Leading International Marathi News Daily

सोमवार, २ मार्च २००९

क्रीडा

ललित मोदी ‘आऊट’; राजस्थान क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीत पराभव
जयपूर, १ मार्च / वृत्तसंस्था

‘इंडियन प्रीमियर लीग’ चे सर्वेसर्वा म्हणून ओळखले जाणारे ललित मोदी यांना आज राजस्थान क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत व्हावे लागले. भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी संजय दीक्षित यांनी मोदी यांचा १८ विरुद्ध १३ अशा फरकाने पराभव केला. मोदी यांनी आपल्या पराभवाला राजस्थान सरकारला जबाबदार धरले आहे. अशोक गेहलोत सरकारने माझा पराभव व्हावा यासाठी प्रयत्न केले, असा आरोप मोदी यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना केला. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या निकटच्या वर्तुळातले म्हणून मोदी ओळखले जातात. याच कारणामुळे आपल्या पराभवासाठी गेहलोत सरकारने प्रयत्न केल्याचे मोदी म्हणाले.

संगकारा, समरवीराची शतके; श्रीलंका सुस्थितीत उमर गुलचे तीन बळी
लाहोर, १ मार्च / वृत्तसंस्था

कुमार संगकारा आणि थिलन समरवीरा यांनी शतके झळकावत चौथ्या गडय़ासाठी केलेल्या २०४ धावांच्या दमदार भागीदारीच्या जोरावर श्रीलंकेने सुरुवातीला जबर धक्के बसल्यानंतरही पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या व अंतिम कसोटी क्रिकेट सामन्यात पहिल्या दिवसअखेर सुस्थिती गाठण्यात यश मिळवले. फैसल इक्बालकडून संगकारा वैयक्तिक ५५ धावांवर असताना झेल टिपण्यात हाराकिरी झाली नसती तर कदाचित आजच्या दिवसाच्या खेळाचे चित्र वेगळे राहिले असते. महेला जयवर्धनेच्या नेतृत्वाखाली शेवटची कसोटी खेळत असलेल्या श्रीलंकेने दिवसअखेर ४ बाद ३१७ धावांची मजल मारली होती. त्यावेळी १३३ धावांवर नाबाद असलेल्या थिलन समरवीराला तिलकरत्ने दिलशान ३ धावा काढून दुसऱ्या टोकाने साथ देत होता.

सरवानची द्विशतकाच्या दिशेने वाटचाल; वेस्ट इंडिजचे इंग्लंडला चोख प्रत्युत्तर
बार्बाडोस, १ मार्च / वृत्तसंस्था

वेस्ट इंडिज संघाच्याच संयमाची परीक्षा ठरलेला तिसरा दिवस अनुभवी रामनरेश सरवानने धीरोदात्त फलंदाजी करत गाजवला पण, इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीचा कालचा दिवस टी.व्ही. पंच डॅरिल हार्पर यांनी केलेल्या ढोबळ चुकांनीच अधिक गाजला. सरवानने २८० चेंडूंना तोंड देत काढलेल्या नाबाद १८४ धावांच्या जोरावर पुन्हा एकदा कसोटी सामना वाचविण्याच्या यजमान वेस्ट इंडिजच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यामुळे पुढच्या आठवडय़ात त्रिनिदादला होणारा पाचवा व शेवटचा कसोटी सामना मालिकेचा निर्णायक कसोटी सामना असेल, हे सुद्धा कालच्या खेळाने जवळजवळ निश्चित केले आहे.

दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या डावात दमदार सुरुवात
जोहान्सबर्ग, १ मार्च / वृत्तसंस्था

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलामीच्या कसोटीतीच पराभव टाळण्याचे आव्हान उभे ठाकलेल्या दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावाची सुरुवात दमदार केली. वाँडर्स स्टेडियमवर सुरू असलेल्या या कसोटीच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या ४५४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने चहापानापर्यंत बिनबाद ५७ धावांची मजल मारली होती. गेल्या डिसेंबर महिन्यात याच प्रतिस्पध्र्याविरुद्ध दक्षिण आफ्रिकेने पर्थ कसोटीत असेच भले मोठे आव्हान यशस्वीरीत्या पार केले होते.दरम्यान, २००२-०३ मध्ये वेस्ट इंडिजने दिलेले ४१८ धावांचे ऑस्ट्रेलियाने यशस्वीपणे पार केले होते. चहापानाला खेळ थांबला तेव्हा नील मॅकेन्झी आणि कर्णधार ग्रॅमी स्मिथ प्रत्येकी २८ धावांवर नाबाद होते.

