Leading International Marathi News Daily

सोमवार, २ मार्च २००९

राज्य

चंद्रपूर जिल्ह्य़ात चार वर्षांत १५ वाघांचा मृत्यू
चंद्रपूर, १ मार्च/ प्रतिनिधी

वाघ व बिबटय़ांच्या हल्ल्यात साडेतीन वर्षांत ४५ लोकांचे बळी गेल्याने लोकप्रतिनिधींनी वाघांना गोळय़ा घालून ठार मारण्याची भाषा सुरू केली असतानाच जिल्हय़ात गेल्या चार वर्षांत पंधरा वाघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती एका वन्यजीव संस्थेने केलेल्या पाहणीत उघड झाली आहे. विशेष म्हणजे मृत्युमुखी पडलेल्या पंधरा पैकी बारा वाघ ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील आहेत. वाघांच्या मृत्यूच्या आकडेवारीकडे लोकप्रतिनिधी आणि वन खात्याचे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे.

दहशतवादाविषयी महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीत चर्चासत्र
नाशिक, १ मार्च / प्रतिनिधी

आंतरराष्ट्रीय दहशतवाद व पोलिसांसमोरील आव्हान, कायदा व सुव्यवस्था, गुन्हेगारी प्रतिबंध व गुन्हे तपास करण्यासाठी पोलिसांचे सक्षमीकरण या विषयावर येथील महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीत आयोजित चर्चासत्रात मान्यवरांनी मार्गदर्शन केले. चर्चासत्रास न्युयॉर्क विश्व विद्यालयाचे डॉ. डेव्हिड बेली, राजकीय व्यवहार विश्लेषक बेथ ब्राऊन्सन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रबोधिनीचे संचालक रितेश कुमार यांनी केले. सदर चर्चासत्रामध्ये पोलिसांची कार्यप्रणाली, गुन्हे प्रतिबंधक कार्यवाहीचे तंत्र, दहशतवाद विरुद्ध लढण्यासाठी आवश्यक कार्यपद्धती या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

समाजशास्त्रावरील राष्ट्रीय चर्चासत्रात शोधनिबंधांचे सादरीकरण
नाशिक, १ मार्च / प्रतिनिधी

येथील एस. एम. आर. के. महिला महाविद्यालय आणि मुंबईच्या एम. एस. जी. फाऊंडेशनतर्फे आयोजित समाजशास्त्र विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्रात महाराष्ट्रातील विविध अभ्यासकांनी १९ शोधनिबंध सादर केले. चर्चासत्राचा समारोप नाशिक एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्राचार्य एस. बी. पंडित यांच्या अध्यक्षतेखाली झाला.
विकास व प्रगती या संदर्भात नियमितपणे संभ्रम आढळून येतो. त्यामुळेच प्रगतीच्या नेमक्या वाटा कोणत्या ते तपासून पाहण्यासाठीच चर्चासत्राची आवश्यकता भासते, असे पंडित म्हणाले. त्यांनी सशक्त राष्ट्र संकल्पनेचाही उहापोह केला. बदलत्या काळानुरूप देशाच्या विकासाचा आराखडा जबाबदारीने मांडण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी व्यासपीठावर एस. एन. डी. टी. विद्यापीठाचे दूरशिक्षण केंद्राचे संचालक डॉ. चंद्रकांत पुरी आणि समाजशास्त्र विभागप्रमुख डॉ. विजय मारूळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

मोदींची सभा ठाणे भाजपाला संजीवनी देईल?
दिलीप शिंदे, ठाणे, १ मार्च

लोकसभा- विधानसभेसाठी अतिशय महत्त्व प्राप्त झालेल्या ठाणे जिल्ह्यावर कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी ते मायावतीपर्यंत सर्वच नेत्यांनी लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे कमजोर बनलेल्या भारतीय जनता पार्टीमध्ये महाराष्ट्राचे प्रभारी तथा गुजरातचे मुख्यमंत्री नरेद्र मोदी हे उद्या होणाऱ्या ठाण्यातील जाहिर सभेत कसे नवचैतन्य निर्माण करतात, यावर राजकीय समिकरणे विसंबून आहेत. गुजरात मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची ठाणे जिल्ह्यात पहिल्यांदाच जाहीर सभा होणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. ठाणे, कल्याण, भिवंडी आणि पालघर या चार लोकसभा मतदारसंघाचे मध्यवर्ती ठिकाण म्हणून सभेसाठी ठाण्याची निवड झाली असली तरी राजकीय लाभ हा भाजपाला किती मिळेल, यावर शंका व्यक्त केली जात आहे.

