Leading International Marathi News Daily

सोमवार, २ मार्च २००९

लाज सोडली..
मुकुंद संगोराम

निवडणुका आता दाराशी येऊन ठेपल्या आहेत. प्रतेयक राजकीय कार्यकर्त्यांपासून ते नेत्यांपर्यंत सगळ्यांची मोर्चेबांधणी आता सुरू झाली आहे. आता देशातले, राज्यातले मोठमोठे नेते येणार, त्यांच्या सभा होणार आणि त्या सभांच्या गर्दीवरून त्या त्या पक्षाच्या उमेदवाराची प्रतिष्ठा ठरणार. ही गर्दी जमवण्याचे हमखास उपाय थकले तर आपली पत जाणार या भीतीने पुणे महापालिकेतील सगळ्या पक्षांच्या नगरसेवकांची धाबी दणाणलेली दिसतात.

भ्रष्टाचाराने पोखरले विद्यापीठ
प्रति,
डॉ. नरेंद्र जाधव, माननीय कुलगुरू, पुणे विद्यापीठ..
स. न. वि. वि.

‘‘विद्यापीठे म्हणजे केवळ हस्तिदंती मनोऱ्यामधील अत्युच्च दर्जाचे संशोधन नाही. संपूर्ण समाजाचे ते श्रद्धास्थान.. पुणे विद्यापीठ म्हणजे ऑक्स्फर्ड ऑफ दी ईस्ट. यापुढील काळात ऑक्स्फर्डला पुणे विद्यापीठ ऑफ दी वेस्ट म्हणून गौरविले जावे..’’ कुलगुरुपद स्वीकारल्यानंतर आपल्या या ध्येयवादी वक्तव्यांमुळे सर्वसामान्य पुणेकरांच्या आशा उंचाविल्या.

बाल हृदयरोगाचे वाढते प्रमाण चिंताजनक - पवार
पिंपरी, १ मार्च / प्रतिनिधी

दिवसेंदिवस वाढणारे ताणतणाव आणि बदलत्या जीवनशैलीमुळे हृदयरोग ही मोठी समस्या बनली असून अलीकडच्या काळात बालहृदयरोगाचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. त्यादृष्टीने काळजी घेण्याबरोबरच आवश्यक उपाययोजना केल्या पाहिजेत, असे मत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी व्यक्त केले. हृदयरोगाचा अनुभव आपणही घेतल्याचे सांगत याबाबत काळजी करण्याचे कारण नाही, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. पिंपरी पालिका आणि रुबी एलकेअर सवर्हसेस यांच्या वतीने चव्हाण रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या कॅथलॅबचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

तेजसला हवीय आणखी मदत
पुणे, १ मार्च/प्रतिनिधी

तेजसच्या हृदयाचे छिद्र बुजविण्यासाठी सहृदय दाते पुढे येत असले तरी आणखी आवश्यकता आहे तुमच्यासारख्या सहृदयी माणसांच्या आर्थिक मदतीची..होय अपेक्षा आहे तुमच्या सहकार्याची आणि पंचावन्न हजार रुपयांची! ससून रुग्णालयामध्ये उपचार घेत असलेला सतरा वर्षीय तेजस सावंत अजूनही झगडतोय जीवन जगण्यासाठी. ‘लोकसत्ता’ मधील तेजसच्या आजाराची व कौटुंबिक परिस्थितीच्या वृत्ताची दखल घेऊन समाजातील काही व्यक्ती व संस्थांनी लगोलग त्याच्या शस्त्रक्रियेसाठी आपापल्यापरीने आर्थिक मदत पाठविली आहे.तेजसच्या हृदयावरील छिद्र बुजविण्यासाठी आतापर्यंत पंचेचाळीस हजार रुपयांची आर्थिक मदत जमा झाली असून अजूनही त्यासाठी पंचावन्न हजार रुपयांची आवश्यकता आहे. या शस्त्रक्रियेसाठी एकूण एक लाख रुपये इतका खर्च येणार आहे.

पुणे शहर व पिंपरी-चिंचवडमध्ये आज वीजकपात
पुणे, १ मार्च/प्रतिनिधी

टाटा पॉवर कंपनीकडून केवळ २२ मेगावॉट अतिरिक्त वीज उपलब्ध होणार असल्याने पुणे व िपपरी-चिंचवड शहरांमध्ये उद्या (सोमवारी) सव्वादोन ते पावणेचार तासांची वीजकपात होणार असल्याचे ‘महावितरण’कडून कळविण्यात आले आहे. ‘अ’ गटातील शिवाजीनगर, कोथरूड, पद्मावती व बंडगार्डन या विभागांमध्ये सव्वादोन तास, ‘ब’ गटातील पर्वती, रास्तापेठ, नगररस्ता व भोसरी या विभागांमध्ये तीन तास, तर ‘क’ गटातील िपपरी विभागात पावणेचार तासांची वीजकपात होणार आहे.