 

भारताच्या सहा कसोटीपटूंना अखेर मिळणार सरावाची संधी
वेलिंग्टन, १ मार्च/वृत्तसंस्था

कसोटी मालिकेपूर्वी सराव मिळण्यासाठी भारताचे कसोटी संघातील सहा खेळाडू येथील स्थानिक स्पर्धातून खेळणार आहेत. न्यूझीलंड क्रिकेट मंडळातर्फे आज ही माहिती देण्यात आली.
व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, राहुल द्रविड, अमित मिश्रा, मुरली विजय, लक्ष्मीपती बालाजी आणि धवल कुलकर्णी हे सहा खेळाडू स्थानिक स्पर्धातील दोन फेऱ्यांमध्ये खेळणार आहेत. इंडियन क्रिकेट लीग (आयसीएल) मध्ये खेळलेल्या न्यूझीलंडच्या खेळाडूंचा समावेश नसलेल्या संघातून भारतीय खेळाडू खेळणार आहेत. राहुल द्रविड हा स्टेट कँटरबरी विझार्ड्स या संघाकडून, अमित मिश्रा, मुरली विजय हे स्टेट सेंट्रल स्टेजेस संघाकडून, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण हा स्टेट ओटॅगो व्होल्ट्स संघाकडून, लक्ष्मीपती बालाजी, धवल कुलकर्णी हे स्टेट वेलिंग्टन फायरबर्ड्स संघाकडून खेळणार आहेत.

मोदी यांची घसरगुंडी
जयपूर, १ मार्च / वृत्तसंस्था

२००५मध्ये राजस्थान क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर ललित मोदींची कारकीर्द वादविवादांमुळे चर्चेत राहिली. फेब्रुवारी २००५ - वादग्रस्त निवडणुकीनंतर किशोर रुंगठा यांना पराभूत करून ललित मोदी राजस्थान क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षस्थानी; ३८ वर्षे संघटनेवर वर्चस्व गाजविलेल्या रुंगठांची सद्दी संपुष्टात ११ डिसेंबर २००८ - वसुंधराराजे निवडणुकीत पराभूत; वसुंधराराजे यांच्यासाठी निवडणुकीदरम्यान मोदी यांनी पडद्यामागून महत्त्वाची भूमिका बजावली होती.

आफ्रिकेचा काही नेम नाही..
विजयासाठी २७६ धावांची गरज
जोहान्सबर्ग, १ मार्च / वृत्तसंस्था

जगज्जेते होण्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ अशक्यप्राय धावांचा पाठलाग करण्यासाठी मागे राहणार नाही हे त्यांनी ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मातीत पराभूत करून दाखवून दिले असून याचाच प्रत्यय उद्या देखील येण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलामीच्या कसोटीच्या शेवटच्या दिवशी दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी २७६ धावांची गरज असून त्यांचे दोन फलंदाज तंबूत परतले आहेत. दक्षिण आफ्रिकेची दिवसअखेर २ बाद १७८ अशी अवस्था असून हाशिम अमला (नाबाद ४३ ) आणि जॅक्स कॅलीस (नाबाद २६) खेळत आहेत. दुसऱ्या दिवसअखेर पराभव टाळण्याचे आव्हान उभे ठाकलेल्या दक्षिण आफ्रिकेने दुसऱ्या डावाची सुरुवात दमदार केली. वाँडर्स स्टेडियमवर सुरू असलेल्या या कसोटीच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या ४५४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेने चहापानापर्यंत बिनबाद ५७ धावांची मजल मारली होती.

