Leading International Marathi News Daily
सोमवार, २ मार्च २००९

सोने-डॉलर विळ्या-भोपळ्याचे नाते
सोने उत्तरोत्तर उंचच उंच भराऱ्या घेऊ लागले आहे. देशोदेशीच्या चलनांचे अवमूल्यन ही तर सोन्याच्या भरारीसाठी सकारात्मक ठरलेली बाब. आता तर अडचणीतल्या बँका व वित्तीय संस्थांना तारण्यासाठी जगभरातील मध्यवर्ती बँका अधिकाधिक नोटांची छपाई करू लागल्या आहेत. सोन्यासारखा मौल्यवान धातू आणि चलनी नोटांमधील हा अंतर्विरोध कसा आहे तो नेमका समजून घेतला पाहिजे..
.. आपण कोणत्याही हॉटेलात काही खाण्यासाठी गेल्यावर सामान्यपणे बिल भरताना चलनी नोटा देऊ करतो. विनिमयाचे साधन म्हणून या नोटांचा हॉटेलवाल्याकडून स्वीकार होईल याची आपल्याला खात्री असते. पण हॉटेलवाल्याने जर तुम्ही सादर केलेली नोट स्वीकारली नाही तर? ‘हॉटेलच्या बिलाच्या बदल्यात ज्याचे मूल्य घसरणार नाही असे अस्सल काही तरी मला हवे,’ या मागणीवर हॉटेलवाला अडूनच बसला आहे, असे समजा. ही अशी कल्पनाच आपल्याला करवत नाही!
हा आपल्यासाठी निश्चितच एक मोठा धक्काच असेल. कोणताही माल खरीदण्यासाठी अथवा सेवा उपभोगण्यासाठी आपण आजवर याच चलनी नोटांचा वापर करीत आलो आहोत आणि हेच आपल्या अंगवळणीही पडले आहे. पण आता म्हणे, पैसा म्हणून ही नोटच कुचकामी ठरली आहे. हा तर खूपच बाका प्रसंग ओढवला म्हणायचा.. आपण भाबडे आजवर समजत आलो होतो की, कागदी नोटा म्हणजे राज्यशकट पाहणाऱ्या ‘सरकार’ची विश्वासार्हता किंवा सरकार शाबूत आहे याचा जणू प्रत्ययच आहे. पण सरकारवरचा विश्वासच उडाला किंवा त्याबद्दलची आत्मीयताच संपली तर कागदी नोटांचे कवतिक ते काय?

 

खरेच, हे असेच घडेल?
सध्या आपण ज्या जागतिक वित्तीय संकटातून जात आहोत त्याचे परिमाण खरोखरच खूपच अभूतपूर्व आहे. त्यातून सहीसलामत बाहेर पडण्याचा मार्ग अद्याप तरी दृष्टीपथात नाही. सध्या ताबडतोबीची प्रतिक्रिया म्हणून जगभरातील मध्यवर्ती बँका रोखीची चणचण राहू नये म्हणून नोटांची छपाई करीत चालल्या आहेत. अर्थव्यवस्थेतील मागणीचा दुष्काळ त्यातून संपेल आणि दिवाळखोर वित्तसंस्थांना उभारी मिळेल, हा त्यामागील हेतू.. अर्थव्यवस्थेला पुन्हा आपल्या पायावर उभे करण्याच्या या धडपडीतही अमेरिकेनेच आघाडी घेतलेली दिसते. तरीही अमेरिकेत कोणतीही गोष्ट सध्या मार्गी लागताना दिसत नाही. घरांच्या किमतींनी तळ गाठला आहे; लाखोंच्या संख्येने लोकांनी रोजगार गमावला आहे; थकित व बुडीत कर्जाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे; महसुली तूट वाढते आहे; गुंतवणुकीचे मूल्य शून्यवत झाले आहे आणि सर्वात मुख्य म्हणजे ‘डिफ्लेशन’चे (चलनघटीचे) संकट आ वासून उभे राहिले आहे.
त्या उलट तथाकथित ‘बेलआऊट पॅकेज’च्या नावावर अमेरिकेची मध्यवर्ती बँक असलेली फेडरल रिझव्‍‌र्ह आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकून जगभरातील अन्य मध्यवर्ती बँका रोख तरलता सांभाळण्यासाठी नोटांचा पाऊस यापुढेही पाडत राहतील. पण केवळ ‘सरकारची विश्वासार्हता (नव्हे अब्रू) सांभाळण्यासाठी’ अशी डॉलरची छपाई करणे बरोबर म्हणता येईल? कागदी नोटांची वारेमाप छपाई करण्याला तांत्रिकदृष्टय़ा काही धरबंद येण्याची शक्यताच नाही. त्यामुळे नोटांचा हा पाऊस अमर्याद सुरूच राहील, (सरकारला लोकांचा भरवसा मिळविण्यासाठी ते आवश्यकच आहे!) पण प्रत्यक्षात अर्थव्यवस्थेत तितके मूल्य आहे काय, हाच कळीचा प्रश्न आहे.
या सर्वाची परिणती अर्थतज्ज्ञ म्हणतात त्याप्रमाणे ‘डिबेसमेंट ऑफ करन्सी’ अर्थात चलनात असणाऱ्या कागदी नोटांचा अमर्याद (किंबहुना अतिरेकी!) पुरवठा अशा भयंकर स्थितीत होईल. नोटा म्हणजे कितीही प्रमाणात आणि वाटेल तेव्हा तयार केल्या जाणाऱ्या केवळ एक छापील कागद बनून राहतील. नोटांची छपाई हा मध्यवर्ती बँकांच्या (आपल्याकडील भारतीय रिझव्‍‌र्ह बँक) अखत्यारीतील बाब आहे आणि नोटांची अतिरेकी छपाई करण्याची रिझव्‍‌र्ह बँकेची कृती ही चलनी नोटांबद्दलची विश्वासार्हता गमावणाराच परिणाम साधेल. या ‘करन्सी डिबेसमेंट’ अर्थात चलनी नोटांनी आपला बुड गमावण्याच्या या स्थितीचे झिम्बाब्वे हे उमदे उदाहरण ठरेल. झिम्बाब्वेची आज अशी अवस्था आहे की, किराणा दुकानात रोजच्या गरजेच्या वस्तू खरेदीसाठी जावयाचे म्हटले तरी पोत्यांनी भरून नोटा न्याव्या लागतात. अमेरिकी डॉलरच्या एक अब्जावा भाग होईल इतके तेथील चलनम्हणजे झिम्बाब्वे डॉलरचे अवमूल्यन झाले आहे.
ही सारी पूर्वपिठिका चलनाला पर्याय म्हणून गणले जाणाऱ्या ‘सोने’ या मौल्यवान धातूला असलेल्या अक्षय मूल्याचे महत्त्व पटावे यासाठीच अर्थात आहे. एक तर सोन्याचा पुरवठा हा मर्यादित आहे आणि दुसरे म्हणजे
कोणत्याही मध्यवर्ती बँकेचे त्या पुरवठय़ावर नियंत्रण नाही. शिवाय कागदी नोटांच्या तुलनेत सोन्याचे साठवण मूल्य खूप मोठे आहे. नोटा तिजोरीत साठवून ठेवल्या तर कालानुरूप त्यांचे मूल्य वाढण्याऐवजी घसरत जाते. म्हणजे अर्थव्यवस्थेतील चलनवाढ किंवा साध्या शब्दात महागाईची संकल्पना वापरली तर आज जितक्या जिनसा विशिष्ट नोटांच्या विनिमयात मिळतात, तेच जिन्नस मिळविण्यासाठी १० वर्षांनी आजच्या पेक्षा कितीतरी अधिक नोटा खर्ची घालाव्या लागतील.
अमेरिका आणि ब्रिटनसारख्या प्रगत देशातील मध्यवर्ती बँकामार्फत चलनात असलेल्या नोटांच्या तुलनेत त्या देशातील सुवर्ण साठा यांचे तुलनात्मक प्रमाण अभ्यासल्यास मोठे रंजक निष्कर्ष पुढे येतात. त्या देशांतील सुवर्ण साठय़ाच्या टनातील परिमाणाला मध्यवर्ती बँकांकडून चलनात असलेल्या नोटांनी (अब्ज परिमाणातील) विभागण्यात आले. त्यातून पुढे आलेले निष्कर्ष हे अर्थातच आश्चर्यकारक नव्हते. या देशांमधील सुवर्ण साठा हा त्या देशांच्या मध्यवर्ती बँकांच्या चलनात असलेल्या पैशांच्या गुणोत्तरात उत्तरोत्तर विलक्षण घसरत गेल्याचे आढळून आले आहे.