‘वकिलांना कायदेविषयक आधुनिक प्रशिक्षण देणे गरजेचे’
मनमाड, १ मार्च / वार्ताहर

कायदा आणि न्याय याबाबत सामान्य माणसाचा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी वकिलांना सातत्याने कायदेविषयक आधुनिक प्रशिक्षण देणे गरेजेचे आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ए. एम. खानविलकर यांनी येथे व्यक्त केले. मनमाड वकिल संघ व महाराष्ट्र-गोवा वकिल परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वकिलांच्या नाशिक विभागीय परिषदेत खानविलकर बोलत होते. महाराष्ट्र व गोवा वकिल परिषदेचे अध्यक्ष अॅड. राजीव पाटील अध्यक्षस्थानी होते. परिषदेत सुमारे ५०० हून अधिक वकिल सहभागी झाले होते. ट्रायल कोर्ट व तालुका कोर्टाचे विविध प्रश्न व अडचणी, न्ययालयीन कामकाजातील तरतुदी, दिवाणी तसेच फौजदारी प्रक्रियेबाबतच्या अडचणी, याविषयीच्या उपायांवर चर्चा करण्यासाठी या विभागीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

कल्याण डोंबिवली पालिकेचा अर्थसंकल्प,
विकासकामांचे प्रस्ताव सात तासात मंजूर
कल्याण १ मार्च/प्रतिनिधी
कल्याण डोंबिवली पालिकेचा ९५१ कोटी १२ लाखाचा अर्थसंकल्प आज स्थायी समितीच्या विशेष सभेत मंजूर करण्यात आला. त्याचबरोबर परिवहन समिती आणि शिक्षण मंडळाचे अर्थसंकल्प स्थायी समितीत सादर करण्यात आले. गेले तीन महिने पालिकेत स्थायी समिती सदस्य व सभापतीपदावरून वादंग सुरू होता. त्यामुळे स्थायी समिती अस्तित्वात नसल्याने अर्थसंकल्प सादरीकरण व विकासाकामांचे मंजुरीचे काम रखडले होते. कोणत्याही क्षणी आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने आज रविवार असूनही विकास कामांसदर्भातचे १५५ कोटीचे प्रस्ताव व अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. सकाळी ११ वाजता सुरू झालेली बैठक संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सुरू होती.

नाशिकमध्ये आज डॉ. आंबेडकरांच्या अस्थींना अभिवादनासाठी सभा
नाशिक, १ मार्च / प्रतिनिधी

काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहास सोमवारी ७९ वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्ताने येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी जनतेला अभिवादन करण्यासाठी ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती कर्मवीर दादासाहेब गायकवाड जन्मशताब्दी महोत्सव समितीचे संयोजक मधुकर तुपलोंढे यांनी दिली आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या जागेवर उभे राहून सत्याग्रहींना प्रेरणा दिली आणि प्रतिगामी शक्तींना आव्हान केले, त्याच जागेवर अस्थी ठेवण्यात येणार आहेत. मंदिर परिसरात सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान सर्व आंबेडकरी जनतेने, राजकीय पक्षांनी अभिवादन सभेसाठी उपस्थित राहावे, असे आवाहन तुपलोंढे, बाळासाहेब कर्डक, नानासाहेब भालेराव यांनी केले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतरच मच्छीमारांसाठी पॅकेज
सावंतवाडी, १ मार्च/वार्ताहर

कोकणातील मच्छीमारांसाठी मुख्यमंत्र्याच्या चर्चेनंतरच पॅकेजची घोषणा केली जाईल, अशी माहिती मत्स्यविकास मंत्री रवीशेठ पाटील यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिल्याचे आमदार परशुराम उपरकर यांनी सांगितले.मत्स्यविकास प्रश्नी पाटील यांनी मंत्रालयात बैठक बोलावली होती. यावेळी आमदार दिवाकर रावते, आमदार परशुराम उपरकर, देवगड उपसरपंच रंजना उपरकर, अरुण सावंत, अधिकारी वर्ग उपस्थित होते. सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांना पॅकेज देता येईल का, त्याबाबत मुख्यमंत्र्याच्या कानी सर्व बाजू घालूनच त्यावर निर्णय घेतला जाईल, असे पाटील म्हणाले. सिंधुदुर्गातील मच्छीमारांना सानुग्रह अनुदान वाटप झाले नाही. त्याकडे उपरकर यांनी लक्ष वेधून कोकण पट्टीतील मच्छीमारांना अनुदानाचे तातडीने वाटप व्हावे, अशी सूचना केली असता ९०१३ मच्छीमारांना अनुदानाचे वाटप बाकी आहे, ते तातडीने करण्याच्या आदेश त्यांनी दिला. मच्छीमारांना कर्ज वसुलीसाठी १०१ च्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मच्छीमारांची आर्थिक स्थिती बिकट बनली आहे. त्याकडे रावते व उपरकर यांनी लक्ष वेधले असता त्या नोटिसांना स्थगिती देत आहोत असे पाटील यांनी सांगितले.