आनंदला राजबोव्हने रोखले
लिनारेस, १ मार्च / पीटीआय
विश्वविजेता आणि भारताचा ग्रॅण्डमास्टर विश्वनाथन आनंद याने लिनारेस बुद्धिबळ स्पर्धेत विजय मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, पण अझरबैजानच्या तैमूर राजबोव्हविरुद्धच्या सामन्यात त्याला बरोबरीवर समाधान मानावे लागले. या लढतीतील निकालामुळे आनंद संयुक्तपणे चौथ्या स्थानावर फेकला गेला आहे.आठव्या फेरीनंतर आनंदच्या खात्यात चार गुण असून तो नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनसह चौथ्या स्थानावर आहे तर अ‍ॅलेक्झांडर ग्रिसचुकने ५.५ गुणांसह पहिले स्थान कायम राखले आहे. युक्रेनचा व्ॉसिली इव्हानचुक व अर्मेनियाचा लेव्हॉन अ‍ॅरोनियन ४.५ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत.

भारताची न्यूझीलंडवर २-० ने मात; मालिकाही जिंकली
ऑकलंड, १ मार्च/ पीटीआय

कर्णधार संदीप सिंग आणि दिलीप तिर्की यांनी दुसऱ्या सत्रात केलेल्या प्रत्येकी एका गोलमुळे भारताने न्यूझीलंडवर चौथ्या आणि अंतिम हॉकी सामन्यात २-० असा विजय संपादन करून मालिकेवरही वर्चस्व मिळविले. पहिल्या सत्रात दोन्हीही संघ गोल करण्यात अपयशी ठरले. पण दुसऱ्या सत्रात मात्र सिंग आणि तिर्की यांनी गोल लगावले ते पेनेल्टी कॉर्नर्सवर. पहिल्या सत्रानंतर बाजू बदलल्यावर भारतीय संघाने जोरदार आक्रमणे केली आणि त्यामुळे न्यूझीलंड बॅकफूटवर ढकलली गेली. दुसऱ्या सत्रात भारताची आक्रमणे थोपविणे न्यूझीलंडला अशक्यप्राय वाटू लागले. भारतीय संघ आक्रमकमणे खेळत असला तरी त्यांना ४२ व्या मिनीटापर्यंत एकही गोल करता आला नव्हता. ४३ व्या मिनीटाला तिर्कीने जोरदार फटका लगावत पहिला गोल लगावला आणि भारताच्या विजयाचे दार उघडले गेले. कर्णधार संदीप सिंगने ६७ व्या मिनीटाला न्यूझीलंडच्या गोलपोस्टवर डावीकडे जोरदार फटका लगावत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. एकही गोल न करणाऱ्या न्यूझीलंडला या सामन्यात दैवाने साथ दिली नाही. नाहीतर पहिल्याच सत्रात त्यांच्या खात्यात गोल दिसला असला. न्यूझीलंडच्या आक्रमकपटूने भारतीय गोलपोस्टवर एक जोरदार फटका लगाविला, पण भारतीय बचावपटूच्या अंगाला लागून तो चेंडू तिथल्या तिथेच थांबला आणि न्यूझीलंडचा संघ दुर्देवी ठरला. या विजयाने भारताने ही मालिका २-० अशी आरामात खिशात टाकली आहे.

रेफरल पद्धत वादाच्या भोवऱ्यात
बार्बाडोस, १ मार्च / पीटीआय

पंचांनी बाद दिल्यानंतर त्याविरुद्ध फलंदाजाला दाद मागता येईल, अशी तरतूद असलेली रेफरल पद्धत पुन्हा चर्चेत आली आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात १४ वे शतक झळकावणाऱ्या रामनेरश सरवानची कामगिरी रेफरल पद्धतीमुळे झाकोळली गेली आहे. पायचीत बाद झाल्यानंतर चंद्रपॉल व ब्रेन्डन नॅश यांच्या चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव होते. सामना रंगतदार स्थितीत असताना या निर्णयामुळे सामन्यावर परिणाम होईल, असे मत वेस्ट इंडिजचे प्रशिक्षक जॉन डायसन व ओमकार खान यांनी व्यक्त केले आहे. सामनाधिकारी अ‍ॅलन हरस्ट यांच्याशी चर्चा केल्यानंतर अनेक बाबी लक्षात आल्या. अजूनही ही नवीन पद्धत समजून घेतली गेली नाही. पंच म्हणून काम बजावताना अनेकदा असे कठीण प्रसंग येतात. अशावेळीच खरी कसोटी लागत असते. मात्र रेफरल पद्धतीमध्ये अधिक पारदर्शकता येण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. ही पद्धत अमलात आणणे अवघड असल्याचे हरस्ट यांनी मान्य केले आहे.