उदाहरणार्थ, अमेरिकेकडे १९७३ साली असलेला सुवर्णसाठा ८,५८४ टनांमध्ये होता आणि चलनात ६१ अब्ज डॉलर होते. म्हणजे सुवर्णसाठय़ाला चलनात असलेल्या डॉलरने विभागल्यास १४१.२ असे गुणोत्तर पुढे येते. म्हणजेच १९७३ साली प्रत्येक एक अब्ज डॉलरमागे १४१.२ टन सोने अमेरिकेत उपलब्ध होते. त्या उलट २००७ साली अमेरिकेचा सुवर्णसाठा ८,१३३ टन होता आणि चलनात असलेल्या डॉलरचे प्रमाण ७५९ अब्ज इतके होते. त्यामुळे सोने उपलब्धतेचे हेच गुणोत्तर २००७ साली १०.७ टन प्रति अब्ज डॉलर असे घसरलेले दिसले.
जर अमेरिकेला १९७३ सालचे सोने उपलब्धतेचे १४१ टन प्रति अब्ज डॉलरचे गुणोत्तर पुन्हा मिळवायचे झाल्यास, त्या देशाचा सुवर्णसाठा २००७ सालच्या ८,१३३ टनांऐवजी १०७,१५३ टनांपर्यंत भरमसाट वाढायला हवा होता. म्हणजे आजच्या तुलनेत तब्बल १३ पटींनी अधिक सुवर्णसाठा अमेरिकेकडे असायला हवा.
एकुणात, देशाकडे उपलब्ध सुवर्णसाठा मर्यादित राहिला आहे, तर त्या उलट मध्यवर्ती बँका अधिकाधिक नोटा चलनात आणीत आहेत. सोने हे भारतीय परंपरेत तर प्रतिष्ठा, इभ्रतीचे साधन गणले जाते. त्या प्रतिष्ठेचे मूल्य उत्तरोत्तर कमालीचे घसरत चालले आहे. त्या उलट अमेरिकेत सध्याचे आर्थिक अरिष्टाच्या पाश्र्वभूमीवर, ‘भरोसा’ सांभाळण्याचा सरकारच्या सुरू असलेल्या प्रयत्नात भरमसाट पॅकेजची खैरात, अर्थात डॉलरची उधळण सुरू आहे. आजच्या पुरता तोच एक उपाय देशोदेशींच्या सरकारपुढे असल्याचे दिसून येते. यातून परिणाम मात्र उलटाच घडत आहे. चलनी नोटा बूड गमावत चालल्या आहेत आणि पर्यायाने त्याच्याशी निगडित सरकारच्या प्रतिष्ठेचाही ऱ्हास होतो आहे. जेव्हा जेव्हा पैसा असा मातीमोल बनतो तेव्हा लोकांकडे पैसा आहे पण क्रयशक्तीच नाही अशी विचित्र स्थिती निर्माण होते. नेमक्या अशाच दोलायमान स्थितीत सोन्याची लकाकी लोकांचे डोळे दिपवून टाकते. सोन्याचे मोल हे अशावेळी लोकांना कळू लागते.
सोन्याचे अमेरिकी डॉलरशी असलेले असे विळ्या-भोपळ्याचे नाते इतिहासात अनेकवार सिद्ध झाले आहे. दीर्घ मुदतीत संपत्तीचा संवर्धक आणि पर्यायाने प्रतिष्ठेचा रक्षक म्हणून सोन्यानेच भूमिका निभावली हे पश्चिमेतील गोऱ्यांनाही पुरते पटले आहे. आज उभ्या राहिलेल्या खडतर प्रसंगी, देव करो आणि अमेरिकेच्या सरकारला डॉलरप्रमाणे सोन्याची छपाई करण्याचेही कोणते तंत्र सापडू नये म्हणजे मिळविले..
देवेंद्र नेवगी
devendra@quantumamc.com
(प्रस्तुत लेखक हे क्वांटम अ‍ॅसेट मॅनेजमेंट कं. प्रा. लि. या कंपनीचे सीईओ आणि मुख्य गुंतवणूक अधिकारी आहेत.)
सोने खरेदी का करावे?
तरुणांचे असे मत आहे, की सोने का घ्यावे? कारण सोन्यातील गुंतवणूक अडकून पडते. त्यापेक्षा आम्ही मोबाईल, लॅपटॉप, कार वगैरे गोष्टी घेतल्यातर त्याचा आम्हाला खूपच उपयोग होतो. माझ्या मते त्यांचे म्हणणे ६५ टक्के बरोबरही आहे. पण अडकून पडलेली गुंतवणूक म्हणून सोन्याची खरेदी फारच कमी प्रमाणात झाली तर पुढे संसारात काही अडचण आल्यास हातात काही राहात नाही.