विवाहबाह्य़ संबंधास नकार देणाऱ्या महिलेचा खून
हडपसर, १ मार्च/वार्ताहर

विवाहबाह्य़ संबंध ठेवण्यास नकार देत असल्याच्या कारणावरून हडपसर येथील गोसावी वस्ती भागात आज दुपारी भरवस्तीत एका महिलेचा चाकूने वार करून खून करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी संबंधित आरोपीला अटक केली आहे. विद्या पूतभवाती यादव ऊर्फ परदेशी (वय ३५) असे खून झालेल्या महिलेचा नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी अनिलकुमार रामखिलावन मिश्रा (वय ३९, रा. गोसावी वस्ती, हडपसर) याला अटक केली आहे. या प्रकरणी देण्यात आलेल्या फिर्यादीनुसार अनिलकुमार हा परदेशी यांच्या घराजवळच राहतो. त्याचा विवाह झाला असून, त्याची पत्नी मध्य प्रदेशातील त्याच्या मूळ गावी राहते. तो पुण्यात एका बांधकाम व्यावसायिकाकडे रखवालदार म्हणून काम करतो. परदेशी यांना दोन मुलगे व दोन मुली आहेत. अनिलकुमार हा मागील एक वर्षांपासून या महिलेकडे विवाहबाह्य़ संबंध ठेवण्याची मागणी करीत होता. त्यासाठी तो त्यांना सतत त्रासही देत होता. सतत होणाऱ्या त्रासामुळे परदेशी या आज दुपारी अनिलकुमार याला त्याचा जाब विचारण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी चिडून जाऊन अनिलकुमार याने जवळील चाकूने परदेशी यांच्या पोटावर व गळ्यावर वार केले. या प्रकारानंतर परदेशी यांचा जागीच मृत्यू झाला. खून केल्यानंतर अनिलकुमार पोलिसांसमोर हजर झाला.

बीएसएनएल कर्मचाऱ्यांची मागण्यांसाठी निदर्शने
पुणे, १ मार्च / प्रतिनिधी

वेतन आयोगाबाबतच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बीएसएनएल एम्प्लॉईज युनियनच्या वतीने टेलिफोन भवन येथे निदर्शने करण्यात आली. बीएसएनएल मधील कर्मचाऱ्यांना जानेवारी २००७ पासून वेतनवाढ लागू करण्यात आली आहे. मात्र, त्याबाबत प्रशासन उदासी आहे. या प्रश्नावर आजपर्यंत प्राथमिक चर्चाही सुरू झालेली नाही. याचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात आले. पे रेव्हिजन करावे, निवृत्त कर्मचाऱ्यांना ५० टक्के मर्जरचा लाभ मिळावा, नवी प्रमोशन पॉलिसी लागू करावी, अशा मागण्याही या वेळी मांडण्यात आल्या. संघटनेचे जिल्हा सचिव नागेश नलावडे तसेच वृशाली दाभोळकर, शशांक नायर आदींनी या वेळी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.

प्राप्तिकर विभागाचा तक्रार निवारण सप्ताह
पुणे, १ मार्च /प्रतिनिधी

प्राप्तिकर विभागाच्या वतीने २ ते ६ मार्च दरम्यान ‘तक्रार निवारण’ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या विभागाची अनेक प्रकरणे प्रलंबित असून ती या सप्ताहात सोडविण्यात येणार आहेत, तसेच ज्या व्यक्तीची कागदपत्रे कमी आहेत, त्यांची माहिती या सप्ताहात देण्यात येणार असून ती कागदपत्रे त्यांनी नंतर टपालाने पाठवावी, असे सांगण्यात येईल.

माजी पोलीस आधिकारी मुहम्मद शरीफ सरखवास यांचे निधन
पुणे, १ मार्च /प्रतिनिधी

माजी पोलीस उपअधीक्षक मुहम्मद शरीफ सरखवास (वय ९२) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे दोन चिरंजीव आहेत. सरखवास यांनी २१ वर्षे लाचलुचपत प्रतिबंधक खात्यामध्ये काम केले होते. त्यांना राष्ट्रपती पदकासह अनेक पारितोषिकांनी सन्मानीत करण्यात आले होते.

भालचंद्र बारटक्के यांचे निधन
पुणे, १ मार्च /प्रतिनिधी

गोखलेनगर रहिवासी संघाचे माजी अध्यक्ष भालचंद्र गणपती बारटक्के (वय ६१) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने नुकतेच निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, एक चिरंजीव व दोन कन्या असा परिवार आहे.