बास्केटबॉल: सेनादलाचा महाराष्ट्रावर निसटता विजय
मुंबई, १ मार्च/ क्री.प्र.

रामू स्मृती अखिल भारतीय बास्केटबॉल स्पर्धेत शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या एका लढतीत सेनादलाने महाराष्ट्रावर ६४-६१ असा निसटता विजय संपादन केला. पहिल्या सत्रापर्यंत दोन्ही संघांमध्ये १५-१५ अशी बरोबरी होती. दुसऱ्या सत्रात सेनादलाने ३०-२५ आघाडी घेतली. शेवटच्या सत्रात फक्त तीन गुणांमुळे महाराष्ट्राला पराभव पत्करावा लागला. अन्य लढतींमध्ये पश्चिम रेल्वेने ओएनजीसीला ६७-६० असे नमविले तर इंडियन ओवरसीस बॅंकेने उर्वरीत भारताच्या संघावर ८६-६२ असा विजय संपादन केला. महिलांच्या सामन्यात दक्षिण रेल्वेने उर्वरीत भारताच्या संघाला ४१-२२ अशी धुळ चारली.

गावसकर आणि रिचर्ड्स आवडते खेळाडू - मियाँदाद
कराची, १ मार्च / पीटीआय

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सुनील गावसकर व वेस्ट इंडिजचा विव्ह रिचर्ड्स आपले सर्वात आवडते खेळाडू असल्याचे पाकिस्तानचा माजी कर्णधार जावेद मियाँदाद याने म्हटले आहे.
आयसीसीच्या ‘हॉल ऑफ फेम ’ साठी निवडण्यात आलेल्या ५५ खेळाडूंमध्ये मियाँदादचा समावेश आहे. आयसीसीच्या कॅप वितरण प्रसंगी मियाँदादने जुन्या आठवणींना उजाळा दिला. तो म्हणाला, ‘ अनेक खेळाडू कौतुकास प्राप्त आहेत. पण गावसकर , विव्ह यांना खेळताना पाहणे खूपच आनंददायी होते.’ गद्दाफी स्टेडियमवर झालेल्या या कार्यक्रमात मियाँदादने भारताविरुद्ध शारजा येथे झालेला सामना कारकिर्दीतील सर्वोत्तम सामना होता असे सांगितले. हनिफ मोहम्मद यांनाही यावेळी बट यांच्या हस्ते कॅप प्रदान करण्यात आली. ५५ खेळाडूंमध्ये नामांकन होणे अभिमानास्पद असल्याचे ते म्हणाले. हॉल ऑफ फेममध्येत समावेश असलेल्या जवळ जवळ सर्वच खेळाडूंसमवेत खेळण्याचा योग आला असे सांगत सर गॅरी सोबर्स माझे ‘फेवरिट’ आहेत असे हनिफ म्हणाले. माजी कर्णधार इमरान खान मात्र या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत. या वर्षांसाठी गौरविण्यात आलेल्या हॉल ऑफ फेममध्ये रॉडनी मार्श, मायकल होल्डींग, अ‍ॅण्डी रॉबर्ट्स, बॅरी रिचर्ड्स, गॅ्रमी पोलॉक या खेळाडूंचा समावेश आहे.

आसिफला केवळ दंड
कराची, १ मार्च/वृत्तसंस्था

गेल्या वर्षी दुबई येथील विमानतळावर बॅगेमध्ये अमली पदार्थ सापडल्याच्या घटनेबाबत पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहंमद आसिफ याला पाकिस्तान क्रिकेट मंडळाकडून केवळ दंड केला जाणार असल्याचे कळते. दुबई येथील विमानतळावर तपासणीत आसिफ याच्या बॅगेत अमली पदार्थ सापडले
होते.