Leading International Marathi News Daily

सोमवार, २ मार्च २००९

भारतीय जनमानसही आज अनेक देशी आणि त्याहीपेक्षा विदेशी नव्या प्रसारमाध्यमांच्या प्रचंड दबावाखाली सापडले आहे की काय, अशी शंका येते. परदेशातील जे अनेक अभ्यासक उत्साहाने आपल्याकडे येतात, त्यांचे संशोधन-विषयदेखील बोलके असतात. मध्यंतरी माझ्याकडे एक युरोपीय विदुषी आल्या होत्या.

 

त्यांनी चांगले मराठी बोलणे शिकून घेतले होते. त्यांचा मूळ विषय राज्यशास्त्र. आपल्या शासनाची खास शिष्यवृत्ती मिळवून त्या ‘मराठी संतचळवळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे आंदोलन’ यांचे अनुबंध तपासत होत्या. त्यांनी मला खोदून खोदून काही प्रश्न विचारले - एकनाथांच्या पत्नीबद्दल काय काय माहिती मिळते? तुकाराम महाराजांना मुलेबाळे केव्हा झाली? त्यांनी पुढे काय केले? रामदास बोहल्यावरून पळाले, पुढे त्यांच्या वाग्दत्त वधूचे काय झाले? चोखोबांना आजचे दलित बांधव का मानत नाहीत?.. अशा साऱ्या प्रश्नांच्या निमित्ताने त्यांचा सत्यशोधनाचा मुळातील हेतूच मला गंभीरपणे शंकास्पद वाटला. असेच एक परदेशी तरुण अभ्यासक प्रचंड अर्थबळ आपल्या शासनाकडून घेऊन येथे आले. त्यांनी उत्तरेकडील एका प्राध्यापकास, ज्याला मराठी अजिबात येत नाही, बरोबर घेतले. असे ‘विशेष सहकार्य’ इतरीही काही व्यक्तींकडून मिळवून तो संत नामदेव गाथेचा अभ्यास करीत राहिला. संगणकाच्या आधारे त्याने गाथाच कशी अलीकडील आहे हे प्रमाणित केले. संत नामदेव हे पंजाबात गेलेच नाहीत, हे कसे सिद्ध करता येईल, यासाठी त्याचा बराच आटापिटा दिसतो. त्याला मोठय़ा हौसेने सहकार्य देणारे एक मराठी पंडित मला आग्रहपूर्वक म्हणाले, ‘‘संत नामदेवांच्या पंजाबातील प्रभावखुणांविषयी तुमच्यापाशी जी सामग्री आहे, ती तुम्ही या परदेशी अभ्यासकांस द्यावी. त्यांच्याकडे अनेक आधुनिक सुविधा-साधने असतात. ते पद्धतशीर संशोधन करून सत्य समोर मांडतील.’’ मला त्यांचा हा विश्वास वृथा वाटला. अशा अनुभवांतून दुर्दैवाने दोन तथ्ये पुढे येतात. एक, सत्यशोधन फक्त परदेशी अभ्यासकच करू शकतात आणि आम्हाला सत्यशोधनाच्या तंत्राची वा मंत्राची गंधवार्ताही नाही, असा करंटा विचार करणारे बरेच आहेत. देशातील मंडळींपेक्षा परदेशी मंडळींना आमच्या सांस्कृतिक परंपरांविषयी अधिक आस्था आहे, हे गृहीत धरले जाते. दुसरी गोष्ट त्याहून अधिक क्लेशकारक. तथाकथित राजकीय स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही परकीयांसमोर लाळघोटेपणा करण्याच्या आपल्या वृत्तीत बदल झालेला नाही. परस्वाधीनपणातच स्वाधीनतेचा आत्मा आहे, असे आमच्यापैकी काही आजही दुर्दैवाने मानतात.
अशोक कामत

बुध किंवा चंद्रावर जशी विवरे सापडतात, तशी विवरे पृथ्वीवरही सापडतात का? पृथ्वीवर अशी प्रसिद्ध विवरे कोठे आहेत?
बुध अथवा चंद्रावर आढळणारी विवरे ही त्यांच्यावरील अशनीपाताने तयार झालेली विवरे आहेत. आपल्या कक्षेतून भरकटलेले लघुग्रह जेव्हा चंद्राच्या अथवा बुधाच्या गुरुत्वाकषर्णाने त्यांच्याकडे ओढले जातात, तेव्हा ते त्यांच्या पृष्ठभागावर जाऊन आदळतात. या आघातातूनच अशी विवरे तयार झाली आहेत. अशा प्रकारच्या घटना पृथ्वीलाही अपरिचित नाहीत. मात्र पृथ्वीवरील दाट वातावरणाच्या थरातून जेव्हा लहान आकाराचे अंतराळात फिरणारे दगड आत शिरू पाहतात, तेव्हा त्यांच्याशी होणाऱ्या हवेच्या घर्षणाने ते प्रज्वलित होतात व आपल्याला आकाशात एक प्रकाशशलाका दिसते, त्यावेळी आपण ‘उल्का पडली’ असे म्हणतो. प्रत्यक्षात वातावरणात जळून जाते ती उल्का व त्याचे उरलेसुरले अवशेष म्हणजे ‘अशनी’. पृथ्वीवर विवर तयार करण्यासाठी पडणाऱ्या अशनीचा आकार व वस्तुमान अतिशय जास्त असायला हवे. अशा प्रचंड वस्तुमानाला एखाद्या मोठय़ा आकाराचा लघुग्रहच कारणीभूत असू शकतो व या प्रकारच्या घटना अत्यंत तुरळक मानल्या जातात. या घटना तुरळक असल्या तरी असंभव मात्र नाहीत. पृथ्वीच्या लक्षावधी वर्षांच्या इतिहासात अशा घटना अनेकदा घडलेल्या आढळतात. अमेरिकेतील सुप्रसिद्ध बॅरिंजर विवर, ऑस्ट्रेलियातील हॅनबरी विवर, कॅनडातील क्युबेक तर महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्हय़ातील लोणार विवर, ही या प्रकारच्या अशनी आघात विवरांची काही उदाहरणे आहेत. मेक्सिकोतील युकॅटन या ठिकाणचे चिक्सलुब हे विवर तर डायनासोरच्या नाशाला कारणीभूत ठरलेल्या अशनीचे विवर मानण्यात येते.
महेश नाईक
मराठी विज्ञान परिषद, विज्ञान भवन, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी (पूर्व), मुंबई ४०००२२
दूरध्वनी - (०२२)२४०५४७१४ , २४०५७२६८

खगोल शास्त्रज्ञ आणि डॉक्टर म्हणून नावलौकिक मिळविणाऱ्या जर्मनीच्या ओल्बर्स व्हिल्हेल्म यांचा जन्म ११ ऑक्टोबर १७५८ रोजी झाला. शालेय वयातच त्यांना खगोलशास्त्रज्ञ विशेषत: धुमकेतूच्या अभ्यासाची गोडी लागली. वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करुन त्यांनी डॉक्टरकीचा व्यवसाय पत्करला व फावल्या वेळात ते आकाश निरीक्षण करीत. डोळ्यांचे डॉक्टर म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला. दवाखान्याच्या दुसऱ्या मजल्यावर त्यांनी वेधशाळा थाटली होती. धूमकेतूची कक्षा सोप्या पद्धतीने शोधून काढल्याने एक खगोलशास्त्रज्ञ म्हणून त्यांचे नाव झाले. त्यांनी अनेक लघुग्रहांचा शोध लावला. तसेच मंगळ व गुरुच्या दरम्यान मधले सर्व लघुग्रह हे एका मोठय़ा ग्रहाच्या स्फोटाचे तुकडे असावेत असे त्यांनी मत मांडले. आकाश गंगेत सूर्याइतके तेजस्वी तारे असू शकतील, असे मत त्यांनी मांडले तर मग रात्रीचे आकाश काळे का दिसते याचे स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, ‘अवकाश पूर्णपणे पारदर्शक नसून आकाशातील द्रव्याने ताऱ्यांचा प्रकाश शोधला जातो. यामुळे तारे मंद होऊन आकाश काळ्या ठिपक्यांप्रमाणे दिसते.’ याला ‘ओल्बर्सचा विरोधाभास’ असे म्हणतात. धूमकेतूचे शेपूट हे त्याच्या शीर्षांतून निघणारे सूक्ष्म कण सूर्याच्या येणाऱ्या ऊर्जेमुळे दूर लोटून बनते. तसेच उल्का प्रवाहाची एक फेरी पूर्ण करण्यास ३३ वर्षे लागतात. हे त्यांनीच पहिले सांगितले. त्यांच्याकडे असणाऱ्या खगोलशास्त्रीय पुस्तकांचा संग्रह हा युरोपातील एक सवरेत्कृष्ट संग्रह ओळखला जातो. खगोलशास्त्राचा इतिहास या संस्थेचे ते सदस्य होते. उदयोमुन्ख खगोलशास्त्रज्ञांना ते मार्गदर्शन करत. २ मार्च १८७० रोजी ब्रेमेन येथे त्यांचे निधन झाले.
संजय शा. वझरेकर

द्राक्षाचा हंगाम सुरू झाला तसा राजाभाऊंचा फोन आला, ‘‘मुलांनो, द्राक्षे तोडायला आणि खायला या रविवारी सासवडला. इथून द्राक्षाच्या मळय़ावर पूर्ण दिवस जायचंय. सोमवारी परत पुण्याला जा.’’ सगळेच खूश झाले. एसटीमध्ये बसून तिन्ही मुले निघाली. स्टेशनवर न्यायला आत्या येणार होती. जीपमधून लीलाआत्या-राजाभाऊंबरोबर गप्पा मारत, दंगा करीत, गाणी गात सगळी द्राक्षाच्या मळय़ात पोहोचली. मळ्यात नाना तऱ्हांची द्राक्षं होती. गुलाबाच्या फुलांचा वास येणारी द्राक्षे होती. घोस लगडले होते, कुठले तोडायचे अन् कुठले तोडायचे नाहीत याचेही शास्त्र होते. रसाळ, रसरशीत टपोरी द्राक्षे पाहून सगळय़ांच्या तोंडाला पाणी सुटले होते. मालकांची ओळख करून दिली. सारखे विनोद करून मनसोक्त हसणारे जयदेव हिंगे कुमार, लता आणि आनंदचे चांगले दोस्तच झाले. कुमारने पाण्याची बाटली आणि तोंडात टाकायला भाजलेले शेंगदाणे घेतले होते. मधून मधून तो ते स्वत:च्या तोंडात टाकत होता. इतरांनाही द्यावेत असे काही त्याला वाटले नाही. द्राक्षे गोळा करण्याच्या टोपल्या प्रत्येकाने उत्साहाने घेतल्या होत्या. मुकादम मुलांना कुठला घड तोडायचा ते सांगत होता. कडक ऊन वाढत होते. लताला उन्हाची सवय नव्हती. तिला चक्कर आल्यासारखे झाले. आनंदच्या ते लक्षात आले. टोपली ठेवून तो धावत आला. त्याने लताला पाणी दिले. लीलाआत्या, राजाभाऊ हिंगे काकांशी गप्पा मारत एका झाडाखाली बसले होते. आनंद लताला घेऊन त्यांच्यापाशी सावलीला आला. तेवढय़ात लीलाआत्याची नजर कुमारकडे गेली. तो तोडलेली द्राक्षे तोंडात टाकत होता. लीलाआत्या जरा मोठय़ाने म्हणाली, ‘‘विषारी औषध मारतात त्यावर, धुतल्याशिवाय खाऊनकोस रे कुमार.’’ जयदेव हिंगेंकडे जेवणाचा छान बेत होता. शेतावरच्या घरी सगळे पोचले. कुमारने विचार केला, जेवायला वेळ आहे तोपर्यंत द्राक्षे खाऊया. एक एक द्राक्ष तोंडात टाकल्यावर गोड रसाने तोंड भरून जात होते. थोडय़ावेळाने जेवणाची तयारी झाल्याची हाक आली तसा कुमार दचकला. बहुतेक बरीचशी द्राक्षे एव्हाना त्याने खाल्ली होती. त्याला बोलवायला आलेल्या लता, आनंदनी द्राक्षांचा फडशा पडलेला पाहिला. ‘तू पक्का स्वार्थी आहेस’, आनंद चिडून म्हणाला. लता म्हणाली, ‘‘सगळय़ांनी द्राक्षं तोडली. आमचा वाटा तरी शिल्लक ठेवायचास.’’ तेवढय़ात मुलं का आली नाहीत जेवायला ते पाहायला आत्या येत होती. ती म्हणाली, ‘‘नका रे बोलू त्याला. होतं असं कधीकधी.’’ कुमारच्या तोंडातली द्राक्षांची चव केव्हाच नाहीशी झाली होती.
तुमच्या हातून चूक होते तेव्हा तुम्ही स्वत:ला दोष देता, इतरांना दोष देता, लपवायला पाहता, दुर्लक्ष करता का, विसरून जाता? त्याऐवजी चूक कबूल करा. स्वत:च्या चुकांची जबाबदारी घेणं हा शिकण्याचा चांगला मार्ग आहे.
आजचा संकल्प- मी चुका स्वीकारायला, कबूल करायला सुरुवात करेन.
ज्ञानदा नाईक
dnyanadanaik@hotmail.com