चिन्मय मिशनचे कार्यक्रम जाहीर
खोपोली, १ मार्च/वार्ताहर
चिन्मय मिशन शाखा-खोपोलीचे निवासी आचार्य तथा प्रवचनकार ब्र. प्रयाग चैतन्यजी यांनी शाखेतर्फे मार्चमध्ये राबविण्यात येणारे आध्यात्मिक कार्यक्रम जाहीर केले आहेत. ३ ते ९ मार्च सकाळी ७ ते ८ चिन्मय जीवन मोगलवाडी येथे ‘ध्यानवर्ग’ ८ मार्च रविवारी सकाळी ६ ते ७.३० ‘गायत्री हवन’. ११ मार्च ते २० मार्च सायंकाळी ६ ते ८ गुरुकृपा हॉल शास्त्रीनगर येथे ‘श्रीमद्भागवत कथा-स्कंद-३ (ज्ञान-यज्ञ)’, १४ मार्च रोजी चतुर्थीनिमित्त चिन्मय जीवन येथे सायंकाळी ६ ते ७.३० अथर्व शीर्ष आवर्तने. रविवार, १५ मार्च सायंकाळी ६ ते ७ गायत्री हवन. मंगळवार, ३१ मार्च-चिन्मय जीवन वर्धापनदिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. सायंकाळी ४.३० ते ६ विष्णू सहस्त्रनाम अर्चना व पादुका पूजन, सायंकाळी ६ ते ७.३० भक्तीसंगीताचा विशेष कार्यक्रम. दर शनिवारी सायंकाळी ६ ते ७ अभ्यासवर्ग. सर्व साधकांना संयोजकांनी हार्दिक निमंत्रण दिले आहे.

पोस्टल इन्शुरन्सबद्दल विश्वासार्हतेचा प्रश्न?
देवरुख, १ मार्च/वार्ताहर

पोस्टल इन्शुरन्सची पॉलिसी पूर्ण होऊन देवरुखजवळील साखरप्यातील महिला कमल जमदाडे यांना पॉलिसीची रक्कम मिळाली नसल्याने, शिवाय या प्रकरणाकडे रत्नागिरी व मुंबई पोस्ट विभागाकडूनही लक्ष दिले जात नसल्याने पोस्टाच्या विश्वासार्हतेचा कालावधी उलटूनही पैसे मिळत नसल्याने जमदाडे संतप्त बनल्या आहेत. कमल जमदाडे यांनी १३ फेब्रुवारी १९९० मध्ये साखरपा पोस्ट ऑफिसमार्फत पोस्टल लाईफ इन्शुरन्स (पीएलआय)ची पॉलिसी उतरवली. ही पॉलिसी ३० नोव्हेंबर ०८ रोजी पूर्ण झाली असून, पॉलिसीची कागदपत्रे पोस्टात जमा करूनही त्यांना अद्याप रक्कम मिळालेली नाही. साखरपा पोस्टात त्यांनी वारंवार खेटा मारल्या असता रत्नागिरी विभागाकडे बोट दाखवले जाते. रत्नागिरी विभागात त्यांनी चौकशी केली असता कोणतेही ठोस उत्तर त्यांना मिळालेले नाही. मुंबई पोस्ट ऑफिसकडे याविषयी जमदाडेंनी तक्रार करण्याचा वारंवार प्रयत्न केला असता मुंबई ऑफिसमध्ये दूरध्वनी उचललाच जात नसल्याने त्यांना धक्का बसला आहे.

विनामूल्य व्हील चेअरसाठी अपंगांना आवाहन
खोपोली, १ मार्च/वार्ताहर
के.एम.सी. महाविद्यालय व अमेरिकेतील फ्री व्हील चेअर मिशन संस्थेच्या संयुक्त विद्यमाने अपंग व्यक्तींसाठी विनामूल्य ‘व्हील चेअर’ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. इच्छुक अपंगांना नावनोंदणीसाठी ५०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. सोबत वैद्यकीय दाखल्याच्या दोन झेरॉक्स प्रती व दोन पासपोर्ट आकाराचे फोटो देणे आहे. के.एम.सी. महाविद्यालयाच्या कार्यालयात शनिवार, ७ मार्चपर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे. नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी इच्छुकांनी महाविद्यालयाशी ०२१९२-२६३३०४/२६६९०४ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य आर. वाय. पाटील यांनी केले आहे.

भोकरमध्ये रस्ता काँक्रिटीकरणासाठी निधी मंजूर
धुळे, १ मार्च / वार्ताहर

तालुक्यातील भोकर गावातंर्गत रस्ता काँक्रिटीकरणासाठी आठ लाख रूपयाचा निधी मंजूर करण्यात आला असून या रस्त्याच्या कामास लवकरच सुरूवात करण्यात येणार आहे. गावातंर्गत रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था झाली होती. त्यामुळे गावात रस्त्यांची कामे करण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी अनेक दिवसांपासून केली होती. त्यानुसार आ. रोहिदास पाटील यांनी भोकर येथे भेट देऊन गावांतर्गत रस्त्यांची पाहणी केली होती. त्या अनुषंगाने पाटील यांनी मंत्रालय पातळीवर प्रयत्न करून रस्त्याच्या कामास मंजुरी मिळवली. या रस्त्याच्या कामास त्वरीत सुरूवात करण्याच्याही सूचना दिल्या आहेत. मंडळाकडून या कामासाठी आठ लाख रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला.