Leading International Marathi News Daily
सोमवार, २ मार्च २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

ललित मोदी ‘आऊट’; राजस्थान क्रिकेट संघटनेच्या निवडणुकीत पराभव
जयपूर, १ मार्च / वृत्तसंस्था

‘इंडियन प्रीमियर लीग’ चे सर्वेसर्वा म्हणून ओळखले जाणारे ललित मोदी यांना आज राजस्थान क्रिकेट

 

संघटनेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत व्हावे लागले. भारतीय प्रशासकीय सेवेतील वरिष्ठ अधिकारी संजय दीक्षित यांनी मोदी यांचा १८ विरुद्ध १३ अशा फरकाने पराभव केला.
मोदी यांनी आपल्या पराभवाला राजस्थान सरकारला जबाबदार धरले आहे. अशोक गेहलोत सरकारने माझा पराभव व्हावा यासाठी प्रयत्न केले, असा आरोप मोदी यांनी पीटीआय वृत्तसंस्थेशी बोलताना केला. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या निकटच्या वर्तुळातले म्हणून मोदी ओळखले जातात. याच कारणामुळे आपल्या पराभवासाठी गेहलोत सरकारने प्रयत्न केल्याचे मोदी म्हणाले.
अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाला असला तरी राज्यात या खेळाच्या विकासासाठी काही तरी करू शकलो याचे मला समाधान आहे, असे मोदी म्हणाले.या पुढेही राजस्थानात क्रिकेटच्या प्रसारासाठी आपण कार्यरत राहू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
या पराभवाचा इंडियन प्रीमियर लीगच्या राजस्थानात होणाऱ्या स्पर्धावर कसलाच परिणाम होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेतील सामने जयपूर येथे होतील.या सामन्यासाठी प्रशासनाकडून आपणाला सर्व ते सहकार्य मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
२००५ मध्ये मोदी हे राजस्थान क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी निवडून आले होते.