पूर्वीच्या लोकांचे असे म्हणणे होते, की आपल्या कमाईतील काही भाग हा भविष्यासाठी आई-वडिलांसाठी, मुलांसाठी, दानासाठी, त्याचप्रमाणे काही भाग हा सोन्याचे दागिने करण्यासाठी वापरावयाचा त्यात सोने व जमीन याच गोष्टींचे पैसे आपणाला भरभरून मिळतात; पण जमीन एक-एक फूट करून घेता येत नाही. सोने मात्र आपल्या सोयीने एक-एक ग्रॅम करून घेता येते. आज सोने विकत घेतले व वर्ष-सहा महिन्याने नको म्हटले तर कमीतकमी खरेदीच्या ८० टक्के तरी परत मिळतातच मिळतात, पण जागा सोडून इतर गोष्टीत ३० ते ४० टक्केसुद्धा परत मिळत नाहीत. म्हणजेच सोन्यातली गुंतवणूक त्यादृष्टीने लाभदायक ठरते. कधीही कोणत्याही वेळी गरज पडल्यास सोने विकून पैसे उभे करता येतात. हा सोने खरेदीचा एक मोठा उपयोग. अनेकदा सर्वसामान्य लोक
‘गोल्ड ईटीएफ’ना लकाकी!
सोन्यातील गुंतवणुकीचे मोल हे कालानुरूप वेळोवेळी सिद्ध झाले आहे. सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीपेक्षा शुद्धतेचे प्रमाण देणाऱ्या सोन्याच्या नाण्यांची खरेदी ही गुंतवणूकदृष्टय़ा उपयुक्त ठरेल, हेही लोकांना आता कळू लागले आहे. पण अशा गुंतवणुकीपेक्षाही सोय, सहजता, किफायतशीरता आणि मुख्य म्हणजे सुरक्षितता बहाल करणारी सोन्यातील गुंतवणूक म्हणजे ‘गोल्ड एक्स्चेंज ट्रेडेड फंडां’तील गुंतवणूक होय. म्युच्युअल फंडांच्या धर्तीवरील ही एक गुंतवणूक योजना असून, ती राष्ट्रीय शेअर बाजारावर (एनएसई) नियमित व्यवहारांसाठी सूचिबद्ध आहे. या योजनेचे एक युनिट म्हणजे अर्धा ग्रॅम सोन्याचे दर्शनी मूल्य असते. स्वत:पाशी सोने बाळगण्याची जोखीम न स्वीकारता भरारी घेत असलेल्या सोन्याच्या भावाचा फायदा मिळवून देणारी योजना अर्थातच गुंतवणूकदारांमध्ये खूपच लोकप्रिय बनली आहे. म्हणूनच गुंतवणुकीच्या दृष्टीने अत्यंत वाईट गेलेल्या फेब्रुवारी २००८ नंतरच्या कालावधीत एनएसईवरील QGOLDHALF या गोल्ड ईटीएफ योजनेतील गुंतवणूक पाच पटींनी वाढली आहे.
यासाठीच सोने खरेदी करतात.
सोने खरेदीमुळे आपले इतर नाहक खर्च आपोआप कमी होतात व आपले संसाराची गंगाजळी भरूभरून वाढतेच. बरे सर्वसामान्यत: आज सोने विकले व मोबाईल घेतला, असे होत नाही. त्यासाठी वेगळे जमवून इतर खर्चाला कात्री लावून त्याची खरेदी होते व आपले सोने शिल्लकच राहते व घरात जसा मोठय़ा माणसांचा आधार असतो तसेच आपणाकडे चांगल्या दर्जाचे सोने, चांदी, दागिने आहेत याची खात्री असल्याने आपला आर्थिक पायाही चांगला व मजबूत असतो व याचा उपयोग नवीन जागा घेण्यासाठी, व्यवसाय उद्योग करावयाचा असल्यास भांडवल म्हणून त्याच क्षणाला उपयोग करून घेता येतो व आणखी मोठी भरारी मारण्यास त्याचा लाभ होतो म्हणूनच सोन्याचे दागिन्यांत गुंतवणूक म्हणजेच पुढे मोठी भरारी घेण्यासाठी करून ठेवलेला खारीचा वाटाच आहे यामध्ये मला जराही संदेह वाटत नाही.
विश्वास वैद्य गाडगीळ सराफ
संपर्क- ९८२१९१६८७८