवण्यात आले. प्रारंभी खंड विकास अधिकारी या पदावर ते काम करीत होते. सध्या वनराई, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नाटय़ परिषद, प्रगतिशील लेखक संघ इत्यादी साहित्यिक, सामाजिक संस्थेवर ते पदाधिकारी असून महात्मा फुले भारतीय प्रतिभा संशोधन अकादमीचे ते सरचिटणीस म्हणून गेल्या ३० वर्षांपासून काम करीत आहेत.

हितेन एक्स-रे व सोनोग्राफी केंद्राचे उद्घाटन
नागपूर, १ मार्च / प्रतिनिधी

क्ष-किरण तज्ज्ञ डॉ. जितेंद्र विधानी यांच्या टेलिफोन एक्सचेंज चौकाजवळील राजश्री पॅलेस येथील हितेन एक्स-रे अ‍ॅण्ड एक्स-रे सोनोग्राफी सेंटरचे उद्घाटन त्यांच्या आईवडिलांच्या हस्ते नुकतेच झाले.
याप्रसंगी डॉ. प्रफुल मोकदम, डॉ. सुरेश चांडक, डॉ. हरीश चांडक, डॉ. मधुसूदन सारडा, डॉ. मकुंद बाहेती, डॉ. विंकी रुघवानी यांच्यासह वेद आर्य, सुरेश भोजवानी, प्रताप मोटवानी, राजेश छाबरानी, प्रदीप पंजवानी प्रामुख्याने उपस्थित होते. डॉ. विधानी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एम.बी.बी.एस. झाले असून अमरावती आणि मुंबई येथे त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. मुंबईतील जे.जे. रुग्णालयात त्यांनी काम केले. गेल्या दहा वर्षांपासून ते या क्षेत्रात आहेत.

मांगरूळ येथे शेतकऱ्याच्या घराला आग, लाखाचे नुकसान
उमरेड, १ मार्च/ वार्ताहर

जवळच्या मांगरूळ येथील शेतकरी दिनकर मालके यांच्या घराला शनिवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास आग लागून एक लाख रुपयाचे साहित्य जळून खाक झाले. दिनकर मालके सकाळीच शेतात कामासाठी गेले. शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी. उमरेड पालिकेच्या अग्निशामक दलाची गाडी तातडीने घटनास्थळी पोहोचली आणि आग विझवण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला. तहसीलदारांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.

नक्षलवाद्यांच्या स्फोटामुळे रेल्वे वाहतूक विस्कळीत
नागपूर, १ मार्च/ प्रतिनिधी

ओरिसामधील सुंदरगड जिल्ह्य़ातील भालूलता रेल्वे स्थानकाच्या इमारतीत काल नक्षलवाद्यांनी स्फोट घडवल्याने आज हावडा-अहमदाबाद एक्सप्रेस नागपूरला येऊ शकली नाही. या हल्ल्यामुळे हावडा-मुंबई गीतांजली एक्सप्रेस सुमारे सहा विलंबाने धावत होती. या घटनेमुळे उद्या, सोमवारला हावडा-मुंबई मार्गावरील गाडय़ा विलंबाने धावणार आहेत. अहमदाबाद- हावडा एक्सप्रेस, नवी दिल्ली-हावडा राजधानी एक्सप्रेस, पुणे- हावडा आझाद हिंद एक्सप्रेस, पोरबंदर- हावडा एक्सप्रेस, लोकमान्य टिळक टर्मिनस-हावडा एक्सप्रेस आदी गाडय़ा उद्या नागपुरात उशिरा पोहचण्याची शक्यता असल्याचे रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

मुख्याध्यापकांची कार्यशाळा
नरखेड, १ मार्च / वार्ताहर

येथील नाडेकर विद्यालयात नवीन शैक्षणिक गुणवत्ता विकास व माहिती तंत्रज्ञानच्या साह्य़ाने शिक्षण या विषयावर मुख्याध्यापकांची कार्यशाळा नुकतीच झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहेबराव राऊत होते. उद्घाटन नरखेड पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी पुरुषोत्तम भड यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी हिरूडकर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एस.यू. कुकडे यांनी केले. आभार सी.जे. तागडे यांनी मानले.

विषारी द्रव्य प्राशन केल्याने मृत्यू
नागपूर, १ मार्च / प्रतिनिधी

एका बारमध्ये काम करणाऱ्या तरुणाचा विषारी द्रव्य प्राशन केल्याने मृत्यू झाला. आनंद टॉकीजजवळील एका बारमध्ये शनिवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. अजय विठ्ठल लामसुंगे (रा. जुना सुभेदार लेआऊट) हे त्याचे नाव आहे. काल रात्री आठ वाजताच्या सुमारास एंड्रीन प्राशन केल्याने त्याला मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना रविवारी सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. मेडिकल बूथवरून ही माहिती समजल्यानंतर धंतोली पोलीस तेथे गेले. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. त्याने विषारी द्रव्य का प्राशन केले याचा तपास धंतोली पोलीस करीत आहेत.