Leading International Marathi News Daily
सोमवार, २ मार्च २००९
क्रीडा
(सविस्तर वृत्त)

भारताच्या सहा कसोटीपटूंना अखेर मिळणार सरावाची संधी
वेलिंग्टन, १ मार्च/वृत्तसंस्था

कसोटी मालिकेपूर्वी सराव मिळण्यासाठी भारताचे कसोटी संघातील सहा खेळाडू येथील स्थानिक स्पर्धातून खेळणार आहेत. न्यूझीलंड क्रिकेट मंडळातर्फे आज ही माहिती देण्यात आली.

 

व्ही.व्ही.एस. लक्ष्मण, राहुल द्रविड, अमित मिश्रा, मुरली विजय, लक्ष्मीपती बालाजी आणि धवल कुलकर्णी हे सहा खेळाडू स्थानिक स्पर्धातील दोन फेऱ्यांमध्ये खेळणार आहेत. इंडियन क्रिकेट लीग (आयसीएल) मध्ये खेळलेल्या न्यूझीलंडच्या खेळाडूंचा समावेश नसलेल्या संघातून भारतीय खेळाडू खेळणार आहेत.
राहुल द्रविड हा स्टेट कँटरबरी विझार्ड्स या संघाकडून, अमित मिश्रा, मुरली विजय हे स्टेट सेंट्रल स्टेजेस संघाकडून, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण हा स्टेट ओटॅगो व्होल्ट्स संघाकडून, लक्ष्मीपती बालाजी, धवल कुलकर्णी हे स्टेट वेलिंग्टन फायरबर्ड्स संघाकडून खेळणार आहेत.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कसोटी मालिकेला १८ मार्चपासून प्रारंभ होणार आहे. स्टेट ऑकलंड एसेस, स्टेट नॉर्दन नाईट्स या संघांकडून कोणताही भारतीय खेळाडू खेळणार नाही. ‘आयसीएल’ स्पर्धात खेळलेल्या खेळाडूंचा समावेश असलेल्या संघाकडून भारतीय खेळाडूंनी खेळू नये, असा स्पष्ट आदेश भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने काढलेला आहे. २७ फेब्रुवारी रोजी न्यूझीलंड क्रिकेट मंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनीय सामन्यात सचिन तेंडुलकर, दिनेश कार्तिक खेळणार होते. मात्र या सामन्यात आयसीएल स्पर्धेत खेळलेला न्यूझीलंडचा एक खेळाडू खेळणार असल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सचिन व दिनेश कार्तिक यांना या सामन्यात खेळू नका, अशा सूचना दिल्या. त्यामुळे सचिन व दिनेश कार्तिक यांनी अखेरच्या क्षणी या सामन्यातून माघार घेतली.
सचिन, दिनेश कार्तिक यांना प्रदर्शनीय सामन्यातून अखेरच्या क्षणी माघार घ्यावयास लावल्याने न्यूझीलंड क्रिकेट मंडळाने नाराजी व्यक्त केली होती.
भारतीय खेळाडूंना स्थानिक स्पर्धात खेळण्याची संधी मिळावी यासाठी स्थानिक संघातून आयसीएलमध्ये खेळलेल्या खेळाडूंना वगळण्यात येणार नाही, अशी भूमिका न्यूझीलंड मंडळाने घेतली होती. अशा परिस्थितीत भारतीय मंडळापुढे या सहा जणांना स्थानिक स्पर्धात खेळू न देणे एवढाच पर्याय शिल्लक राहात होता.
न्यूझीलंड मंडळाने या भूमिकेपासून माघार घेत भारतीय खेळाडूंना सरावाची संधी उपलब्ध करून दिली. कसोटी मालिकेपूर्वी एकही सराव सामना नसल्याने भारतीय खेळाडूंना येथील वातावरणाचा, खेळपट्टय़ांचा अंदाज येण्यासाठी स्थानिक स्पर्धेतील सहभाग मोलाचा ठरणार आहे.
भारतीय खेळाडूंना या सामन्यांतून सराव मिळेल, त्याबरोबरच न्यूझीलंडमधील युवा खेळाडूंना राहुल द्रविड, व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यासारख्या जागतिक दर्जाच्या खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी मिळणार आहे, असे न्यूझीलंड क्रिकेट मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जस्टिन वॉन यांनी सांगितले.
आयसीएलचे खेळाडू नसलेल्या संघांतून द्रविड, लक्ष्मण, विजय, बालाजी व धवल खेळणार